आयुष्याच्या वाटेवरचे प्रवासी…..

घोषणा सुरु असतात….8.12 की लोकल अमुक फलाट पर आयेगी, 8.35 की लोकल रद्द कियी गयी है….

लोकल ट्रेनचा सेकण्ड क्लासचा डबा…..

8.02 ची सी एस टी लोकल…

तीन बसायच्या सीटवर चारजण दाटीवाटीने बसतात. चौथी सीट मिळवलेल्याला अर्धाच पार्श्वभाग टेकू शकल्याने होणार्या त्रासापेक्षा चौथी सीट कमावल्याचा आनंद जास्त….

बहुतेक सगळे घामाने डबडबलेले…एकदा स्थानापन्न झाल्यावर चेहेरा आणि अंग पुसून ओला झालेला रुमाल वायु विजनासाठी वरची दोन बटणे उघडी ठेवलेल्या शर्टच्या कोलरवर घडी करून ठेवलेला…

अठरा पगड़ जाती आणि धर्माचे लोक……एकमेकांवर लिम्पुन घेतलेले….मराठी, उर्दू, हिंदी, कानडी पेपर वाचणारे….पेपर देखिल गुन्हे आणि विस्मयकारक घटना पहिल्या पानावर छापणारे….मटा, लोकसत्ता, TOI, ET ह्यांना इथे स्थान नाही! सर्वांचे साधे सामान्य कपडे….बहुतेक सर्वांच्या चपला किंवा फ्लोटर्स….बूटवाले साहेब तसे कमीच….

बहुतेकजण “पैसा कमवणे” ह्या आयुष्याच्या अंतिम ध्येयाच्या मागे वर्षानुवर्ष रोज ऊर फाटेस्तोवर धावून थकलेले आयुष्याच्या वाटेवर देवाने सोडलेले प्रवासी…

हा ट्रेन प्रवासच कितीतरी जणांच्या आयुष्यात विरळा असलेला विरंगुळा, खर्या आरामाचे क्षण देउन जातो. सीट मिळालेले भाग्यवंत तर सोडाच, अनेकजण उभ्या उभ्या देखिल ट्रेनच्या रीदमवर झोपून जातात……संसाराच्या आणि व्यवहाराच्या चक्रात अडकून पैसा कमवणे ह्या एकमेव ध्येयासाठी सकाळी घरातून बाहेर पडलेले आयुष्याचे प्रवासी सकाळी प्रवासाआधीच दमून गेलेले असतात….अनेकांच्या चश्म्याच्या फ्रेम मूळचा सोनेरी रंग आणि आकार सोडून घामाने हिरवट झालेल्या असतात आणि गर्दीचे धक्के सोसून त्यांनी “ट्रेन विशेष” आकार घेतलेला असतो…..त्या पलिकडे असलेले खोल गेलेले डोळे एकतर झोपलेले असतात किंवा बर्याचदा कंटाळलेले आणि अगतिक वाटतात….

ज्यांना पाहून ह्या सर्वांना “आपण किती सुखी आहोत” असा उगाचच दिलासा वाटतो असे भिकारी खापरीचे तुकडे बडवत किनार्या आवाजात “केशवा मधवा” गात फिरतात. मग भक्ति, कणव किंवा समाधान ह्यापैकी एखाद्या कारणाने पर्सनल लोनचे हप्ते तुम्बलेला एखादा प्रवासी त्या भिकार्याच्या डब्यात दोन रुपये टाकतो… तर कोणी डोक्यावरून हात फिरवून “भगवान् भला करेगा रे राजू” म्हणणाऱ्या हिजडयाला पैसे देतो….

सुई, कंगावे ह्यापसून इमिटेशन ज्वेलरी पर्यन्त सर्व इथे विकल जात. अट एकच. किम्मत पाच रुपया पासून वीस रुपये ह्या रेंज मधे हवी. विक्रेते “देखने का पैसा नहीं साहब” म्हणून वस्तू बिनधास्त लोकांच्या हातात देतात. मॉल मधल्या चकाचक दुकानातील इंग्रजी बोलाणाऱ्या सेल्समन च्या वाटेला जायला बिचाकणारे अनेक इथल्या सेल्समनची प्रेमळ आणि अघळपघळ वागणूक पाहून भाराउन जातात. आपल्यालापण कोणीतरी बॉस, साहेब म्हणत आहे हे ऐकून अंगावर मुठभर मास चढते…आपल्या उत्पन्नाला खरोखर परवडतील अश्या भावात आज देखिल वस्तू मिळतात ह्या आनंदात अनेकजण आनंदाने “शोपिंग” चा आनंद लुटतात…

गर्दीची स्थानके येत जात असतात…लिम्पलेल्या गर्दीवर आणखी लोकांचे थर चढत आणि उतरत असतात….

प्रत्येकजण दिवसातले चौदा पंधरा तास पैसा कमवणे आणि त्यासाठी प्रवास करणे हयात घालवत असतात…पण ज्यांच्यासाठी तो कमवायचा त्यांच्यासाठी वेळच मिळत नाही……रेल्वेचे इंडिकेटर आणि ऑफिसमधील बायोमेट्रिक ह्यांचे मिनिट आणि सेकंद संभाळताना बायको केव्हा वयस्क दिसू लागली आणि पोर केव्हा मोठी झाली ते लक्षातच येत नाही…

दाबल्यावर अनपेक्षित फोर्सने पाणी फेकून कपडे ओले करणार्या स्टेशनवरील टॉयलेटमधील प्लास्टिकच्या नळाखाली हात धुवून तेथील भिंतीवर उरल्यासुरल्या फुटक्या आरशात स्वत:चे पिकू लागलेले कल्ले आणि डोळयाखाली आलेली वर्तुळे पाहून क्षणभर विचलित झालेला आयुष्याच्या वाटेवर देवाने सोडलेला प्रवासी “चलता है यार” अस स्वत:ला समजावतो आणि पैसे कमावायला स्टेशन मधून बाहेर पडणार्या गर्दीचा हिस्सा होतो….

ट्रेन सुरूच असतात…घोषणा होताच असतात….10.17 की बदलापुर लोकल आज फलाट क्रमांक 4 से जाएगी….

mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!