ताई…
मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेसचा रु.75 टिकिट असलेला जनरल डबा. मी सीएसटी पासून बसल्याने विंडो सीट मिळालेली. गाडी हळूहळू भरते. कल्याणला त्या तिघी आणि तो चढतात. एकीचे वय साधारण पस्तीस ते अडतीस. ती त्यांची आई असते. दुसरी नऊ किंवा दहा. ती ताई असते. मग एक गोडुली पाच सहा वर्षांची अल्लड. आणि तो…आईच्या कडेवर आरामात पहुडलेला, वंशाचा दिवा म्हणून दोन बहिणींच्या पाठीवर थोडा उशीरा झालेला एक वर्षाचा छकुला!
तिघ मुल आणि ब्यागा संभाळताना त्या आईची तारांबळ उडते. मी उभा राहून तिला जागा देतो. बाळाला मांडीवर घेऊन ती बसते. पिशव्या सिट खाली जातात. दोघी पोरींपैकी धाकटी सहा वर्षांची आईला चिकटुन घुसून बसते. ताई वयाला न शोभेश्या जबाबदारीने उभी रहाते. गाडीत वडापाव, करवंदे, अंजीर पासून चिक्की विक्रेते येत असतात. धाकटी चिऊ प्रत्येक वेळेला चिवचिव करून हट्ट करते. आई नाही म्हणते, शेवटी कंटाळून एकदा फटका पण देते. ताई लगेच तिला जवळ घेऊन समजावते. मधे आई बाथरूमला जाते. बाळ ताईच्या मांडीवर ठेवून.
लोणावळ्याजवळ जेली विकणारा येतो. छोटी आशेने त्याच्याकडे पहाते. जेलीचे क्यूब पाहून तिच्या निरागस डोळ्यात खूप आनंद साठतो. आता आईला विचारायची सोय नसते. ती खट्टू होऊन ताईकडे पहाते. ताई डोळ्यांनी तिची समजूत काढायचा प्रयत्न करते. छोटी डोळ्यांनीच ताईला रागावते. मी एक चिक्की घेताना एक जेलीची छोटीशी डबी घेतो. हसून छकुलीच्या पुढे धरतो. तिच्या डोळ्यात आनंद आणि निरागस चेहऱ्यावर मला देव दिसतो. आई पिल्लात अडकलेली असते. छकुली ते घ्यायच्या आधी ताईकडे विनवणी करत पहाते. ताई नजरेने दटावते. पिल्लू खट्टु होते. मग मी बोलतो. ताईला सांगतो “अग माझ्या घरीपण तुझ्याएवढीच एक मुलगी आहे. तू मला तिच्यासारखीच. घेऊ दे खाऊ हिला.” ताई आईकडे कटाक्ष टाकते. आई माझ्याकडे पहाते. मी हातातील डबा दाखवून स्मित करतो. आई ताईला होकार देते. ताई छोटीला ओके म्हणते. छोटी डबा हातातून हिसकावून मला “thank you uncle” म्हणून डबा उघडू लागते!
ह्यात आई, छोटी मुलगी आणि ते बाळ ह्यांचे वागणे नैसर्गिक वाटले. पण ती ताई? पाठीवर दोन भावंडे झाल्यावर आठ ते दहा वर्षांच्या त्या चिमुरडीला इतकी समज यावी? लहान भावंडांना तिचा आई इतका आधार आणि आदर असावा? खेळण्या बागडण्याच्या वयात तिने इतका जबाबदारपणा दाखवावा? नवव्या, दहाव्या वर्षीच ताई ह्या बिरुदाबरोबर तिचे काही अंशी आईची जबाबदारी घेणे मला चक्रावून गेले. हे ट्रासझिशन इतक्या सहज आणि लवकर फक्त स्त्रीयात होऊ शकते असे मला वाटते! कोवळ्या वयात सुद्धा गरज पडल्यावर आईची माया, जाबाबदारी, मैच्युरिटी दाखवणार्या त्या ताईच्या डोक्यावरून मी मायेने हात फिरवून सुखी रहा आयुष्यभर असा मनोमन आशीर्वाद दिला! ती गोड हसली! मला तिच्या जागी माझी मुलगी हसताना दिसली!!!
Image by OpenClipart-Vectors from Pixabay
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023