नाही

अंबानी हॉस्पिटल मधील ट्विन शेअरिंग रूम मधील शेजारच्या बेडवरील पेशंट एकतर बराच लोकप्रिय असावा किंवा त्याच्या नातेवाईकांना हॉस्पिटल म्हणजे साइट सीइंग किंवा मज्जा करायची जागा वाटत असावी. हॉस्पिटल मध्ये एक लाल पास दिला जातो. तो धारण करणारी व्यक्ति चोवीस तास तिथे रुग्णाबरोबर राहू शकते. तसेच दोन ग्रीन पास देतात. ते घेऊन विजिटिंग आवर मध्ये एका वेळेस दोन लोक रुग्णाला भेटायला येऊ शकतात. काल संध्याकाळी शेजारील रुग्णाच्या बायकोने हसतमुखाने आमचे ग्रीन पास “10 मिनिट्स ओन्ली” म्हणून मागून घेतले. आणि दहा मिनिटांत पाच नातेवाईकांना (त्यांचे तीन आणि आमचे दोन पास वापरून) घेऊन वर आली! त्यांचा टीव्ही पाहून आणि गप्पांचा अड्डा संपल्यावर आणखी पाच आले. परत तोच कार्यक्रम! आमच्या तीन पासवर ससुबाई एकट्याच होत्या. मला वर यायचे असल्याने मी पाससाठी फोन केला. त्या म्हणाल्या पास शेजाऱ्यांकडे आहेत! मला आमच्याच पासासाठी अर्धा तास थांबावे लागले!

आज सकाळी त्याच बाईंनी आमचे सर्व पास मागितले…लाल पास सकट! मी इतकेच सांगितले की “सिक्युरिटीवाला हमको कल पूछ रहा था| आप को पकडा तो प्रॉब्लम होगा|” ती घाबरून निघुन गेली! नातेवाईकांना “इधर सिक्युरिटी बहुत फालतू है| बहुत रिस्ट्रिक्शन है|” असले काहीतरी फोनवर सांगत होती! माझी किरकोळ मात्रा लागू पडली होती!

मल्टी लेव्हल मार्केटिंगची बकवास प्रॉडक्ट विकणारे नातेवाईक, उठसुठ उघार मागणारे आणि वेळेवर परत न करणारे मित्र, आपला पेन ड्राइव्ह, पेन, स्टेपलर इ. फुटकळ स्टेशनरीसुद्धा “टू मिनिट्स” म्हणून नेऊन परत आणून न देता आपण मागितल्यावर कुठेतरी शोधून देणारे किंवा प्रसंगी ते हरवले म्हणून “you know how I am dude! Sorry bro!” असे निर्लज्जपणे हसत म्हणून हात वर करणारे कलीग, फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ती का एक्सेप्ट केली नाही म्हणून फॉलोअप करून भंडावून सोडणारे “वुड बी फ्रेंड्स” आणि रोज भेटणारे असे अनंत लोक ज्यांना इच्छा असून देखील नाही म्हणता येत नाही…फारच कानकोंडी सिच्यूएशन होते!

ह्यापैकी फार थोडे असे असतात ज्यांना नाही म्हणावे की नाही, म्हटले तर कसे म्हणावे ह्यावर विचार करावा लागतो कारण त्यांना आपण कटवलेले कळू शकते आणि ती व्यक्ति दुखावली गेल्यास नुकसान होउ शकते! अश्या वेळी शक्यतो ह्यूमर किंवा इनेबिलिटी ह्यांच्या नकार द्यायला वापर करावा. ती एक सोपी कला आहे जी सरावाने जमु लागते!

पण कोणाकडे काय मागावे, ते कसे वापरावे ह्याची अक्कल किंवा पोच नसलेल्या लोकांना त्यांच्याच भाषेत बिनदिक्कत कटवावे! एकतर ते इतके महत्वाचे नसतात, दोन आपल्याला कटवले जात आहे हे कळण्याइतकी त्यांची डोकी शार्प नसतात त्यामुळे त्यांना कळत नाही आणि तीन त्यांना बरेचदा कटवून घ्यायची देखील सवय असते त्यामुळे त्यांना राग येत नाही! अश्यांना बिनधास्त थातुरमातुर कारण सांगून नाही म्हणावे!

Image by KoalaParkLaundromat from Pixabay

mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!