फिरणारे कुत्रे…
मला प्राण्यांची आवड आहे. कुत्रे तर विशेष प्रिय आहेत. ते अनेकवेळा माणसापेक्षा जास्त हुशारी आणि प्रेमाची प्रचिती देतात. पण अनेकदा मनात विचार येऊनही घरात कुत्रा पाळायची हिम्मत झाली नाही. त्या करीता लागणारा वेळ, पेशंस ह्याचा माझ्याकडे असलेला आभाव हेच कारण असावे. परंतु मित्र आणि ओळखीच्यांकडे कुत्रा असेल तर मी आवर्जून त्याच्याशी खेळतो, त्याचे लाड करतो. अट एकच माझ्या चेहर्याला चाटायच नाही. काही कुत्री ऐकतात काही चटतात! मला वाटत मुल जशी आई वडिलांवर जातात तशी कुत्री मालकांनवर जात असावी!
रोज सकाळी वॉकला जातो तेव्हा अनेक मालक आपापल्या कुत्र्यांना “फिरवायला” घेऊन आलेले असतात. विविध जाती, आकार, प्रकृति आणि पेहेरावातील कुत्रे आणि मालक मालकीणी पहाटेच्या प्रहराला बाहेर पडलेले दिसतात. मग मालकांमुळे मैत्री झालेली कुत्री आणि कुत्र्यांमुळे मैत्री झालेले मालक मालकिणी एकमेकांना संभाळत, साखळीने ओढत, गचके देत घेत रस्त्याच्या कडेला मैफिली जमावतात. ह्या सर्व “फिरवाफिरवित” आज एका मालकिणीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. तिचा गोंडस, लाल शर्ट घेतलेला लॅब्रेडॉर तिला खेचत चालत होता. त्याचे “फिरायचे” विशिष्ट ठिकाण आल्यावर त्याने “फिरणे” उरकले आणि त्या सुस्वरूप मालाकिणीने बरोबर आणलेल्या कागदाने ते “फिरणे” उचलून कचरा कुंडीत टाकले!
मी एक लॅप संपवून परत येत असताना कुत्रे, मालक मालकिणी आणि बघ्यांची थोडी गर्दी जमली होती. पहातो तर ती मघाची मालकीण इतर मालक मालकीणींना तिने केलेली सफाइची कृती त्यांनी सुद्धा अंगिकारावी ह्याबद्दल समजावत होती. बहुधा “हे विश्वाची शौचालय” समजून कुत्र्याचे “फिरणे” रस्त्यावर ठिकठिकाणी पेरुन रोज हळूच कल्टी मारणाऱ्या एखादे मालक/ मालकीण हिला दिसले असावे आणि त्याला/ तिला समजावण्यातून सुरुवात होऊन कॉमन इंटरेस्ट असलेले इतर जमा झाले असावे. बहुतेक मालक/ मालकीणी आणि कुत्रे सुखवस्तु आणि सभ्य असल्याने “You have a point. We should do this” पासून “Why not? We used to clean it ourself while in the US…then why not here? Let’s do it from tomorrow!” पर्यन्त प्रतिक्रया आल्या. त्या सुस्वरूप मालकिणीला Thanks वगैरे म्हणून झाले. आता उद्यापासून काही बदल दिसेल अशी एक अपेक्षा आहे. अन्यथा सार्वजनिक रस्ते आणि मैदाने ही आपल्या कुत्र्यांना “फिरण्यासाठी” आपल्या तीर्थरूपांनी आंदण दिलेली शौचालये आहेत हा ठाम ग्रह करून तिथे कुत्र्यांना “फिरवणारे” बहुसंख्य मालक पाहायाची सवय आपल्याला आहेच!
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023