मी हरवलो होतो ती गोष्ट…..

साधारण 3 वर्षांचा असेन मी तेव्हा. मी बाबांबरोबर बऱ्याच वेळेला संध्याकाळी गिरगावातील त्यांच्या मित्राच्या दुकानात जायचो. आमच्या घरापासून साधारण अर्धा किलोमीटर असलेले ते दुकान रस्त्याला लागून होते. बाबा फुटपाथवर उभे राहून काउनटर पलीकडच्या मित्राशी गप्पा मारायचे आणि मी त्यांच बोट धरून काचेपलीकडची खारी बिस्किट, चिवडा, रस्त्यावरची लोकं, टांगे. सिग्नलचे लुकलुकणारे रंगीत दिवे आणि रहदारी बघत असायचो. असा तो आठवड्यातून ३ ते ४ दिवसांचा रम्य कार्यक्रम असे. तर एक दिवस बाबा बोलण्यात गुंग होते आणि का कसा माहित नाही पण मी बाबांचं बोट सोडून निघालो. बाबांच्या लक्षात यायला काही सेकंद गेले असतील, पण तो पर्यंत मी नजरे आड झालो होतो. बाबा मला शोधात फिरत होते. पण मी दिसलो नाही. मला शोधात बाबा घरी पोहोचले. घरी मी हरवल्याचे कळतच सर्वांना धक्का बसला. आई, बाबा, काका, चाळीतले शेजारी मला शोधायला निघाले. ते चाळीच्या जिन्यापर्यंत पोहोचले तेवढयात मी एका माणसाबरोबर जीने चढून वर येत होतो! मला पाहून आईला रडू फुटले! मला काय झाला ते कळत नव्हते. फक्त आईने जवळ घेतल्यामुळे बरे वाटत होते! ह्यातील महत्वाचा भाग पुढेच आहे.

बाबा आणि काका त्या माणसाचे आभार मनात होते. तो गिरगावकरच होता. त्या माणसाने सांगितले कि तो ठाकुरद्वार वरून भुलेश्वरच्या दिशेने चालत जात होता. मी एका गल्लीच्या नाक्यावर अचानक त्याचे बोट धरले आणि चालू लागलो. त्याला आश्चर्य वाटले. पण तो मुद्दाम काही बोलला नाही. त्याला वाटले जर तो बोलला तर मी घाबरून जाईन. म्हणून त्याने माझ्याबरोबर शांतपणे चालायचा निर्णय घेतला. माझ्या घरापासून बाबांच्या मित्राच्या दुकानापर्यंतचा रस्ता बरेचदा जाऊन बहुधा मला पाठ झाला असावा. त्या काळी रस्त्यावर रहदारी पण कमी होती. मी त्या माणसाचे बोट धरून चालत चालत सरळ घरी गेलो!

त्या माणसाने मला माझ्या तंद्रीत चालू दिल्यामुळे आणि मला पण बहुधा बाबांचं बोट धरल्यासारख वाटत असल्यामुळे आम्ही सहज घरी पोहोचलो. आता मनात विचार येतो कि जर तो माणूस मध्येच माझ्याशी बोलला असता तर????? तर माझी तंद्री तुटली असती, मी नक्की घाबरलो असतो, रडलो असतो आणि नक्कीच घरी जाऊ शकलो नसतो. मला माहित नाही की तेव्हा मला माझा पत्ता सांगता येत होता की नाही. आणि बरोबर बाबा नाहीत म्हटल्यावर असुरक्षिततेमुळे वाटणारया भीती ने मला येत असता तरी मी सांगू शकलो नसतो. मग घरी चालत जाण तर दूरच राहिल! मग पोलिस, शोधाशोध सगळं झाल असत. फारसा लांब नसल्याने कदाचित मी घरच्यांना सापडलो पण असतो …..पण बऱ्याच मानसिक त्रासानंतर! आणि…आणि कदाचित सापडलो नसतोपण…… जर तो माणूस विचारपूर्वक माझ्याबरोबर शांतपणे चालत आला नसता तर? मी त्याच्या ऐवजी आणखी कोणाचं बोट धरलं असतं तर? खरच मला कोणी पळवुन नेलं असतं तर? भयानक विचार आहेत! असो…..

आज जर एखाद मुल असं हरवलं तर किती शक्यता आहे ते मिळायची? माझ्या लहानपणी उपरे, उपटसुंभ, गुन्हेगारी वृत्तीचे लोक फार कमी होते एकंदरीतच. त्यामुळे कदाचित मी वाईट माणसाच्या हातात नाही सापडलो अनु सुखरूप घरी पोचलो. तो माणूस त्या वेळेला आणि आजही आमच्यासाठी देव होता/आहे…

mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!