“लॉट है सेल है “!!!!

बर्याच दिवसापासून मनात होते पण लिहायला वेळ मिळाला नाही. काही दिवसांपूर्वी माझ्या घरातील एक इलेक्ट्रिक प्लग नादुरुस्त झाला (दोनच वर्षापूर्वी नवीन घेतलेला). कॉम्प्लेक्सच्या एलेक्त्रिशियनला बोलावले. त्याने तो दुरुस्त न करता बदलून टाकला. वर माहिती अशी दिली कि हल्ली काहीच शक्यतो दुरुस्त होत नाही. बदलूनच टाकावे लागते. मला लहानपणीचे गिरगावातले काळ्या रंगाचे इलेक्ट्रिक प्लग आणि काळ्या पांढर्या रंगाची बटने आठवली. ती बहुधा माझ्या आजोबांच्या तरुणपणापासून लावलेली होती आणि दोन पिढ्या चालली. चालू स्थितीतील ती बटने फक्त नुतनीकरण करताना काढून टाकावी लागली. मग मला अश्या बर्याच गोष्टी आठवल्या ज्या टिकायच्या, दुरुस्त व्हायच्या/ करून घेतल्या जायच्या आणि लोक आनंदाने त्या वापरत देखिल होते. घरातील भांडीकुंडी, बेड, कपाटे, आरसे, गाद्या, पांघरुणे, चपला व अनेक वस्तू! भांड्यांना कल्हइ केली जायची, चपला शिवून घेतल्या जायच्या, चाकू सूर्यांना धार काढली जायची, कापूस पिंजून गाद्या उश्या फुलवल्या जायच्या, कपड्यांना रफू केले जायचे! तेव्हा आधुनिकपणा आणि आकर्षक बाह्य रूप ह्यापेक्षा टिकाऊपणा हा कोणतीही गोष्ट खरेदी करण्याचा निकष होता. जीवनावश्यक वस्तू “दुरुस्त” करून वापरण्यात कमीपणा नव्हता. पण काळाबरोबर जसा माणसाच्या “depth ” पेक्षा “shallowness ” सवंग प्रसिद्धीचा आणि लोकप्रियतेचा सोपा मार्ग झाला त्याचप्रमाणे “दर्जा” पेक्षा “गवगवा आणि नाविन्य” हे वस्तू खरेदी करायचे निकष बनले. ज्याच्याकडे “latest ” वस्तू त्याची पत भारी. मग सारखं नवीनच घ्यायचं, काही महिन्यात/ वर्षात बदलायचं ह्या प्रवृत्तीमुळे वस्तूंचा “टिकाऊपणा/ दर्जा” पहायची गरजच संपली. मग काय वस्तूंचे निर्माते देखिल वस्तू बनवतानाच त्यांचे आयुष्य कमी कसे राहील ह्याची खबरदारी घेऊ लागले. “जुने देवूनी नवीन घ्या” सांगणारे “मायाबाजार” अनेक वेबसाईट वर मांडले गेले. हल्लीतर कित्येक लोकांना चिरंतन संस्कारी विचार आणि ते सांगणारे लोक देखिल “out of trend ” वाटू लागल्याचं जाणवत. दृढ नाती आणि नातेवाईक ह्यापेक्षा सोयीस्कर “रिलेशनशिप” अनेकांना जवळच्या वाटू लागल्याचं चित्र समोर येत. भाऊबीज आणि पाडवा ह्यापेक्षा “दिखाऊ” Valentine day साजरा करण्याची चढाओढ दिसून येते. सतत नव्याची आसक्ती आणि क्षणभंगुर आनंदाचा हव्यास ह्या मागे जग धावू लागलेलं आहे अस वाटू लागतं. चंगळवाद कि काय म्हणतात तो हाच का असा प्रश्न पडतो…. असो. माझ्या ३ वर्ष वापरलेल्या बुटाचा सोल जरा उसवला आहे. कुठे शिवणारा आढळतो का ते शोधतो. नाहीतर आहेच “लॉट है सेल है “!!!!

mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!