विवेक आणि काटकसर….
लहानपणी माझ्या आजीच्या तोंडून ऐकलेले शब्द “विवेक आणि काटकसर”. त्या पिढीतल्या ब्राह्मण लोकांनी नक्कीच आयुष्याचा हाच “mantra ” ठेवला आणि होती त्या परिस्थितीत आनंदाचे जीवन जगले. इतकेच नव्हे तर त्यामुळेच पुढील पिढ्यांना स्वतःपेक्षा जास्त आर्थिक समृद्धीपूर्ण आयुष्य देऊ शकले. आमच्या आई वडिलांनी देखील अगदी आजी आजोबानइतका नसला तरी आयुष्याचा तोच mantra ठेवला. निदान स्वतःपुरता तरी नक्कीच. म्हणजे मुलांना काही हवं असेल तर शक्यतो नाही म्हणायचं नाहीआणि स्वतःवर खर्च फक्त “गरज” असेल तेव्हाच करायचा. गरज म्हणजे सुद्धा विवेक केल्यानंतर देखील प्रकर्षाने जाणवणारी अयाश्यक गोष्ट! त्याचा आमच्या पिढीला नक्कीच फायदा झाला. ते आमच्यासाठी काहीतरी साठवू किंवा ठेऊ शकले. आता मी स्वतः पालकाच्या भूमिकेत आल्यावर मला “विवेक आणि काटकसर” ह्यांची प्रकर्षाने आठवण होते आणि त्याचे महत्व पण पटते. पण माझ्या अनेक समवयस्क मित्रमैत्रीण आणि नातेवाइक ह्यांना ही संकल्पना आता कालबाह्य झाली आहे असे वाटते. मी तसे वागू नये किंवा मी तसे वागलो तर काहीतरी जुनाट आणि बुरसटलेल करतोय असं देखील ते मला वारंवार सांगतात. “One life , जी लो जी भर के, कल किसने देखा” ह्या आणि अश्या संकल्पना हे आज चे सत्य आहे असं त्यांचा म्हणणं आहे. क्वचित प्रसंगी माझी व्यवहार्य काटकसर माझा “कंजुषपणा” म्हणून देखील हिणवली जाते. मला खरच फरक पडत नाही. ते माझे हितचिंतक आहेत आणि माझ्या भल्यासाठीच ते बोलत असतात ह्याची मला जाणीव आहे. फक्त ह्या समूहावर लोकांचे विचार जाणून घ्यावेसे वाटले म्हणून ही पोस्त. पिढ्यानपिढ्या चालत आलेली विवेक आणि काटकसर ही संकल्पना खरच कालबाह्य झाली आहे का? ती मानणारा माझ्या पिढीमध्ये ह्या पृथ्वीतलावर मी एकटाच जीव आहे का? गरजेप्रमाणेच खरेदी करणे ह्या ऐवजी खरेदी केली म्हणून गरज निर्माण करणे किंवा जाहिरातींमधून उत्पादकांनी निर्माण केलेल्या भ्रामक गरजेला बळी पडून खरेदी करणे असे केले तरच आपण तथाकथित आधुनिक जगात जगायला लायक आहोत अशी परिस्थिती आहे का? ऋण काढून मोठे खर्च करून केलेला देखावा हाच मोठेपणाचे लक्षण राहिले आहे का? आपण मजा मारून पुढच्या पिढीला आर्थिक दृष्ट्या दुर्बल करणे म्हणजेच “live life king size ” का? तसे असेल तर मला कोणी किंग नाही म्हटलं तरी बेहत्तर पण माझ्या पुढल्या पिढीला कोणासमोर हात पसरवायची गरज नाही पडणार ह्याची तजवीज करणे मला जास्त महत्वाचे वाटते!!!
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023
ही तुमची कथा किंवा स्फुट म्हणू पण ही आजच्या मध्यम वर्गातील आजही सत्यता आहे मी आणि माझा नवरा दोघेही गिरगावतले आणि आमचे पालक अगदी असेचआणि आता आम्हाला मुलगी झाल्यावर ते कळते