सुनील सहस्त्रबुद्धे….
एस टी ने तिठयावर रिवर्स घेतला. नाकातोंडात उडणारा धुरळा झेलत मी, काही मैलांवर कॉलेज असलेल्या आणि मोबाईलमधे डोक खुपसलेल्या काही मूली, ऐशी वर्ष सहज पार केल्या असतील अश्या एक काटक आजी आणि दोन सामान्य व्यक्तिमत्वाचे पुरुष त्यात चढलो. फाटलेल्या सीट्स आणि खड़खड़ वाजाणार्या खिडक्या ल्यालेल्या बसच्या चुणचुणित वाहकाने डबल बेल मारली. मी खिडकीतून 13 वर्षाच्या गोड हर्षला टाटा केला आणि परत धुराळयाचा एक घास भरवत बसने केळये गावाचा तीठा सोडाला आणि ती रत्नागिरिकडे निघाली!
रत्नागिरीमधे काही कामानिमित्त शनिवारी जाणे झाले. हॉटेलमधे चेकिन करून ठरलेल्या मीटिंग्स झाल्या. संध्याकाळी नेहेमीचे हॉटेलमधे बसून टीव्ही पहाणे झाले. पण “रत्नागिरीत आल्याचा” फील येत नव्हता. Something was missing! मग सुनीलला फोन लावला!
सुनील सहस्त्रबुद्धे. आमचा शाळेतील मित्र. गिरगावकर! कॉलेज संपल्यावर अस्मादिक धोपट मार्गाने चार टिकल्या कमवण्यासाठी आयुष्यभराच्या नोकरी नामक गुलामगिरीच्या शोधात होतो तेव्हा त्याने एक धाडसी निर्णय घेतला. मुंबई सोडून गावाला, रत्नागिरीला जाऊन “धंदा करायचा”! अनेकांनी वेड्यात काढले. “मुंबईला लोक करियर करायला येतात आणि तू गावाला जातोस?” इथपासून “अनुभव येईल तोवर उशीर झाला असेल” इथवर सर्व कॉमेंट्स झाल्या. ह्या सर्व गदारोळात फक्त त्याचे वडील त्याच्या पाठीशी भक्कम उभे होते! सुनील गावाला गेला! गावात वडिलोपार्जित घर, तिथे राहाणारे प्रेमळ दादा वाहिनी, काही गुंठे जमीन आणि दुर्दम्य इच्छाशक्ति ह्या भंडावालावर सुनील बऱ्याच मित्रांनी नाकारलेल्या आयुष्याच्या वाटेवर निघाला! घराच्या बाजूच्या प्लॉटवर एक शेड उभारून त्याने कोकणातील खास पदार्थांची ओळख बाहेरील लोकांना करून देण्यासाठी “कोकण प्रोडक्ट्स” नावाचा ब्रांड सुरु केला!
मग आम्ही सगळेच “चरितार्थ, संसार” ह्या चक्रात अडकलो. वर्षामागून वर्ष गेली! सुनील मुंबईला आला की भेट व्हायची. त्याच्या व्यवसायातील प्रगती कळायची. काही किलोने सुरुवात झालेली क्वांटिटी त्याच्या व्यवसायात सक्रिय सहभाग घेणाऱ्या त्याच्या भागीदारामुळे टनात गेली. तो भागिदार म्हणजे त्याची बायको! हाताने होणाऱ्या प्रॉडक्शनला वाढत्या मागणीमुळे हळूहळू यंत्रांची साथ लाभली! एका फॅक्टरीची जागा चार प्रोडक्शन यूनिट्सने घेतली. सुनिलचा व्यवसाय विस्तारत होता!
माझा फोन झाल्यावर रविवारी सुनिलच्या घरी, केळये गावत जेवायला जायचा प्लान ठरला. सकाळी सुनील आला. मला खालून फोन केला. मी चावी रिसेप्शनवर ठेवून हॉटेलच्या बाहेर गेलो. सुनील उभा होता. त्याच्या इनोव्हा गाडीच्या बाजुला! आमचा शाळेतील एक मित्र, आजचा यशस्वी व्यावसायिक! असे अनेक यशस्वी व्यावसायिक मित्र आहेत मुंबईमधे. पण मुंबई सोडून, कम्फर्ट झोन मधून बाहेर पडून शून्यातून स्वर्ग उभा केलेला सुनील त्या सर्वांहून वेगळा आणि म्हणूनच त्याच्या यशाचे कौतुक देखील स्पेशल!
आम्ही निघालो. गाडीने रत्नागिरी “शहर” सोडले. हळूहळू मनातले कोकण डोळ्यासमोर दिसू लागले. लाल चिर्याची कौलारू घरे, माडांच्या वाड्या, आंब्याच्या बागा, नागमोडी वळणे घेणारे चिमुकले रस्ते आणि साधे लोक! सुनीलने गाडी पार्क केली. आम्ही लाल चिर्याच्या पायऱ्या असलेली घाटी उतरून माडांनी वेढलेल्या त्याच्या टुमदार घरापर्यन्त पोहोचलो.
त्याच्या दादाने काही वर्षांपूर्वी योजनाबद्धपणे परत बांधून घेतलेले घर म्हणजे कोकणातील पारंपरिक घर आणि आधुनिक सुविधा ह्यांच्या अप्रतिम संगम आहे. घरात झोपळा आहे आणि त्याच्या बाजूला अद्यावत संगणक आहे! टिपिकल कोकणी माणसासारखा घरात उघडा बसलेला त्याचा दादा इंजिनियर आहे. त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे. सुनिलच्या सर्व फॅक्टरी पाहून, भरपूर गप्पा झाल्यावर देव दिवाळी निमित्त केलेल्या घावनांवर आणि सुग्रास जेवणावर आडवा हात मारून मी निघालो. “आता जेवण झाल्यावर घाटी कशाला चढतोस? हर्ष काकाला शॉर्टकटने तीठ्यावर सोड” सुनिलने सांगितले. मी सर्वांना अच्छा करून हातात असलेली काठिे झाडांवर मारत एका अंगणातून दुसऱ्या अंगणात, एका वाडीतून दुसऱ्या वाडीत भिंतींच्या मधे लावलेल्या पण वहिवाटिसाठी सतत उघड्या असलेल्या गेट्स मधून झरझर सराइतपणे चलणाऱ्या हर्षच्या मागे चालत होतो. “रत्नागिरी शहरात” असलेल्या हॉटेलात परतायला बस पकडण्यासाठी!
आज मुंबईच्या परतीच्या वाटेवर एक विचार मनात येतो आहे. मुंबईमधे राहून आज थोडेफार यश कमवलेले आम्ही आणि गावात रहायचा निर्णय घेऊन यशस्वी झालेला सुनील हयात जास्त सुखी किंवा आनंदी कोण आहे? मान्य आनंद हा मानण्यावर असतो. पण घड्याळाच्या काट्याबरोबर धावणार, प्रदुषण आणि गर्दीच्या विळख्यात अडकलेल, वन किंवा टू बेडरूम मधे बंदिस्त झालेल आयुष्य आणि निसर्गाच्या कुशीत, प्रदुषण आणि गर्दीमुक्त, वेग आपल्या हातात असलेल आयुष्य ह्यापैकी जास्त आनंद कशात मिळेल? असो तो प्रत्येकाचा वैयक्तिक चॉइस आहे. पण एक गोष्ट नक्की…भविष्यात विक्राळ रूप घेऊन जगणे कैक पटीने कठीण करू शकणाऱ्या शहरी आयुष्याचा सामना करायची वेळ येणाऱ्या भावी पिढीला पर्याय शोधताना सुनीलसारख्या लोकांची उदाहरणे नक्कीच प्रेरणादायक ठरतील!
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023