Too close for comfort…

“बॅग खाली ठेवा” एक विशीतील पोरगा म्हणाला! मी चमकून त्याच्याकडे पाहिले आणि मांडीवर धरलेल्या माझ्या बॅकपॅक वरची ग्रीप घट्ट केली!

मग ड्रायव्हर म्हणाला “भाऊ बॅग इथे द्या”. मला कळेना की माझ्या बॅगमधे असे काय आहे की ती अचानक सर्वांना हवीहवीशी वाटू लागली! एव्हाना तो विशीतला त्याचे डोके माझ्या नाकावर दाबून जवळ जवळ माझ्या मांडीवर बसायच्या प्रयत्नात होता! इतक्या जवळ बायको आणि कन्या ह्यांच्या व्यतिरिक्त कोणीच येण्याची सवय नसलेला मी स्तंभित झालो होतो. काय होतय ते कळण्यापूर्वीच ड्रायव्हरने माझी बॅग आमच्या मधे बसलेल्या भैयाच्या खांद्यावरून हात लांब करून घेतली! अचानक त्या विशीतल्याने माझ्या दोन पायात साधारण बहाहत्तर अंशाचा कोन केला आणि मला “जरा मागे व्हा दादा म्हणून तो त्याची पाठ माझ्या तुंदिल पोटावर दाबून, त्याचे केस माझ्या नाकात हुळहुळत माझी बॅग त्याच्या हातात धरून “तयार केलेल्या” जागेवर अर्धा पार्श्वभाग टेकला आणि 14 माणसांनी ओथंबललेली ती “सहा आसनी” टमटम जागेवरून हलली!!!

आज बदलापूर जवळील कान्होर नामक गावी एका मीटिंगसाठी जायचे होते. मी मीटिंगला साजेशी वेशभूषा करून… हुशारी, प्रोफेशनलीझम, प्रेझेंटेबिलीटि ह्या सर्वांचा ओतप्रोत साज लेऊन घरून निघालो. लोकल ट्रेन नामक नरकाच्या यातना तश्या कमी होत्या कारण मी “अगेंस्ट ट्रॅफिक” जाणार होतो. CST ला ट्रेन पकडली. बदलापूर स्थानकात उतरून इतर उतारूंचे अनुकरण करत रेल्वे लाईन एका उडीत ओलांडून तुटलेल्या भिंतीला पार करून शॉर्टकटने रस्ता गाठला! तिथून कान्होरला जायला लाल डबा किंवा टमटम हे दोनच पर्याय असतात! मी इमानदारीत टमटमकडे गेलो. मागील सीटवर चार कॉलेज कन्यकांचा “छावे” विषयावरील रंगलेला परिसंवाद ऐकून उगाच डिस्टर्ब नको ह्या उदात्त भावनेने मी ड्रायवहरच्या शेजारील “अढळपद” पटकावून तंगड्या पसरून TOI वाचू लागलो.

यथावकाश आम्ही पाच चे नऊ झालो. मागील दोन सिटवर प्रत्येकी चार असे आठ लोक कोम्बले…मग त्यांच्या मधे पायात पाय घालून कामरेत वाकलेले दोन स्टॅंडिंग! मग एक भैया आला. हातातील भाजीच्या तीन पिशव्या माझ्या दीड तासापूर्वी पॉलिश केलेल्या बूटांवर आदळून बिनदिक्कतपणे “जरा अंदर सरको” म्हणाला! “आयला हा बाजूला बसणार?” आधीच टमटम किमान वीस मिनिटे जागेवरून न हलल्याने उशीर होत असल्याने सहन शक्ति संपत आलेला मी वैतागलो! “तुम अंदर जाव” म्हणत चरफडत खाली उतरलो आणि त्या भैयाला माझे स्थान ढळवण्याचे पातक केल्याबद्दल मनातल्या मनात चार हिंदी शिव्या हसडल्या! भैया बसला, मी त्याला चिकटून बसलो. ड्रायव्हर त्याच्या उजव्या बाजूला एकाला डकवून घेऊन बसला! इग्निशन लावून त्याने भैयाच्या दोन पायातून हात घालत सराईतपणे गियर टाकला…आता निघणार म्हणून मी निःश्वास सोडाला आणि इटक्यात हा विशितला उपटला!!!

त्याला सामावून घेताना माझा डावा पाय टमटमच्या एक फुट बाहेर लटकत होता! “खड्डयांना पडलेल्या रस्त्यामधून” ड्रायव्हर 14 गुणिले पर सीट पंधराचा हिशोब मनातल्या मनात मांडत आनंदाने गाडी हाकत होता! टमटम मधील सगळे त्या परिस्थितसुद्धा मजेत होते. मी एकटाच त्रासलो होतो! कारण? कारण शहरी जीवनात आपण स्वतःच स्वतःभवती आखलेल्या परिघात शक्यतो कुणाला येऊ देत नाही. आपल्या सोशल, प्रोफेशनल सर्कल मधील लोकसुद्धा तो परिघ ओलांडत नाहीत. चुकून तसे झाल्यास आपल्याला ते “too close for comfort” वाटून uncomfortable वाटते! ते आपण लगेच लक्षात आणून देतो आणि तसे चुकून करणारी व्यक्ति सुद्धा चटकन त्या झोनच्या बाहेर जाते!

पण आज तो टू क्लोज फॉर कम्फर्ट झोन बिनदिक्कत लांघून मला काय वाटेल ह्याची पर्वा न करता हे लोक मला चिकटले होते. मला आणि माझ्या कम्फर्टला हे नवीन असले तरी ते त्यांच्यासाठी रोजचे होते. माझ्यासाठी फक्त एक दिवसाची असहाय्यता असलेला हा प्रवास मजबूरीतून त्यानी निवडलेला शिरास्ता होता! एका खड्यातून टमटम गेली आणि माझी लिंक तुटली! मी म्हटले “What the hell? आपला कम्फर्ट झोन जरा विसरू आणि हा अनुभव देखील एन्जॉय करू” मग मी थोडा मागे सरकून त्या विशितल्याला आणखी जागा करून दिली. “बाबा पाय संभाळ माझा लेफ्टला” असे हसत ड्रायव्हरला सांगितले. तो पण काळजी करू नका असे हसत म्हणाला. भैया पण हसला! मागच्या सीटवरील कुणाच्यातरी मोबाईलवर लागलेले “तेरा प्यार हुक्का बार” कानाला सुखावू लागले. माझे ठिकाण कधी आले कळलेच नाही! ड्रायव्हरला वीस रुपयांची नोट देऊन पाच रुपये परत न घेता, माझा एक मेंटल ब्लॉक काढून एक नवीन अनुभव दिल्याबद्दल त्या सर्व 15 लोकांचे मनातल्यामनात आभार मानत मी निघुन गेलो.

परतताना टमटम गावातून भरून आली होती. मी हात दाखवला. पुढच्या सीटवर “अधळस्थानी” बसलेल्याच्या पायात मी सराईतपणे बहाहत्तर अंशाचा कोन करून “तयार केलेल्या” जागेत माझा पार्श्वभाग टेकला! टमटम सुरु झाली! ते विश्व तस्सेच होते जसे येताना होते! फरक इतकाच होता की माझ्या मागे बसलेल्याच्या नाकात हुळहुळवायला माझ्या डोंबल्यावर केस नव्हते! टमटम मध्ये कोणाच्या तरी मोबाइल मध्ये “साडी के फॉलसा कभी मॅच किया रे” सुरु झाले होते…. And I was absolutely comfortable…trust me!!!

mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!