सुख
आमच्या लहानपणी बाबा आम्हाला सलूनमध्ये केस कापायला न्यायचे. त्या सलूनमधल्या खुर्चीवर छोटे स्टूल ठेवले जायचे जेणेकरून आमचा चेहरा आम्हाला आरशात दिसेल. मग ते काका हळुवार कात्री चालवत केस कापत. मग मॅन्युअल “मशीन”ने तीन बाजूंनी केस ट्रिम करत. ते करताना कधीतरी केसाबरोबर डोक्याची स्किन त्यात अडकून एक चिमटा बसे. पण त्याची देखील जाम मजा यायची. मग वस्तऱ्याने मानेवरची आणि कानावरची “लाईन” आखली जाई. तो वस्तरा केस भादरतानची संवेदनाही मस्त वाटायची. आजही वाटते.
लहानपणी हातात तेलाच्या बाटल्या घेऊन, त्या एकमेकांवर आपटून त्यांचा आवाज करत “चंपी” असे किनाऱ्या आवाजात ओरडणारे रात्री गिरगावच्या फूटपाथवर बसलेले भैय्ये तसेच त्यांच्यापुढ्यात उघडे बंब होऊन बसलेले काकालोक आणि भैय्याने काकालोकांना तेल लावून तिंबून काढताना काकालोकांच्या चेहऱ्यावरील विलक्षण आनंद खूप टेम्पटिंग वाटायचा. मग एकदाचा जरा मोठा झाल्यावर, कॉलेजात जायला लागल्यावर मनाचा हिय्या करून त्या प्रलोभनाला बळी पडून एका रात्री गिरगावच्या नाक्यावर डोक्याला चंपी करून घेऊन “मालिश” करून घ्यायला मी देखील भर रस्त्यात उघडाबंब होऊन माझा देह भैयाच्या हाती सुपूर्द करून त्या स्वर्गीय आनंदाचा अनुभव घेतला. ते व्यसन आजतागायत सुरु आहे. चंपी, मालिश आणि त्यानंतर “तलिया” झाला की तिथेच झोपावंस वाटत. उठून घरी जायचा देखील कंटाळा येतो. इतका रिलॅक्स करणारा तो अनुभव असतो.
अजून एका गोष्टीचे मला प्रचंड कुतूहल आहे. डोक्यावर लाल रंगाचा फेटा बांधून, गळ्यात अडकवलेल्या छोटुश्या लेदर ब्यागेत अनेक बाटल्या, कापूस तसेच धातूच्या काड्या ठेवणारे “कानकोरे” मला लहापणीपासून आकर्षित करत आले आहेत. अगदी खांद्यावर धनुकली घेऊन त्याचा टsणकार करून आपले अस्तित्व जाणवून देणारे कापूस पिंजे किंवा डोक्यावरील भांडी आणि पाठीवरील कपड्यांचे ओझे सांभाळत एक हात कानावर ठेवून “भॉईंडी” असे ओरडणाऱ्या बोहाऱ्याइतकेच. बोहारी आणि कापूसपिंजे ह्यांचा ह्याची देही ह्याची डोळा अनुभव घेऊन झाला आहे. परंतु समोर बसलेल्या गिर्हाईकाची प्रत्येक वेळी ब्रह्मानंदी टाळी लावण्याचे कसब अंगी असलेल्या त्या कानकोऱ्याचा ह्याची देही ह्याची “कानी” अनुभव घ्यायची ईच्छा आणि कुतूहल आताशा प्रबळ होऊ लागले आहेत. त्यामुळे लवकरच एखाद्या निवांत संध्याकाळी कान कोरायची अपुरी ईच्छा पूर्ण करत एक स्वर्गीय अनुभव घेऊन नंतर समस्त “स्पा”ना run for their money देऊ शकणारी चंपी, मालिश आणि तलिया करून “सुखं” करायचा विचार आहे!- मंदार जोग
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023