बीपी
पूर्वी बाहेरगावच्या नातेवाईकांशी बोलायला ट्रंक कॉल बुक करायला लागायचा. काही मिनिटे किंवा तासांनी तो कॉल लागला की बेंबीच्या देठापासून ओरडत समोरच्याच्या बेंबीच्या देठाचा आवाज ऐकावा लागायचा. आजच्या जमान्यात मोबाईलवर एका क्षणात परदेशातील मित्रांशी स्काइप आणि व्हिडिओ कॉलिंग वरून संपर्क साधणार्यांना ट्रंक कॉल नामक उपासना कधीच कळणार नाही. जसे मोबाईलवर क्लिपिंग उपलब्ध असलेल्यांना चोरून बीपी पहाण्याच्या खटाटोपातील मजा अनुभवता येणार नाही.
बालक पालक चित्रपटात ह्याची हलकीशी झलक पहायला मिळाली. लोकांनी त्याच्याशी रिलेट केल्याने चित्रपट तुफान चालला. पण पर्दे के पीछे बीपी संदर्भात अनेकांचे अनेक अनुभव असतील. आम्हा मित्रांचेही काही आहेत.
त्या वेळी एखाद्या मित्राने “नेक्स्ट वीक माझ्या घरी कोणी नाहीये” असे म्हणणे आज व्होडाफोन स्टोर मध्ये आपला वेटिंग नंबर 28 असताना 20 नंतर 21 ते 27 क्रमांकचा हाकारा होऊन कोणीच न आल्याने डायरेक्ट आपला नंबर लागल्यावर मिळणाऱ्या सुखाइतके आनंददायक असे. कोणी नाही? म्हणजे संधी आहे!!! आमच्या एक नियोजन क्षेत्रात पारंगत असलेल्या मित्राकडे बाय डिफॉल्ट आमच्या बीपी पहाण्याच्या इव्हेंटच्या नियोजनाची जबाबदारी पडत असे. तो देखिल मोठ्या आनंदाने, एखाद्याने कॉन्ट्रिब्यूशन थकवले तरी फारसा तगादा न लावता, आपल्या घरचे कार्य असल्यासारखा कामाला लागे.
साधारण नववी दहावीतील मुलांचा “कल” विचारला जातो. आमच्या सदर मित्राचा एक कल बीपी पहाणे हा नक्की होता आणि आहे. त्याकाळी व्हिडिओ आणि कॅसेट भाड्याने देणारी दुकाने असत आणि काहीजण प्रायव्हेट सप्लाई देखिल करत. दुकानांवर अनेकदा धाडी पडत, साहित्य जप्त होई. तेव्हा असे प्रायव्हेट सप्लायर्स देव वाटत. अश्या अनेक सप्लायर्सचा डेटाबेस आमच्या ह्या मित्राकडे होता. अगदी कुंभार तुकडा, डोंगरी भागातील सप्लायर्सशी बीपी नामक विषयातील हौस, छंद, कुतूहल आणि “कल” ह्यामुळे मिळवलेल्या प्रचंड माहीती आणि ज्ञानाच्या भंडारामुळे तो उत्कृष्ट संबंध राखून होता. तो अश्या सप्लायर्सना त्यांच्याच धंद्यातील नवे ट्रेंड्स, इनोव्हेशन, कॉम्पिटिशन एनालिसिस, डिमांड एंड सप्लाय अश्या विषयांवर फुकट कंसल्टेशन करून लेटेस्ट क्यासेट मिळवत असे. आपल्याला कश्या दीपिका पादुकोण, करीना कपूर, गेला बाजार श्रद्धा कपूर, अगदी साई ताम्हणकर किंवा नवी जुनी सोनाली कुलकर्णी माहीत असतात. त्यांचे नवे, जुने चित्रपट, त्यातील परफोरमेन्स माहीत असतात तसे त्याला आजही प्रिया राय, निकोल रे, सनी लिओनी आणि अश्या अनेक “अभिनेत्रींची” कुंडली पाठ आहे. त्यांचे उत्कृष्ट “पर्फोर्मन्स” असलेले चित्रपट ठावूक आहेत. त्याकाळी गरजेपुरते बीपी बघणारे आम्ही आता त्यात फारसा रस घेत नसलो तरी बीपी ह्या विषयात “कल” असलेला तो आजही विषयाशी ईमान राखून आहे! असो…
तर हा आमचा परम मित्र जुगाड करून व्हिडिओ प्लेयर आणि कॅसेट घेऊन यायचा. ज्याच्या घरी आम्ही जमायचो त्याच्या घराचे सर्व दरवाजे, खिडक्या बंद. साधारण शेजार्यांची निजानीज झाली की आमची रात्र सुरु. आवाज म्यूटवर ठेवून टीव्हीवर बीपी नामक विरंगुळा सुरु होई. नावाच्या पाट्या, डायलॉग, संवाद असे फालतू भाग फॉरवर्ड करत फक्त मुख्य चित्रपट बघितला जाई. व्हीसीआर नामक त्या यंत्राचे सर्वात झिजलेले बटण फॉरवर्डचेच असे! तो सुरु झाला की इतकावेळ भंकस, बडबड करणारे सर्वजण अचानक शांत होत. सर्व लक्ष आजी म्या ब्रह्म पाहीले सारखे टिव्हिच्या स्क्रीनवर. एक कॅसेट झाली की दूसरी. ती लावेपर्यंत तेचतेच पाहुन आम्हा काहिजणांना कंटाळा आलेला असे. मग मस्ती सुरु. त्या वेळेला अश्या चित्रपटात काम करणारा एक माणूस अगदी थोडासा आमच्या मित्रांपैकी एकाच्या वडिलांसारखा दिसत असे. मग आम्ही कंटाळलेले उगाच “अरे हा कोणातरी ओळखीच्या माणसासारखा दिसतो” अशी पुडी सोडायचो. मग “कोणासारखा?” “अरे आपल्या नेहमीच्या पहाण्यातील आहे कोणीतरी!” असे प्रेशर वाढवणारे डायलॉग. “कोणाच्यातरी बाबांसारखा दिसतो का हा?” असा डायरेक्ट सवाल. तो ऐकतच चित्रपट पहाणारे बाकीचे टेंशनमधे. मग आम्ही कंटाळलेले सर्वात आधी झोपायचो, मग दोन चित्रपट पूर्ण केलेले. मग तीसरा चित्रपट जागून पाहिलेले. सकाळी उठलो की आमचा “कल” असलेला मित्र तीसरा चित्रपट दुसऱ्यांदा बघत बसलेला असे! आम्ही त्याला आजही बीपी ह्या विषयात गुरु स्थानी मानतो.
पण त्या काळात असे हौशी मित्र अनेक होते. कॉलेजमधील एका मित्राच्या कपाटात त्याच्या वडिलांना आदमासे 200 बीपीच्या कॅसेट सापडल्या होत्या! अजून एक मित्र वेगळीच गंमत करत असे. त्या काळी गिरगावात रात्री उशीरा केबलवर क्वचित अडल्ट सिनेमे दाखवत. माझा सदर मित्र चाळीतील डबल रूम मध्ये राहायचा. घराच्या माधोमध पार्टीशन. पलीकडे किचन आणि अलीकडे लिव्हिंग कम बेडरूम. पार्टिशनला लागलेल्या एका लाकडी शोकेस कम कपाटात टिव्ही. मधे सहा फुट जागा आणि समोर सिंगल बेड. माझा मित्र रात्री त्या बेडवर झोपत असे. मधल्या जागेत जमिनीवर गादी घालून आईवडिल झोपत. आई वडिलांना झोप लागली की हा हातात रिमोट घेऊन अडल्ट पिक्चर बघत असे. त्यांची ज़रा कुस बदलली की हा चॅनल बदलून एकदम भारत भूषणचा सिनेमा लावत असे!
अजून एक मित्र तर कहर होता. घराची मांडणी वर उल्लेख केल्या सारखीच. फ़क्त ह्याच्याकडे छोटा ब्लॅक एंड व्हाईट टिव्ही. हां इसम रात्री चक्क टिव्हिला त्याच्या स्थानावारुन उचलून, स्वतः पलंगावर झोपून आपल्या पोटावर टिव्ही ठेऊन, अंगावर पांघरूण ओढून तोच एडल्ट चित्रपट म्यूट करून पहात असे. घरच्यांना कारण असे की तुम्हाला टिव्हीच्या उजेडाचा डिस्टर्ब नको म्हणून मी ही आयडिया करतो आहे!!!
सामाजिक एकता व्हावी, विषमता दूर व्हावी ह्यासाठी अनेक लोक विविध उपक्रम हाती घेतात. बीपी पहाणे ह्या कार्यक्रमातून झालेले सामाजिक एकीकरण मी अनुभवले आहे. गोष्ट मी सेकंड ईयरला असतानची. तेव्हा माझा एक मित्र होता. वाळकेश्वर नामक सधन भागात 2000 चौ. फूटाचे घर असलेला. एक दिवस कॅन्टीन मध्ये बसलेले असताना तो मला सहज म्हणाला की “आज माझ्या घरी कोणी नाहीये!” हे ऐकून माझे कान टवकारले. त्याने सरळ विचारणा केली की “बीपी का जुगाड हो सकता है क्या?” मी मौके पे चौका मारत, माझ्या “कल” असलेल्या मित्रवर असलेल्या दृढ़ विश्वासाच्या आधारे “हो” म्हणालो. मग त्या नंतर त्याच्या प्रासद्तुल्य घरात तो, त्याचा नोकर, मी, माझा एक पांढरपेशा मित्र, त्याचा एका ऑफिसात पिऊन म्हणून काम करणारा एक मित्र, त्या पिऊन मित्राचा आणखी एक मित्र, आमचा “कल” असलेला मित्र, त्याचा कॅसेट सप्लाय करणारा डोंगरीचा भाई असलेला एक मित्र असे समाजाच्या विविध स्तरातील लोक बीपी ह्या एका आनंद सोहळ्याने एकत्र आणले होते!!
आज अडल्टच्या संकल्पना बदलल्या. पॉर्न नामक एकेकाळाचे गुलबकावलीचे फूल भुछत्रासारखे कोणाच्याही मोबाईलमध्ये कधीही उगवू लागले आणि अनेक सणांचा जसा इव्हेंट झाला आणि त्यातील मजा संपली तसेच बीपी पहाणे हा साग्रसंगीत सोहळा काळाच्या आणि तंत्रज्ञानाच्या उदरात गुडुप झाला. पण आमच्या “कल” असलेल्या मित्रासारखे बीपीचे काही पाईक आजही change is constant म्हणत पुस्तकातून ई बुकवर येणाऱ्या वाचकांसारखे कॅसेट वरून सिडीचे वळण घेत, पेन ड्राइव्ह आणि फोनवर आले ते पुस्तकी किड्यांसारखे त्यांचे त्यांच्या आवडीच्या विषयातील कंटेंट वरील प्रेम तसुभरही कमी झालेले नसल्याने! मीडियम कोणतेही असो! कंटेंट इज किंग…अगदी बीपीच्या जगात देखिल. जोवर मनुष्य आहे तोवर हा कंटेंट विविध रूपात, विविध तंत्रज्ञानाचा वापर करून पाहीला जाणारच! बीपीला मरण नाही!!!…मंदार जोग
Latest posts by mandar jog (see all)
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023
very good