उन्हाळ्याचे दिवस आणि चांदण्याच्या रात्री!

उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली की मला माझे शाळेचे दिवस आठवतात. त्यावेळी समर म्हणजे मस्त समर होता. त्याला कॅम्प वगैरे बिरुद लागली नव्हती. शेवटचा पेपर दिला कानात वारं भरलेल्या वासरासारखी पोरं घराकडे उधळायचो. पुस्तकं आणि पॅड कपाटात टाकून युनिफॉर्म बदलला की सुट्टी सुरू!

मग चाळभर पकडा पकडी, लंगडी, विषामृत, डोंगर का पाणी, लंगडी, कांदाफोडी, भोवरा, गोट्या, आबादुबी, लगोरी, पत्ते, करवंटी ठेऊन डबा ऐसपैस, लपाछपी, चेस, कॅरम, व्यापार, कित्ती कित्ती, कोयबा मारबा असे खेळ खेळत हुंडण्यात दिवस जात असे. सगळी चाळ पोरांच्या खेळण्याने हादरून जात असे. मग कधी छत्रीची ताडी एका बाजूने वाकवून कुकरच्या गास्केटचा गाडा चालवला जाई तर कधी जुन्या टायरला काठीने धोपटत गाडा पळवला जाई. चाळीच्या चौकात रबरी बॉलने क्रिकेट तर कधी सिझनच्या बॉलचे किट घेऊन चौपाटीसमोर असलेल्या जिमखान्यात एखाद्या टीमशी अकरा किंवा एकवीस रुपयांची मॅच खेळली जाई. तिथे जाताना हातात स्टंप, पॅड सांभाळत रेल्वे रूळ ओलांडण्यात मोठं थ्रिल असे. कधी सकाळी उठून भाड्याच्या सायकल घेऊन नरीमन पॉईंट ते वाळकेश्वर मार्गे नेपियन सी रोड अशी रपेट करण्यात वेगळीच मौज वाटे. एखाद्या दिवशी चाळीतील एखाद्या मित्राच्या घरी दुपारी आपल्या हाताने ब्रेड पकोडे, सँडविच बनवण्याचे कार्यक्रम असत. कधी जपानी बागेत खेळून कुटुंबसखी मध्ये वडे आणि शिरापोहे खाण्याची ऐश केली जाई!

दिवेलागणीला थकली भागली पोरं घरी हातपाय धुवून जेवली की रात्री छायागीत, फुल खिलें हैं गुलशन गुलशन, गजरा, ज्ञानदीप अश्या कार्यक्रमांची चंगळ असे. त्यावेळी चाळीच्या गच्चीवर झोपायची प्रथा होती. किमान वीस मुलांची अंथरूण संध्याकाळ पासून थंड व्हायला पसरलेली असायची. म्हणजे दिवसभर उन्हात तापलेल्या गच्चीत उन्ह कलल्यावर दव पडत असे. ते पडून आम्ही गच्चीत जाईपर्यंत अंथरूण थंडगार होत असे. टीव्ही आटपून गच्चीत गेल्यावर गप्पांचा फड पडे. मग एखाद्या सिनेमाची स्टोरी किंवा भुतांच्या कथा सांगितल्या जात. भुतांच्या गोष्टी ऐकून पोरांची पाचावर धारण बसत असे. मग कधीतरी आमच्याहून मोठा असलेल्या एका दादाच्या ट्रान्झिस्टर वर भुले बिसरे गीत ऐकण्यात वेगळाच आनंद होता. त्याच्या ट्रान्झिस्टरच्या बॅटरीचे कव्हर पडले असल्याने त्याने बॅटरी रबर बँड ने बांधलेल्या होत्या. हे सर्व कार्यक्रम झाले की पोरं आईच्या मऊसूत साडीचे अच्छादन असलेल्या अंथरुणावर पाठ टेकत. अंगाखाली थंड गार अंथरूण आणि वर चांदण्यांचे पांघरूण असा कोझी सरंजाम असे. झोप कधी लागायची लक्षातच यायचं नाही. मग शेजारच्या देवळात दर तासांचे वाजणारे टोले झोपेशी एकरूप व्हायचे. त्या अंधाऱ्या रात्री खरं तर त्या टोल्यांचा आधारच वाटायचा.

रात्री लघवीला जाणे हे मोठे दिव्य होते. कारण गच्चीतून उतरून तिसऱ्या मजल्यावर दुसऱ्या टोकाला असलेल्या संडासात अंधाऱ्या गॅलरीतून चालत, तेरा खोल्या ओलांडून जाताना गाळण उडायची. आपल्याला जाग आल्यावर एखादा जागा असला तर त्याला सोबतीला न्यायचो. पण एकट्याने जाणे ही भयाण गोष्ट होती. आणि त्याच रात्री जर भुताची गोष्ट ऐकलेली असेल तर ते भूत आपल्या बरोबर चालते आहे असे वाटायचे. आपण चालत असताना नेमकी नतद्रष्ट कबुतर खुडबुडायची आणि पंखांचा आवाज करत पडायची. कधी मांजरांच्या भांडणाचे भयानक आवाज काळजात चर्रर्र करायचे तर कधी दूर झोपलेल्या कुत्र्याला तेव्हाचाच मुहूर्त भेसूर रडायला सापडायचा. मग संडासात पोहोचेपर्यंत कंट्रोल करणे कठीण होत असे. रामराम जप करत सांडसापर्यंत पोहोचून मिणमिणत्या दिव्याच्या संडासात कार्यक्रम आटोपला की जिन्यात लावलेल्या, सभोवार पाखरं उडत असलेल्या झिरोच्या बल्बच्या दिशेने ढुंगणाला पाय लावून पळायचं आणि गच्चीचे जीने एकेक सोडत वर जाऊन आपल्या अंथरुणावर डोळे गच्च मिटून पडायचं! मग हळूच डोळे उघडले की आजूबाजूला झोपलेले आपले सवंगडी दिसत आणि मन शांत होई! मग झोप लागली की पहाटे पाच वाजता देवळात वाजणाऱ्या मृदंग आणि सनईच्या प्रसन्न आवाजाने पहाट झाल्याची जाणीव होत असे. अंगावर दव पडून सगळे पांघरूण आणि उशी दमट थंड झालेली असे. त्यातच तोंड खुपसून परत झोप लागे!

मग हळू हळू उन्ह वर येत. पक्ष्यांचे आवाज ऐकू येत. नवाचा भोंगा वाजे. अंगाला आता उन्हाचे चटके बसत. मग अंगभर पांघरूण ओढून आत घामाघूम होऊन घुसमटत झोपायला पण धमाल यायची. मग चाळीतल्या काकवा आणि पोरी पापड, चिकवड्या, कुरडया ही वाळवण घालायला गच्चीत यायच्या. त्या एकेकाला उठवायच्या. मग आळसावलेले आम्ही आमची अंथरूण गुंडाळून ठेऊन खाली जायचो. त्यावेळी वर्षभराची लोणची आणि मुरांबे घरीच बनवायचे असे सांगितले तर आज वेड्यात काढलं जाईल.

मग घरी आंबे खाणे, मामाच्या घरी आजोळी जाऊन राहणे ह्या गोष्टी नित्याच्या होत्या. आजोळी आजोबा हापूस पिळून पातेलभर रस नातवंडांसाठी रोज काढत. आम्ही सगळी मामे आणि मावस भावंड त्यात तूप आणि दूध घालून रसाचा फडशा पाडत असू. आमचे दोन पासून तीस पर्यंत सरळ आणि आडवे पाढे आजीने उन्हाळ्याच्या सुट्टीत करून घेतले होते. तसंच इंग्रजी मुळाक्षरे आजीनेच करून घेतली होती. बक्षीस म्हणून किस्मत टॉकीजला चित्रपट किंवा संध्याकाळी प्रभादेवी चौपाटीवर खेळायला गेल्यावर आईस्क्रीम अशी आजीची ऑफर असे. तेव्हा आपल्या सध्या रुपात असलेले, जागृत म्हणून प्रसिद्ध न झालेले सिद्धिविनायक मंदिर आमच्या खेळाची अजून एक जागा होते! पाढे नीट जमले की संध्याकाळी आजोबा बंदा एक रुपया बक्षीस म्हणून देत. आजी आजोबा रोज रात्री रमी खेळत. स्कोर दगडी पाटीवर लिहिला जाई. त्या पाटीच्या दुसऱ्या बाजूला आजीने रविवारी टीव्हीवर सांगितलेली सप्ताहिकी कॉपी करून घेतलेली असे. आजी फार न गुंतता खेळायची. आम्ही सगळे आजीला चिकटून, लटकून खेळ बघत असायचो. आजोबा मात्र इंडिया पाकिस्तान मॅच खेळत असल्यासारखे सिरीयस असायचे. जाड काळ्या कडांच्या चष्म्यातून पत्ते बघत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील भाव त्यांच्या पानांची पोझिशन सांगत असत. बेकार पत्ते असले की आजोबांची चिडचिड होत असे. आजोबा वाईट पानांना फतरी पानं म्हणायचे. मग आजी म्हणायची इतके रागावू नका हो. हवी तर तुमची पान मला द्या आणि माझी तुम्ही घ्या! ते ऐकून आजोबा अजून वैतागायचे. मी तुझा नातू नाहीये असे दरडावून सांगायचे. मग आजी खुसफूसत हसायची. तशी हसल्यावर ती हलयची. ती हलली की आम्हाला हसू यायचं. ते पाहून आजोबा म्हणायचे काय रे झालं गुलामांनो? हसताय का? आम्ही मात्र गप्प. पत्ते खेळून झाले की आजीच्या आजूबाजूला आम्ही मुलं पडायचो. आमच्या आजीला वाचनाचा भयंकर शौक होता. मग ती डोक्याशी टेबल लॅम्प लावून काहीतरी अंक, पुस्तक वाचायची. आम्हाला आजीच्या उबेत मस्त झोप लागायची! आजी गेल्यावर सावरकरांची अंदाजे शंभर पुस्तके मामाने एका संस्थेला दान केली. तिच्या शाळेत आमच्या आजीने नेत्र आणि देहदान केले. तिचा देह मी आणि मामाने जेजे च्या अनोटॉमी डीपार्टमेंटच्या हवाली केला होता! आजी गेल्यावर तिच्या कोकणातील शाळेत आपल्या शाळेतील पहिली विद्यार्थिनी गेली म्हणून शोक पाळण्यात आला होता!

आजोळी सकाळी उठल्यावर चहा बरोबर मारी बिस्कीट खाताना चहा बशीत ओतून त्यात मारी बिस्कीट बुडवल्यावर ते फुलासारख फुलत असे. मग चमच्याने त्याचे लहान लहान चौकोन करून खाण्यात एक धमाल वाटत असे. मामाच्या घराभोवती माड होते. तिथे चढून नारळ आणि माडी काढणारे लोक बघायला मजा यायची. खाली काही बैठी घर होती. ते लोक कोंबड्या पाळत. त्या कोंबड्या, त्यांची भांडणे बघणे ही एक अपूर्वाई होती. आई घरी न्यायला आली की पंधरा दिवस राहिलेल्या आजोळातून पाय निघत नसे. पण गिरगावातील मित्र, खेळ ह्यांची आठवण काढत आम्ही पिशव्या भरायचो. खाली उतरून वळून टाटा केला की उघड्या कृश देहाचे आजोबा चष्मा बाजूला सारून धोतराच्या सोग्याने हळूच डोळे पुसायचे! आजोळच्या आठवणी मनात साठवून आम्ही घराकडे निघायचो!

मग त्या रात्री चांदण पांघरून आकाशात बघत झोपल्यावर टीव्हीच्या अँटिना मागे चंद्र दिसे. तो मामाच्या घराच्या खिडकीतून नारळाच्या झावळ्या पलीकडे दिसत असे. आजी आणि आजोबांची आठवण येई. मन आजोळी जाई आणि हळूच आजी अंगावर हात फिरवत असल्याच वाटून मस्त झोप येई!

आता अगदी एसीच्या थंडाव्यात, मऊमऊ अंथरुणावर क्विल्ट ओढून झोपल्यावरही मन कधीतरी भूतकाळात जात. ती गच्ची, ते थंड अंथरूण, देवळातले टोले, भुताच्या गोष्टी, ट्रान्झिस्टर वरचे भुले बिसरे गीत, रामराम म्हणत लघवीला जाण, अंधारातल्या निरर्थक पण खूप अर्थ असलेल्या गप्पा आठवतात. आजी आजोबांचं नितळ प्रेम आठवत! आता आजी आजोबा नाहीत, ते चाळीतले मित्र नाहीत, त्या रात्री नाहीत, चाळीच्या आजूबाजूला टॉवरच जाळ आहे. पण हुआ सुट्टीत एक दिवस मी कन्येला मुद्दाम नेऊन चाळीच्या गच्चीत झोपणार आहे. तिला भुताच्या कथा सांगणार आहे. वर आकाशात दिसणारे पणजी आणि पणजोबा दाखवणार आहे! ह्या समर व्हेकेशन मध्ये कॅम्प बरोबर कन्येला माझ्या भूतकाळाचा एक कप्पा जगायला देणार आहे. तिला नक्की आवडेल. कारण माझ्या कन्येच्या हास्यात माझ्या आजी आणि आत्याचा भास आहे! माझी कन्या माझं भविष्य, माझा भूतकाळ आणि माझा विश्वास आहे! ©मंदार जोग

Image by Sasin Tipchai from Pixabay

mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

8 thoughts on “उन्हाळ्याचे दिवस आणि चांदण्याच्या रात्री!

    • April 9, 2019 at 9:18 am
      Permalink

      अप्रतिम! वाचताना वर्तमान काळाचा विसर पडला. 👍👌👌

      Reply
      • April 10, 2019 at 5:37 am
        Permalink

        Thanks

        Reply
          • April 28, 2019 at 2:28 am
            Permalink

            thanks

  • April 11, 2019 at 4:17 am
    Permalink

    Khup Chhan, June Diwas athawale. Amachi chawl nawhati pan experience was almost the same

    Reply
    • April 12, 2019 at 6:36 am
      Permalink

      thanks

      Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!