हरी…..
काही लोकांना अहो जाओ म्हणावसं वाटतच नाही. म्हणजे त्यांच्याबद्दल आदर तसूभरही कमी नसतो. पण जवळीक आणि आपुलकी इतकी वाटते की आहो जाओ केलं तर उगाच चुकल्यासारखं वाटत. असाच आमचा शाळेजवळाच हरि. तो असेल माझ्या बाबांच्या वयाचा. आम्ही शाळेत असताना तो तरुण होता. पण आम्ही पोरं त्याला “ए हरी” असंच म्हणायचो. हरीचं घर आमच्या शाळेसमोरच्या चाळीत तळ मजल्यावर. घराचा उंबरा ओलांडला की डायरेक्ट रस्त्यावर. त्या उंबर्यावरचत्याने दुकान थाटल होतं.
शाळेच्या बारीक सारीक स्टेशनरी व्यतिरिक्त त्याच्याकडे काही खास पदार्थ मिळायचे. त्या पदार्थांमुळे हरि मुलांच्यात आणि विशेषतः मुलींच्यात खूप पॉप्युलर होता. त्या काळच्या आठवड्याला चाराठ आणे असलेल्या पॉकेट मनीत (तेव्हा पॉकेट मनी हा शब्द मध्यमवर्गीयांना माहीत नव्हता. तेव्हा ते “खाऊचे पैसे” असत! असो!) हरिकडे काही अद्भुत वस्तू मिळायच्या. तळ हातावर ठेवल्यावर आपोआप गुंडाळला जाणारा पातळ प्लास्टिकच्या कागदाचा बंबई का बाबू, कर्कश्श आवाजाच्या रंगीत शिट्टया, बोराच्या आकाराचे काळे बूच बॉल ह्या विलक्षण गोष्टी मुलांच्या आवडीच्या. आणि चिंचा, करवंद, कुरकुरीत नळ्या, झाडावरून खुडलेली मऊ बडीशेप, एक चिमूट खाल्यावर तोंडात चुळा सुरु करणार प्रचंड आंबट चव असलेलं काळ्या रंगाच, फक्त हरिकडेच मिळणार चूर्ण ह्या मुलींच्या जिव्हाळ्याच्या गोष्टी.
मधल्या सुट्टीत डबा खाऊन झाल्यावर हरिकडे मुलांची गर्दी व्हायची. हरी हे दे, ते दे असे म्हणत मुलं कल्ला करायची. हरि पंधरा वीस पैशांचे हिशोब ठेवत, उरलेले दहा पैसे परत देऊन पोरांना हव्या त्या गोष्टी द्यायचा. मग हातातील “हरि मेव्याचा” आस्वाद घेत मुलं रेंगाळत शाळेकडे निघायची. हरिच्या दुकानाला शाळा सुटेपर्यंत विश्रांती मिळायची!
हळू हळू आम्ही मोठे झालो, शाळा संपली, हरिकडे जण सुटलं. पूर्वी त्याच्याकडे लिमलेटच्या गोळ्या विकत घेणारी पिढी संध्याकाळी त्याच्याकडेच “हरि एक गोल्ड फ्लेक दे” म्हणण्याइतकी मोठी झाली. पण हरि तिथेच होता पुढील अनेक पिढयांना “पॉकेट मनी मध्ये जग विकत घेतल्याचा आनंद” देण्याचे व्रत घेतलेल्या व्रतस्था सारखा!
मी महिन्याभरापूर्वी हरिकडे गेलो होतो. सहज एक गोळी विकत घेतली. शाळा आणि वातावरण कसं बदललं आहे ह्यावर त्याच्याशी बोलत उसासे सोडले. हरि खूप थकलेला वाटला तेव्हा. म्हणजे वयाचा परिणाम. अनेक पिढ्यांचे बालपण समृद्ध करणारा, साकारणारा हरि त्याच्या वृद्धत्वात शोभतच नव्हता. पण काळाने आपल्या खुणा त्याच्यावर सोडल्या होत्या.
काही दिवसांपूर्वी हरि गेला अशी बातमी मिळाली. आणि आमच्या बालपणीच्या आठवणींच्या आताशा भग्न झालेल्या किल्ल्याच्या, अजून तग धरून असलेल्या मोजक्या बुरुजांपैकी एक बुरुज त्याच्या रूपाने ढासळला! आत खोलवर काहीतरी कालवून गेला! मान्य आयुष्य बदलतं, लोक भेटतात आणि जातात. तोच विश्वाचा नियम आहे वगैरे. पण काय आहे माहित्येय का? माणसाचं आयुष्य आणि मन हे सारवलेल्या शेणासारखं असतं. काळाबरोबर कोरडं होत जाणारं! पण सुरुवातीच्या ओल्या, मऊ, संस्कारक्षम वर्षात आयुष्यात येणाऱ्या काही लोकांच्या ज्या पाऊलखुणा मनावर उठतात ना त्या वयाबरोबर येणाऱ्या कोरडेपणात, काठिणपणातही तश्याच रहातात! शाळा, तिथले शिक्षक, हरि, मगन, हळबे, बालभवन, लायब्ररी, अध्ययन वाटिका, जय ते जय ते किंवा सदैव सैनिका ही गाणी, गायन बाई आणि त्यांची पेटी, हस्तकलेचा पत्र्याचा डबा आणि त्यातली कात्री, बाईंनी शिकवलेल्या होड्या, रघुनाथ दादा ह्यांनी आमच्या बालवयातील ओल्या मनावर सोडलेल्या पाऊलखुणा आजही जिवंत आहेत! मग एखादं दिवशी अशी बातमी येते आणि अनेक वर्षांपूर्वी सारवलेल्या आमच्या भावविश्वाच्या जमिनीचे एखादे डीखुळ निघते, एखादया पाऊलखुणेची खपली उचकटते, आठवणींचे रक्त भळाभळा वाहू लागते आणि हरिला “होता” बनवून काळ पुढे सरकतो!इतकंच!
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023