अँग्री यंग मॅन

संध्याकाळची वेळ.

सव्वासहा.

मनीष हाॅल, रिंग रोड.

रस्ता पाॅपकाॅर्नमेकरसारखा फुललेला.

टण टण ऊडणार्या लाह्यांसारख्या गाड्या घुसत होत्या.

चारों दिशाओंसे.

जागा मिळेल तिथनं.

ट्रॅफीकला हजारो वाटा फुटलेल्या.

सगळ्यांनाच घाईची लागलेली.

तिथंच भाजीवाल्यांची गर्दी.

गाडीवरनं खाली न ऊतरता, 

ऊभ्या ऊभ्या भाजी घेणारी काही ऊच्चभ्रू मंडळी.

ह्या लोकांना बघितलं की मला सेहवागची आठवण येते.

बिलकूल फुटवर्क नाही.

नुसते खडेखडे शाॅट मारणार.

ईथं आमच्या डोक्याला शाॅट.

ही मंडळी आंघोळीला सुद्धा गाडीवरनंच जात असणार.

हे पीक आवर्स म्हणे.

ट्रॅफीकचं पीक टम्म तरारलेलं.

सुपीक जांगडगुत्ता.

माझ्यासमोर मनीष हाॅलचा सिग्नल तीन वेळा मेला.

मेरा नंबर आयेगा ?

कब ?

युगानेयुगे वाट बघितल्यावर तो पुन्हा एकदा हिरवा झाला.

अॅक्सीलेटरची मुंडी फूलटू पिरगाळली आणि..

मी घराच्या दिशेनं कूच केलं.

काही मिलीमीटर पुढे गेलो असेन..

ब्रेकवर पाय ठेवून ऊभा राहिलो.

किंकाळी मारून, खिंकाळत माझी बाईक स्टाॅपली.

पुछो क्यों ?

माझ्यापुढची एक पांढरी स्विफ्ट अचानक थांबली.

दसदस तोला.

गळ्यात दोरखंड.

हातात सुवर्णकडी.

पांढरा शर्ट, पांढरी पँट, पांढरे बूट.

काळी दाढी, भरघोस झुपकेदार मिशा.

मिशांना अपलिफ्टण्याची रजनीगंधा स्टाईल.

साहेब दमदार पावलं टाकत खाली ऊतरले.

पलीकडनं वैनीसाहेब ऊतरल्या.

त्यांच्या खांद्यावरचं ओझं, 

साहेबांनी आपल्या खांद्यावर घेतलं.

साहेबांच्या खांद्यावरनं राजकुमार टकामका बघू लागले.

साहेबांनी जगापुढे तुच्छतापूर्वक बघितलं.

अत्यानंदानं फूटपाथवर ,पचकन् रांगोळी काढली.

ऊजव्या हाताचं बोट तोंडात सरकवलं.

आतला चोथाऐवज बाहेर काढला.

रस्त्यावर फेकला.

त्यांच्या चेहर्यावरची ती मग्रुरी , तो रूदबा.

मागच्या दरवाजातून, 

दोन पंटर कम कार्यकर्ते मंडळी ऊतरली.

गाडीवर रेलून ‘गंमतजंमत’ बघू लागली.

गाडी भर रस्त्यात तशीच पार्कलेली.

हार्टला जाणार्या ब्लडव्हेनमधे, 

अचानक मेगाब्लाॅक व्हावा,

हार्टवर मरणाचं प्रेशर यावं अन् ,

मायक्रोसेकंदात सगळं संपून जावं तसं झालेलं.

मागे ट्रॅफीकचं प्रेशर तुंबलेलं.

फुगवटा मागच्या सिग्नलपर्यंत पोचला.

चारही वाटा ट्रॅफीकच्या चिखलात रूतल्या.

सिग्नल ऊभ्या ऊभ्या गुंता सोडवत बसला.

गाडीमागचं पब्लीक हाॅर्नवर डोकं ठेवून झोपी गेलं.

साहेबांना फिकीर नव्हती.

वहिनीसाहेबांची भाजीखरेदी आरामात चाललेली.

लोकल पब्लीक साहेबांना ओळखून होतं.

त्यांची पाॅवर जाणून होतं.

साहेब नावाजलेले फ्लेक्सपटू होते.

त्यांची फ्लेक्सवरची आणि मागची छबी, 

पब्लीकला माहिती होती.

तोंड दाबून बुक्क्याचा मार.

माझा शेजारचा एक्सपेरिअन्स्ड होता.

त्यानं आपली गाडी रस्त्यात तशीच सोडली.

पटकन् खाली ऊतरून भाजी घेवून आला.

येता येता साहेबांना मजबूरी स्माईलही दिलं त्यानं.

तरीही…

काही किडे वळवळताच.

एका नालायक बाईकवाल्यानं गाडी घुसवली.

साहेबांच्या गाडीपाशी पोचला.

पंटर लोकांना काहीतरी सुनावलं.

” ऐ भाड्या, जाऽऽना घरला गिपचीप.

नाहीतर टू व्हीलरनं घराभाईर गेल्ता,

फोरव्हीलरमधनं घरला जाशीला “

हवा गेलेल्या फुग्यासारखा तो फुस्स झाला.

पाच मिनटं संपता संपेना.

अचानक , कुठून तरी एक भिकारी आला.

दाढीचे खुंट वाढलेले.

केसांचं जटाधारी टोपलं.

कपड्यांची लक्तरं.

हातात पोचेरी वाडगं.

फिदीफिदी हसत गाडीपुढं पुढं ऊभा राहिला.

कराकरा डोकं खाजवत.

येडछापच असावा.

त्याचे डोळे.

त्यात अंगार पेटलेला.

अचानक त्याच्या हातात एक वीट दिसली.

जीव खावून त्यानं गाडीच्या पुढच्या काचेवर हाणली.

काचेच्या ठिकर्या.

काचचूर्ण खळ्ळकन रस्यावर पसरलं.

तो तसाच फिदीफिदी हासत ऊभा.

साहेब शाॅकमधे गेलेले.

पंटरलोग धावले.

त्या येड्याला धरलं.

पब्लीक मनोमन खुष.

साहेबांचं भाग मिल्खा भाग.

दीड ढांगात साहेब त्या येड्या भिकार्यापाशी.

पब्लीक फुल्ली वरीड.

आता बहुतेक आबुधाबी धुलाई केंद्र.

एवढ्यात आजूबाजूचे दोन चार भाजीवाले धावले.

” साहेब माफ करा योक डाव.

येडं हाय ते.

येका फटक्यात गारद हुईल.

ऊगा म्येलं बिलं तर नस्त लफडं होवून बसायचं.”

साहेब नुस्तेच दात ओठ खात ऊभे.

कच्चा पापड, पक्का पापड, तीळपापड.

पब्लीकनं म्युट टाळ्या वाजवल्या.

मनातल्या मनात.

मौके पें चौका.

कुणीतरी मौका साधलाच.

चौका हाणला.

मिनव्हाईल गाडीपाशी साहेबांपैकी कुणी नव्हतं.

मागनं एक दगड भिरभिरत आला.

मागची काच शहीद.

नुस्ती अफरातफरी.

रप्पाधप्पी.

पळापळ.

दगडी पाऊस.

गाडीची वाट.

दोन मिनटात रस्ता रिकामा.

पळपुट्यांमधे मीही शामील.

साहेंबांचं पुढं काय झालं माहित नाही.

त्याच रात्री.

नऊ वाजता.

कोथींबीर आणायला माझी वरात काढली गेली.

मनीष हाॅलपाशी भाजीवाल्याकडे गेलो.

कोथींबर प्रसन्न.

एक जण आला.

दोघा तिघा भाजीवाल्यांना पाचशेची नोट देवून जाऊ लागला.

एक पल…

नजरानजर झाली.

तो चालता झाला.

तेच अंगारी डोळे.

मी ओळखलं त्याला.

तोच होता तो.

जीव खावून पळालो .

गाठला त्याला.

त्याचा हात हातात दाबला.

” थँक्स मित्रा. 

पुन्हा नको करूस असं.

आपण कायदा हातात नाही घ्यायचा”

‘ पुन्हा नाही.

रोजची सवय आहे त्याची.

माझा रस्त्यात ईनसल्ट केला एकदा.

तेव्हाच ठरवलं.

याला सोडायचं नाही.

एक महिना अॅक्टींग क्लास जाॅईन केला होता.

आज लाईव्ह परफाॅर्मन्स दिला.

आमच्या को अॅक्टर्सना बिदागी देवून आलो.

त्यांनी सांभाळून घेतलं.’

मी मनोमन त्या अँग्री यंग मॅनला दंडवत घातला.

माॅरल आॅफ स्टोरी ईज..

डोन्ट अंडरएस्टीमेट पाॅवर आॅफ काॅमन मॅन…

काॅम मॅन की जय हो.

……कौस्तुभ केळकर नगरवाला

Image by maronilsonjr from Pixabay

*****

Kaustubh Kelkar
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)

Kaustubh Kelkar

कौस्तुभ केळकर ह्यांनी बीई (इलेक्ट्रिकल) तसे बीजे (जर्नालिझम) असे शिक्षण घेतले आहे. गेली अनेक वर्ष ते अहमद नगर येथे भौतिकशास्त्राचे क्लासेस चालवतात. फेसबुकवर कौस्तुभ केळकर नगरवाला ह्या नावाने परिचित असलेल्या कौस्तुभ ने अनेक कार्यक्रमांचे लेखन, निवेदन आणि सुत्रसंचलन केले आहे. हसरी दिवाळी तसेच कथुली ह्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. लोकसत्ता, सकाळ, लोकमत अश्या अनेक दैनिकांमधून विपुल लिखाण केले आहे. तसेच त्यांचे कथुली नावाचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

2 thoughts on “अँग्री यंग मॅन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!