“कलर कोड….”
त्याला ती आवडायची.
जाम आवडायची.
कशी दिसते रे ती ?
तुम्ही असं विचाराच त्याला.
चॅलेंज लावून सांगतो.
त्याला नाही सांगता येणार.
त्यानं अजून तिला तसं डोळे भरून बघितलेलंच नाहीये.
तरीही ती त्याला आवडते.
त्याला अजूनही तिची पहिली भेट आठवते.
भेट ?
पहिल्यांदा तिच्याशी फोनवर बोलला तो.
तिचा आवाज.
फार काही गोड वगैरे नव्हता.
थोडासा घोगराच.
पण तिच्या आवाजात जादू होती.
बोलता बोलता मधेच खिदळून हसणं.
सहज आपलंसं करणारं बोलणं.
औपचारिकतेला फाटा देणारं.
तरीही आपला आब राखून ठेवणारं.
बोलताना सुद्धा तिच्यातला काॅन्फीडन्स खणखणीत वाजायचा.
स्वतःवर तिचा ठाम विश्वास असायचा.
म्हणूनच समोरच्यावर सुद्धा.
वही तो !
पहिल्यांदा दोन तीन मिनटंच बोलला असेल तो तिच्याशी.
अगदी मॅगीटाईम.
कसं शक्य आहे ?
खरंच सांगतोय.
मी आत्ता जे सांगतोय ते सगळं जाणवलं त्याला.
अगदी या दोन तीन मिनटांतच.
वेवलेंग्थ मॅच झाल्यासारखं झालं.
दोन वर्ष बंगलोरला होती ती.
आत्ताच पुण्यात परत आलीय.
त्याच्याच कंपनीत.
त्याच्या शेजारीच तिचं कॅप्सूल.
दोन महिने झालेत तिला येऊन.
सहवास सोसायटीत रहायला गेल्यासारखं वाटतंय त्याला.
तिचं असणं.
तिचं हसणं.
तिच मनापासून बोलणं.
तो वेडा झालेला.
तिचा केअरींग स्वभाव.
समोरच्याचं शांतपणे ऐकून घेण्याचं तिचं हिअरींग एड.
हो जायेगा यार…
डेडलाईन सांभाळणारी टेक ईट ईझी पाॅलीसी.
रोज काही तरी नवीन शिकण्याची तयारी.
डब्यात आठवणीनं सगळ्यांसाठी काही तरी आणायची.
घड्याळ विसरून कामात बुडून जाणं.
खरं सांगू ?
तिच्या स्वभावाच्याच प्रेमात पडलेला तो.
प्यार तो होना ही था.
आता तर काय ?
दोघं एकाच प्रोजेक्टवर.
चार जणांची टीम.
ती, तो आणि आणखी दोघं.
मागच्याच आठवड्यात बाॅसनं चौघांना बोलवलं.
म्हणाला, या प्रोजेक्टवर तुम्हाला चौघांना काम करायचंय.
जूनची डेडलाईन आहे.
मरेपर्यंत काम करावं लागेल.
खूप शिकायला मिळेल.
क्लायेंट यूएस चा आहे.
तेव्हा घड्याळ नाही, कॅलेंडर बघायचं आजपासून.
बेस्ट लक !
तो हवेत.
बाॅस पहिल्यांदा ईतका जवळचा वाटला त्याला.
मनातल्या मनात खुरट्या दाढीसकट बाॅसचा पापा घेतला त्यानं.
तिच्यासाठी काय पण….
मुक्काम पोस्ट हिंजवडीचे गोठणे.
जीना यहाँ मरना यहाँ.
मर मर काम.
आता तर ती फारच जवळची वाटू लागलेली.
फार रात्र झाली तर..
कॅबनं नको जाऊस.
मी सोडतो तुला.
चलेगा…
तिला काही विशेष वाटायचं नाही त्यात.
इथंच सगळा घोटाळा होता.
फेसरीडींग करण्यात पटाईत होती ती.
समोरच्याचा चेहरा घडाघडा वाचायची ती.
फिर भी ?
आमच्या हिरोच्या ‘दिल की बात’ वाचता येऊ नये तिला ?
तिला तो आवडायचा.
फक्त एक मित्र म्हणून…?
नका रे असं बोलू.
मला मनापासून वाटतं.
दोघांचं जमावं.
दोघं अगदी टेलरमेड आहेत.
मेड फाॅर ईच आदर.
जवळ जवळ आठवडाभरानं आज सुट्टी मिळालीय.
धुळवड.
प्रेमरंग…
आज खेल शाम संग होरी..
त्याला खूपच आवडलं असतं.
बाप्पा प्रसन्न.
मनभावन सकाळ.
आज तिनंच फोन केला त्याला.
नळस्टाॅपला ये.
समुद्रमधे फिल्टर्ड काॅफी घेऊ यात.
दहा वाजता वाट बघते.
तो ऊडायलाच लागला.
बस..
अच्छा मौका है !
आज विचारूनच टाकायचं तिला.
दहा वेळा मनातल्या मनात त्यानं रिवाईज केलं.
सव्वानऊ वाजल्यापासून समुद्राच्या बाहेर तो घिरट्या घालत होता.
डूबा डूबा रेहता हूँ प्यार में तेरे..
प्यार की कश्ती में..
दहाला पाच कमी.
पहिल्यांदा त्यानं डोळे भरून बघितलं तिला.
पांढरा शुभ्र सलवार कमीज.
केशरी बांधणीची ओढणी.
भुरूभुरू ऊडीऊडी केस.
कानात नाजुका मोत्याचे डूल.
गोरी पान चंद्रकला.
धारदार नाक.
शुभ्र दंतपंक्ती
आणि त्यातून डोकवणारं मुक्तहास्य.
यही है वो !
त्याला बघितलं अन् तीही हसली.
अर्धा तास..
साल्याची दातखीळ बसली वाटतं.
अर्धा तास प्रोजेक्टवरच चर्चा.
दोन मिनटं मेट्रो, दोन मिनटं चितळ्यांची बाकरवडी.
दीड मिनटं बेडेकर मिसळ.
अशानं देश पुढं जाणार कसा…?
संपलं..
बिल दिलं.
दोघं बाहेर.
तो कसानुसा हसला.
ती तिच्या अॅक्टीव्हापाशी पोचली.
हात फडकवून बाय केलं.
तो कसानुसा हसला.
एकदम…
तिनं डिकी ऊघडली.
केसरीया..
नॅचरल कलर.
त्याच्या चेहर्यावर गोड फर्राटे…
तिच्या कोमल हातांनी केलेलं रंगकाम.
” तू आवडतोस मला..
तरीही ..
कदाचित तूच नाही म्हणशील.”
डायरेक्ट त्याच्या हार्टलाच गुदगुल्या.
प्रेमरंगी रंगले.
दोघंही.
शक्यच नाही…
तो कशाला नाही म्हणतोय..?
फार घाई करताय राव तुम्ही.
त्याच्या अंगी दहा हत्तीचं बळ चढलंय.
तिच्या मागोमाग तो तिच्या घरी.
पटवर्धन बागेत.
तिच्या घरी.
तिचे आई बाबा दोघंही घरी.
हा सदाशिवपेठी.
ती कर्नाटकी.
चालतंय की !
पसंत आहे मुलगा…
तिच्या बाबांच्या डोळ्यांनी म्हणलं.
बाबा, थांबा जरा..
ती म्हणाली.
तिनं तिच्या आईला बोलावलं.
आता बोल ?
तो हादरलाच.
त्याची आई सेम टू सेम तिच्यासारखीच.
फक्त…
चेहर्यावर….
कोडेड फेस.
आहे तयारी तुझी ?
तिनं विचारलं.
निर्णय तुला घ्यायचा आहे.
आमच्या बाबांच्या घराण्यात असं कुणी नाही.
तिकडे आजोळीही कुणी नाही.
मी अशी का ?
माझ्या आईनं सुद्धा स्वतःला असं कधीच विचारलं नाही.
गाॅडस् गिफ्ट.
तिनं सहज स्वीकारलं.
हुशार होती ती.
शिकत गेली.
महाराष्ट्र बँकेत ब्रँच मॅनेजर आहे.
माझी आई ग्रेट आहे.
बाबाही तितकाच ग्रेट.
आहे तशी ,आवडली ती त्याला.
एक व्यक्ती, एक माणूस म्हणून …
माझ्या आईईतकं जगात सुंदर कुणीही नाही.
माझा स्वभाव, माझी हुशारी सगळं माझ्या आईकडनं आलंय…
दिलदारपणा, कामात झोकून देणं हे बाबानं शिकवलं.
रंग फक्त आईचा घेतला नाही एवढंच.
तो मिळाला असता तरीही चालला असता मला.
तिच्यासाठी माझा बाबा जगाशी भांडला.
घर सोडून आला..
आता सगळं घर पुन्हा जोडलं गेलंय.
माझ्या आई बाबांचा मला प्रचंड अभिमान आहे.
घाई नाही.
नीट विचार कर…
हा डिसीज अल्टरनेट जनरेशन व्हायरल होतो, असं मेडिकल सायन्स सांगतं.
तू नाही म्हणालास तरी चालेल.
माझ्या बाबानं तेवढं खंबीर केलंय मला.
दोन … चार… पाच…
सहा मिनटं संपली.
कुणीतरी बोला रे..
हा सायलेन्स झोन सहन नाही होत मला.
तो मनापासून हसला.
तिच्या बाबांचे हात हातात घेतले.
“तुम्ही खरंच ग्रेट आहात.
मला असाच सासरा हवाय.”
सगळे खाकर्यासारखे मनमुराद हसले.
खिशातला रंग त्यानं तिच्या आईबाबांना लावला.
होली के दिन दिल मिल….
प्रेमाचा कलर कोड त्याला मिळालेला..
आई बाबा हो म्हणाले तर ठीक…
नही तो…
आई गं..ऽऽऽ
त्याचा सासरा कळवळला.
प्रेमाच्या ढगात हरवलेल्या त्यानं…
सासर्याच्या पायावर पाय ठेवलेला..
बेस्ट लक !
होली है !
दाग अच्छे होते है !
……कौस्तुभ केळकर नगरवाला.
Image by stephanieadams from Pixabay
- घरघर….. - October 4, 2021
- ‘स्कूल चले हम ! - September 22, 2021
- चष्मा - July 12, 2021
Mast concept aahe,vachaychi Maja yete
thanks