सदासर्वदा…
“सदासर्वदा…”
‘डोईफोडे वाडा कुणीकडं ?’
अशी चौकशी करत ,महिन्यातून एखाद वेळी कुणी तरी यायचंच यायचं.
निम्म्या वेळी असं विचारणारी माणसं सदाकडेच आलेली असायची.
571, नारायण पेठ, पुणे 30.
हा खरं तर डोईफोडे वाड्याचा पत्ता.
आमची हॅप्पी सोसायटी होवून आता दोन वर्ष झालीयेत.
तरीही..
सदाची गाववाली मंडळी अजून डोईफोडे वाड्यातच रमलेली.
सदा हा आमच्या सोसायटीचा आॅनरेबल मेंबर.
अगदी वाडा असताना सुद्धा त्याची खोली दरवाज्यासमोर.
आणि आत्ता सुद्धा सोसायटीच्या गेटसमोर.
पार्किंग एरियात सदाचा छोटासा फ्लॅट.
चारशे स्क्वेअर फुटाचा.
सेल्फ कन्टेन्ड.
टापटीपीनं रहायचा दोन खोल्यात.
एक खोली आणि छोटसं स्वयंपाकघर.
एकटा जीव सदाशिव.
कुणीच नव्हतं त्याला.
आणि हॅप्पी सोसायटीलाही त्याच्याशिवाय कुणीच नव्हतं.
कोण होता हा सदा ?
सांगतो.
सदानंद हा डोईफोडे वाड्याच्या मालकांचा नोकर.
नोकर , गडी नावाला फक्त.
खरं तर मालकांच्या घरचाच.
गुहागरजवळचं नरवण गाव त्याचं.
आई वडिल लहान असतानाच गेलेले.
चुलता छळ छळ छळायचा.
मालकांचा लांबचा नातेवाईक.
मालकांनी ऊचलून आणला त्याला पुण्यात.
पंधराव्या वर्षापासून मालकांकडे होता.
स्वयंपाकापासून सगळी कामं करायचा.
मालकांचा रवि सदाच्याच अंगाखांद्यावर मोठा झालेला.
मालकांनी दोन खोल्याची जागा दिली होती रहायला.
रवि शिकला आणि नोकरीसाठी तिकडे गेला.
बंगळूरात.
मोठ्ठं घर बांधलंय रविनं तिकडे.
मालक, मालकीणबाईही तिकडेच शिफ्ट झाले.
चार वर्षांपूर्वी वाडा रिडेव्हलपमेंटला दिला.
तिथंच झालेली ही आमची सोसायटी.
जाताना हा दोन खोल्यांचा छोटासा फ्लॅट सदाच्या नावावर करून दिला.
सदाला स्वतंत्र करून गेले.
‘रहा आरामात इथं.’
सदा आणि आराम ?
नो चान्स.
तसे मालकांचेही दोन फ्लॅटस् आहेत सोसायटीत.
वर्षातून एखादवेळी चक्कर मारतात.
मालक आले की सदा एकदम बिझी होवून जायचा.
सदा सर्वदा मालकांच्या सेवेसी तत्पर.
मालक गेले आणि सदा कधी आमचा झाला कळलंच नाही.
तसा बिल्डींगला वाॅचमन आहे.
पण लक्ष ठेवून जागा असतो तो सदा.
सदाच्या डिक्शनरीत ‘नाही’ हा शब्द नसायचाच मुळी.
कुणाचं, कुठलंही काम असू देत.
सदा आहे ना ?
मग झालं तर.
रोज सगळ्या गाड्या धूवून पुसून लख्ख.
भाजी आणून दे.
कपडे ईस्त्रीला टाक.
नानूकाकांना रिक्षात घालून बँकेत घेऊन जाणे आणि सुखरूप परत आणणे.
सोसायटीची लाईटबिलं भरणे.
ईमर्जन्सीला पोरांच्या शाळेत जाणे.
पाहुण्यांना स्टेशनवरून घरी आणणे आणि पोचवणे.
पोरांच्या बर्थडेची तयारी.
किट्टी पार्टीची तयारी.
सोसायटीच्या गणपतीची तयारी.
काय वाट्टेल ते.
सदा तैयार है !
खरा कर्मयोगी.
निरपेक्ष भावनेनं काम करत रहायचा.
अट एकच.
हातातलं काम पूर्ण होवू देत.
हे संपलं की पुढचं.
‘टाईम प्लीज’ सदा कधी म्हणायचाच नाही.
खरं तर त्याला तशी काहीच गरज नव्हती.
गावाकडनं ठराविक ऊत्पन्न मिळायचं.
पुरेसं.
नरवणला दहा एकर जमीन होती त्याच्या नावावर.
अगदी समुद्राजवळ.
ही मालकांची कृपा.
त्यांनी स्वतः लक्ष घालून, भावकीतला त्याचा हिस्सा त्याच्या नावावर करवून दिलेला.
हापूसची कलमं होती.
फणस होते.
पोफळी होती.
चुलते त्याच्या जमिनीवर भात लावायचे.
दोन चार पोती भात यायचा.
सोसायटीत निम्म्या घरच्या कुकरमधे, सदाच्या शेतातला भात रटरटायचा.
गावाकडनं फणस आला, की सदा घरोघरी डिव्हीडंडसारखा वाटायचा.
आजच्या भावानं सदा कोट्याधीश.
तरीही सदा आमच्यासाठी राब राब राबायचा.
एकदा मी विचारलंही.
” कशाला राबतोस एवढा ?
रहा की आरामात.”
‘ आसं कसं ?
बिल्डींगच माझं घर.
ईथली माणसं माझ्या घरची.
घरच्या माणसांसाठी केलं तर काय एवढं ?’
आम्हीही सदाला खूप जपायचो.
सणवारी गोडाधोडाचं ताट, आठवणीनं सदाच्या घरी जायचं.
सोसायटी मेंबर्सनी सदाच्या नावानं अकाऊंटच काढलंय.
महिन्याच्या अखेरी केलेल्या कामानुसार पैसे जमा करतो .
लाख दोन लाख सहज जमा झाले असतील आत्तापर्यंत.
एखाद महिन्यापूर्वी सदा म्हणालेला.
” दादानु, गावाकडच्या जमिनीचं काय करावं कळत नाहीये.
तुम्हीच काहीतरी मार्गी लावून द्या.
म्हातारपणीची सोय लावून द्या आमची “
“नक्की”
पाॅईंट टूबी नोटेड.
मागच्या आठवड्यात महाबळेश्वरला गेलेलो.
माझ्या मित्राचंच हाॅटेल.
खूप वर्षांनी भेटला.
छान गप्पा झाल्या.
बरीच हाॅटेल्स आहेत त्याची.
तो सहज म्हणाला.
” कोकणात बीच रिसाॅर्ट बांधायचंय.
कुठली साईट असेल तर सांग “
मला एकदम सदाची आठवण झाली.
दोन तीन एकरात छान रिसाॅर्ट झालं असतं.
तरीही सदाकडे बरीच जागा राहिली असती.
पैशाच गणित त्या दोघांना करू देत.
” आहे एक साईट आहे.
पुढच्या आठवड्यात घेऊन येतो, त्या माणसाला तुझ्याकडे “
मित्र खूष.
पुण्याला परत आलो.
कधी एकदा सदा भेटतोय असं झालेलं.
नेमका सदा गावाकडे गेलेला.
काल सकाळची गोष्ट.
लेकीची व्हॅन आलीच नाही.
शाळेची वेळ झालेली.
आॅफीसची घाई.
देवासारखा सदा भेटला.
” दादा तुमी जा आॅफीसला.
मी सोडतो ताईंना शाळेत “
एकदम हायसं वाटलं.
ते रिसाॅर्टविषयी..
” सदा, संध्याकाळी घरी ये.
महत्वाचं काम आहे.”
‘ येतो की ‘
” अचानक गावाकडं ?”
‘ जमीन विकून टाकली दादानु.
सरपंचानीच घेतली.
गावचे मास्तर होते बरूबर.
बँकेत गेलो.
मी म्हणलं, मला रक्कम सुद्दा सांगू नका.
ब्यांकेत गेलो आन्,
आलेलं पैसं आर्मी फंडला दिवून टाकलं.
आता खूप बरं वाटतंय.
देशासाठी माझा खारीचा वाटा ‘
मी फ्रीज्ड.
सदा माझ्या नजरेत मावेना.
एकदम मोठ्ठा माणूस झालेला.
“अरे पण तुझ्या म्हातारपणीची सोय ?”
माझी लेक एकदम बोलली.
” सदाकाका डोंट वरी.
म्हातारा झालास की माझ्या घरी ये.
मी सांभाळीन तुला.”
माझी लेकही मोठी झालेली.
मीच तेवढा लहान राहिलेलो.
माझी लेक सदाचा हात धरून शाळेत गेली.
मी आॅफीसला.
लॅपटाॅप आॅन केला.
पहिल्यांदा आर्मी फंडला दहा हजार रूपये ट्रान्सफर केले.
थोडंसं ऊंच झाल्यासारखं वाटलं.
सदासर्वदा…
सदा योग तुझा घडावा.
जयहिंद.
……कौस्तुभ केळकर नगरवाला.
Image by Alexas_Fotos from Pixabay
- घरघर….. - October 4, 2021
- ‘स्कूल चले हम ! - September 22, 2021
- चष्मा - July 12, 2021
छान व्यक्तीरेखा!
thanks
अशीही माणसे या जगात आहेत…खुप छान व्यक्तिरेखा..
Great !!!!