भीमरूपी महारुद्रा…
मला आठवतंय आमच्या लहानपणी मी ब्राह्मण सभेच्या व्यायामशाळेत जात असे. तिथे असलेल्या हनुमानाच्या मूर्तीची दर शनिवारी आरती असायची. तेव्हा वरून हॉस्पिटल मधून आरतीचे ताट आणायला आम्हा मुलांमध्ये स्पर्धा असायची. आरती झाली की धीरगंभीर आवाजात सगळे भीमरूपी महारुद्रा म्हणायला लागले की दंडात काहीतरी सळसळ व्ह्यायची! आणि हनुमान जयंती असेल तर मात्र धम्माल असायची. मोठे बॉडी बिल्डर आणि आम्ही छोटे पैलवान आमच्या लाडक्या मारुतीचा वाढदिवस झोकात साजरा करायचो. त्यावेळी का कुणास ठाऊक मारुती आपल्या बरोबरच व्यायाम शाळेत जोर बैठका मारतोय असं सतत वाटत असे.
त्याआधी खूप लहान असताना माझ्या आजोबा आणि मामा बरोबर दादरच्या ब्राह्मण सभा किंवा तत्सम ठिकाणी हनुमान जयंतीच्या उत्सवाला काही वेळा गेल्याची अंधुक आठवण आहे. तिथे मिळालेल्या सुंठवड्याची चव मात्र आजही जिभेवर रेंगाळते आहे.
मग आठवते गिरगावात आमच्या गच्चीत आम्ही तयार केलेल्या व्यायाम शाळेत स्थापन केलेल्या छोट्या मारुतीच्या मूर्तीची पूजा करून आम्ही जोरदार साजरी केलेली हनुमान जयंती. वर्गणी जमा करून, भरपूर प्रसाद ठेऊन, मी साधारण अकरावी किंवा बारावीत असताना जोशात साजरी केलेली हनुमान जयंती!
आता मुंबईत बहुतांश ठिकाणी हनुमानाच्या नावापुढे “जी” लागल्यानंतर बेबी को बेस पसंद है च्या साथीने “सेलिब्रेट” होणारी हनुमान जयंती बघवत नाही. कारण ब्राह्मण सभेच्या व्यायाम शाळेत आमच्याबरोबर व्यायाम करणारा हनुमान किंवा मारुती आजही आमच्या दंडात, आमच्या मनात तसाच आहे. आजही भीमरुपी किंवा सत्राणे उड्डाणे म्हणताना त्याच्या शक्तीचा साक्षात्कार होऊन अंगावर काटा येतोच.
असो! जग बदललं, श्रद्धा आणि त्यांच व्यक्त करण बदललं. असेना का. आजही गिरगावात त्या ठरलेल्या हनुमान मंदिराजवळ आलं की काहीही असलं, कुणीही बरोबर असलं, पाऊस, थंडी, ऊन, दिवस, रात्र असली तरी अचानक तो असल्याची जाणीव होते. उजवा हात हृदयाजवळ जातो. एक क्षण डोळे मिटतात. मनोजवं मारुत तुल्य वेगं आपसूक म्हटलं जातं आणि डोळे उघडले की समोर शेंदूर ल्यालेला, हातात द्रोणागिरी धरून उड्डाणाच्या तयारीत असलेला तो दिसतो आणि का माहीत नाही पण प्रत्येक वेळी आत्मविश्वास वाढला असं वाटतं!
अश्या प्रत्यक्ष सूर्याला पकडायला निघालेल्या आमच्या लहानपणापासूनच्या मित्राचा, शक्ती, आरोग्याचे दैवत बनून आम्हाला चार योग्य गोष्टीसाठी कॉलेजात प्रेरणा देणाऱ्या याराचा, स्त्रियांचा आदर, मैत्री तसेच भक्ती ह्यांचं जिवंत उदाहरण असलेल्या आमच्या जीवलगाचा, रामाचा आशीर्वाद आणि अमरत्व असे वरदान लाभलेल्या आमच्या गुरूचा आज वाढदिवस! वाढदिवसाच्या शुभेच्छा रे वातात्मजा! 🙏
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023