घासाघीस…
यकीनही नही होता…!
वर्ष होऊन गेलं असेल मला अंतूशेट होवून.
फरक एवढाच की, पुलंच्या अंतूशेटचं दुकान दोन चार महिन्यांत बंद पडलं.
त्यांच्या दुकानाचा अण्णू गोगट्या झाला…
आमचं दुकान मात्र जोरात चालूंय.
किडाच होता माझ्या डोक्यात.
वळवळणारा.
सारखं डोकं कुरतडायचा.
‘सोड नोकरी..
कर बिझनेस…’
बायकोही तशीच मिळाली मला.
तिलाही राधिका सुभेदार व्हायचं होतं.
मसाला क्वीन वगैरे नाही हो.
बिझनेसवुमन व्हायचं होतं तिला.
लग्नानंतर बारा वर्ष नोकरी झाली.
पोरगं पाचवीत.
फ्लॅटचे हफ्ते संपलेत.
पुढच्या दोन वर्षांची सोय होईल, ईतपत पैसा साठवलाय.
खोल श्वास.
ठाम निश्चय.
मन है विश्वास,
पूरा है विश्वास.
मारली धंद्यात ऊडी.
मागच्या अक्षयतृतीयेला चालू केलं दुकान.
येत्या अक्षयतृतीयेला वर्ष होईल.
आमच्या दुकानाचं नाव आहे “घासाघीस”.
भारी आहे ना ?
छान चाललंय आमचं.
नोकरीइतका पैसा आरामात सुटतोय.
आनंद हाच की ,आता आम्ही स्वतःसाठी राबतोय.
हा आलेख वाढता राहणार..
अर्थात मेहनत आहेच.
सध्या भाड्याचीच जागा आहे.
दोन तीन वर्षात स्वतःची होईल.
गेली दोन वर्ष होमवर्क करतोय.
माझ्या मित्राचं दुकान आहे तुळशीबागेत.
ड्रेसमटेरियल, काॅस्मेटीक्स, आर्टीफीशीयल ज्वेलरी, वगैरे वगैरै…
साधारण हजार स्क्वेअरफूट जागा असेल.
आठ दहा जणांचा स्टाफ..
बायकांची गर्द झुंबड असायची दुकानात.
सगळ्या बायकांचं हे आवडतं दुकान.
बोलो क्यों ?
तिथं जरा बारगेन करता यायचं.
आख्खी तुळशीबाग फिक्स्ड रेटची पाटी मिरवतेय सध्या.
कुणीही एक पैसाही कमी करत नाहीये.
ही सगळी मंडळी धंद्यात मुरलेली.
अनुभवी.
त्यांना पुण्यातल्या बायकांची सायकोलाॅजी समजायला हवी.
जरा ‘भाव’ करता आला की शाॅपींगची मजा दुप्पट होते.
सगळ्यांच्या ‘मनी’ हाच भाव.
म्हणूनच माझ्या मित्राचं दुकान वर्ल्ड फेमस.
आॅफीस संपलं की रोज माझ्या मित्राच्या दुकानात जायचो, तुळशीबागेत.
बायकोही सकाळी नऊ ते बारा दुकानात असायची.
वर्षभर आमच्या दोघांचं ट्रेनींग चालू होतं.
माझा मित्र ग्रेटच.
धंद्याची सगळी सिक्रेटस् हातचं राखून न ठेवता सांगितली.
तुम्हालाही सांगतो.
सोप्पंय ते !
बार्गेनींग एक्स्पर्ट झालोत आम्ही दोघं.
बार्गेनींगविषयी आमचे काही प्रचंड गैरसमज होते.
जिथं बार्गेन होतं ते दुकान आज ना ऊद्या बुडणारंच, असं मला नेहमी वाटायचं.
आता पटतंय.
शक्यच नाही.
बार्गेनमधेच गेन आहे लाॅस नाही.
हर चीज की कुछ किमत होती है…
आपला नफा पकडून कुठली तरी मिनीमम अमाऊंट येते.
ही किंमत आमच्या डोक्यात फिक्स्ड असते.
ही लक्ष्मणरेषा कधीही ओलांडायची नाही.
एम.आर.पी. या किमतीपेक्षा साधारण 20% ते 30% जास्त असते.
एम. आर. पी.चा स्टीकर त्या वस्तूवर चिटकवलेला हवा.
या 20 -30%त बार्गेनींगचा खेळ खेळायचा.
10% डिस्काऊंट दिला तरी समोरची पार्टी खूष.
आमचाही फायदाच.
घासाघीस हा प्रकार भन्नाटच असतो.
‘मी नेहमी येते इथे..
तुम्ही ओळखलं नाही का मला ?
मला या कानातल्याची खरी किंमत माहित्येय..
दहा दुकानं फिरून आलेय मी.’
लढाईला अशी सुरवात होते.
कानातली, गळ्यातली,क्लिप्स, गंगावने, याच्यात काही वेळा बराच मार्जीन असतो.
अर्थात त्यासाठी लाॅटमधे माल ऊचलावा लागतो.
200 रूपये किंमत असेल तर बायका 50 पासून सुरवात करतात.
आपण चिडायचं नाही.
ऊलट त्यांचं कौतुकच करायचं.
”एवढी तर माझी खरेदीही नाही..
नही परवडता ..”
असं म्हणत चक्क रडायचं
दहा पंधरा मिनटं वाटाघाटी चालतात.
150 ला मांडवली होते.
आम्हीही 150 ला देवून टाकतो.
बायकांच्या चेहर्यावर विजयानंद.
साध्या साध्या गोष्टीत आनंद शोधतात या.
ग्रेट !
आम्हाला दोघांनाही हा आनंद बघायला आवडतो.
खरं तर यात नुकसान काहीच नाही.
बायका एक कानातलं कधीच घेणार नाहीत.
त्या घेतात लाॅटमधे.
आईसाठी, बहिणीसाठी, नणंदेसाठी, सासूबाईंसाठी, मैत्रिणीसाठी..
आनंद वाटून कसा खावा?
हे यांच्याकडून शिकावं..
लाॅटमधे खरेदी.
म्हणूनच…
आमचं दुकान कसं भरलेलं असतं नेहमी.
आमचीही काही सीक्रेटस् आहेत.
सगळ्या गोष्टींचं बार्गेनींग नाही होत.
बार्गेनींगचं वेगळं सेक्शन आहे आमच्याकडे.
निम्मा सेक्शन फिक्स्ड रेटमधे.
प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या आॅफर्स.
रोटेशनमधे दोन्ही सेक्शनमधले आयटेम्स फिरवतो.
रोज कुठली तरी आॅफर असतेच.
त्यामुळे गर्द गर्दी रोजचीच.
सॅटरडेला वेगळी चंमतग असते.
एका काऊंटरला ‘बोली बोल’चा धमाका चाललेला असतो.
समजा..
एखादी ब्रॅन्डेड लिपस्टीक आहे.
मार्केट प्राईस 200रू आहे.
आम्ही बेस प्राईझ फक्त 50 रू. लावतो.
बायका ‘बोली’ लावायला सुरवात करतात.
अगदी पिक्चरमधल्यासारखं.
शेवटी ती 180 च्या आसपास पोचतेच.
आमची अट एकच असते .
कमीतकमी दहा पीसेस घेण्याची.
नुकसान कोणाचंच नाही.
आमचा मार्जीन सुटतोच.
शनिवारी मात्र आमच्या दुकानात पाऊल ठेवायला जागा नसते
तुमची आणि बाप्पांची कृपा आहे महाराजा…
दुकान चालंतय नव्हे पळतंय.
कधी येताय वहिनींना घेऊन ?
कधीही या.
दुकान आपलंच आहे.
ओळखीचा काही फायदा नाही व्हायचा बरंका. !
आपली आपण ‘घासाघीस’ करायची आणि बेस्ट प्राईस पदरात पाडून घ्यायची.
बडे सयाने केह गये है ,
खरीददारी का असली मजा, घासाघीस करनेसेही आता है !
और ‘घासाघीस’ दुकान पेंच आता है ..
पाहुणे लवकर या..
वाट बघतोय.
****
“घासाघीस..”
‘डिट्टो तुळशीबाग’…,
नळस्टाॅप चौक, कर्वे रोड, पुणे.
…..कौस्तुभ केळकर नगरवाला.
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)
- घरघर….. - October 4, 2021
- ‘स्कूल चले हम ! - September 22, 2021
- चष्मा - July 12, 2021
Wah
असं दुकान आहे का खरंच?
मस्तच … घासाघीस करू न शकणाऱ्या माझ्यासारखीला ट्रेनिंग सेंटरच आहे हे !!!
यायलाच हवं