बाजार….

अंजी उठली तेव्हा दुपारचे ४ वाजून गेले होते. आता तिला उठायलाच लागणार होते. पाच- सहा वाजेपर्यंत तयार होऊन कोपऱ्यावर उभे राहणे गरजेचे होते. गिऱ्हाईक पटवण्यासाठी जितके लवकर जात येईल तितके बरं. तिच्याच शेजारच्या खोलीत दोन नवीन मुली आल्या होत्या कारण. अंजनी पंचविशीत आली होती. दिसायला नाकीडोळी नीटस मुलगी होती ती लहानपणापासून. काका घेऊन आला तिला इकडे. शहर दाखवायला आणि त्याच्याकडे रहायला म्हणून. दोन दिवसांनी काकी माहेरी गेली तिच्या. त्यानंतर पहिल्याच रात्री त्याने तिच्यावर हात टाकला. पंधरा सोळा वर्षाच्या अंजीला काय झाले ते कळलेच नाही. आठवडाभर तिला भोगल्यावर साळसूदपणे त्याने तिला घरी सोडले. ओकाऱ्या चालू झाल्याच तिला पुढच्या महिन्यात. जीव तोडून खरे काय ते सांगितले तिने. काकाने हात वर केले. म्हणला मी कामावर जात होतो. ही घरात एकटी. कुठे शेण खाल्ले काय माहित? अंजीला राग आवरला नाही. तिने पुढे होऊन त्याच्या मुस्काटात हाणली. घरदार संपलेच तिला नंतर. रात्री बापाच्या पाकिटावर हात मारला तिने. जे काय पैसे हाती लागले ते घेतले. दोन साड्या बांधल्या आणि घर सोडून गेली. आपल्या पाठी गावात बोंब झाली असणार पोरगी धंदे करून पैसे चोरून पळाली म्हणून. राहून राहून तिच्या मनात येई. आईला भेटायला पाहिजे होते. फक्त तिला पटले होते आपण काय सांगतोय ते. कळत होते तिच्या नजरेवरून. आता काय म्हणा त्याचे? अंजी विचार झटकून उठली. तिने सोनीच्या मुठीतून आपला पदर सोडवला. काकाचे हलकटाचे हे एक देणंच मला. तिला सुरुवातीला सोनीचा खूप राग येत असे. पण जसजशी ती मोठी होऊ लागली तसतसा अंजीचा राग मावळत गेला. झाल्या प्रकारात तिची काय चूक? वस्तीत येणाऱ्या एका संस्थेच्या दादांनी तिच्याशी बोलून बोलून तिला पटवून दिले होते. अंजीला वाटे पोरगी नसती तर कुठे गेलोच असतो आपण निघून. पण आता तिला जगवणे आले आणि तिच्यासाठी जगणे आले. तिने सोनीच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. बोटे मोडली आणि ती आवरण्यासाठी उठली.

हरामखोर गिऱ्हाईक होते कालचे शेवटचे. चार झाल्यावरच ती दमली होती. पण पाचव्याने तिला पैसे जादा देईन म्हणून तयार केली. खेळत बसला साला किती वेळ पण.

“आटप की लवकर” अंजी त्याला कंटाळून म्हणाली होती.

“का तुला काय पूजेला जायचंय कुठे? पैसे देतोय की मी.”

“अरे पैसे देशील म्हणून काय जीव घेशील का माझा आता?” अंजी म्हणाली.

तशी त्याने अंजीला उसंत पण घेऊ दिली नाही पुढचा अर्धा तास. वर म्हणला उद्या येईन परत. तुलाच शोधून काढतो बघ. तशाही स्थितीत अंजीला हसू आले. जा की. आला मोठा. लयी पाह्यले शाने तुझ्यासारखे. तरीपण मनातून कुठेतरी तिला तो यावा असेच वाटले. ती आता तयार झाली. केसात त्याच्या आठवणीने तिने गजरा घातला. गच्च ब्लाउजवरून पदर आवळला. ती खाली येऊन तिच्या कोपऱ्यावर उभी राहिली.

“ये साहेब येतो का?”  तिचे नेहमीचे इशारे सुरु झाले.

समोरच्या सिग्नलवर एक गाडी थांबली होती. आलिशान होती झकास. अंजीला वाटले काय भारी गाडी आहे. यातल्या कुणी सायेबाने उचलले आज आपल्याला तर लैच भारी होईल. मनात पण एसीच्या गार वाऱ्याने ती सुखावली. इतक्यात गाडीची काच खाली आली. आतमध्ये एक कमालीची देखणी बाई बसली होती. तिच्याच वयाची असेल. तिने अंजीला इशारा केला. अंजीला कळेचना. ती तशीच गोंधळली गाडीपाशी गेली.

“नाव काय तुमचे?” त्या बाईने विचारले

“अंजी. का वो?”

“येताय का आज आमच्याकडे? खूप पाहुणे आहेत.”

“किती देणार?”

“किती घेता तुम्ही?”

“पाचशे घेईन प्रत्येकाचे”

रेवा हसायला लागली.

“बस गाडीत.”

अंजी गाडीत बसली. तिला खरंच वाटेना. पदराने घाम पुसत ती म्हणाली

“कुठे जायचे वो?”

रेवाने एरियाचे नाव सांगितले. अंजीला तसाही काही फरक पडला नसता. तिची चाळ आणि आजूबाजूची चार हॉटेल सोडून ती कुठे गेली नव्हती. ती चोरून रेवाकडे बघत होती.

रेवा सराईतासारखी गाडी चालवत होती.

“तुला असे वाटत असेल ना मी तुला का विचारले म्हणून?”

“हां ते पण एक आहेच”

“तुला काहीही करायचे नाहीये, मला कुणीतरी बोलायला हवय म्हणून तुला घेऊन चालले आहे.”

अंजी चाट पडली. धंद्याचा वेळ घालवून या बाईबरोबर बोलत बसले तर कसे व्हावे? बाहेरून कुलूप असले तरी खोलीत एकटीच खेळात असलेली सोनी तिला दिसायला लागली. अधूनमधून अंजी डोकावून तिला बघून येत असे. तिचा तिथे कुणावरही विश्वास नव्हता. पोरीची जात. कुणी उचलून नेली असती, विकली असती तर अंजीला काहीच करता आले नसते. तिचा श्वास खालीवर झाला.

“घाबरू नकोस. मी आणून सोडते तुला इकडे परत. तुझी खोटी नाही करायची मला. तास दीड तासाचे पैसे देईन मी तुला.”

तशी अंजी थोडी सैलावून बसली. गाडी एका मोठ्या आलिशान बिल्डिंगपाशी येऊन थांबली. दारातल्या सिक्युरिटीने सलाम ठोकत दार उघडले. गाडीतून उतरणाऱ्या भडक साडी आणि मेकअप मधल्या अंजीला पाहून तो दचकला. रेवाकडे चोरटी नजर टाकत तो मागे झाला. अंजी टकामका सगळीकडे बघत होती. रेवाने तिला खूण केली तशी ती रेवाच्या मागोमाग चालू पडली. लिफ्ट पंधराव्या मजल्यावर थांबली. एका मोठ्या दरवाजासमोर लिफ्ट थांबली. रेवाने कार्डने दार उघडले.

“ये आत बस.”

अंजी सोफ्यावर चोरून बसली. इतक्या मोठ्या घरात राहणाऱ्या बाईचे आपल्याकडे काय काम असेल ते तिला कळेना.

रेवा आत गेली. दहा मिनिटांनी बाहेर येऊन बसली.

“पितेस का तू?”

“न्हाई बा. न्हान पोरगी आहे मला. तिच्याकडे बघावे लागतंय अधूनमधून. पिऊन चालत नै”

रेवा हसली. तिने पर्समधून दोन हजाराच्या दहा करकरीत नोटा काढल्या.

“घे तुझ्यासाठी”

“इक्ते पैसे?” अंजीचा पुढे झालेला हात झटकन मागे आला.

“अगं घे. बस.”

रेवा आत गेली. तिने दोन बशा भरून खायला आणले. अंजी बघत होती. केक, बिस्कीट, मिठाई सगळेच होते. सोनीसाठी तिचा जीव गोळा झाला. तिच्या घशाखाली उतरेना. रेवाच्या लक्षात आले.

“अगं खा. पोरीसाठी देते मी बांधून वेगळे.”

अंजीने एक केकचा तुकडा उचलला.

“काय बोलायचे होते तुम्हाला?”

रेवा उठली. तिने बार कॅबिनेट मधून स्वतःसाठी एक उंची ग्लास काढला.

“तुला चालेल ना मी प्यायले तर?”

“व्हय की. तुमचेच घर आहे. तुम्ही कायबी करा की त्यात”

रेवा हसायला लागली. तिला हसता हसता ठसका लागला. तिच्या डोळ्यात पाणी आले.

डोळ्यातले पाणी पुसून ती सोफ्यावर येऊन बसली.

“मी काल माझ्या नवऱ्याच्या साहेबाबरोबर गेले होते त्याच्या बंगल्यावर.”

अंजी तिच्याकडेच बघत होती.

“म्हंजी त्याच्याबरोबर ….”

“हो”.

“पण का? तुम्हाला काय गरज आहे? इतके सगळे तर आहे तुमच्याकडे. आमचे ठीक आहे. मी गेलो नाही तर खायला कोण घालणार मला?”

“सगळे काही खाणे पिणे जगणे इतकेच नसते अगं.”

“म्हंजी?”

“म्हणजे हा माझ्या नवऱ्याचा साहेब आहे ना. मी एकदा नवऱ्याबरोबर ऑफिसच्या पार्टीत गेले होते. तिथे त्याने मला पाह्यले.”

अंजीच्या लक्षात आले.

“म्हणजे त्याने तुम्हाला तिथेच हात लावला का?”

“हो. तिथेच तो माझ्या गळ्यात पडला.”

“पण तुमचा नवरा होता ना तिथे?”

“होता की.”

“मग? त्याने काही बोलला नाही का?”

“नाही.”

“का?”

“कारण त्याची नोकरी धोक्यात आहे.”

“काय केले त्याने?”

“पैसे खाल्ले.”

अंजी हसायला लागली. रेवा तिच्याकडे चमत्कारिक नजरेने बघायला लागली.

“हसतेस काय?”

“नाहीतर काय करू?”

“पैसे खाल्ले तुमच्या नवऱ्याने आणि तुम्हाला त्याच्या साह्यबाबरोबर जायला लागतंय. दल्ला हाय काय साह्येब तुमचा? इज्जत जाऊ न्हाई म्हणून बायकोला विकतो? असली कसली इज्जत ही?”

रेवाच्या चेहऱ्यावर अंगार फुलला. ती लाल झाली.

“ए बाजारबसवे तोंड सांभाळून बोल.”

“का? तुम्हाला का राग यायलाय इतका?” अंजीने शांतपणे विचारले

रेवा कोसळली. तिने अंजीकडे बघितले. एकाएकी ती हमसाहमशी रडायला लागली.

“किती प्रेम केले मी सुहासवर. सुहास शिर्के कुणीही नव्हता तेव्हापासून. जीव ओवाळला मी त्याच्यावर. काय चुकले माझे?”

अंजी आता कावरीबावरी झाली. तिने रडणाऱ्या रेवाच्या खांद्यावर हात ठेवला.

रेवाने अंजीला घट्ट मिठी मारली. ती धाय मोकलून रडत होती. अंजी तिला थोपटत होती. जरा वेळाने रेवा शांत झाली.

“आय एम सॉरी” तिने चेहरा फिरवला.

अंजीने पदराने तिचे डोळे पुसले.

“गप ऱ्हावा आता. किती त्रास करून घेताय? एकदाच जायला लागले न्हवे तुमाला?”

“नाही ग. किती जणांकडे गेले मी. माहित पण नाही आता. उबगलाय जीव माझा आता. नवरा आहे का कोण? याच्या भानगडी निस्तरण्यासाठी याच्या कामासाठी मला वापरून घेतो.”

“तुमचं तर माझ्यापेक्षा वाईट चाललंय की म्हणजे. मला पैशे तरी भेटत्यात. तुमाला काय भेटतय?”

“इज्जत मिळते ना. खोटी का असेना. इतक्या मोठ्या माणसाची बायको म्हणून.”

“मग आता पुढे?”

“काय माहित? पण उद्या मी घर सोडून जाणार आहे हे.”

‘आणि कुठे जाशील?”

‘दुसऱ्या देशात. कायमची. आज कुणाशी तरी बोलायचे होते फक्त. हे कुणाला सांगणार घरात? सगळ्यांना पैसे दिसतो. मान दिसतो. पण त्यामागचे आयुष्य दिसत नाही. कुणाला सांगून समजणार पण नाही. सुखी आहेस तू. तुला बघायला तुझी पोरगी तरी आहे मोठेपणी.”

“कुणाला ठाऊक बघते की नाही ते. आई असले तरी रांड बाई मी. काय माहित बघल नाही बघल. आपलं आपण बघावे, हेच खरं बघा.”

सगळे उमजल्यासारखी रेवाने मान हलवली. थोड्या वेळाने ती उठली. एका मोठ्या डब्यात खायचे भरून आणून तिने अंजीच्या हातात डबा दिला. अंजी उठली. रेवा तिच्या मागोमाग किल्ली घेऊन उभी राहिली. रेवाने अंजीला पैसे एका सुंदर पर्समध्ये घालून दिले

“नको ताई पैसे ह्ये”

“अगं माझ्या भाचीला घेऊन जा.”

“नको माय. स्वतःच्या बायकोला धंदा करायला लावून कमावलेले पैसे हे. लेकराला नका देऊ. कुठे जाल तिथे सुखी राहा. कधीमधी भेट जमले तर.”

“पण तू कशी सापडणार मला?”

“आम्ही कुठे जातोय? आमच्यासारख्यांना जायला कुठले दुसरे गाव आणि देश नस्तय. मी तिथेच आसन.”

अंजी चार पावले पुढे गेली आणि वळली.

“ताई माझे एक काम कराल का?”

“काय ग?”

“आमच्या वस्तीत एक दादा येतु. त्याची संस्था हाय. आमच्या वस्तीतल्या पोरांना सांभाळतो. त्याला हे पैसे द्या. त्याला गरज आहे.”

रेवा तिच्याकडे बघतच राहिली.

परतीच्या रस्त्यावर दोघी शांत बसून होत्या गाडीत.

“त्यो बघा त्यो दादा. त्यो पोरांना घेऊन जातो रातीला सांभाळायला. म्या येतु आता. धंद्याचा टाइम झाला.”

ती वळली आणि मागून रेवाने हाक मारली.

“नाव काय तुझे सांग ना परत?”

“काय फरक पडतोय ताई? तुमाला बरं वाटले न्हवं माझ्याशी बोलून.”

“तरीपण”

“माझे नाव अंजी.”

अंजी तिथून निघाली. ती तडक खोलीवर आली. सोनीला बघून तिच्या जीवात जीव आला. सोनीला छातीशी धरून ती बसून राहिली. थोड्या वेळाने ती खाली उतरली. नाक्यावर जाऊन उभी राहिली. तो दिसला तिला. लांबून तिच्याकडेच बघत होता. तो कालचाच. तिच्यावर तुटून पडणारा आणि तरीही तिला हवाहवासा वाटणारा तो. तो शांतपणे चालत तिच्याकडे आला.

“येती का?”

“तुझ्याबरोबर? न्हाई बा”

“का?”

“तू सरळ शांत न्हाईस म्ह्णून”. तिने हसत हसत उत्तर दिले.

तो हसला. “आज नाही त्रास देणार”.

ती हसली. त्याच्याबरोबर खोलीत गेली. त्याने तिचा पदर ओढला आणि हातावर दोन हजाराच्या कोऱ्या पाच नोटा ठेवल्या.

“इक्ते पैशे?” अंजीचे डोळे विस्फारले.

“अगं घे. माझा साहेब खूप मोठा माणूस आहे. त्याने या आठवड्यात दिलेत बोनस म्हणून.”

“अस्सं. कोण म्हणे साहेब तुझा?”

“तुला काय करायचे ग?”

“असच विचारले”

“सुहास शिर्के नाव आहे त्याचे. बायको एकदम आयटम आहे बघ त्याची. साली दाखवते अशी की एकदम सती सावित्री आहे. पण दहा जणांबरोबर जातीय”.

अंजीने त्याच्याकडे नीट बघितले.

“माझे प्रेम आहे बघ तुझ्यावर.” तो तिला जवळ ओढून म्हणाला.

अंजीची कवटीच सरकली. ती एकदम सरळ ताठ उभी राहिली.

“प्रेम आहे म्हणू नकोस र मुडद्या. थू तुमच्या प्रेमावर हराम्या. काय करायचे ते कर आणि पैसे टाक भिकाऱ्या. जास्त तोंड चालवू नगंस काय?”

हातात चुरगळलेले पैसे घट्ट धरून रागाने थरथरणाऱ्या अंजीकडे तो बघतच राहिला.

©प्राजक्ता काणेगावकर

Image by Efes Kitap from Pixabay

Prajakta Kanegaonkar

Prajakta Kanegaonkar

मॅनेजमेंटची प्रोफेसर म्हणून नोकरी. खाद्यपदार्थांचा स्वतःचा व्यवसाय. आजूबाजूला घडणाऱ्या अनेक लहान मोठ्या घटनांकडे चौकस कुतूहलाने बघणारी, लिखाणातून व्यक्त होणारी नजर. इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांवर प्रभुत्व पण अभिव्यक्ती मराठीवरच्या प्रेमामुळे मराठीतूनच. सर्व प्रकारचे लिखाण करायला आवडते.

6 thoughts on “बाजार….

  • May 11, 2019 at 5:13 pm
    Permalink

    Excellent storyline…. apt end

    Reply
  • October 14, 2019 at 5:23 pm
    Permalink

    Good one. Vidarak Satya

    Reply
    • November 3, 2020 at 6:17 pm
      Permalink

      निःशब्द

      Reply
  • March 5, 2020 at 8:54 am
    Permalink

    छान आहे

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!