निहिरा…

अमितला कॉलेजपासून भयकथांचा नाद. फक्त वाचन नाही तर त्या वाचून रंगवून रंगवून लोकांना सांगण्याची प्रचंड आवड. अश्याच एका कॅम्पला अमावस्येच्या रात्री तंबूच्या बाहेर विस्तीर्ण पठारावर बसून त्याने सांगितलेल्या भयकथेने घाबरलेल्या निहिराने त्याला थरथरत मिठी मारली. ती मिठी प्रेमाची बनून निहिरा अमितची केव्हा झाली ते दोघांच्याही लक्षात आलं नाही. सगळं छान होतं फक्त अमित भयकथा सांगू लागला की निहिरा लांब जात असे. तिने त्याला सांगितलं होतं की ह्या तुझ्या कथा एक दिवस जीव घेतील माझा!

कॉलेज संपून अमित पुढील अभ्यासाला अमेरिकेला गेला तो निहिराशी साखरपुडा करूनच! वर्ष भराभर उडाली. अमितची उद्या भारतात यायची फ्लाईट. आज त्याचा दिवस आणि निहिराची रात्र. त्याने हट्टाने निहिराला स्काईप वरून एक अमेरिकन भयकथा ऐकवली. ती ऐकताना निहिराच्या कपाळावर जमा झालेले धर्मबिंदू बघून त्याला मजा वाटली. तो म्हणाला पण “उद्या आलो की बघ तुला इतक्या भयकथा सांगतो की तुझी भीती कायमची निघून जाईल”

अमितची फ्लाईट भारतात लँड झाल्यावर तो बॅग्स घेऊन अराईवल टर्मिनल मधून बाहेर आला तेव्हा निहिरा त्याची वाट बघत होती. तिला एकटीलाच बघून त्याला आश्चर्य वाटलं. निहिरा म्हणाली “घरी सगळे तयारी करत आहेत. म्हणून मी एकटीच आले!” घरी निघाल्यावर टॅक्सीत निहिरा गूढ हसत त्याच्या डोळ्यात बघत होती. आज तिने त्याचा आवडता मोगऱ्याचा गजरा घातला होता. चंदनाच अत्तर लावलं होतं. चंदनाच्या अत्तराचा तिटकारा असलेल्या निहिराला चंदनाच अत्तर लावलेल बघून अमितला आश्चर्य वाटलं. त्याने विचारल्यावर ती म्हणाली “आता कशाचाच तिटकारा किंवा भीती नाही. तुझ्या भयकथांची पण नाही!” असं म्हणून ती त्याच्या डोळ्यात बघत गूढ हसली!

तिने टॅक्सी अमितच्या घरा ऐवजी त्याच्या बाबांनी त्या दोघांसाठी लग्नानंतर राहायला घेतलेल्या कॉम्प्लेक्सकडे घ्यायला सांगितली. अमितला म्हणाली “तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे!” परत गूढ हसली. टॅक्सी सोडून दोघे लिफ्टजवळ आले. ती म्हणाली “तू हो पुढे. मी पायऱ्या चढून येते!” अमितला हे सर्व विचित्र वाटत होतं. तरी तो लिफ्टमध्ये गेला. त्याने तेराव्या मजल्याच बटण दाबल. लिफ्ट सुरू झाली. अचानक लिफ्ट मधले लाईट गेले आणि लिफ्ट सहाव्या आणि सातव्या मजल्याच्या मध्ये बंद पडली! अमितच्या कपाळावरून घामाचा एक थेंब ओघळला. दीड एक मिनिटांनी लिफ्ट आपोआप सुरू झाली! अमित तेराव्या मजल्यावर उतरला. निहिरा त्याच स्वागत करायला उभी होती. तेच गूढ हास्य चेहऱ्यावर लेवून! तिला समोर पाहून तो दचकला. म्हणाला “तू तेरा मजले चढून आलीस पण माझ्या आधी?” ती म्हणाली “सरप्राईज घरात आहे. जाऊन बघ.”

अमित अविश्वासाने पुढे निघाला. त्यांच्या 1301 फ्लॅटच दार उघडं होत. त्याने ते हळूच ढकललं. अचानक त्याला मोगऱ्याचा वास आला.फ्लॅट मोगऱ्याचा उदबत्तीच्या धुराने भरला होता. अमित थोडा पुढे आल्यावर त्याला समोर एका पाटावर ठेवलेला निहिराचा हसरा फोटो दिसला! त्याला चंदनाचा हार घातला होता! ते पाहून अमितला प्रचंड धक्का बसला. तो मागे वळला तर समोर निहिरा उभी होती. गूढ हसत! तिने अमितचा हात आपल्या थंड हातात घेतला आणि म्हणाली “काल तू मला तुझी गूढकथा सांगितलीस. ती ऐकून माझ्या मनावर प्रचंड आघात झाला आणि पाच मिनिटात माझा मृत्यू झाला!” हे ऐकून अमितने तिचा हात सोडला!

त्याला घाबरलेला बघून निहिरा जोरजोरात हसायला लागली. अमितला कळत नव्हतं नक्की काय झालं आहे. ती म्हणाली “सर्वांना भयकथा सांगणाऱ्या तुला एक भयकथा अनुभवायला का देऊ नये असा विचार काल तुझी भयकथा ऐकल्यावर डोक्यात आला. म्हणून मी एकटी एअरपोर्टवर आले. गूढ हसत होते, चंदनाच अत्तर, माझा फोटो आणि मोगऱ्याची उदबत्ती हा सगळा सेट अप केला आणि तुला इथे आणला. तुला लिफ्टने पाठवून वॉचमनला सांगून लिफ्ट एक मिनिट बंद केली. तेवढ्या वेळात मी दुसऱ्या लिफ्टने वर आले. एअरपोर्टवर यायच्या आधीच मी इथे ही सर्व तयारी करून ठेवली होती. कसा वाटला भयकथेचा अनुभव?”

अमित स्तंभित होता. म्हणाला “माझा अजूनही विश्वास नाहीये!” निहिरा म्हणाली “भूत आरशात दिसतात का?” अमित म्हणाला “नाही”. निहिरा त्याला बेडरूम मध्ये घेऊन गेली. दोघे आरशासमोर उभे राहिले. अमितला आरशात निहिरा दिसत होती. इतक्यात निहिराला फोन आला. तिने फोन घेतला. त्यावर कळलेली बातमी ऐकून ती म्हणाली “हे कसं शक्य आहे? अमित तर…” तिने घाबरत अमितकडे बघितलं. तो आरशात बघत होता. फोन तसाच सुरू ठेऊन ती थरथरत पुढे आली आणि घाबरत तिने आरशात बघितलं. आरशात फक्त ती दिसत होती. फोनवर अमितचे बाबा ओक्साबोक्शी रडत म्हणत होते “निहिरा, अमितच्या विमानाला अपघात झालाय. आत्ताच बातमी आली. विमान जळून महासागरात कोसळल आहे. कोणीच वाचायची शक्यता नाहीये. अमित गेला ग आपला!” निहिराच्या हातून फोन गळून पडला. आरशात फक्त ती दिसत होती आणि मागे अमित छतावर तरंगत होता. उदबत्त्या संपल्या तरी घरात ताज्या मोगऱ्याचा वास पसरला होता!

Image by Pete Linforth from Pixabay 

mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

8 thoughts on “निहिरा…

  • May 15, 2019 at 8:18 am
    Permalink

    Khatarnak👌👌👌👌

    Reply
  • May 17, 2019 at 6:23 am
    Permalink

    Katha masttt ahe pan te etaka bhayanak photo takane compulsary ahe ka…….phar bhiti ho log in kelyavar ekdum samor yetoy to….

    Reply
  • July 17, 2020 at 4:48 pm
    Permalink

    Baaapre. Beyond imagination

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!