रडार
जोशीकाकू.
फ्लॅट नं 1, सरिता विहार.
आमच्या बिल्डींगमधला पहिला फ्लॅट, जोशीकाकांनी बुकला होता म्हणे.
बिल्डींगमधला हा एकमेव गार्डन फ्लॅट.
तळमजल्यावरचा.
ऐसपैस चार खोल्या.
समोर सुमारे 500 स्क्वेअर फूट जागा.
त्याला चारफूट ऊंचीचं छोटसं कंपाऊंड.
जोशीकाकूंच्या फ्लॅटसाठीचं वेगळं गेट.
या पाचशे स्क्वेअर फूटातच जोशीकाकूंनी त्यांचं शालीमार गार्डन ऊभारलेलं.
जाई जुईचे वेल.
सोनचाफा, बकुळी, रातराणी.
पंधरा वीस कुंड्यांत गुलाब.
गेटजवळच्या एका कोपर्यात छोटसं लाॅन.
तिथं असलेला त्यांचा छप्परवाला झोपाळा.
जोशीकाकूंचा वावर सदासर्वदा या शालीमार गार्डनमधेच.
सतत झाडाझडती चाललेली.
या झाडाची माती ऊकर नाहीतर त्या झाडाची मुंडीकट.
काही नाही तर हातात खराटा घेऊन पालापाचोळा गोळा करणं.
त्याचा ढीग करायचा अन् पेटवून द्यायचा.
जोशीकाकूंचे कुटीरोद्योग सतत चालू असायचे.
हे सगळं करून दमल्या की त्या झोपाळ्यावर बसायच्या.
हात बिचारे कुठलीतरी भाजी निवडत बसायचे.
जोशीकाकूंचे कान आणि डोळे.
आॅलवेज आॅन ड्यूटी.
बिल्डींगमधे शिरलं की काॅमन पार्कींग आणि जिना.
डाव्या बाजूला जोशीकाकूंचा फ्लॅट.
येणारा जाणारा प्रत्येक जण जोशीकाकूंच्या नजरेच्या टप्प्यात.
जोशीकाकूंना आम्ही रडार सिस्टीम म्हणायचो.
प्रत्येकावर त्यांचं बारीक लक्ष.
कुणाकडे कोण कोण पाहुणे येतात ?
कुणाची पोर तास्नतास फोनवर असते ?
कोण कधी कधी थोडीशी घेऊन येतं ?
कुठल्या घरातल्या कुरबूरी वाढल्यायेत ?
कुठं पाणी मुरतेय सध्या ?
जोशीकाकूंकडे बित्तंबातमी असायची.
जाता येता कुणी मनातल्या मनात जरी बोललं, तरी जोशीकाकूंना ऐकू जायचं म्हणे.
व्हायरल होणं..
सोशल मिडियामधे हे आत्ता सुरू झालंय.
आमच्या बिल्डींगमधे हे आधीपासूनच सुरूय.
जोशीकाकूंना एखादी बातमी समजली की ती शून्य मिनटात व्हायरल व्हायची.
पुन्हा जाब विचारायची सोय नाही.
जोशीकाकू चारचौघात साग्रसंगीत पाणऊतारा करायच्या.
तिन्ही सप्तकात लीलया विहारणारा त्यांचा दमदार आवाज.
भांडायला त्यांना भयानक आवडायचं.
नव्हे तो त्यांचा छंदच होता.
सुतार पक्ष्यासारखं टोचून टोचून बोलायच्या.
समोरच्यानं मान खाली घालून कोपरापासून हात जोडल्याशिवाय मॅच संपायची नाही.
अर्थात मॅच नेहमी जोशीकाकूच जिंकायच्या.
सहसा कुणी जोशीकाकूंच्या वाटेला जायचं नाही.
तरीही, प्रत्येकाला घरी जाताना जोशीकाकूंच्या वाटेवरूनच जावं लागायचं.
आम्ही रहायचो तिसर्या मजल्यावर.
दुसर्या मजल्यावरचं घर गोखलेकाकांचं.
खरं तर गोखलेकाका बाबांचे सख्खे मित्र.
बाबा आणि ते एकाच आॅफीसमधे.
म्हणून तर एकाच बिल्डींगमधे फ्लॅट घेतलेला.
आमच्या दोन्ही घरात घरोबा.
आई आणि गोखलेकाकू.
दोघी सख्ख्या बहिणी असल्यासारख्या वागायच्या.
नेहमी आमच्या घरातून त्यांच्या घरात,
कांदाभजीपासून श्रीखंडपूरीपर्यंत फ्री एक्सेंज चालायचं.
गोखलेकाका आणि बाबा एकत्रच आॅफीसला जायचे अन् यायचे.
मी आणि गोखलेकाकांची ननू.
आम्ही दोघं एकाच वर्गात.
ननू एकदम घारी गोरी.
दोन शेंडेवाली.
प्रचंड हुशार तेवढीच दिलदार.
नेहमी पहिला नंबर.
माझे अभ्यासाचे नेहमीच वांदे.
ननूवाचून माझं नेहमीच अडायचं.
ननू नेहमीच सांभाळून घ्यायची मला.
वर्गपाठ, गृहपाठ, निबंधवह्या, प्रयोगवह्या, परीक्षेचा अभ्यास..
सगळं काही ननूच्या सौजन्याने.
ननू नसती तर मी पहिली सुद्धा पास झालो नसतो.
एकदम काय झालं कुणास ठावूक ?
मी आणि ननू दहावीत असू.
बाबांच्या आॅफीसमधे प्रोमोशन्स झाली.
बाबांना मिळालं, गोखलेकाकांना नाही.
तिथं काही तरी बिनसलं.
बरसो पुरानी दोस्ती जल के राख.
आता दोघं कट्टर दुश्मन.
एकमेकांसमोर आले तरी तोंड फिरवायचे.
त्या दोघांचं बरं होतं.
त्यांनी एकमेकांच्या नावापुढे फुली मारली.
आम्ही काय करायचं ?
आई आणि गोखलेकाकू.
मी आणि ननू.
नाईलाजानं आमची मैत्री संपली.
सांगतो काय ?
बाबांचं आणि गोखलेकाकांचं वाजलं,
ही बातमी दोन्ही घरात समजण्याआधी जोशीकाकूंना समजली.
तिथून ती बिल्डींगभर व्हायरल झाली.
आता मी बारावीत होतो.
सिरीयसली अभ्यासाला लागलेलो.
मान मोडून अभ्यास करायचो.
अभ्यास करून दमलो की गॅलरीत जायचो.
खालच्या गॅलरीत ननू दिसायची.
मला बघितलं की गोड हसायची.
बोटांचा फ्लाॅवर करून हात हलवायची..
कुछ कुछ…
एकदम समोर लक्ष जायचं.
जोशीकाकू समोरच बसलेल्या असायच्या.
थँक्स गाॅड.
त्यांचं आमच्याकडे लक्ष नाही गेलं.
मोठा झालो म्हणून असेल कदाचित.
जोशीकाकूंचा राग नाही यायचा आजकाल.
एक केस म्हणून बघायचो त्यांच्याकडे.
जोशीकाका, काकू आणि त्यांची एकुलती एक लेक सई.
प्रचंड लाडकी.
आर्किटेक्चरला होती.
तिथं तिचं एका गुज्जू मुलावर प्रेम बसलं.
त्यानं बिचार्यानं रीतसर येवून मागणी घातली.
काका नाही म्हणाले.
सई एक दिवस पळून गेली.
आता कॅनडाला असतात म्हणे ती दोघं.
ती गेली आणि काका काकूंचा जगण्यातला इन्टरेस्टच संपला.
काका रिटायर्ड झाले आणि टायर्डही.
सतत त्यांच्या खोलीत काहीतरी वाचत बसतात.
काकू जगावर सूड ऊगवण्यासाठी टपून बसलेल्या.
कुणाचं काही बिनसलं, की काकूंना मनापासून आनंद व्हायचा.
तशा मनानं वाईट नव्हत्या.
रडारपणाच्या अॅडीक्ट झालेल्या.
सगळं लक्ष दुसर्यांच्या आयुष्यात.
कष्टाचे बळ, मिळते फळ.
मन लावून केलेल्या,
अभ्यासाचं फळ मिळालं.
बारावीनंतर एम. बी. बी. एस ला गेलो.
नंतर एम. डी.
सायक्रॅटीस्ट झालोय.
मला वाटतं काकूंमुळेच मला या विषयात इन्टरेस्ट क्रियेट झाला.
काकूंचा राग नाही यायचा.
आता कुठं मी त्यांना समजून घेऊ शकायचो.
ननू पहिल्यापासून हुशारच.
ननूही बी.डी. एस. झाली.
छानच दिसायची.
काही तरी वेगळं वाटायचं तिला बघितल्यावर.
एकदा असंच गॅलरीत ऊभा होतो.
समोर ननू.
माझ्याकडे बघून गोड हसली.
डोळ्यांनीच तिला विचारलं.
” होशील , होशील ?
माझी होशील ?”
झूकी झूकी सी वो नजर.
तिच्या पापण्यांनी हलकेच हो म्हणलं.
कसं जमायचं ?
त्या दोन राहू केतूंना कोण शांत करणार ?
आयडिया..
जोशी काकूंची रडार सिस्टीम.
मुझे ये सिस्टीम पर पूरा यकीन था.
ठरलं तर…
मी आणि ननू.
एकमेकांचे सेल नं. मिळवणं फारसं अवघड गेलं नाही.
मुद्दामहून गॅलरीत ऊभे राहू लागलो.
एकमेकांकडे पाहून हसणं.
लाजणं.
खाणाखुणा.
सगळं काही जोशीकाकूंच्या रडारच्या टप्प्यात येईल असं.
जोशीकाकूंच्या घरासमोरून येता जाता फोनवर कुजबूजायचो.
इथं भेटूयात.
तिथं भेटूयात.
मुद्दामहून ननू ननू असं म्हणायचो.
रडार वाॅज हायली अलर्ट अॅज आॅलवेज.
शेवटी व्हायचं तेच झालं.
माझं आणि ननूचं अफेअर चालू आहे..
ही न्यूज व्हायरल झाली.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत..
सगळीकडे फक्त हीच ब्रेकींग न्यूज.
दोन्ही घरी समजलं.
युरेका.. युरेका..
काय चमत्कार झाला कुणास ठाऊक ?
कुठंही आकांडतांडव नाही की आदळआपट नाही.
हॅप्पी एंडसारखं झालं.
आमच्या लव्हस्टोरीचा शेवट गोड.
गोखलेकाका आणि बाबा…
दिलजमाई.
जसं काही भांडण झालंच नव्हतं कधी.
मागच्याच महिन्यात शुभमंगल सावधान.
ननूची मज्जा.
सासर ,माहेर एकाच बिल्डींगमधे.
मागच्या रविवारीच जोशीकाका- काकूंना घरी जेवायला बोलावलं होतं.
आम्ही जोडीनं दोघांच्या पाया पडलो.
काकूंना साडी , काकांना कुर्ता पायजमा गिफ्टला.
दोघांनी मनापासून आशीर्वाद दिले.
आता सांगायला काही हरकत नव्हती.
काकूंना म्हणलं,
” काकू, तुमच्या रडारसिस्टीममुळेच आमचं लग्न झालं.
दिलसे थँक्स.”
काकू मनापासून हसल्या.
” मेल्या, तुझी बायको तयार कुठं होती लग्नाला.
तुम्हा दोघांना पहिल्यांदा गॅलरीत बघितलं तेव्हाच वाटलं ,
यांचं जमायला हवं..
ननूला विचारलं तर म्हणाली,
तो तर फक्त माझा मित्र आहे.
म्हणलं नवरा मित्र होऊ शकत नाही का गं बयो ?
तिला पटवली, नंतर त्या दोन राहू केतूंना.
तुम्ही नाही म्हणालात ,तर मीच दोघांना पळवून आळंदीस नेत्ये अन् लग्न लावून देत्ये.
अशी धमकीच दिली होती.
मला नाही म्हणतात होय ?
सूतासारखे सरळ झाले.”
काकू खरंच ग्रेट आहात.
मी काकूंचे पायच धरले.
माझी डिग्री चुलीत घालून जाळावी असं वाटू लागलं.
जोशीकाकूंची केस माझ्या अभ्यासाच्या रडारला टिपताच आली नाही.
तरीही..
एकच प्रश्न विचारावासा वाटला.
मनातल्या मनात काकूंना विचारला सुद्धा.
” काकू, सईच्या वेळी तुम्ही असं का वागलात ?”
सई नावाचा सॅटेलाईट जोशीकाकूंच्या रडारच्या रेंजबाहेर असावा बहुतेक..
तोही येईल लवकरच रेंजमधे..
वाट बघतोय त्याची.
……कौस्तुभ केळकर नगरवाला.
Image by Michael Kauer from Pixabay
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)
- घरघर….. - October 4, 2021
- ‘स्कूल चले हम ! - September 22, 2021
- चष्मा - July 12, 2021
Khup chhan
Wah chan
Mast 👌👌
Khup chhan 👌👌
Khup chhan as usual 👌👌
Khup Chan
मस्त गोष्ट….प्रत्येक सोसायटीमध्ये अशी एक तरी रडार यंत्रणा असतेच
भन्नाट, नेहमीप्रमाणे
मस्तच…
छानच
खुप खुप छान . खुप आवडली कथा.
बढीया 👌👌👌