मॉम…
गेल्या आठवड्यात आमची एक शालेय मैत्रीण अचानक अनेक वर्षांनी भेटली. तिच्याबरोबर एक बाप्या. आम्ही मस्त गप्पा मारत होतो आणि तो मनुष्य आमच्याकडे “काय बोअर मारतायत!” अश्या नजरेने बघत होता. गप्पांचा पहिला आवेग संपल्यावर तिला काहीतरी आठवण झाली. तिने त्या बाप्याशी माझी ओळख करून दिली. ती म्हणाली “हा आदित्य. माझा धाकटा मुलगा. मोठा दिल्लीला असतो आणि आदि हा मंदार जोग. आम्ही एकाच शाळेत होतो!” आदी बाबाने तुच्छ नजरेने माझ्याकडे बघितलं आणि समोरच्या फुटपाथवर चालत असलेल्या रंगीत फुलपाखराने त्याच लक्ष वेधून घेतलं! मग तो “आई मी पुढे होतो. तू ये.” अस म्हणून फुलपाखराच्या मागे गेला. मी तिला म्हणालो-
मी- तू सांगितलं नाहीस तेव्हा. शाळेत आम्हाला माहीतच नव्हतं.
ती- काय?
मी- तुझं लग्न झालं होतं ते.
ती- ए. काहीही काय बोलतोस?
मी- अग खरच. हा इतका मोठा मनुष्य तुझा धाकटा मुलगा आहे म्हणजे मोठा साधारण माझ्याहून चारेक वर्ष लहान असेल.
ती- गप रे. वाट्टेल ते काय? कॉलेजच्या लास्ट इयर नंतर रिझल्टच्या आधीच माझं लग्न झालं. लव्ह मॅरेज.
मी- आणि रिझल्ट नंतर काही महिन्यात तो दिल्लीला आहे तो रिझल्ट लागला. बरोबर ना?
ती- (लाजून) हो…
मी- आयला आता काही वर्षांत तू आजी होशील. नाहीतर आम्ही! साला आमची पोर मोठी कधी होणार कोण जाणे!
ती- होईल रे काळजी करू नको. माझं सगळंच तुमच्यापेक्षा दहा ते बारा वर्षे लवकर झालं. बाकी काही नाही!
मी- पण साधारण माझ्याइतके दिसणारे पुरुष तुला ह्या वयात आई अशी हाक मारतात तेव्हा विचित्र वाटत नाही? आय मीन अजूनही चार माना तू शेजारून गेल्यावर मागे फिरतात.
ती- छे विचित्र काय त्यात? मी आहे त्यांची आई. मला तर खूप छान वाटत उलट.
मी- मग आजपासून मी तुला आंटी म्हणेन.
ती- चालेल. माझ्या मुलांचे मित्र म्हणतात मला आंटी. पण मी शेजारून गेल्यावर त्यांची नजर मागे वळत नाही. ते तुलाही लागू होईल.
मी- नको. त्यापेक्षा तू मैत्रीणच बरी. पण खरंच कमाल आहे. तू आहेस. अजून दोघी आहेत. साला तुम्ही पोराबाळांच्या लोच्यातून लवकर सुटलात. आम्ही अजून अभ्यास, ट्रिप, होमवर्क, क्लासेस ह्यात गुरफटलेले आहोत.
ती- मी म्हणाले ना, शाळेत तू जितक्या नंबरांनी माझ्या पुढे असायचास तितक्या वर्षांनी मी संसारात तुझ्या पुढे आहे. चालायचंच! चल निघते. आदी वाट बघत असेल.
मी- कोण? तो मगाशी होता तो पुरुष? तो तर एका सुंदर मुलीच्या मागे गेलाय. इतक्यात वाट नाही बघणार तुझी. पण बाय.
ती- बाय.
ती शेजारून निघून गेली. माझी मान आपसूक वळली. साला संतूर मॉम झक मारतील अशी ती मॉम होती! संसारात आमच्या एक तप पुढे असलेली तपस्विनी होती! इतक्यात आमच्या कन्येच्या फोन आला. बाबा आज येताना दोन A3 साईज चे पेपर्स घेऊन ये असा आदेश आला. मी आपल्या पोरीच्या बालपणाच्या जगात परत गुरफटलो. – ©मंदार जोग
Image by Alexandra Haynak from Pixabay
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023
Mast
Mast😊😊
Hota asa…🤣
😊😊😊