सेल्फी…

हल्लीच्या मुलांच्या हातात त्यांचा स्वतःचा मोबाइल आला की, सेल्फी काढणे हे आद्य कर्तव्य आहे. माना वाकड्या करायच्या, तोंडं करायची आणि फोटो क्लिक करायचा. ताबडतोब तो अपलोड देखील झाला पाहिजे.

मग प्रसंग परत्वे, मैत्रिणींच्या डोक्याला डोकी लाऊन, मॉल मधील एखाद्या दुकानाच्या बॅकग्राउंडवर वगैरे सेल्फीजची त्यात भर पडते. “हॅड अ ग्रेट टाईम विथ अमुक-तमुक” अशी कॅप्शन असणे सुद्धा आवश्यक आहे. फेसबुकवर गेल्या गेल्या अशा सेल्फीज परेड देत समोर येतात. मग फटाफटा त्यांना लाईक करायचं. “क्युट”, “मुआआ” “फॅब” “बेब” वगैरे दीड शब्दांचे बुडबुडे त्यावर उधळले की मगच पुढची नित्यकर्मे करायची.

वॉट्सऍपचा डीपी रोज बदलायचा आणि इतर कोणी डीपी बदलले आहेत ते तपासून त्यावर “नाइस डीपी”, “लुकींग क्युट” वगैरे कमेंट्स करायच्या आणि आपल्याला आलेल्या कमेंट तपासायच्या हा देखील अनेकांचा नित्यपाठ असतो. परवाचा म्हणावा तितक्याच नित्यनेमाने हे चालू असतं.

माझ्या लहानपणी मुली आरश्यासमोर जास्त मुरडायला लागल्या की, “पुरे आता. आरसा झिजेल.” असं कोणी जेष्ठगण करवदायचे. हल्ली जेष्ठगण सुद्धा आरशासमोर उभे राहून चांदीचे प्रमाण किती वाढले ते तपासत असतात. ह्याला नार्सिझम म्हणायचे का?

गेल्या आठवड्यात माझ्या कन्यकेने तिच्या आईच्या साक्षीने माझी उलट तपासणी घेतली. ” बाबा, पहिला हॅन्डसेट घेतल्यापासून तुझा तो एकच डीपी आहे. असा कसा रे मागासवर्गीया सारखा राहतोस?” नको तिथे नको ते शब्द वापरण्यात तिचा हातखंडा आहे. “अगं, इतक्या वर्षात मी जसाच्या तसा आहे. मग फोटो कशाला बदलायचा?” मी जरा स्टाइल मारायचा प्रयत्न केला. ” दाढी कर आधी ! कसा रहातोस तू.” या विषयावर मी कायमच मुकबधिरत्व धारण करतो.

थोड्या वेळाने पोरीने हळूच विचारले,” बाबा रागावू नकोस, पण तू इतक सगळं लिहितोस ते खरंच कोणी वाचतं का रे? किती कमी लाईक असतात त्याला. त्यातून तू फोटोपण अटॅच करत नाहीस. मी नुसता एक सेल्फी टाकला ना तर इझीली १०० लाईक्स येतात. फाइव्ह सेंटेन्सेसच्या पेक्षा जास्त मोठी पोस्ट असली तर हल्ली सगळे स्कीप करतात सरळ.” पोरीलाच बापाच्या पोस्टला कमी लाईक मिळाल्याची लाज वाटत होती.

“काय करू गं, माझे सगळे फ्रेंड्स असेच आहेत. पण मन्या, माझ्या पोस्ट म्हणजे माझे सेल्फीजच असतात ग. तुम्ही चेहेर्‍याचे मुड्स टाकता, मी मनाचे मुड्स टाकतो, एवढाच काय तो फरक.” यावर ती काही बोलली नाही. फाइव्ह सेंटेन्सेस पेक्षा जास्त असलेलं बोलणं सुद्धा ती स्कीप करत असावी.

© प्रशांत पटवर्धन.

Image by Luis Wilker Perelo WilkerNet from Pixabay 

One thought on “सेल्फी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!