माणूस…२
यथावकाश केस कोर्टात उभी राहिली. अनिरुद्धच्या बाजूने सांगळे वकील उभे राहिले. सांगळे शहरातले नावाजलेले वकील होते. सोनालीच्या बाजूने खांडपे वकील होते. सवाल जवाब झडत होते. अजय कोर्टात फारसा येत नव्हता. एकदाच त्याला बोलावून घेतले तेव्हा मनाविरुद्ध आला होता तो. त्याच्याकडे बघून अनिरुद्धला धक्काच बसला. त्याचा रुबाबदारपणा पार लयाला गेला होता. वजनही उतरले होते त्याचे. बहुतेक बायकोला कळले असणार अनिरुद्ध स्वतःशीच म्हणाला. सोनाली मात्र काहीच झाले नाही अशी वावरत होती. अनिरुद्धने केलेल्या हल्ल्याचे निमित्त साधून तिने डिवोर्सची केसही फाईल केली होती. अनिरुद्ध दोन केसेसचा सामना करत होता. सोनालीच्या चेहऱ्यावर तो पश्चात्ताप शोधात होता. पण तिचा चेहरा त्याला वाचताही येत नव्हता. केसच्या संदर्भात तिचे फोन, मेसेजेस वाचूनही हाती काही लागले नव्हते. अनिरुद्धला या सगळ्याचा कंटाळा यायला लागला होता. त्याच्या मनाने कधीच हार पत्करलेली होती. त्याला आरोप प्रत्यारोप सहन होत नव्हते. सांगळे वकिलांच्य म्हणण्याप्रमाणे अनिरुद्धने केलेला हल्ला हा भावनिक स्फोट आणि स्वतःचा बचाव असा सिद्ध करता येऊ शकत होता. त्या दृष्टीने त्यांनी अनिरुद्धकडून प्रश्नोत्तरांची तयारी करून घेतली होती.
केसचा आज चौथा आठवडा होता. अनिरुद्ध बॉक्समध्ये उभा राह्यला. खांडपे वकील उभे राहिले.
“नमस्कार अनिरुद्ध”
“नमस्कार”
“कसे आहात?”
“कसा असणे अपेक्षित आहे?”
“ते पण खरंच आहे म्हणा. बरं एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला, विचारू का?”
खांडपे वकिलांनी दिवाणखान्यात बसून विचारावे इतके सहज विचारले.
“विचारा की.”
“तुमची बायको म्हणजे माझी क्लाएन्ट सोनाली हिच्यावर जीवघेणा हल्ला केलात त्या रात्री हो ना?”
“हो. मला वाटते हे तुम्ही सिद्ध केलाय नाही का?”
“अनिरुद्ध साहेब आज हा मुद्दा मी वेगळ्या संदर्भात मांडणार आहे. त्यामुळे न चिडता उत्तर द्या.”
अनिरुद्धने फक्त मान हलवली.
“तुमच्या आणि सोनालीच्या लग्नाला किती वर्षे झाली?”
“आठ”
“तुम्हाला कधी असे वाटले नाही आपल्याला मूल असावे म्हणून?”
अनिरुद्धने मान वर केली. दोन क्षण त्याच्या डोळ्यात राग उसळला. त्याने खांडप्यांच्या खांद्यावरून सांगळे वकिलांकडे पाहिले. त्यांनी त्याला नजरेनेच शांत राहा म्हणून सांगितले. अनिरुद्धने मोठा श्वास घेतला.
“हो मला मुलांची आवडही आहे आणि हवेही आहे.”
“मग इतक्या वर्षात कधी विचार नाही केलात ते?”
“कारण मूल होण्यासाठी दोघांची तयारी पाहिजे. आईची जास्त. कारण तिला त्याला जन्म द्यायचा असतो.”
“बाप म्हणून तुम्ही काय करणार मग?”
“आईची जबाबदारी असली तरी बाप मोकळा फिरत नाही वकील साहेब. घर दोघांचे असते. तिथे कामे, जबाबदाऱ्या आणि गुंतवणूक ही दोघांची असते.”
खांडप्यांनी त्याच्याकडे रोखून बघितले.
“पण त्यासाठी अनिरुद्ध, मूल जन्माला घालण्याची ताकद असावी लागते?”
अनिरुद्ध गोंधळला.
“म्हणजे?”
“म्हणजे तुमच्याकडून सोनालीला मूल होऊ शकत नाही. शी इज अनहॅपी”
“व्हॉट?” अनिरुद्ध ओरडला, “तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते?”
सांगळे वकिलांनाही हे अनपेक्षित असावे. ते ताडकन उठून उभे राहिले. दोन्ही वकिलांमध्ये बाचाबाची सुरु झाली.
अनिरुद्ध कठड्याला रेलून उभा होता. कठड्याचा हात सुटला असता तर तो कोसळलाच असता. त्याच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते. संताप, फ्रस्ट्रेशन, कोंडमारा त्याच्या डोक्यात दाटून आला होता. त्याने नजर उचलली. समोरच खांडप्यांच्या टेबलवर सोनाली बसली होती. ती त्याच्याकडेच बघत होती. तिच्या नजरेत विजयाची झाक होती. त्या गुर्मीतच ती अनिरुद्ध कडे बघत होती. अनिरुद्धच्या डोळ्यातून पाणी ओघळले. सोनालीची नजर दोन क्षणांसाठी हलली. तिने मान फिरवली. अनिरुद्ध तिच्याकडेच बघत होता. तिच्या शेजारीच अजय बसला होता. त्याचा चेहरा शरमिंदा झाला होता. त्याला सोनालीकडे बघवत नव्हते. त्याची आणि अनिरुद्धची नजरानजर झाली. दोघांच्याही मनातली पराभूत भावना एक क्षण नजरेत डोकावून गेली.
अनिरुद्ध … अनिरुद्ध … सांगळे वकील त्याला हलवत होते.
अनिरुद्ध भानावर आला.
“पुढची तारीख घ्या सांगळे साहेब. मला बरं नाही वाटत आहे”.
सांगळे वकिलांनी पुढची तारीख घेतली. अनिरुद्ध गाडीत बसला. घरी आल्यावर तो बाथरूममध्ये गेला. शॉवर सोडून तसाच तो कपड्यांसकट शॉवर खाली बसून राहिला बराच वेळ. बऱ्याच वेळाने तो बाहेर आला. त्याचे डोळे लालबुंद झाले होते. त्याने कपडे बदलले. सांगळे वकिलांना फोन लावला.
“सांगळे, मला आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंट करायची आहे. या स्टेजला शक्य आहे का?”
“मी प्रयत्न करतो अनिरुद्ध पण माहित नाही.”
“प्लिज करा.”
“त्यासाठी तुम्हाला एकदा सोनालीला भेटावे लागेल. त्यांची तयारी असेल तर केस कोर्टाच्या बाहेर सेटल होऊ शकते.”
“ठीक आहे.”
अनिरुद्धने फोन ठेवला. पुढच्या क्षणी त्याने सोनालीचा नंबर फिरवला.
“सोनाली, अनिरुद्ध बोलतोय”
“हो कळले मला.”
“मला वाटले एव्हाना नंबर डिलिट केला असशील माझा?”
“नाही. बोल.”
“मला कोर्टात अजून तमाशे करायचे नाहीयेत. आपण ही केस बाहेर मिटवू शकतो का?”
सोनाली हसली. तिला बहुधा ते अपेक्षित असावे.
“मी माझ्या वकीलांशी बोलून सांगू का?”
“तुझ्यावर आहे ते सोनाली. केस तुझ्या हातात आहे. तू ठरवलेस तर होईल ते. बघ विचार करून मला कळव. मी घरीच आहे.”
अनिरुद्धने फोन ठेवला. तो तसाच उठून बार कॅबिनेटपाशी गेला. स्कॉचची बाटली काढली. एक ग्लास भरून घेऊन तो बेडरूम मध्ये त्याच्या आवडत्या विंडो सील वर बसला. आता इथून खाली उडी मारली तर प्रश्नच संपतील सगळे, त्याच्या मनात आले. त्याने ग्लास खाली ठेवला. तसाच चालत चालत तो बाल्कनीमध्ये आला. पंधराव्या मजल्यावरून खाली बघत राहिला. कठड्यावर पाय देऊन उभा राहिला आणि अचानक खाली उतरला. साला उडी मारायची पण धमक नाही बघ तुझ्यात. जोरजोरात हसत तो बेडरूम मध्ये आला. ग्लासवर ग्लास पीत राहिला. सकाळ कधी झाली त्याला कळलेच नाही. कधीतरी जाग आल्यावर त्याने फोन पाहिला. सोनालीचे मिस्ड कॉल होते खूप. त्याने तिला फोन लावला.
“बोल”
“अनिरुद्ध तू, मी आणि आपले वकील असे भेटून केस क्लोज करू शकतो. तू सांग कधी भेटायचे ते.”
आत्ता, अनिरुद्ध म्हणणार होता.
“सांगतो सांगळे वकिलांना मी.”
पुढच्या पंधरा दिवसात त्यांच्या ३ मीटिंग झाल्या. सोनालीने केसचा पूर्ण फायदा घेत अनिरुद्धकडून जवळपास खंडणीच वसूल केली. अनिरुद्ध फारसा विरोध करत नव्हता. तो एकटक फक्त सोनालीचे निरीक्षण करत होता. त्याच्या वतीने सांगळेच भांडत होते. पण एकूणात केस क्लोज होत होती त्यामुळे त्यांचाही इंटरेस्ट संपत आला होता. शेवटच्या सह्या सोपस्कार पार पडल्यावर अनिरुद्ध वळला. सोनालीने त्याला हाक मारली.
“अनिरुद्ध”
तो मागे फिरला.
“काय?”
त्याची दशा बघून ती जरा हलली.
“एक कप कॉफी पिऊया का?”
“बंद केलय मी कॉफी पिणे सोनाली. येतो मी”
सोनालीने पुढे होऊन त्याचा हात धरला.
“अनिरुद्ध प्लिज मला बोलायचंय तुझ्याशी”
अनिरुद्ध हसायलाच लागला
“आता बोलून काय उपयोग आहे का सोनाली? आणि तसेही आता मला काही ऐकण्याची इच्छा पण नाही. माझा तमाशा घातलास तू सगळीकडे. मी तुझे समाधान करू शकत नाही सांगण्यापर्यंत मजल गेली तुझी. माझ्या डोळ्यांनी मी तुला दुसऱ्या पुरुषाबरोबर झोपलेले पाहिले. पुरेपूर वसुली केलीस तू तासाभरापूर्वी. सगळ्या नात्याची, मनाची, डोळ्यातल्या पाण्याची, आठ वर्षातल्या प्रत्येक क्षणाची वसुली केलीस तू. अजून काय सांगणार आहेस तू मला? मला जाऊ दे आता. तुझे मन कधी गुंतले नाही आणि माझे मन मी काढून घेऊ शकलो नाही. सदैव आशेवर राह्यलो. आपले घर फुलेल म्हणून. तुझी वाट पाहिली. तू आलीच नाहीस. मी नाहीये तुझ्या इतका एम्बिशस सोनाली. त्याची किती मोठी शिक्षा दिलीस तू मला. तुझ्या इतका नसेन पण मीही कमी कमवत नाही अगं. माकड केलस तू माझे सोनू माकड केलस, नाचून दाखवू का तुला मी?”
“अनु” सोनालीचा आवाज कापला
“कोण अनु नाही इकडे आता तुझा सोनाली. चुकले माझे मी तुला सोनू म्हणालो. आता याची पण केस करशील का तू? माझा माजी नवरा मला सोनू म्हणला, त्याचे पण कॉम्पेन्सेशन पाहिजे मला”.
त्याचा विदीर्ण चेहरा सोनाली बघतच राहिली. तिला कळेचना काय बोलावे ते. त्याचा तोल जात होता चालताना. ती पटकन पुढे झाली. तिने त्याचा हात पकडला.
“अनिरुद्ध आय एम सो सॉरी”
त्याने तिचा हात सोडवला. तिच्याकडे एकदा बघितले.
“टू लेट. गो बॅक टू युवर फ्रिकीन सक्सेसफुल लाईफ. लिव्ह मी अँड माय लाईफ अलोन सोनाली”.
शंकर कामावर आला तेव्हा अनिरुद्ध वाकडातिकडा पडला होता. तसा कामावर जात होता तो, पण घरी आला की रात्र रात्र जागा असे. खिडकीतून शून्यात बघत बसे. आई आली त्याची की तेव्हढयापुरता तो नॉर्मल वागे. त्याचे वडील आजारी असल्याने त्यांना सोडून येणे आईलाही शक्य नव्हते. शेवटी त्यांनी सुनंदा आणि शंकर दोघांशी बोलून त्यांना पूर्ण वेळ कामावर ठेवून घेतले. सुनंदा कधी डबा देई कधी शंकर स्वयंपाक करत असे. सुनंदाचे दिवस भरत आल्याने ती सध्या कामावर येत नव्हती. आजही ती घरीच होती. शंकरला कुठच्याही क्षणी जावे लागले असते घरी. अनिरुद्धची हालत बघून त्याचा पाय निघत नव्हता पण त्याचे चित्त थाऱ्यावर नव्हते.
अनिरुद्धला जाग आली. शंकर त्याच्यासाठी चहा करायला गेला. अनिरुद्धने डोळे उघडून नीट सगळीकडे बघितले. क्षण दोन क्षण लागले त्याला शंकर आहे हे कळायला. शंकरने त्याला चहा दिला. आज शंकरचे हात पटपट काम करत होते. अनिरुद्धने त्याच्याकडे बघितले. खिडकीतून बाहेर बघितल्यावर तो एकदम हसला.
“अरे शंकर”
“बोला साहेब”
“पाऊस येणार बघ आज”
शंकरने खिडकीतून बाहेर बघितले.
“नको साहेब. असे म्हणू पण नका. आज सुनंदाला हॉस्पिटलमध्ये न्यावे लागेल बहुतेक. पाऊस पडला तर या शहरातून गाडी चालवायची कशी?”
अनिरुद्ध एकदम चमकला. तो टक लावून शंकरकडे बघत राहिला. अचानक तो बेडरूम मध्ये गेला आणि तयार होऊन तो बाहेर आला.
“चल”.
“कुठे?”
“तुझ्या घरी”.
“का?”
“तुझ्या घरी तुझी जास्त गरज आहे आत्ता. मी सोडतो तुला”.
अनिरुद्ध पटकन दारापाशी जाऊन उभा राहिलापण. शंकरने पटपट किचन आवरले. सगळीकडचे दिवे बंद करून तो दारापाशी आला. अनिरुद्धचा रापलेला चेहरा त्याने बघितला. त्याच्या एके काळच्या देखण्या चेहऱ्यावर दारूने ठसे उमटवले होते. घरात शुद्धीबेशुद्धीच्या सीमेवर असणाऱ्या माणसाकडून शंकरला इतक्या झटपट प्रतिसादाची अपेक्षाच नव्हती. काही न बोलता तो गाडीत बसला. गाडी त्याच्या घरापाशी कधी आली तेही त्याला कळले नाही. घरात शेजारच्या मावशी होत्या. सुनंदाच्या चेहऱ्यावर अतीव वेदना दिसत होत्या.
“मी म्हणतच होते तुला कळवायचे”, मावशी म्हणाल्या.
अनिरुद्धने एक नजर सुनंदाकडे टाकली. त्याने निर्णय घेतला.
“शंकर, चल हिला घेऊन दवाखान्यात. माझ्याच गाडीतून नेऊया”.
शंकरच्या आधाराने कशीबशी सुनंदा उभी राहिली. तिच्यापाठी मावशींनी दार लावले. हातातली पिशवी सांभाळत त्या सुनंदाबरोबर गाडीत बसल्या. शंकर पुढच्या सीटवर बसला. पाऊस आता मी म्हणत होता. येणारी कळ कशी तरी सोसत सुनंदा दाताखाली ओठ गच्च दाबून सहन करत होती. जागोजागी अडकलेल्या ट्रॅफिकमधून अनिरुद्ध गाडी बाहेर काढत होता.
एकदाचे ते सगळे हॉस्पिटलमध्ये पोचले. सुनंदाला ऍडमिट करून दोघेही बाहेर बाकावर बसले. मावशी पिशवी सांभाळत शेजारी बसल्या. एक एक क्षण तिघांनाही जड जात होता. बोलत कुणीच नव्हते. अनिरुद्धला वाटले एक पेग मारता आला असता तर बरं झाले असते. निदान डोक्याला मुंग्या आल्या असत्या. जरा शांत वाटले असते. त्याचे हात थरथर करत होते. बाकाची कड घट्ट आवळली होती त्याने. त्याच्या केसबद्दल बरंच काही पसरलेले होते. त्याच्यापाठी बोलणाऱ्यांच्या गप्पाही त्याने ऐकल्या होत्या. त्याचे रक्त तापत असे सुरुवातीला. आताशा तो सोडून देत असे. तशात त्याच्या वाढत्या व्यसनाच्या चर्चाही सुरु झाल्या होत्या. माझी काय चूक हे विचारणेही त्याने सोडून दिले होते. सोनालीच्या सगळ्या भल्याबुऱ्या आठवणींचा गिच्च गोळा झाला होता त्याच्या डोक्यात. त्याच्या डोक्यातल्या तिचे काय करावे हेच त्याला कळत नसे. राग होता म्हणावे तर आता ती नव्हतीच समोर राग काढायला. त्यामुळे साचून राहिलेल्या वांझ रागाचे नुसतेच गळू होते. ठसठसणारे. एखादी नस बधीर होऊन काळीनिळी पडावी तशा मनाने तो लोकांचे बोलणे ऐकत असे. तसेही एक दारूबाज, बायकोला हवे ते न देऊ शकणाऱ्या, लौकिकार्थाने अयशस्वी माणसाने त्याची कथा सांगितली काय न सांगितली काय, ती ऐकायला कुणाला वेळ होता? आपण समजतोय ते खरं नाहीये कळले असते तर मग बोलणार काय लोक, त्यापेक्षा विश्वास न ठेवणे उत्तम असा एक विचार मनात आल्याबरोबर अनिरुद्ध हसला.
शेजारी बसलेल्या शंकरने त्याच्याकडे पाहिले.
“काय झाले साहेब?”
“काही नाही”, अनिरुद्ध उठला. लगतच्या खिडकीजवळ उभे राहून त्याने हळूच डोळे पुसले. डॉक्टरांचा आवाज ऐकून तो मागे वळला.
शंकर लगबगीने उठून उभा राहिला होता. मावशी पण काळजीने ऐकत होत्या.
“काय झाले डॉक्टर?” अनिरुद्धने विचारले.
“लगेच ओ टी मध्ये घेतोय. तुम्ही फॉर्म नि पैसे भरा. “
“किती पैसे लागतील डॉक्टर?”
अनिरुद्धने त्याचा खांदा थोपटला. त्याला घेऊन तो काउंटरपाशी आला. पटपट फॉर्म भरून त्याने खिशातून वॉलेट काढले. त्याने कार्ड स्वाईप करून पैसे भरले. शंकर संकोचला.
“साहेब पैसे आहेत माझ्या कडे”
“ते नंतर बघू आपण”, अनिरुद्ध म्हणला.
अशाच ताणात तासभर तरी गेला. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले. त्यांनी शंकरच्या खांद्यावर थोपटले.
“मुलगी झालीय तुम्हाला.”
शंकरच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. त्याच्या डोळ्यात पाणी भरले. अनिरुद्धने त्याला मिठी मारली. शंकर मुलीला आणि आईला बघायला पळाला. त्याच्यापाठी मावशीही लगबगीने गेल्या. अनिरुद्ध त्या भरल्या कॉरिडॉरमध्ये एकटाच उभा राहिला. त्याला कळेचना काय करावे ते. थोड्या वेळाने तो भानावर आला.
काही दिवस शंकर साहजिकच कामावर आला नव्हता. अनिरुद्ध घरात एका जागी बसूनच असे तसेही. बेल वाजल्यावर हातात ग्लास घेऊनच त्याने दरवाजा उघडला. समोर शंकर आणि सुनंदा दोघेही उभे होते. अनिरुद्ध सुनंदाला बघून शरमला. त्याने किचन मध्ये जाऊन ग्लास ठेवला. तो बाहेर आला.
“तू घरी कशी आलीस? मला बोलवायचे ना. मी आलो असतो भेटायला”.
“नाही साहेब मलाच तुम्हाला भेटायचे होते”, सुनंदा म्हणाली.
“त्या दिवशी तुम्ही कुठे निघून गेलात साहेब? मी किती शोधले हॉस्पिटल मध्ये तुम्हाला”, शंकरने विचारले
“अरे माझे काय काम नव्हते तिकडे, म्हणून निघून आलो”, अनिरुद्धने हसून उत्तर दिले.
“साहेब जरा बसा इकडे.” सुनंदाने अनिरुद्धला बोलावले.
अनिरुद्ध सोफ्यावर मुकाट बसला. तो त्या दोघांकडेही थोडे संशयाने, थोडे कुतूहलाने बघत होता.
शंकरने सुनंदाकडे बघितले. त्याने मानेनेच तिला तू बोल म्हणून खूण केली.
“साहेब तुम्ही पोरीला पहिले पण नाही. बघा तिला आता.”
सुनंदाने मुलीला त्याच्या समोर धरले. अनिरुद्धने तिच्या नाजूक हाताच्या पंजावर बोट फिरवले. अचानक त्या इवल्याश्या मुठीने त्याचे बोट गच्च पकडले. अनिरुद्धने तिच्या बाळमुठीवर हात ठेवला आणि तो अचानक ओक्साबोक्शी रडायला लागला. सुनंदा उठली. तिने मुलीला त्याच्या हातात दिले.
“दादा एक सांगू का?”
अनिरुद्ध काहीच बोलला नाही
“आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुमचा संसार आम्ही बघितलाय. तुमचे प्रेम आम्ही बघितलय. तुम्ही हे असे नव्हता दादा. कुणी काही म्हणू दे आमचे दादा आम्हाला माहित आहेत. आमचे दादा म्हणजे लाखात एक माणूस आहेत. आम्हाला माहित आहे ना. म्हणूनच आजपासून तुमची मुलगी समजा दादा हिला.”
अनिरुद्ध उठला. शांतपणे तो किचन मध्ये गेला. हातात ग्लास घेऊन बाहेर आला. शंकर त्याच्याकडेच बघत होता. त्याने शंकरच्या हातात ग्लास दिला.
“जा ओतून ये.”
शंकरने डोळे पुसले.
“साहेब तुम्हीच नाव सांगा मुलीचे”
“मुक्ती” अनिरुद्ध म्हणला.
त्याने हळूच मुलीच्या कपाळावर ओठ टेकवले.
©प्राजक्ता काणेगावकर
Image by Gerd Altmann from Pixabay
- Kaleidoscope- मुझे तुमसे मुहोब्बत है दिवानगी की हद तक - May 28, 2021
- Kaleidoscope- लव्ह ऍक्चुअली - April 29, 2021
- Kaleidoscope- दिल तो आखिर दिल है ना - April 14, 2021
मला वाचायला खूप आवडते . तुमच्या प्रकाशित होणाऱ्या सगळ्या कथा वाचायला आवडतील
❤️❤️❤️❤️
मनापासून धन्यवाद
Nice
Khup sunder
All the stories are wonderful really very happy for being member . Thanks mandarji for this great concept
मनापासून धन्यवाद
खूप खूप सुंदर आणि संवेदनशील कथा आहेत तुमच्या… वाचून मन अगदी भरून आलं. छान असंच सुंदर सुंदर लिहीत राहा
खूपच छान…
खूप छान
एकाच स्थितीवर दोन वेगवेगळ्या प्रतिक्रिया.
छान आहे कथा
फार सुरेख👌👌👌
👌
धन्यवाद 🙏
खुपच छान
माणसाला जगातून उठवणारी वृत्ती आणि जगात स्थान मिळवून देणारी वृत्ती….खुप छान लिहीलयं
अप्रतिम कथा ,,, शेवट वाचून डोळे पाणावले
खुपच छान
तुमच्या लेखणीला सलाम.
खूप छान कथा… डोळे भरून आले…. जगात कशी लोकं असतात… स्वतः चुका करतात आणि तरीही तेचं जिंकतात…..त्याचं एक उदाहरण दिलं तुम्ही…..