ग्रीन ब्लड!

 
“आज अमावस्या आहे. कुणाला ती रुम द्यायची नाही. लक्षात आहे ना? शांती करायला आलेल्या गुरुजींनी बजावून ठेवलय.अनर्थ होईल. शुद्धीत आहेस ना रे? ऐकतोयस ना? का तर्र झालास?” तात्यांनी विचारलं तेव्हा सोम्या झुलतच होता. “न्हाय वो सायेब. हाय ध्यानात. जावा तुमी बिनघोर” सोम्याने तात्यांना सांगितलं खरं, पण त्याचा या सगळ्यावर जराही विश्वास नव्हता. बाटली चढवली की सोम्या शेर व्हायचा. आजच्यासारखा…
____________________________________
 
चांगला BSC असताना हा वणवणीचा जॉब करणं खरंतर मला जिवावरच येतय. पण क्या करेगा… नसीब गांडू म्हणतात ना त्यातली गत. दारोदार हिंडून रक्ताचे सॅम्पल गोळा करणं हे खरतर माझ्यापेक्षा कितितरी कमी शिकलेल्याचं काम. पण उपाशी झक मारण्यापेक्षा मी पुढ्यात आलेला जॉब निमुटपणे स्विकारला होता.
 
तसाही हा जॉब स्विकारण्यामागे माझा स्वार्थी हेतु होताच. नाही, जगण्याचा प्रश्न तर सुटत होताच, पण मला माझ्या रिसर्चमध्येही या जॉबचा फायदाच होआर होता. आता सांगायला हरकत नाही, पण मला “ग्रीन ब्लड”चा शोध घ्यायचा होता.
 
आय नो, आय नो, तुम्ही म्हणाल त्या भिकार साय-फाय किंवा हॉरर मुव्ही बघून मला नको त्या कल्पना सुचत आहेत. पण मला ज्यांनी दिक्षा दिली, ज्यांना मी गुरू मानतो, त्यांनीच याचा उल्लेख माझ्याजवळ केला होता. ते म्हणाले होते, ” यू हॅव पोटेन्शीयल माय बॉय !! मी सहसा हे सांगत नाही कोणला, पण तुला सांगावसं वाटतय. Its extremely difficult to find.  पण तू जर ते मिळवू शकलास, तर आयुष्यात खूप मोठी प्रगती करशील. Keep the stones turning !!”
 
आज माझ्या ऑफिसपासून तब्बल १०० किलोमिटर दूर सॅम्पल गोळा करायला येताना, मला का कोण जाणे, हा सगळा संवाद आठवत होता. कसला तरी मेडिकल कॅम्प स्थानिक गावकर्‍यांनी आयोजीत केला होता आणि त्यात सगळाच सावळा गोंधळ होता. डॉक्टर्स येउच शकले नाहीत म्हणे. आलिया भोगासी म्हणत मी माझं काम निमुटपणे करत राहिलो. तशी गर्दी बरीच होती पण मी काळजी म्हणून आईसबॉक्स मोठाच आणला होता. आलेली लोकं देखील काऽही तक्रार करत नव्हते. सगळं आवरता आवरता चांगलाच उशीर झाला. अनेक मंडळी मलाच डॉक्टरसाहेब म्हणत होते. सुरवातीला मी स्पष्टिकरण द्यायचा प्रयत्न केला पण लवकरच त्याचाही नाद सोडून दिला.
 
परतीची ट्रेन मिळणार नाही याचा अंदाज आलाच होता आणि तसच झालं ! उशीर चांगलाच झाला होता आणि स्टेशन जवळच्या एकुलत्या एक लॉज मधला, अंधाराशी भांडून थकलेला दिवा आपलं अस्तित्व दाखवून देत होता इतकच. मी निमुटपणे त्या दिशेने पावलं टाकायला सुरवात केली.
 
___________________________________
 
अवेळी जाळी खडखडली तेव्हा सोम्याही क्षणभर दचकलाच. गावठी दारूचा ग्लासही हिंदकळला त्याच्या हातात. मग लडबडत उठून तो दरवाज्याशी गेला. बाहेर कुणी साहेबासारखा माणुस उभा होता. “काय?” त्याने मिटल्या तोंडानेच खुणेने विचारलं. “रहायला जागा हवी आहे.” साहेब म्हणाला. “जागा न्हाय. हाटिल बंद हाय आज. जावा तुमी.” सोम्या तरकटला आणि वळला. “काय शेठ !! एकदा पहा तरी इकडे..” अनिच्छेने सोम्याने मान वळवली आणि नजरबंदी झाल्याप्रमाणे त्याचे डोळे पाहुण्याच्या हातातल्या पाचशे रुपयांच्या नोटेवर खिळून राहिले. स्वतःच्याही नकळत त्याने जाळीचा दरवाजा उघडून त्या साहेबाला आत घेतलं.
 
___________________________________
 
पैसा भलेभले दरवाजे उघडतो तर हे लॉज त्याला कसा अपवाद असेल? हा लॉजचा नोकर तर एका नोटेत पटला. जेमेतेम चार खोल्यांचं लॉज. पण तीन खोल्या कायमच्या भाड्याने दिलेल्या म्हणे ! आणि त्यांना कुलुपं होती !!  एकच खोली रिकामी होती. मला काय आजची रात्र पाठ टेकायला जागा हवी होती. उघड्यावर रहाण्यापेक्षा गैरसोईची असली, तरी रूम होती, हे महत्वाचं !
 
मी सकाळी लवकर निघून जाणार आहे आणि मला भाड्याची पावती नको म्हंटल्यावर तो नोकर, सोम्या त्याचं नाव, तुडुंब खुश झाला. त्या रूम बद्दल तो काहीतरी सांगत होता, पण त्याच्या लडबडत्या जिभेमुळे एक अक्षरही कळत नव्हतं. मलातरी त्याच्या बडबडीत कुठे रस होता.
 
रूम उघडल्यावर एक प्रकारचा कुबट, उबस्स वास एकदम नाकाला जाणवला. एकच रिकामी रूम असुनही असा कुबट वास का? हे काही मला कळलं नाही. रूम ठीक होती. मोरीतल्या नळाला पाणी होतं, एक टेबल, एक खुर्ची आणि एक पलंग असा आटोपशीर प्रकार होता. पलंगावरच्या चादरीला पडलेल्या काळपट डागांना सोडलं, तर या परिस्थितीत ही रूम म्हणजे राजमहालच होता. मला प्यायचं पाणीवगैरे देउन सोम्या एक सलाम ठोकून पसार झाला.
 
चिकचिकलेल्या अंगावर पाणी मारल्यावर मला जरा बरं वाटलं. कपडे बदलून जेवण उरकलं. सोबत आईसबॉक्स असल्याने जेवण खराब व्हायचा प्रश्नच नव्हता. गारगुट्ट असलं तरी चांगलं जेवता तरी येतं. घड्याळ पाहिलं तर फक्त साडेदहा वाजले होते. करण्यासारखं इतर काहीच नसल्याने सरळ पलंगावर आडवा झालो आणि चक्क झोप लागली देखील.
 
____________________________________
 
अख्खी बाटली खाली केल्यावर सोम्या रात्रभर एखाद्या बाळासारखा शांत झोपायचा. पण आज मात्र सतत दचका बसून त्याची झोप मोडत होती. रात्रीच्या नीरव शांततेत नव्या पाहुण्याच्या खोलीमधून हलक्या घोरण्याचा आवाज तेवढा ऐकू येत होता. अचानक कसला तरी तडतडण्यासारखा आवाज आला आणि सोम्याला जाग आली. बारा वाजून गेले असावेत. पाहुण्याच्या खोलीच्या दरवाजाची चौकट आतून सांडणार्‍या हिरवट प्रकाशाने उजळून निघाली होती  !!! भारल्या प्रमाणे सोम्या दरवाजाकडे पहातच राहिला.
 
____________________________________
 
असं दचकून जाग यायचं खरंतर काही कारण नव्हतं. दिवसभर मरणाचं काम पडलं होतं. रात्री अंघोळ, जेवण सगळं व्यवस्थीत झालं होतं, तरी जाग आली खरी. अत्तातरी रूम मधे गडद अंधार होता, पण असं वाटत होतं की कुणीतरी माझ्यासोबतच जागं झालं आहे !! मी झोपलेल्या पलंगावर काहितरी हलचाल सुरू झाली होती. काहितरी सुटुन मोकळं होत होतं.
 
हलकेच माझ्या पायाच्या बाजूने हलक्या हिरवट रंगाचं काहितरी हवेत पसरायला लागलं. त्या साबणांच्या जाहिरातीत नाही का, मळाचे पुंजके डिटर्जंटमुळे सुटून वरवर सरकायला लागतात, तसंच काहीतरी. काही क्षणातच माझ्या अंगाखालूनही काहितरी सुटून वर जायची धडपड करतय अशी विचित्र जाणीव व्ह्यायला लागली !! मी ताडकन उठून पलंगाखाली उतरलो. चादरीवरच्या प्रत्येक मळक्या डागातून काहितरी सुटून मोकळं होत होतं… काहीतरी हिरवं काहितरी गूढ..
 
मी भान हरपून पहात होतो. स्वतःच्या इच्छेने हलचाल करणं जणू मी विसरूनच गेलो. डागांमधून सुटून वर जाणारे पुंजके आता एकत्र होत होते. एकत्र होतानाच त्यांच्यामधला हिरवट प्रकाशही वाढत चालला होता. तो प्रकाश आता फुलबाजी तडतडावी तसा तडतडत होता. त्या तडतडटातून काहीतरी आकार जन्म घेत होता, काहीतरी साकार होत होतं.
 
काही मिनिटातच एक मनुष्याकृती उभी असल्यासारखा भास झाला. पाठामोरी उभी असलेली कुणी स्त्री !!! याच खोलीत, ज्या माणसावर तिने मनापासून प्रेम केलं, ज्याच्या सोबत ती घरदार सोडून पळून गेली, त्यानेच तिची अतिशय निर्घृण हत्या केली होती. तिचं रक्त याच खोलीत सांडलं होतं आणि किती स्वच्छ केलं तरी धुतलं जात नव्हतं. आता तिला तहान लागली होती. रक्ताची तहान… मग ते रक्त कोणाचं का असेना.
 
त्या पुंजक्यांनी आता हिरवा देह धारण केला होता. तिची नजर (असलीच तर) मी झोपताना उशाशी ठेवलेल्या आईसबॉक्सवर खिळून राहिली होती. तिच्या देहातलं सांडलेलं रक्त ती परत पिउन स्वतःची तहान भागवणार होती. आज अनेक दिवसांनी तिला ही संधी मिळाली होती. मला कुणीही न सांगता हे सगळं आतून जाणवलं ! माझ्या अंगावर शिरशिरी आली आणि बहुदा माझा टेबलाला धक्का लागला. त्या आवाजासरशी तिने गर्र्कन वळून पाहिलं. तिच्या मानेतून अजून रक्त ओघळत होतं मात्र त्या रक्ताचा रंग हिरवा होता !!!!! मी नजरबंदी झाल्याप्रमाणे नुसता पहात राहिलो. ती माझ्या दिशेने पुढे सरकली…
 
____________________________________
 
तडतडणार्‍या हिरव्या प्रकाशाने भारलेल्या सोम्याला, अचानक खोलीतून कसलासा आवाज ऐकु आला. एखादं टेबल सरकवल्या सारखा. क्षणभर तो हिरवट प्रकाश थरथरला आणि अचानक त्याचा जोर वाढला. पुढच्याच क्षणी काळिज गोठवणारी एक किंकाळी सोम्याला ऐकू आली. कुठल्याही मानवी कंठातून असा आवाज येणं शक्य नव्हतं. त्याचं रक्त गोठल्यासारखं झालं. “बापरे हे काय करून बसलो म्या…!!” तो विचार करत असतानाच खोलीतला हिरवा तडतडता प्रकाश अचानक विझला आणि काही सेकंदातच भिरभिरत्या लालभडक प्रकाशाने दरवाजाची चौकट भगभगायला लागली. मात्र हा लाल धगधगता प्रकाश जणू खोलीभर फिरत असावा असं वाटत होतं. ते देखील प्रचंड गतीने !! मग अचानक तो प्रकाश स्थीर झाला आणि खोलीचा दरवाजा हलकेच उघडू लागला…
 
_____________________________________
 
इतकी वर्ष जे शोधत होतो, ते असं अचानक आणि अशा स्वरूपात समोर येईल असं मला कधी वाटलच नव्हतं. हिरवं रक्त… ग्रीन ब्लड म्हणजे अतृप्त पिशाच्चाचं रक्तं???!!!! माझ्या कल्पनेच्याही बाहेरचं होतं हे !! पण मग गुरुजींनी का त्याचा उल्लेख केला? खूप मोठी प्रगती राहिली बाजूलाच पण आता या प्रकारातून सुटका तरी सुखरूप व्हावी…
 
हिरवं रक्त ठिबकणारी ती आता माझ्यापासुन फक्त हातभर अंतरावर आली होती. नाकपुड्या फेंदारत ती कसलाचा वास हुंगत होती, बहुदा माझ्या रक्ताचा… मग अचानक ती थांबली. तिने वळुन त्या आईसबॉक्सकडे पाहिलं आणि परत फिरून माझ्याकडे पाहिलं. मग तिने ती विचित्र, कर्कश्य काळजाचा थरकाप उडवणारी किंकाळी फोडली !!!
 
एक क्षणभर, अगदी क्षणभरच मला देखील हतबल झाल्यासारखं वाटलं. अवघं आयुष्य डोळ्यासमोरून भरकन फिरलं. त्या गरगरत्या चक्रामधून एक आकृती स्थीर नजरेनी माझ्याकडे पहाताना दिसली. माझ्या गुरूंची आकृती.
 
आठ वर्षांपुर्वी बारावीची परिक्षा संपल्यावर स्कॅंडिनेव्हीयन कंट्रीज भटकताना केवळ नशीबाने आमची गाठ पडली होती. त्यांच्या प्रभावाने मी झपाटल्यासारखाच झालो होतो. अनेकांना वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही न मिळणारं, दिक्षा प्राप्त करण्याचं भाग्य मला लाभलं होतं. अगदी त्याच दिवशी त्यांनी मला दिक्षा दिली होती. अमृतानुभवच जणू !!
 
त्यांचा पट्टशिष्य होण्यासाठी मला अजून दोन अनुग्रह घ्यावे लागले असते, ते देखील एक-एक महिन्याच्या अंतराने. इतके दिवस मला तिथे रहाणं शक्यच नव्हतं. विझा इमिग्रेशनच्या भानगडी झाल्या असत्या आणि गुरूंना कुठल्याही प्रकारे त्यांच्याकडे कुणाचं लक्ष वेधलं जायला नको होतं.
 
मला निरोप देताना त्यांनी तो ग्रीन ब्लडचा उल्लेख केला होता. ते तेव्हा अजुनही काही म्हणाले होते, ते एकदम लखकन आठवलं. ते म्हणाले होते, “स्वतःला कधी एकटा किंवा दुर्बल समजू नकोस. आता दिक्षेनंतर तू माझ्या रक्तरेखेचा अंश झाला आहेस. अडचणीच्या वेळेस मी सदैव तुझ्या सोबत असेन !”
 
निमिशार्धात मी इतकं सगळं फिरून आलो. एक वेगळाच शक्तीसंचार झाला माझ्या अंगात मग सगळं धाडस एकवटून आणि माझ्या गुरूंचं नाव घेउन मीच तिच्या दिशेने पाऊल टाकलं…
 
___________________________________
 
किंचितही आवाज न होता उघडलेल्या दरवाजामागे रात्री उशीरा आलेला पाहुणा उभा होता. अगदी आला होता त्याच कपड्यांमधे, हातात तसाच मोठा खोका घेउन. मात्र अत्ता त्याच्या चेहेर्‍यावर रूंद हास्य पसरलं होतं !! जणू मगाचचा आणि अत्ताचा पाहूणा यात खूप मोठ्ठा फरक झाला आहे असं वाटत होतं.
 
लांब ढांगा टाकत तो सोम्याजवळ आला. सोम्या तोंड उघडं टाकून नुसतं पहात राहिला. त्या पाहुण्याने त्याचे लांबसडक हात सोम्याच्या खांद्यावर ठेवले. मस्तकात भिनलेल्या गावठी दारूमुळे असावं बहुदा, पण पाहुणा बोलला, तेव्हा त्याचा आवाज खोल विहिरीमधून घुमून आल्याप्रमाणे वाटला सोम्याला. 
 
“सोम्या तुला कल्पनाही नसेल, पण तू ती रूम मला रहायला देउन माझं आयुष्य बदलायला नकळत हातभार लावला आहेस ! त्याचं तुला बक्षीस मिळणारच. माझ्या शक्ती प्रचंड वाढल्या आहेत. मी सिध्ध झालो आहे. मी गुरू झालो आहे !!” असं म्हणून पाहुण्याने सोम्याला मिठीत घेतलं.
 
___________________________________
 
तिला आलेली शंका बरोबर होती. ती बिचारी माझ्या आईसबॉक्स मधल्या रक्ताच्या वासाने ओढली गेली होती. तिला माझं रक्त काही उपयोगाचं नव्हतं, पण माझ्यासाठी मात्र तिचं रक्त फारच महत्वाचं होतं.
 
मी एका झटक्यात तिला धरलं आणि तिच्या मानेत माझे तिक्ष्ण सुळे खुपसून तिचं अमुल्य ग्रीन ब्लड घटाघटा पिउन टाकलं. तिच्यातलं रक्त संपताच एखादं फोलपट वाऱ्यावर उडावं तशी ती शक्तीहीन होवून संपून गेली. खोलीतला हिरवा प्रकाश पूर्णपणे विझला आणि अचानक माझ्यात निर्माण होत असलेल्या शक्तीचा लालभडक प्रकाश रूम भरून टाकू लागला.
 
ते ग्रीन ब्लड मिळाल्याने मी आता तृतीय श्रेणीचा हस्तक उरलो नव्हतो. आता मला दुसऱ्यांचं सॅम्पल म्हणून काढलेलं रक्त पिवून माझी भूक भागवावी लागणार नव्हती. आता मी स्वतःच गुरू झालो होतो आणि माझं स्वतःचं साम्राज्य उभारणार होतो.
 
मी क्षणार्धात तयार झालो. माझ्या बोटांच्या इशार्‍यासरशी रूमचा दरवाजा उघडला. चार ढांगात मी सोम्याजवळ पोहोचलो. त्याच्याशी मनोसंवाद साधून त्याला मिठीत घेतानाच मी माझे तिक्ष्ण सुळे त्याच्या मानेत खुपसून, त्याला प्रथम हस्तक बनायचा मान बहाल केला.
 
माझा आईसबॉक्स त्याला भेट म्हणून दिला आणि चटकन वटवाघळाचं रूप घेउन जाळीच्या दरवाजातून आकाश कवेत घेण्यासाठी उडत निघालो !!!
 
Image by Rachel Burkum from Pixabay 

8 thoughts on “ग्रीन ब्लड!

  • May 27, 2019 at 5:21 pm
    Permalink

    Khilavun thevalat! Anakalaniya!

    Reply
  • May 28, 2020 at 12:34 pm
    Permalink

    भयानक

    Reply
  • December 30, 2020 at 9:51 am
    Permalink

    ओ बापरे 🥺🥺🤭

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!