नजर के सामने, मगर के पास….
चिपळूण.
माझ्या मामाचा गाव.
डिट्टो चांदोबातला गाव.
कौलारू घरं आणि पुढे मागे छोटेखानी अंगण.
अंगणाभोवती दीडफूट ऊंच जांभेरी लाल भिंत.
कंपाऊंड माणसांसाठी नाहीच.
तसं कुणीही यावं आणि आत डोकवावं.
तास दीड तास निवांत गप्पा छाटाव्यात.
घड्याळानं वेळ विसरून जावी इतकं निवांत गाव.
गुरं आत येवू नयेत म्हणून केलेली ही सोय.
कंपाऊंडला दरवाजा नसतोच.
तीन बांबू ओवलेले.
ते पुढे मागे करून आत शिरायचं.
कंपाऊंडबाहेर छोटी नाली.
पावसाचं पाणी वाहून जावं म्हणून केलेली ही सोय.
त्यावर लोखंडी चाळणीदार पट्टी.
ये जा करण्यासाठी.
प्रत्येक घराचं हेच तेच ते डिझाईन.
लोखंडाची मुक्तहस्त ऊधळण करणार्यांत चिपळूणचा नंबर दुसरा.
पहिला अर्थात भारतीय रेल्वेचा.
माझ्या आठवणीतलं चिपळूण आता बदललंय.
तेही माॅडर्न झालंय.
मोठमोठ्या बिल्डींगा, शोरूम झाल्यात.
जुनं चिपळूण कुठं तरी हरवलंय.
एरवी हे गाव द्रोणासारखं.
चारही बाजूने डोंगर.
मधल्या बेचक्यात वसलेलं चिपळूण.
मुंबईकडून आलात की गावात शिरायच्या आधी वाशिष्ठी दर्शन होतं.
तशी ती परशुरामाच्या घाटातूनही दिसतेच..
एखादी सुबक ठेंगणी ठुमकत ठुमकत चालावी तशी वळसे घेत जाताना दिसते.
पावसाळ्यातला तिचा थाट विचारूच नका..
रक्त पिऊन फुगलेल्या जळूसारखी टम्म.
टाकी फुल्ल.
एकदम झिंगालाला.
तिच्या वाहत्या पाण्याला सतराशे साठ वाटा फुटतात.
दुधानं भरलेला मातीचा घडा फुटावा आणि त्या शुभ्र दुधाचे ओघळ चहूकडे वहात जावेत, डिट्टो तसंच वाटतं.
सभोवतीची हिरवी भातशेती.
कुक करणारी, मधेच डोंगरात लपाछपी खेळणारी, धुरांच्या रेषा हवेत काढणारी , निळीशार कोकणरेल्वे..
तीही तशीच नदीच्या काठानं नागमोडी वाटेनं ठुमकत ठुमकत जाणार.
एखाद्या सुळूक सुसाट नागिणीसारखी.
परशुरामाच्या घाटात वाशिष्ठी दर्शन नावाचा एक पाॅईंट आहे.
तिथं ऊभं राहिलं की हा सगळा नजारा पहायला मिळतो.
कुणाला ऊघड्या डोळ्यांनी तप करायचं असेल तर खुशाल इथं ऊभं रहावं.
बारा वर्ष एका पायावर.
डोळे मिटून घेतलेत तरीही हे दृश्य हटणार नाही.
पुलापाशी वाशिष्ठी जणू नववार नेसून येते.
दुटांगी वाहते.
मधे तयार झालेलं छोटंसं बेट.
समोर सायलेंट वाहणारी वाशिष्ठी.
काठावर पोहणारी दोन चार माणसं.
तिथला तो खोल डोह.
त्याच्याशी रिलेटेड खतरनाक दंतकथा.
जरा पुढं गेलं की गांधारेश्वर.
ईतकी निवांत जागा जगात दुसरी नसावी.
छोटंसं मंदिर.
पाठीशी ऊभा ठाकलेला विश्वेश्वर.
समोरचा छोटासा घाट.
पाण्यात पाय सोडून पसरट बसावं.
सगळा अहं गळून पडतो.
पाण्यात वाहून जातो.
विधात्याने चितारलेलं अत्युत्तम चित्र डोळ्यासमोर असतं.
त्याच्या अदाकारीने आपण हिप्नोटाईज्ड.
जगात प्रेम दोघांवरच करावं.
एक बायकोवर.
आणि दोन गांधारेश्वरासमोरच्या वाशिष्ठीवर.
दोघीत अधिक सुंदर कोण ?
हा प्रश्न मी नेहमीच आॅप्शनला टाकतो.
फार वेळ तिथं बसलं की मामा रागवायचा.
लवकर घरी चल म्हणायचा.
का ?
तिथं एक मगर आहे म्हणे.
ईतकी वर्ष मी गांधारेश्वरला जातोय.
एकदाही मला तिथं मगर दिसलेली नाहीये.
अगर मगर कुछ नही.
मला सगळ्या कानगोष्टी वाटायच्या.
एकंदर माझ्यासाठी वाशिष्ठी एकदम सोज्वळ , सुशीला, निरूपद्रवी नदी होती.
अचानक कानावर आलं.
चिपळूणपासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर मालडोली नावाचं एक गाव आहे.
तिथं एक क्रोकोडाईल सफारी सुरू झालंय म्हणे.
नेकी ओर पूछ पूछ.
यावेळी ठरवलंच होतं.
चलो चिपळूण.
चलो मालदोली.
आमच्या केतकर सरांनी माहिती पुरवली.
संदेश आणि निलेश संसारे या दोन बंधूंनी हा सफारी सुरू केलाय.
दिवसातून फक्त एक किंवा दोनच राईडस्.
त्यांची छोटीशी मोटरबोट आहे.
दहा पंधरा लोकांना पोटात घेईल एवढी.
संसारे बंधूंशी फोनवर बोललो.
मगरींचं दर्शन घ्यायचं असेल तर ओहटीची वेळ गाठावी लागते.
सकाळी साडेसातची वेळ ठरली.
तसं मगरींनाही कळवता आलं तर बघा,
मी आपला कंट्री विनोद मारला.
मगरीसारखे दात काढून फिदीफिदी हसलो.
पचला नाही.
बायकोने डोळे वटारले.
चिपळूणहून गुहागरच्या दिशेने गाडी दामटायला सुरवात केली.
मालडोलीच्या फाट्याशी गाडी आत वळवली.
सावलीसारखी वाशिष्ठी सोबतीला होती.
वळणावळणाचा रस्ता.
गाडी ईन्फानाईट डोंगर चढली आणि ऊतरली.
मी नेहमीच बाईंचं ऐकतो.
गुग्गळबाईंनी मालदोलीला आणून पोचवलं एकदाचं.
गाडी लावली.
पायांची घसरगुंडी करत खाली चालत गेलो.
ऊडालोच.
मे महिना.
रखरखीत ऊन्हाळा.
समोर बघितलं आणि ऊडालोच.
कुठं ती चिपळूणातली वाशिष्ठी आणि कुठं ही मालडोलीतली..
अबब..
केवढा हा पाण्याचा अगडबंब पसारा.
डोळ्याच्या कवेत मावेना.
नदी नव्हे नद होता तो.
समोरचा किनारा दिसत होता म्हणून नद.
नाहीतर समुद्रच म्हणलं असतं त्याला.
पाऊण एक किलोमीटर रूंद पात्र असेल.
ऊन्हाळ्यात हा माज.
पावसाळ्यात तर…
माझं ईमॅजीनेशन झोपलं.
बारावीच्या वर्गातलं सुबक, बांधेसूद, गौरवर्ण ‘आपले’पण पंधरा वर्षानंतर अचानक रस्त्यात भेटावं.
हातातल्या टुचक्या पोरानं मामा म्हणत, आपला मामा करावा.
आत्ताचा तो किलोंबरी पसारा बघून ,
आठवणीतली ती मरून जावी..
निराश डोळ्यांनी गर्कन मान फिरवावी,
डिट्टो तसंच झालेलं.
बोट रेडी होती.
ही, मी आणि माझ्या दोन लेकी.
आज आम्ही चौघंच.
आमची पेशल वारी.
सुर्र पाणी कापत आमची सुनयना निघाली.
समोरचा अथांग पाणीसाठा माझ्या बापाचा आहे..
आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात हाच माज.
बोट सन सनासन पुढं चाललेली.
हिरवंशार पाणी.
बोटीत बसलं की माझे तीन प्र्श्न ठरलेले.
पाणी किती खोल आहे ?
किती मोठे मासे आहेत ?
पाण्यात पडलं तर मासे चावतात काय ?
ठरलेले प्रश्न विचारले.
ऊत्तरं मिळाली.
खोली चाळीस ते पन्नास फूट.
माशांची लांबी दोन फूट. वजन चार किलोपर्यंत.
बोटीत लाईफजॅकेटस् आहेत.
पाण्यात पडलं की मासे फक्त गुदगुल्या करून चव बघतात.
चव आवडली तर पुढंचं काय ते ठरवतात.
शेवटचं ऊत्तर काही आवडलं नाही आपल्याला.
पाण्यात आपण डेंजर सिरीयस असतो.
असली चेष्टा झेपत नाही अशावेळी.
च्या मारी..
मगरींना विसरलोच की..
पाण्यात पडलं की पहिल्यांदा त्या येणार..
कचाकचा दात खात…
माझी दातखीळ बसायच्या बेतात.
बोटीचा काठ घट्ट धरून बसलो.
बोटीचा ड्रायव्हर मगरीसारखाच हसला.
नदीकाठी दाट खाजणाची बेटं.
तिथे डोकावणारे पांढरे सन्यस्त बगळे.
मधेच काही काळेही.
झाडाच्या फांदीवर बसणारा शिष्ठ खंड्या.
वटवटणार्या टिटव्या.
पाण्यात पोहणारी बदकं.
आकाशातून पाण्यात सूळ्ळकन् झेपावणारी घार किंवा गरूडही.
त्याविषयी मतभेद.
क्या छलांग लगाई यार ऊसने.
एका टेकमध्ये शाॅट ओक्के.
पायाच्या चिमटीत पांढुरका मासा पकडलान् आन् पुन्हा ढगात..
जबराट.
डोळ्याच्या कॅमेर्यानं ते चित्र अचूक टिपलं अन् मनाच्या मेमरीकार्डात कायमचं स्टोअर करून ठेवलं.
आम्ही चिपळूणच्या दिशेनं पाचसहा किलोमीटर आलो असू.
आता मधेमधे बेटं दिसत होती.
हजार दोन हजार स्क्वेअर फूटांची.
बेटांवर गवताचं रान माजलेलं.
काठाशी दलदल.
अचानक डावीकडनं एक मोठ्ठी नदी आली.
आम्हाला अन् वाशिष्ठीला दोघांना हाय केलं तिनं.
‘ कोण गं बयो तू ?’
मी विचारलं.
‘मी जगबुडी. खेडहून आलेय.’
मी घाबरलो.
तिचाही देहपसारा अगडबंब.
बरंच ऐकलंय तिच्याविषयी.
दर पावसाळ्यात दोन चार वेळा, आख्ख्या खेडला पाण्यात बुचकाळून काढते ही बया.
आम्ही पुढे चाललेलो.
आता पाण्यात बेटंच बेटं.
दहा बारा तरी नक्कीच असतील.
अचानक एका बेटापाशी आमची बोट थांबते.
फक्त दहा फुटांवर.
नजर के सामने,
मगर के पास.
बारा एक फूट लांब असेल.
अंगावरचं चिलखत.
चिखलात लोळत पडून आलेलं निवांतपण.
नुकताच माशांच्या कालवणाचा ब्रेकफास्ट झाला असणार.
जबडा सताड ऊघडा.
डेन्टिस्ट असतो तर दात मोजून घेतले असते.
अगदी रूट कॅनालविषयीही सुचवलं असतं.
मला तर वाटलं, पटकन् एका पायानं ती टूथपीक दातात सरकवेल आणि
दात विचकत, दात कोरून मला गुडमाॅर्नींग म्हणेल..
कसचं काय ?
ती दातेरी करवत बघून टरकलो.
तिच्या येवढ्या जवळून गेलो.
बया , जागची हालली नाही.
आळशी मेली.
आता फटाटा मगरी दिसायला लागल्या.
काही लहान पाच सहा फुटी.
मुलखाच्या लाजाळू.
आम्हाला बघितलं की अलगद पाण्यात सूबाल्या करायच्या.
अॅडल्ट पिक्चर बघायला जावं अन् शेजारी शेजारचे काका दिसावेत,
तशा बिचकायच्या.
अगदी आमच्या बोटीखालनं..
काही निर्लज्ज.
ऊघड्या अंगानं तशाच दलदलीत पडून रहायच्या.
आमच्या या प्रभातफेरीत चाळीस एक मगरी दिसल्या.
दिलखूष.
अगदी पोटभर बघितल्या.
नशीब त्यांचंही पोट भरलेलं असावं.
पुन्हा प्रश्न.
‘किती मगरी आहेत इथं अशा ?’
दोनशे एक असतील.
मी गप्प गार.
‘तुम्ही त्यांना खायला देत नाही काही ?’
‘कोकणातल्या मगरी आहेत त्या.
आयतं पचायचं नाही त्यांना.
हात पाय चालवून मासे पकडतात ,
अन् कष्टानं पोट भरतात.
नको त्या सवयी लागल्या तर ऊद्या माणसांवर हल्ला करतील..’
कानावर हे बोलणं आणि नजरेच्या टप्प्यात एक मगर.
नेमकं एकाच वेळी
तिलाही ऐकू गेलं असावं बहुतेक.
टप्पोरी डोळा तिनं कच्चकन् मिचकावला..
संसारेभाऊ, बास झालं.
गाडी स्टॅन्डावर घेवा देवा.
नाहीतर आमचा संसार निम्म्यातच आटपायचा.
मगरदर्शन आटोपता घेवून आम्ही किनार्यावर सुखरूप.
कोकणात गेलात , आणि मालडोलीची क्रोकोडाईल सफारी केली नाहीत तर जीवन व्यर्थ.
मस्ट आणि मस्त एक्सपेरियन्स.
मगरींच्या नैसर्गिक सहजीवनाला कुठलाही धक्का न लावता केलेली अनोखी सफर.
तेव्हा अगर मगर कुछ नही..
चलो मालडोली.
जायच्या आधी फक्त संसारे बंधूंना एक काॅल करा.
जमल्यास मगरींनाही..
क्यों की..
मगर के सामने,
जिगर के पास…
हॅप्पी जर्नी.
सफारीसाठी काॅल 9970683669.
कौस्तुभ केळकर नगरवाला.
Image by Manfred Richter from Pixabay
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)
- घरघर….. - October 4, 2021
- ‘स्कूल चले हम ! - September 22, 2021
- चष्मा - July 12, 2021
Zakas safar👌👌👌👌
Good
मस्तच
मस्त. मगरके पास जायलाच पाहिजे. पण भिती वाटते.
धावत समालोचन मस्तच