दृष्टी…

परवा रात्री अचानक माझा चष्मा तुटला. अगदी झोपताना चष्मा काढून ठेवायला गेलो आणि टेबलावर ठेवायच्या ऐवजी वेंधळेपणे आधीच सोडला आणि बिचार्‍याची गच्छंती झाली. खरंतर त्याची आणि माझी एकदमच गच्छंती झाली. चष्म्याशिवाय मी म्हणजे बाणाशिवाय धनुष्य!! छ्या ! फारच पंचाइत.

दुसर्‍या दिवशी कामावर जाताना, गाडी किंवा बाईक काहीच घेऊन जाता येणार नव्हतं. मुकाट रिक्षामार्ग पत्करल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. दरवाजाबाहेर येताच पहिला झटका मिळाला. आमच्या मजल्यावर हाऊसकिपिंगचे काही कर्मचारी सफाई करत होते. मला त्यांचे फक्त युनिफॉर्मच दिसत होते. डोळे ताणून बघितलं तर त्यांना चेहरेच नव्हते, फक्त युनिफॉर्म ! तो मात्र स्पष्ट दिसत होता. आता हे काय नवीन, हा विचार करत लॉबीत आलो, तर तिथेही तीच परिस्थिती. युनिफॉर्म कधी वॉचमनचा तर कधी हाऊसकिपिंगचा…माणसं गायब!

रस्त्यावर येऊन रिक्षाला हात केला आणि चक्क एक रिक्षा लगेच येऊन थांबलीसुद्धा. “गोरेगाव..” असे सांगायला ड्रायव्हरकडे पाहिलं, तर फक्त त्याचा बॅज दिसत होता. बैठो, या आवाजाच्या भरवशावर जीव मुठीत धरून रिक्षात बसलो. जरा धीर आला. असं का होतंय याचा विचार करताना जाणवलं, माझ्या आजूबाजूच्या रोजच्या बघण्यातले ते कर्मचारी असून मी कोणालाही ओळखत नव्हतो, म्हणून तर मला फक्त ते युनिफॉर्म दिसत नव्हते ना?

रस्त्यात थांबून, नेहमीच्या चष्मेवाल्याकडे नवीन काचा बसवायला उतरलो. त्या दुकानदाराच्या चेहर्‍याऐवजी फक्त एक ठळक चश्माच दिसत होता. माझा गोंधळ चेहर्‍यावर स्पष्ट दिसत असणार, पण त्या दुकानदाराला, दृष्टीक्षीणांचे असे चेहेरे पाहायची सवय असावी. ‘संध्याकाळी घेऊन ज्या’ हे ऐकून मुकाट बाहेर पडलो. बॅज रिक्षात वाटच पाहत होता!

सारं जग सारवल्यासारखं दिसत होतं. डोळे बारीक करून पाहताच मात्र वेगवेगळे प्रकार जाणवत होते. एका पेक्षा एक महाग गाड्यांऐवजी त्यांचे लोगो आणि फक्त किमती दिसत होत्या. त्या गाड्यांमधे बसणारे आत न दिसता, गाड्यांच्यावर अलगद तरंगत होते. जितकी महाग गाडी, तितका त्याचा मालक उंच तरंगत होता आणि इतरांना खाली ढकलायला जोरात पाय झाडत होता.

सिग्नलला थांबलो तशी भिकार्‍यांची फौज आलीच. त्याचे चेहरे मात्र सतत विरघळत होते. कधी लाचारी, कधी निर्लज्जपणा, कधी असूया तर कधी शुद्ध भूक तिथे जाणवत होती.

शेजारच्या रिक्षात एका देहावर अनेक ब्रॅन्ड दिसत होते. अंगावर ऍलन सोली, खाली पिटर इंग्लंड तर पायात वुडलॅन्ड. रेबॅन मात्र डोळ्यांऐवजी एका मोठ्या प्रश्नचिन्हावर विसावला होता. त्याच्या शेजारी, रितु कुमार किंवा तत्सम ब्रॅन्डचा कुरता आणि लिवाईस जीनस्‌घातलेला, चॅनल-५ चा फवारा बसला होता. भल्यामोठ्या गॉगलमागून मात्र एक डोळा रिक्षाच्या मीटर वर तर एक डोळा त्या पीटर इंग्लंडच्या खिशातल्या लठ्ठ पाकिटावर खिळलाय असं वाटत होतं.

रस्त्यात बॅंकांच्या जागी पैशांचे ढिगारे, तर मॉलऐवजी भुलभुलैया दिसत होते. इतक्या सकाळीसुद्धा बिनमेंदूची माणसं त्यात शिरायला गर्दी करत होती, कसलातरी बंपर सेल वगैरे असावा.

ऑफिसात पोचलो आणि एका भ्रामक कोषात स्वतःला बंद करून घेतलं. फारसं काम शक्यच नव्हतं. परत जायला दुसरा बॅज तयारच होता. संध्याकाळी परतताना चष्मा घेतला, पण घातला नाही. अजून थोडा अनुभव घ्यावा म्हंटलं. रस्त्यातल्या मंदिरात शिरून पुढे जावं म्हणून रिक्षा सोडली.

मंदिरात येणारे सगळे भक्त डोळ्यावर झापडं आणि कानात बोळे घालून येत होते. आरती सुरू झाली. त्या घंटानादातून सतत ‘कर्म करा, कर्म करा, नुसत्या भक्तीने काही होत नाही’ असं मोठ्मोठ्याने ऐकू येत होतं. मध्येच झालेल्या शंखध्वनीतून ‘जागे व्हा मूर्खांनो’ असा घोष स्पष्ट ऐकू आला. मात्र सगळे भक्त आता आरतीच्या तालात नाही नाही अशा माना डोलवत होते. चुकून गाभार्‍यातल्या मूर्तीशी नजरानजर झाली तर, देव, ‘तुला तरी कळतंय का हे?’ असं नजरेतून स्पष्ट विचारत होता. उत्तर द्यायची माझी हिंमत नव्हती. मी निमूट नजर खाली घातली.

परत कॉम्प्लेक्स मधे आलो. आता माणसांच्याऐवजी फक्त लाखांच्या/कोटींच्या रकमा दिसत होत्या. मधेच एक मुलगा त्याच्या बापाकडे पैसे मागताना दिसला, फक्त बापाच्या जागी मला एटीएम मशीन दिसत होतं. बधीर होऊन घरी आलो आणि दाराची बेल वाजवली आणि पुढे काय होणार या धास्तीत उभा राहिलो.

काळजी भरल्या चेहर्‍याने ‘ही’ने दरवाजा उघडला. मला पाहताच तिच्या चेहर्‍यावर, तिला झालेला आनंद स्पष्ट दिसला. “किती उशीर, आज चष्मा नाही तर जरा लवकर यायचंस ना..” दिवसभरात दिसलेला पहिला चेहरा ! मी एवढावेळ रोखून धरलेला श्वास सोडला. आतून मुलगी धावत आली, ” बाबा, कसा आहेस?” म्हणून लाडाने बिलगली. एरवी, “आता तू मोठी झाल्येस, असं अंगाशी यायचं नाही” म्हणून मी तिला ओरडतो, पण आज तिला जवळ घेतलं. दिवसभर शिणलेल्या डोळ्यांमधून आपसूक पाणी ओघळलं.

अचानक जाणवलं, आज दिवसभर मला दिसत नव्हतं पण “दृष्टी” आली होती !!

Image by Mabel Amber, still incognito… from Pixabay 

4 thoughts on “दृष्टी…

  • June 30, 2019 at 7:08 am
    Permalink

    हीच खरी दृष्टी. मिळाली कौस्तुभ.
    एकदम झकास.ननं

    Reply
  • December 30, 2020 at 9:40 am
    Permalink

    Superb 👌👌👌👌

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!