नायक की खलनायक ?

तात्यांची सकाळपासून गडबड सुरू होती.
तात्यांची गडबड म्हणून माईंचीही.
साडेसहाची बस पकडायची होती.
सहा वाजताच दोघं आवरून तयार.
‘कशाला ?
सगळे देव सारखेच…’
दीनकरनं, तात्यांच्या मुलानं समजावण्याचा प्रयत्न केला.
पालथ्या घड्यावर पाणी.
तात्यांनी खुन्या मुरलीधराला कमिटमेंट दिलेली..
तुम्हाला तर माहितीच आहे.
एक बार तात्याने कमिटमेंट दी तो,
तात्या खुद की भी नही सुनता !
तसं इथं कोथरूडला आल्यापासून तात्यांना फारसं करमायचं नाही.
सगळं आयुष्य सदाशिवात गेलेलं.
पेरूगेटाशी धायगुड्यांच्या वाड्यातल्या दोन खोल्यांत आयुष्य काढलेलं.
भावे हायस्कूलात तात्या गणित शिकवायचे.
तात्यांच्या आधीच्या चार पिढ्या अशाच टुकीनं संसार करायच्या. खाऊन पिऊन सुखी होतं तात्यांचं घर.
स्वच्छ पांढरं धोतर, पांढरा शर्ट, काळा कोट आणि डोक्यावर काळी टोपी.
घर ते शाळा आणि शाळा ते घर..
तात्यांनी हाच रस्ता पस्तीस वर्ष दिवसातून दोनदा तुडवला.
शाळेतून घरी आले की ,
वाड्यातल्या मारवाड्याच्या दुकानात खतावण्या लिहायला जायचे.
सहा ते नऊ तिथं मान मोडू काम.
तात्या हिशोबाला पक्के.
मोत्यासारखं अक्षर.
स्वच्छ पांढर्या धोतरासारखे प्रामाणिक.
एका पैशाचाही कधी घोटाळा व्हायचा नाही.
मारवाडी जाम खूष असायचा तात्यांवर.
कितीन्दा म्हणायचा,
‘तात्या, मी कर्ज देतो.
तिकडे गुलटेकडीपाशी स्वस्तात जागा मिळतात.
छोटसं का होईना,
स्वतःचं घर बांधा.
माझा पैसा सत्कारणी लागंल.’
नाय नो नेव्हर..
कर्ज म्हणलं की तात्याची सटकायची.
कर्जापायी कोकणातली जमीन विकून तात्याचा बाप , नेसत्या वस्त्रानिशी कफल्लक होऊन इथं पुण्यात आलेला..
जीव गेला तरी चालेल, कर्ज काढणार नाही.
तात्यांची भीष्मप्रतिज्ञा.
वाड्यातल्या किती तरी जणांचं मारवाड्याकडे ऊधारीचं खातं.
तात्यांनी ऊधारी कधीच केली नाही.
एकदा माईंनी दिनकरला,
पाच सहा रूपयांची साखर घ्यायला पाठवला होता दुकानात.
मारवाड्यानं पैसे परत देताना चुकून रूपया जास्तीचा दिला.
दिनकरनं दुसरीकडनं रूपयाच्या लिमलेटच्या गोळ्या घेतल्या.
पाॅकेटमनी दिनकरच्या आयुष्यात असा पहिल्यांदा आलेला.
घरी आल्यावर दिनकरची आॅरेंजी जीभ बघून तात्या भडकले.
कुठनं आणले पैसे ?
तात्यांनी फोडून काढला दिनकरला.
ऊलटटपाली मारवाड्याकडे परत गेले.
माफी मागून तो रूपया परत केला.
शिक्षा म्हणून दोन रविवार दिनकर मारवाड्याच्या दुकानी पुड्या बांधीत होता.
आपला बाप म्हणजे खलनायक आहे…
होय.
छोट्या दिनकरला तरी असंच वाटायचं तेव्हा.
तात्या शिकवायचे जीव तोडून.
तात्यांचा विद्यार्थी नापास व्हायचाच नाही कधी.
खाजगी शिकवणी घ्या म्हणून किती जणं यायची.
‘शाळेत काय गंमतगाणी गातो काय मी ?
तिकडे लक्ष द्या.
पास व्हाल नक्की.
फीया घेऊन खाजगी शिकवण्या घेणं म्हणजे पाप आहे पाप.
सरकारशी केलेली फसवणूक होईल ती…”
पोरं पास व्हायची.
तात्या मात्र अर्थशास्त्रात नापास.
भाड्याचं घर तात्यांना आयुष्यभर पुरलं.
घराण्याचा लोअर मिडलक्लासवाला ईतिहास काही तात्यांना कधी पुसता आला नाही.
तो पुसला दिनकरनं.
लक्ष्मीचं आवताण नाकारून सरस्वतीला पूजणारा आपला बाप त्याला पुन्हा एकदा खलनायक वाटायचा.
बाहेरच्या खोलीतला एक कोपरा.
दिनकर तिथं समाधी लावून बसायचा.
तसा फार काही हुश्शार नव्हता.
पण मेहनती होता.
ठरवून काॅमर्सला गेला.
बँकेच्या परीक्षेची तयारी केली.
पास झाला .
गेली सात वर्ष स्टेट बँकेत आहे.
कॅशियर…
काहीही असो.
तात्यांवर जीव आहे दिनकरचा.
मागच्याच वर्षी कोथरूडला फ्लॅट घेतला.
कर्ज काढलंय म्हणून तात्या फुगून बसले होते.
सूनबाई चांगली मिळालीये हो तात्यांना.
हट्टानं तात्या आणि माई, दोघांना रहायला घेऊन गेली कोथरूडला.
आयुष्यभर पाणी भरून ठेवायची सोय.
नवीन फ्लॅटमधे पहिल्या दिवशी तात्या आंघोळीला गेले.
नळाबरोबर बाथरूममधे धाय मोकलून रडले.
मागेल तेव्हा पाणी देणारा नळ.
ही चैन तात्या आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवत होते.
पोराचा फार अभिमान वाटला तात्यांना तेव्हा.
काय सांगत होतो ?
तात्या आणि माई सकाळी सकाळी पोचले गावात.
खुन्या मुरलीधराशी.
कधी एकदा देवापुढे डोकं ठेवतोय, असं झालेलं तात्यांना.
देवाचे कोटी कोटी आभार मानायचे होते.
प्रसंगच तसा होता.
आज बँकेत सत्कार होता दिनकरचा.
प्रेसिडन्टसाहेबांकडून गौरव.
कालच सगळ्यात पेपरमधून छापून आलेलं.
दहा दहा वेळा वाचल्या सगळ्या बातम्या तात्या आणि माईंनी.
सांगतो.
रणछोडदास मर्चंट कं. ची कॅश दर आठवड्याला डिपाॅझीट व्हायची दिनकरच्या ब्रँचमधे.
दहा बारा लाखाच्या आसपास रक्कम असायची दरवेळी.
गेल्या शनिवारची गोष्ट.
शेटजींचा नोकर साडेदहा लाखाची रक्कम भरून गेला.
शंभरच्या नोटांची बंडलं.
दुपारी कॅश बंद करायच्यावेळी हिशोब लागेना.
दोन लाखाची जादा रक्कम आलेली.
शंभराच्या नोटा.
बाकी कुणाची शंभराची बंडलं नव्हतीच.
दिनकरच्या लगेचच लक्षात आलं.
त्यानं शेटजींना फोन लावला.
आऊट आॅफ रेंज.
मॅनेजरच्या कानावर गोष्टी घातल्या.
जादा रक्कम शेटजींच्या अकाऊंटला जमा केली.
सोमवारी मॅनेजरनी शेटजींना बोलावून घेतलं.
शेटजींनी दिनकरचं तोंड भरून कौतुक केलं.
पेपरपर्यंत बातमी पोचली.
गावभर दिनकरचं कौतुक.
म्हणूनच आज दिनकरचा गौरव.
तात्या काही जायचे नव्हते.
बँकेतल्या बँकेत छोटासा समारंभ व्हायचा होता.
तात्यांनी आपले मुरलीधराला हात जोडले आणि कृतकृत्य झाले.
संध्याकाळी दिनकर घरी आला.
तात्यांच्या मनोभावे पाया पडला.
आँखोदेखा हाल सांगितला.
कार्यक्रमाच्या वेळी शेटजीही मनातलं बोलले.
” आमच्या माणसाकडनं छोटासा चूकी झाला खरा.
बँकेच्या माणसांकडनं चूक नाय झाला.
म्हणूनच हे बँक आपला वाटतो आमाला.
आपच्या पिताजींना जवा ‘दिनकर तात्यासाहेब कुलकर्णी’ हे नाव सांगितला, तवा ते जास्तीच खूष झाला.
तात्यांचा पोरगा.
मंजी सौ टक्का सोना असनार.
तात्या आमच्या पिताजीच्या टायमाला पेडीवर यायचा.
जसा बाप तसा बेटा.
एकदम सच्चा.
दिनकररावचा मनापासून आभार..”
हे ऐकून तात्या खूष.
तात्यांचे हात हातात घेऊन दिनकर मनातलं बोलला.
‘ बाबा लहान असताना खलनायक वाटायचात तुम्ही.
चुकत होतो मी.
तुम्ही खलनायक नाहीच,
आजच्या युगाचे खरे नायक आहात.
तुमचा आशीर्वाद असाच माझ्या पाठीशी राहू देत…’
तात्या सदगदित.
‘नायक’ नावाचा तो फॅमिली पिक्चर बाकी फॅमिली मेंबर म्यूटपणे बघू लागले.
…….कौस्तुभ केळकर नगरवाला.
Kaustubh Kelkar
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)

Kaustubh Kelkar

कौस्तुभ केळकर ह्यांनी बीई (इलेक्ट्रिकल) तसे बीजे (जर्नालिझम) असे शिक्षण घेतले आहे. गेली अनेक वर्ष ते अहमद नगर येथे भौतिकशास्त्राचे क्लासेस चालवतात. फेसबुकवर कौस्तुभ केळकर नगरवाला ह्या नावाने परिचित असलेल्या कौस्तुभ ने अनेक कार्यक्रमांचे लेखन, निवेदन आणि सुत्रसंचलन केले आहे. हसरी दिवाळी तसेच कथुली ह्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. लोकसत्ता, सकाळ, लोकमत अश्या अनेक दैनिकांमधून विपुल लिखाण केले आहे. तसेच त्यांचे कथुली नावाचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

11 thoughts on “नायक की खलनायक ?

  • June 1, 2019 at 4:13 am
    Permalink

    धन्यवाद नितीराज

    Reply
  • June 1, 2019 at 9:58 am
    Permalink

    Mast as always

    Reply
  • June 2, 2019 at 5:37 am
    Permalink

    Honesty is precious 👌👌👌👌

    Reply
  • July 6, 2019 at 11:23 am
    Permalink

    कौके खरच डोळ्यात पाणी आलं राव, कथा उत्तमच👌👌👌

    Reply

Leave a Reply to Mangeshdamle Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!