सोनचाफा

‘करररsss’ असा आवाज करत बस थांबली. भर दुपारची वेळ. अर्ध पुणे वामकुक्षीत गर्क आणि उरलेलं अर्ध जीभ, मेंदू, आयुष्य यांना धार लावण्यात गर्क. कर्वे रोडवरच्या एसएनडीटी कॉलेजची दुपारची लेक्चर्स संपलेली मग काही नेहमीचे चेहरे बस स्टॉपच्या दिशेने चालू लागले.एक नेहमीचा पण तरीही वेगळा चेहरा त्याला दिसला आणि त्या उन्हाने तापणाऱ्या 15×10 बसस्टॉपचं अलास्का बेटात रूपांतरण झालं. चेहऱ्यावर उल्हसित भाव आले ,मनात व्हायोलिन वाजू लागलं, गुलाबांच्या पाकळ्या पडू लागल्या वगैरे वगैरे असं बरंच काही झालं त्या काही क्षणांत.

हल्ली नेहमीचं झालं होतं हे. तो पुण्यात कर्वे रोडवरच्याच एका कम्पनीत काम करायचा. एकदा दुपारी चाय सुट्टा सेशनच्या दरम्यान ती त्याला बरीच लांबून दिसली.तिची बसची वेळ आणि याच्या सेशनची वेळ एकच असं ध्यानात आल्यावर त्याने या वेळेच्या योगायोगाबद्दल देवाचे मनोमन आभार मानले. मग काय रोज सेशन लांबत चाललं, ती बसमध्ये बसून बस नजरेसमोरून पूर्ण जाईपर्यंत हा तिथेच थांबू लागला. तिच्या हातात काहीतरी असायचं जे सांभाळत ती बसमध्ये चढायची.

मग पुढे तो हिम्मत करून बसमध्ये चढला. एवढा मोठा ब्रेक घेतल्यावर मॅनेजर काय म्हणेल असे फालतू प्रश्न त्याच्या मनाला अजिबात शिवले नाहीत त्या दिवशी.त्याने तिला इतक्या जवळून प्रथमच पाहिलं.पाठमोरी ती,गव्हाळ वर्ण, हनुवटीखाली डाव्या बाजूला एक तीळ, घामाघूम असूनही तजेलदार दिसणारा तिचा चेहरा आणि हातात सोनाचाफ्याची ओजळभर फुलं. ज्या फुलांचा दरवळ आजूबाजूला पसरलेला. अशा वेळी तिचे हात स्वतःच्या नाकाजवळ घेऊन हुंगायची त्याला इच्छा होते.

तेवढ्यात ‘तिकीsssssट’ असा कंडक्टरचा आवाज येतो. ती नाजूक आवाजात ‘डेक्कन’ उत्तरते, पास दाखवते.नंतर हा अर्थात तिथलच तिकीट काढतो. पुढे डेक्कन स्टॉपवर उतरल्यावर ती नाहीशी होईपर्यंत तिला पाठमोरी न्याहाळत राहतो. मग पुन्हा परतीचा तिकीट काढून कर्वे रोडला कम्पनीत हजर.तिच्या ओंजळीतल्या सोनचाफ्याचा दरवळ त्याला सगळीकडे सतत जाणवत राहतो. हे असं अनेक दिवस चालत राहतं.

आजही तेच झालं. ती आली, भर उन्हात पुण्यात आणि त्याच्या मनात शरदऋतुचं चांदणं पसरलं. आज पुन्हा कर्वे रोड-डेक्कन आणि पुन्हा कर्वे रोड असा प्रवास झाला.

उद्या आपण तिच्यासाठी सोनचाफ्याची फुलं घेऊन जायची नि तिच्याशी बोलायचं असं त्याने ठरवलं. रात्रभर त्याच्या उशाला, पांघरुणाला, त्याच्या मनात तो सोनचाफ्याचा दरवळ घुमत होता. आज खूप उत्साहात तो ऑफिसला आला, नेहमीच्या चाय सुट्टा सेशन आधी 5 मिनिट लवकर जाऊन त्याने सोनचाफ्याची फुलं तिथल्याच एका फुलवाल्याकडून विकत घेतली आणि स्टॉपवर तो तिची वाट पाहू लागला.नेहमीची वेळ झाली त्याच्या हृदयाची धकधक वाढली. हवेत थंडावा पसरला नव्हता कारण अजून ती आली नव्हती.बराच वेळ झाला,धकधकीच रूपांतर धाकधुकीत झालं.नेहमीच बस आली अन ‘करररss’  असा.

आवाज करत निघूनही गेली पण ती काही आली नाही.त्याने विचार केला आज काही कारणामुळे कदाचित ती कॉलेजलाच आली नसेल. दुसऱ्या दिवशीही तेच घडलं, तिसऱ्या दिवशीही तेच.तो रोज सोनचाफ्याची फुलं घेऊन यायचा पण दरवळ काही पसरायचा नाही.

मग चौथ्या दिवशी असंच निराश होऊन परत जाताना त्याला ती दिसली. तिच्या हातात स्कुटी होती आणि याला पहात ती स्टॉपपासून काही अंतरावर उभी होती. तिला पाहून त्याला खूप आनंद झाला.तो तिच्या दिशेने निघाला, तिच्या ते लक्षात आलं पण ती तिथेच थांबली. तो तिच्याजवळ पोचला आणि हातातील काही सोनचाफ्याची फुलं खाली पडली.ती उचलायला म्हणून तो खाली वाकला, इतक्यात अजून एक हात ती फुलं उचलू लागला.तिचा हात..ती त्याच्याकडे पाहून छानसं हसली, पुन्हा भर दुपारी आसमंतात चांदणं पसरलं,  व्हायोलिन वाजू लागलं.

त्या दोघांना शब्दावाचून सारं उमगलं आणि दोन मनांत चाफ्याचा दरवळ भरून राहिला.

Image by andreas N from Pixabay 

Bhagyashree Bhosekar

Bhagyashree Bhosekar

मुळची महाराष्टात जन्म घेऊन इथेच वाढलेली भाग्यश्री सध्या बंगलोर मध्ये आयटी क्षेत्रात नोकरी करते आणि विविध माध्यमात लिखाण पण करते. मराठी लेखनामुळे तिची मराठी मातीशी असलेली नाळ तुटलेली नाही. लिखाणातून तिचा मराठी भाषेशी जोडलेली राहण्याचा प्रयत्न असतो. भाग्यश्रीला लघु कथा, दीर्घकथा लिहायला विशेष आवडतात. आत्तापर्यंत तिने दोन shortfilms साठी पटकथा लिहिली आहे. शिवाय 2017 साली तिचं बॉम्बे बिट्स नावाचं मराठी पुस्तक प्रकाशित झालं आहे. याव्यतिरिक्त अवांतर वाचन हा तिचा छंद आहे.

4 thoughts on “सोनचाफा

  • June 3, 2019 at 1:08 pm
    Permalink

    दरवळच्या सगळ्या कथा छानच एकदम. मंद सुवासाने बराच वेळ मनात रेंगाळत राहतील अशा.

    Reply
    • June 11, 2019 at 11:34 am
      Permalink

      Tumhi sarw Katha wachlya he wachun khup Chan watal…pudhehi maz likhan wachal hi aasha😊

      Reply
    • July 28, 2019 at 11:26 am
      Permalink

      Super. हे सगळं माझ्या डोळ्यांदेखत घडलंय असं वाटून गेलं.

      Reply
  • July 6, 2019 at 11:15 am
    Permalink

    सुगंधी दरवळ इथेही जाणवला

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!