चेहरा….
चालता चालता बांगड्यांच्या दुकानासमोर ती थांबली. निरनिराळ्या सप्तरंगी बांगड्या पाहून
हरखली.
बांगड्याच तर घ्यायला आली होती ती जत्रेत. बाबाने पण खूष होऊन लाडक्या लेकीच्या हातावर रुपया -दोन रुपये टेकवले होते. त्याचासामोरची गर्दी हटण्याची वाट पाहत ती उभी राहिली. थोड्या वेळाने तिने आपला नाजूक हात पुढे केला. त्याने किंचित मान वर करून तिच्याकडे पाहिले. खोल डोळ्यात खूण पटली. किंचित गालात हसत त्याने तिचा हात हाती घेतला. मिस्किल डोळे, अस्फुट हसू आणि कळत नकळत अस्पष्ट आठ्या उगाच घालून त्याने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. ती पाहतच राहिली. तो बांगड्या चढवत राहिला आणि ती भान हरपून बघत राहिली. तो एकामागोमाग एक रंग हाती चढवत होता आणि ती ते इंद्रधनुष्य त्याच्या डोळ्यात बघत होती.
“तुझा चेहरा माझा झाला बघ आणि माझा चेहरा तुझा झाला”
“चल. काहीतरीच तुझे”
“दाखवूनच देतो की. चल माझ्याबरोबर”
भारल्यासारखी ती उठली. त्याच्यामागोमाग चालू लागली.
कुठल्याशा तंबूत एका आरशासमोर त्याने तिला उभी केली.
“बघ झालाय की नाही”
तिने आरशात पाहिले. खरेच दोघांचे हसरे चेहरे तिला दिसले.
अंतरीची खूण पटलेले …. ती वळली.
“पटले न ?”
“मला नाही सांगता येत” तिचा अस्फुट आवाज….
“बघ माझ्याकडे” त्याचा हुकुमी आवाज
तिने कसेबसे मान वर करून त्याच्याकडे पाहिले
त्याचा हसरा मुखवटा मावळला. पाहता पाहता विदीर्ण झाला
त्याने तिला जवळ ओढले. तिच्या चेहर्यासमोर हात फिरवला
“याची पूर्ती नाही”…
तिचे डोळे पाण्याने भरले. … चेहरा बदलला …..
त्याने परत हसरा मुखवटा चढवला …..
“बघ मी तुला म्हणालो नव्हतो ….. चेहरे बदलतील म्हणून”…..
आणि पाहता पाहता तो दिसेनासा झाला …..
तिच्या नाजूक हातांमध्ये सप्तरंग ठेवून……
Image by Gerd Altmann from Pixabay
- Kaleidoscope- मुझे तुमसे मुहोब्बत है दिवानगी की हद तक - May 28, 2021
- Kaleidoscope- लव्ह ऍक्चुअली - April 29, 2021
- Kaleidoscope- दिल तो आखिर दिल है ना - April 14, 2021