आजीच्या हातची आमटी….

“अनिरुद्धा तुझ्या पोटी आजी जन्माला आली रे” असं आईने म्हणल्यावर अनिरुद्धच्या डोळ्यात पाणी तरळलं.आत्ता आज्जी हवीच होती असं त्याला प्रकर्षाने जाणवलं.वर्षभरपूर्वीच गेलेल्या आजीला असं आज मांडीत छोट्याश्या देहात पाहून अनिरुद्धला खूप आनंद झाला.त्याची मुलगी त्याच्याकडे पाहून गोडस हसली.

“अनि ए अनि” अनिरुद्धला त्याच्या आजीची हाक ऐकू आली.

“बरं झालं रे पणती झाली. नाक माझ्यासारखं आहे की नाही?चाफेकळी??” आजी स्वयंपाक घरातून बोलत होती. तिच्या हातच्या आमटीचा दरवळ अख्ख्या घरभर पसरला होता.तिची आमटी म्हणजे बिल्डिंगभर फेमस. कारणही तसंच होतं आजी पूर्वी डबे द्यायची. ‘पाटील काकूंचे डबे’ अशा नावाने ती मेस चालवायची. बऱ्याच जणांना ती डबेवाली काकू म्हणून ठाऊक होती.

क्षणभर आजीच्या हातच्या आमटीचा दरवळ नाकात भरून घेतल्यावर अनिरुद्ध आजीच्या आठवणींत पार वेडावून गेला.

“सीतेपासून ते आत्तापर्यंत बायका अग्निपरीक्षा देत राहिल्या रे.कोणी मागितलेल्या न मागितलेल्या. निदान आता अग्निपरीक्षेतल्या कुंडात वेगळ्या समिधा असतात. म्हणजे आताच्या पोरींसमोर वेगळी आव्हानं आहेत. ”

आजी नेहमी असं म्हणायची. अनिरुद्धला कायम आश्चर्य वाटायचं एकाच वेळी सोवळं ओवळ करणारी आणि दुसऱ्याच क्षणी अचानक पुरोगामी विचारांची ही आजी.हिचं नेमकं कोणतं रूप खरं मानायचं? तिच्या या व्यक्तिमत्वाला भूतकाळातल्या काही घटना जबाबदार होत्या. आजोबा खुप लवकर गेले तेव्हा आजी फक्त 30 वर्षांची आणि तिची तिन्ही मुलं खूप लहान होती.

“पुरुषाला जाता येतं रे असं सगळ टाकून. बाईचा जीव अडकतो घरातल्या चमच्यापासून माणसांत” आजी नेहमी म्हणायची.

त्या काळी बायका नोकरी करत नसत फारश्या. आजी मेट्रिक पर्यंत शिकली होती.मग तिने चार घरी स्वयंपाकाचं काम धरलं, डबे बनवून देऊ लागली.याच काळात आजीच्या हातच्या फेमस आमटीचा शोध लागला. तिच्या हातात जादू होती.

“सुगरण चव घेऊन नाही तर वासावरून पदार्थ कसा झालाय ओळखते” आजीमधली सुगरण बोलायची.

अनिरुद्धला त्याचे आणि आजीचे संवाद आठवले, तो आजीला गंमतीत नावाने हाक मारायचा

“सावी, आपण तुझ्या हातच्या आमटीच पेटंट करून घेऊया”

“पेटंट म्हणजे काय रे?”

“अगं म्हणजे या चवीची आमटी तुझ्याशिवाय या जगात इतर कोणीच करू शकत नाही यावर सगळ्यांची संमती घेण आणि शिक्कामोर्तब करणं”

“ह्या, घरातल्यानी मान्य केल्यावर कशाला हवंय सगळ्यांच शिक्कामोर्तब!!??अरे मी जिवंत असेन तर पुढच्या पिढीला पण करून खायला घालेन माझ्या हातची आमटी”

आजीने खूप कष्ट केले आयुष्यात. बऱ्याच खस्ता खाल्ल्या.स्वतःच्या मुलाचा मृत्यूदेखील पाहिला. त्यानंतर मात्र आजीने काही काळ मौनव्रत धारण केलं होतं.

“बाईने आर्थिकरित्या सक्षम असावं रे  कायम, आयुष्यात कधी काय पाहावं लागेल काही सांगता येत नाही. पैसा म्हणजे सगळं काही नाही रे पण काही गोष्टी पैश्याशिवाय मिळत नाहीत हेही खरंच की” आजीचा भूतकाळ बोलायचा अधूनमधून. हे सांगताना तिच्या डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, केसातील चांदी खूप काही गोष्टींची साक्ष देत असायच्या.

स्वतःची मुलगी वर्षभराची झाल्यावर एक दिवस अनिरुद्धला हुक्की आली.आंघोळ करून आजीसारखा स्वयंपाकघरात तो घुसला.ती फेमस आमटी बनवायला घेतली. क्षणोक्षणी आजीचे बोल त्याच्या कानात घुमत होते.वासावरून अंदाज घेत घेत त्याने आमटी बनवली.पुन्हा एकदा दरवळ घरभर पसरला.त्याला पोचपावती हवी होती म्हणून त्याने वाटीत थोडीशी आमटी घेतली. मुलीजवळ  गेला ती खेळत असताना तिला त्याने थोडीशी आमटी चाटवली. तिचे डोळे चमकले आणि तिने वाटी जवळ नाक नेऊन वास हुंगुन नाकात भरून घेतला.अनिरुद्धला खूप खूप आनंद झाला.

का कोणास ठाऊक मागून आजी हे सगळं पाहतेय आणि आशीर्वाद देतेय असं त्याला वाटलं.आज आमटीसोबतच आठवणींचा दरवळ सगळीकडे पसरल्याचा भास त्याला झाला.

Image by andreas N from Pixabay 

Bhagyashree Bhosekar

Bhagyashree Bhosekar

मुळची महाराष्टात जन्म घेऊन इथेच वाढलेली भाग्यश्री सध्या बंगलोर मध्ये आयटी क्षेत्रात नोकरी करते आणि विविध माध्यमात लिखाण पण करते. मराठी लेखनामुळे तिची मराठी मातीशी असलेली नाळ तुटलेली नाही. लिखाणातून तिचा मराठी भाषेशी जोडलेली राहण्याचा प्रयत्न असतो. भाग्यश्रीला लघु कथा, दीर्घकथा लिहायला विशेष आवडतात. आत्तापर्यंत तिने दोन shortfilms साठी पटकथा लिहिली आहे. शिवाय 2017 साली तिचं बॉम्बे बिट्स नावाचं मराठी पुस्तक प्रकाशित झालं आहे. याव्यतिरिक्त अवांतर वाचन हा तिचा छंद आहे.

6 thoughts on “आजीच्या हातची आमटी….

  • June 3, 2019 at 7:09 am
    Permalink

    Very nice 👌👌👌👌

    Reply
    • June 11, 2019 at 11:24 am
      Permalink

      प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार 😀

      Reply
  • June 4, 2019 at 6:25 am
    Permalink

    Ahha!!! Mastach zaliye Aamti!!

    Reply
    • June 11, 2019 at 11:25 am
      Permalink

      खूप खूप आभार😊

      Reply
  • July 6, 2019 at 11:03 am
    Permalink

    आमटी बेश्ट….

    Reply
  • July 28, 2019 at 11:36 am
    Permalink

    आहाहा, मला माझी आजी आठवली. ती सगळंच छान करायची. आज बेसन लाडूंची आठवण झाली. Thank you.

    Reply

Leave a Reply to minal Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!