अग्निरेखा
दीड-दोन महिने घासून तालीम करून, चक्री वाचन, रंगीत तालमी चे सोपस्कार पार पाडून, नेपथ्य-प्रकाशयोजना वगैरे प्रकारांना लागेल ती मदत करून, कपडेपट जमा करायला वाट्टेल तिथे तोडं वेंगाडून, प्रयोगाआधी दोन तासांपर्यंत स्टेज वर धडपड करून, तोंड रंगवून, नटराजाला मनोभावे नमस्कार करून मी स्टेजवर उभा राहायचो.
पडदा बाजूला व्हायचा. रंगमंचावरल्या फुटलाईट्सची धगधगती अग्निरेखा उजळली की, देवदत्त अधू दृष्टीमुळे मला प्रेक्षकांचे चेहरे कधीच दिसायचे नाहीत. जाणवायची ती फक्त भावना! “हा शहाणा आपल्यासमोर आता काय नाचणारे” पासून ते “काय बरं केलंय या गुणी पोरांनी आज?” इथपर्यंतचे सर्व भाव अक्षरशः जाणवायचे.
लेखकाचे उसने शब्द खांद्यावर घेऊन, त्या नाटकाचा प्रवास सुरू व्हायचा. प्रेक्षकातून हसणारा पहिला माणूस देवदुताप्रमाणे वाटायचा. शंभर वेळा आधी उच्चारलेली वाक्य, अत्ता पहिल्यांदाच बोलतोय अशा आविर्भावाने उच्चारताना आम्ही नट मंडळी आणि समोरचे प्रेक्षक एकमेकांत विरघळून एक अद्वैत होऊन जात असे. मिळणारी प्रत्येक दाद, उमटणारा एक एक सित्कार जणू शाबासकीसारखा, पाठीवर उमटायचा. नाटक रंगत जात असे.
कधी नटाच्या भूमिकेत तर कधी दिग्दर्शकाच्या भूमिकेत एवढाच फरक पडला. साचा तोच असायचा. एकाचे विचार, दुसर्याच्या तोंडून, तिसर्या पर्यंत प्रभावीपणे पोहचवणे.
कालौघात यथावकाश नाटक करणं बंद झालं. बरीच वर्ष सुषुम्नावस्थेत काढल्यावर हळूहळू काहीबाही लिहायला लागलो. काल अचानक जाणवलं, अरे माध्यम बदललं पण पद्धत तीच आहे. रंगमंचावरल्या फुटलाईट्सच्या अग्निरेखेची जागा, तुमच्या संगणकाच्या अथवा मोबाईलच्या पडद्याने घेतली आहे एवढंच.
माझ्या तुटपुंज्या अनुभवाच्या जोरावर, मोडक्या तोडक्या शब्दात, मी एक आभासी विश्व उभारायचा प्रयत्न करतोय आणि समोरून तुम्ही त्याच विविध भावनांनी वाचत आहात. एखादं वाक्य, एखादा अनुभव, कुठेतरी तुमच्या मनाला भिडतो. एखादा शब्द अचूक तुमच्या मर्मावर बोट ठेवतो. मग तुमच्याही नकळत तुम्ही आणि मी यांच एक अद्वैत बनून जातं.
कधी कधी नाही जमत भट्टी, नाटकाचा एखादा प्रयोग नाही का पडत? पण पुनश्च हरी ॐ म्हणून, जसे आम्ही तयारीला लागायचो, तसाच मी परत प्रयत्न करतो.
रंगमंचावर असो की त्याखाली उतरून वास्तव आयुष्यात असो, नाटक सुटत नाही हेच खरं !!
Image by Peggy und Marco Lachmann-Anke from Pixabay
- मूळ पुरुष- भाग २/२ - March 5, 2020
- मूळ पुरुष- भाग १/२ - March 3, 2020
- करकोचा आणि कादंबरी- प्रशांत पटवर्धन. - February 16, 2020