कॉफी डेट

महेश इराणी कॅफे मध्ये पोचला, समोर पाहून थबकला. त्याने रियाला फोन लावला

“रिया, तुझा प्लॅन होता हा सगळा?”

“हमम..बाबा..तू आजोबांशी प्लिज शांततेत बोल.मी पोचते आहे 20 मिनिटात.” महेश पुढचं काही बोलायच्या आत पलिकडून रियाने फोन कट पण केला. महेशने घसा खाकरला. तो एका टेबलवर जाऊन बसला, त्याच टेबलवर महेशचे बाबा म्हणजेच रियाचे आजोबा बसले होते.दोन मिनिट शांततेत गेली. कोणीच काही बोलेना म्हणून मग महेशचे वडील म्हणजेच विनायकराव यांनी आईस ब्रेक केला.

“ती तुझ्या आवडीची कॉफी मागवू?”

“हमम्म” महेशच मौन उत्तर..

विनायकरावानी कॉफीची ऑर्डर दिली.

“तुला आठवत तुझ्या लहानपणी आपण तिघे तू, मी,तुझी आई इथे यायचो खूपदा” विनायकराव.

“काहीच विसरलो नाहीये मी” महेश पहिल्यांदा 4 शब्द सलग बोलला.

“हे बघ महेश, मी इथे यावं ही रियाची इच्छा होती, मी तिची इच्छा मोडू शकत नाही म्हणून आलो”

“अच्छा म्हणजे तुमची इच्छा नव्हती तर…असो…माझी तरी नव्हती.तुम्ही रिया सोडल्यास सगळ्यांच्या इच्छा मोडल्या आहेत आणि त्याची आम्हाला सवय आहे” महेशचा चिडका स्वर-

“महेश, किती पटकन बोलून जातोस!!!! नाही पण आज बोल सगळ मनातलं…बोलून टाक…मला कळूच दे तुझ्या मनात माझ्याविषयी किती राग दडला आहे ते”

तेवढ्यात कॉफी आली, पुन्हा काही सेकंद शांततेत गेले.

“मलाही बोलायचंच आहे एकदा मनातल… लहानपणाासून बघतोय आबा.. तुमचं कर्मकांड, कर्मठपणा, तिकडे देवाची पूजा करायचात, तांब्याची भांडी जरा कुठे स्वच्छ दिसली नाहीत की फेकायचात, आईला ओरडायचात, आईच्या भावभावनांचा कधी विचार केला नाही तुम्ही.जन्मभर ती मनातून इच्छा मारत जगत राहिली.माझ्याबाबतीत देखील तेच, मी मोठा झालो, आईलाच सगळ्या गोष्टी सांगायचो कारण तुम्ही समजून घ्याल अशी कधी खात्री वाटली नाही.मी माझ्या आणि नंदिनीच्या प्रेमाविषयी बोललो घरी तर ती बाहेरच्या जातीतील म्हणून कडाडून विरोध केला तुम्ही, आमच्या लग्नाला नावापुरती हजेरी लावलीत. माझं जाऊद्या पण आईशी इतकं क्रूर वागुनही ती माझ्याबरोबर अमेरिकेला आली नाही.किती आग्रह केला मी….हे सगळ कमी होत म्हणून की काय तुम्ही मागच्यावर्षी तो निर्णय घेतला…”

महेशला सलग बोलून धाप लागली, विनायकरावानी त्याच्याजवळ पाण्याचा ग्लास सरकवला.

“बोल बाळा, सगळ बोलून टाक. मला तुझे हे सगळे आरोप मान्य आहेत, शेवटचा सोडल्यास” विनायकराव म्हणाले-

“मी स्पष्टीकरण मागितलं नाहीये आबा तुमच्याकडे” महेश रागात बोलला.

“स्पष्टीकरण मागितल नाहीस पण बापाला दोषी ठरवून मोकळा झालास.मला मान्य आहे रे मालतीच्या बाबतीत मी खूप निर्दयी होतो एकेकाळी. तिला तिचं आयुष्य तिच्या इच्छेप्रमाणे जगू दिल नाही मी एकेकाळी.पण आमच्या सरत्या काळात मला तिचं महत्त्व समजल होत, तुला विश्वास बसणार नाही पण मी तिला आराम मिळेल असं पहायचो. तू दुसऱ्या शहरात होतास म्हणून तुला कधी पत्ता पडला नाही याचा. आम्हाला एकमेकांची गरज जास्त होती तुझ्यापेक्षा म्हणून ती आली नाही रे तुझ्यासोबत अमेरिकेला आणि तू वेगळा अर्थ काढलास…. तुझ्याबाबतीत म्हणशील तर मी खूप अन्याय केला आहे तुझ्यावर हे अगदीच मान्य आहे मला आणि मी त्याच प्रायश्चित पण भोगल आहे” विनायकराव बोलत सुटले-

“कसलं प्रायश्चित??” महेशने विचारलं.

“तुझ्या आणि नंदिनिबद्दल तू तुझ्या आईला सांगितलस, मला नाही याचं मला खूप वाईट वाटलं”

“You deserve it. मी इथेच या कॅफे मध्ये बसूनच आईला सगळ सांगितलं..तुम्ही विरोध केलात , किती तमाशा केलात पण आज नंदिनीच सांभाळते आहे तुम्हाला, तिलाही कधी तिचे झालेले अपमान आठवत असतील याचा कधी विचार केला आहेत??”

“हो माहीत आहे तू तुझ्या आईला इथेच बसून सगळ सांगितलं. तुला कित्येकदा सिगारेट ओढताना देखील मी पाहिलं पण तुला ओरडण्याचा, तुझे कान पकडण्याचा अधिकार मी गमावून बसलो होतो याची जाणीव मला झाली होती. नंदीनीच्या अपमाना बद्दल बोलशील म्हणशील तर हो मला त्याचीही जाणीव आहे म्हणूनच रियाच्या जन्मानंतर माझ्यात किती बदल झाला हे तू पाहिलं असशील.” विनायकराव आता थांबत नव्हते.

“आबा, हे सगळ ठीक आहे पण मागच्या वर्षी आईला इच्छामरण देण्याचा एव्हढा मोठा निर्णय तुम्ही कसा काय घेतलात?? याबद्दल काही स्पष्टीकरण आहे तुमच्याकडे?? तिची खरचं तशी इच्छा होती!!! आम्ही भारतात येईपर्यंत तुम्ही निर्णयाची अंमबजावणी पण केलीत” महेशच्या डोळ्यात आत्ता पाणी होत.

“तिच्या इच्छेविरुद्ध मी हा निर्णय घेतला आहे असा तुझा गैरसमज झाला आणि तू त्या दिवसापासूनच माझ्याशी अबोला धरलास. अरे तुझ्यावरच प्रेम मी कधी व्यक्त करू शकलो नाही रे पण प्रेम नसत ते आज इतक्या वर्षांनंतरदेखील तुझ्या आवडीची कॉफी माझ्या लक्षात राहिली असती का रे??” विनायकराव आता रडु लागले, डोळे पुसत त्यांनी खिशातून एक चिठ्ठी काढली महेश समोर धरली-

“हे काय आहे?” महेश विचारता झाला.

“तुझ्या आईने मला लिहिलेली चिठ्ठी, ही मी तुला दाखवू नये अशी तिची इच्छा होती पण आज आपल नात टिकवायचं असेल तर हे करण भाग आहे”

महेशने ती चिठ्ठी उघडली. एकेक ओळ वाचू लागला तस त्याच्या डोळ्यात आनंद आणि आश्चर्य दोन्ही भाव दिसू लागले, एक क्षण असा आला की तो ओक्साबोकशी रडू लागला. विनायकराव त्याच्या पाठीवर हात फिरवत होते, आजूबाजूची सगळी लोकं यांच्यात नेमके काय चाललं आहे या नजरेने पाहत होती. त्या चिठ्ठीत ‘  वेळ आली तर मला इच्छामरण द्या आणि महेशला कधी अंतर देऊ नका व त्याला माझ्या या निर्णयाबद्दल कळू देऊ नका ‘ असं महेशच्या आईने लिहिलं होत-

“आबा, हे आधी का सांगितलं नाहीत?!!” महेश विचारता झाला.

“अजूनही सांगितलं नसत पण परवा माझ्या खोलीत या चिठ्ठीला कवटाळून रडत बसलो होतो, ते नेमके रियाने पाहिलं आणि तिला सगळ समजल. तिनेच मी तुला सांगावं याचा आग्रह धरला. घरात आपण एकमेकांशी एक शब्द बोलत नाही म्हणून मग तिनेच आज इथे आपल्या दोघांची गाठभेट घडवून आणण्याचा प्लॅन बनवला. त्यासाठी ती खोटं बोलली असेल रे पण तरीही तिला ओरडू नकोस प्लिज” विनायकराव म्हणाले-

महेशने डोळे पुसले,

“आबा, मला माफ करा, तुमच्याविषयी आयुष्यभर मनात गैरसमज ठेवून वावरलो. बापही माणूस असतो आणि त्यालाही चुका करण्याचा हक्क असतो हे मी विसरूनच गेलो होतो.”

महेशच्या आबांनी त्याला कधीच माफ केलं होत. इतक्यात तिकडून रिया आणि नंदिनी आल्या, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू ही कॉफी डेट सक्सेसफुल झाल्याचं सांगत होत.

Image by andreas N from Pixabay 

Bhagyashree Bhosekar

Bhagyashree Bhosekar

मुळची महाराष्टात जन्म घेऊन इथेच वाढलेली भाग्यश्री सध्या बंगलोर मध्ये आयटी क्षेत्रात नोकरी करते आणि विविध माध्यमात लिखाण पण करते. मराठी लेखनामुळे तिची मराठी मातीशी असलेली नाळ तुटलेली नाही. लिखाणातून तिचा मराठी भाषेशी जोडलेली राहण्याचा प्रयत्न असतो. भाग्यश्रीला लघु कथा, दीर्घकथा लिहायला विशेष आवडतात. आत्तापर्यंत तिने दोन shortfilms साठी पटकथा लिहिली आहे. शिवाय 2017 साली तिचं बॉम्बे बिट्स नावाचं मराठी पुस्तक प्रकाशित झालं आहे. याव्यतिरिक्त अवांतर वाचन हा तिचा छंद आहे.

2 thoughts on “कॉफी डेट

  • June 20, 2019 at 4:48 am
    Permalink

    lapalele satya
    masta katha

    Reply
  • July 28, 2019 at 12:08 pm
    Permalink

    फार वेगळी कॉफी डेट होती ही. 🙏

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!