त्याचा युनिफॉर्म
“तारा, इकडे ये ग, सही कर यावर”
मी हात पुसत गेले, कागदपत्र चाळली तर टर्म इन्श्युरांसची कागदपत्र होती ती.मी पुन्हा त्याच्याकडे
“कशासाठी!!!” असे हावभाव देत त्रासिक नजरेने पाहिल.त्यावर
“तुला माहितीये, कशासाठी ते, चल पटकन साईन कर, मग आपण तनयला गिफ्ट आणायला जाऊ”
तीन महिन्यांपूर्वीचा संवाद.मी जास्त वाद न घालता साईन केली. दरवेळी आला की त्याची काम ठरलेली.कसली कसली पॉलिसी बघणे, इन्शुरन्स काढणे, कुठल्या पॉलिसी म्याच्युर्ड झाल्या बघणे.एरवी बँकेची काम मी करायचे पण तो आला की मात्र जातीने लक्ष घालून तो करायचा.नंतर माई अण्णा यांची गोळ्या औषधं बघणे, त्यांच्या डॉक्टरांची भेट घेऊन येणे, एकदा तरी अण्णांशी वाढलेल्या शुगर बद्दल वाद घालणे. तनयच्या शिक्षकांची गाठ घेऊन येणे.
यावेळी तर तनयचा वाढदिवस.तनयचा वाढदिवस म्हणजे आमच्या घरातला जणू सणच. एकतर त्याचा वाढदिवस साजरा करायला त्याचे बाबा त्याच्यासोबत असण हेच खूप आनंदाच. तनयचा वाढदिवस तर मस्त झालाच पण त्यानंतर दोनच दिवसांनी आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला तनयच्या बाबांनी चक्क कँडल लाईट डिनर प्लॅन केलं होत.कित्येक दिवसांनी इतके निवांत क्षण अनुभवले.केक कापताना तो म्हणे-
“अजून एक वर्ष पार केलं आपण संसाराच… तर ऑफिशियली वनवास भोगल्याच तू सांगू शकशिल”
मी त्याच्या मिठीत जात म्हणाले की-
“वनवास काय रे!! पण तुझ्या यावेळेच्या सुट्टीत मला लॉट्रीच लागली की, चक्क 15 दिवस सुट्टी, एक ट्रिप, तनयचा वाढदिवस आणि आज चक्क हे डिनर.तुला आठवतय आपण हे असं इतकं निवांत कधी साजर केलं होत का?”
“ह्म्म…मला मान्य आहे हे…. पण देशासाठीची ड्युटी सगळ्यात महत्वाची नाही का?”
“तक्रार नाहीच रे, पुढच्या आठवड्यात तू निघशिल, मी, तनय, माई, अण्णा आम्ही सारे आमची लढाई लढू, तू तुझी लढाई लढशिल”
तो हसला फक्त. पुढच्या आठवड्यात ठरल्याप्रमाणे निघाला. तनय यावेळी बाय म्हणताना चक्क रडला नाही उलट “बाबा, I am 12 years old big boy now,” चक्क अस म्हणाला.माई अण्णांनी डोळ्यातलं पाणी लपवल.मला तर चक्क सवय झाली होती याची.पुढचा महिनाभर आमचे नित्यनेमाने फोनही व्हायचे.मग पुढे फोन जरा विरळ होत गेले, कारण सीमेवर काही emergency होती. आणि एक दिवस तोच आला, पण राष्ट्रध्वजात गुंडाळून.त्यासोबत त्याच्या काही गोष्टी आणि युनिफॉर्म.मानवंदना दिली जात होती, बंदुकांच्या फैऱ्यांचे आवाज गगनाला भिडत होते, माझ्या आजूबाजूला प्रचंड कोलाहल होता. त्याचं शेवटचं दर्शन घेताना मला त्यानेच म्हणलेल वाक्य आठवत
“आम्ही सैनिक सामान्य माणसं म्हणूनच जन्म घेतो, पण आमचं ट्रेनिंग झाल्यावर आमचं एका वेड्या माणसात रूपांतर होत.हे वेडेपण आपल्याला जपायच आहे, पुढच्या पिढीत न्यायचं आहे”
या गोष्टीला आता महिनाभर उलटुन गेलाय.त्याच्या इन्शुरन्सचे पैसे आले, सरकारकडून काही पैसे येताहेत, निधिंमधून पैसे येणं सुरू आहे.शिवाय त्याने तनयच्या शिक्षणाची पूर्ण तजवीज करून ठेवली होती.पैश्यांची काळजी नाही, तो अख्खा माणूस आपल्यासमोर नसून भिंतीवरच्या फोटोत आहे हे स्वीकारणं अवघड जातंय.माईंच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही, त्या प्रचंड हळ्व्या झाल्या आहेत.सुई टोचली तरी धाय मोकलून रडायला कारण पुरत.अण्णांनी मौनव्रत धारण केलं आहे.मी आणि तनय एकमेकांना नजर देत नाही.
त्याच्या सगळ्या वस्तू नि युनिफॉर्म मी जपून ठेवलं आहे.त्या युनिफॉर्म मध्ये त्याच्या घामाचा वास आहे.माझ्यासाठी तो फक्त वास नसून दरवळ आहे.त्याच्या आठवणींचा दरवळ.बऱ्याचदा तो युनिफॉर्म छातीशी कवटाळून मी रडते, झोपी जाते.तेवढेच दोन क्षण तो परत आल्याचा मला भास होतो.
परवा तो युनिफॉर्म हातात धरून तनय आकाशाकडे नजर लावून काहीतरी विचार करत होता.मला ते पाहिल्यानंतर गलबलल.तरीही धीर करून मी तनयला विचारल-
“काय विचार करतो आहेस बाळा?”
“मम्मी मी मोठा होऊन बाबांसारखा देशाची सेवा करणार”
मला धस्स झालं, पण एका सैनिक पत्नीला असे असंख्य धक्के पचवायचे उशा:प असतात.दिवस अन् दिवस सरतात, मला त्याच्या युनिफॉर्म मधून रोज जाणवतो एका सैनिकाच्या कर्तव्याचा, एका मुलाच्या, एका बापाच्या , एका नवऱ्याच्या कर्तव्याचा दरवळ.तो सोबत आहे आमच्या या दरवळाच्या साथीने.
Image by andreas N from Pixabay
- सासूबाई will you be my valentine?- भाग्यश्री भोसेकर - February 23, 2020
- तुमचं आमचं प्रत्येक वेळी सेम नसत- भाग्यश्री भोसेकर - February 20, 2020
- गोष्टी लेखकांच्या –गौरी शिंदे - November 13, 2019
Too Good!!!
खूप खूप आभार 😊
खूपच छान लिहिली आहे कथा.. लेखकांचे अभिनंदन
खूप आभार 😀 वेळ मिळाल्यास पुढच्या कथाही जरूर वाचा 😊
All stories are really very nice 👌👌👌👌
Wah tumhi saglya stories wachlya he aikun khup aanand zala 😀😀
छान
दरवळ मग तो असाही असू शकतो हीच खूप वेगळी गोष्ट आहे. 🙏