बेसनाचा लाडू

गाडी सोसायटीमध्ये शिरली , नि बी ब्लॉक जवळ थांबली. गणेशने दार उघडलं, गार्गी त्या गाडीतून उतरली तसा गणेश म्हणाला-

“मॅडम, बरं झालं तुमची ट्रीटमेंट संपली, आता आराम करा”

गार्गी हसली, तिने विचार करून गणेशकडे पुन्हा एकवार पाहिलं आणि काहीच न बोलता लिफ्टकडे वळली.गणेशला आश्चर्य वाटलं कारण जेव्हा जेव्हा तो गार्गीला मॅडम म्हणायचा तेव्हा तेव्हा गार्गी त्याला हटकून म्हणायची

” मॅडम नको रे ताई म्हण, राखी बांधते ना रे मी तुला?”

पण यावेळी गार्गी काहीच बोलली नाही.

मागून बॅग घेऊन अमोल आला.अमोल, गार्गी लिफ्टमधून बाराव्या मजल्यावर स्वतःच्या घरी आले.दरवाजा उघडताच आर्य गार्गीला बिलगला आणि स्वतः बनवलेलं ग्रीटिंग गार्गीच्या हातात  देत म्हणाला-

“Welcome home आई ” गार्गीच्या डोळ्यात पाणी आल, तिने आर्यला घट्ट जवळ घेतलं.अमोल तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला

“लगेच कामाला लागू नकोस, आता तू आरामच करायचा” ती यावर हलकेच हसली आणि आत निघून गेली.गेले काही दिवस अमोलला तिच्या वागण्यात विक्षिप्त बदल जाणवू लागले होते पण ट्रीटमेंटमुळे असेल कदाचित असं त्याला वाटायचं.

वर्षभरापू्वी गार्गीला कॅन्सर डीटेकट झाला आणि अमोल गार्गीच्या बारा वर्षांच्या सुखी संसाराला ह्या संकटाच गालबोट लागलं.पण यातून सावरून त्यांनी लगेच ट्रीटमेंटला सुरुवात केली आणि सुदैवाने काही महिन्यांतच त्यांच्या मेहनतीला यशदेखील आल. नुकतीच गार्गी पूर्ण बरी झाली होती.आता तिने पूर्वीसारखं काम केलं तरी चालेल असं तिचे डॉक्टर स्वतः म्हणाले होते.पुन्हा अमोल गार्गीच्या संसारात आनंद पसरला.पण गार्गीच्या वागण्यात इतका फरक का पडला आहे हे अमोलला समजत नव्हतं. होईल काही दिवसात तिचं वागणं नीट असा विचार करून तो त्याकडे दुर्लक्ष देखील करत होता.

काही दिवस आराम केल्यानंतर एक दिवस सकाळी

गार्गी अचानक तयार होत होती. अमोलनी तिला विचारलं

“हे काय कुठे निघालीस?”

” आम्हा मैत्रिणींच get together आहे ”

“अरे वाह, मी गणेशला सांगतो तो तुला सोडेल, घ्यायला पण येईल”

“नको, माझी मी जाईन”

“अग असं काय करतेस?? तुला दगदग होईल म्हणून म्हणतोय ”

“मी आता पूर्ण बरी झाली आहे अमोल, माझं मला जाऊदे प्लिज”

इतकं म्हणून गार्गी घराबाहेर पडली सुद्धा. अमोल बघतच राहिला, पण त्याने नंतरही यावरून वाद घातला नाही.

आजची सकाळ प्रसन्न होती, कितीतरी दिवसांनी गार्गी आज खूप फ्रेश वाटतं होती. आर्य शाळेत गेला असल्याने घरात फक्त अमोल आणि गार्गीच होते.अमोलने संधीचा फायदा घेत गार्गीला जवळ ओढल, तिने आढेवेढे घेतले मग मात्र तिने कमालच केली तिने अमोलला चक्क दूर ढकलल, तेही खूप जोरात.गार्गीच हे रूप अमोलसाठी खूपच नवीन होत.मग मात्र अमोल आवरून ऑफिसला निघून गेला.

तो निघून गेल्यावर गार्गीने पूर्ण घरभर फिरून पाहिल, थोडा वेळ सोफ्यावर बसली, पडद्यांवरून हात फिरवला, किचनमधल एकेक भांड न्याहाळल.ती खोलवर काहीतरी विचार करत होती. मग तिने तिचा स्पेशल बेसन लाडू बनवायला घेतला. तूप विरघळल आणि बेसनाचा खमंग दरवळ सगळीकडे पसरला.त्या दरवळसोबत तिच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या.अमोल आणि तिचा प्रेमविवाह. दोन्ही घरी फारसा विरोध नाही आणि त्यांनी लग्न केलं. गार्गीला स्वयंपाकाची खूपच आवड, त्यातही तिच्या हातचे लाडू खायचे म्हणले की अमोल खूप खुश होऊन जायचा.

“तोंडात विरघळणार सुख आहे हे सुख ” असं लाडू खाताना अमोल म्हणायचाच. नवीन नवीन लग्न, नव्याची नवलाई संपून गेली पण अमोलच गार्गीच्या हातच्या बेसनाच्या लाडू वरच प्रेम मात्र तसच राहिलं आणि आता आईच्या हातचे लाडू हा आर्यचा देखील विक पॉइंट होता . लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला, नंतर आर्यच्या वेळी बातमी समजली तेव्हा, आर्यने पहिलं पाऊल टाकलं तेव्हा, आर्यचा शाळेचा पहिला दिवस या आणि अशा कितीतरी आनंदाच्या प्रसंगी न चुकता गार्गीच्या हातच्या बेसनाच्या लाडवांची हजेरी असायचीच.किती नि काय काय नव्याने आठवावे!!!! आता कढईत बेसनाच्या खमंग पिठासोबत साखर हळूहळू विरघळत होती आणि गार्गीच्या मनात गोड आठवणी.

आता गार्गीने लाडू वळायला घेतले, हाताला तूप लावलं, गरमगरम चटके बसत असूनही आता याची गार्गीला इतकी सवय झाली होती की ती तिच्या विचारांमध्ये पटापट लाडू हातावेगळे करत होती.तिला तिच्या बहिणीचं एक वाक्य आठवलं,

” पुरुषाला संसारात असच बांधून ठेवावं लागतं. वेळ चुकली की लाडू वळले जात नाहीत तसाच आपला संसारही. ”  गार्गीने एक सुस्कारा सोडला.आता तिने लाडवांवरून शेवटचा हात फिरवला, तिने सगळ्या लाडूना बेदाणे, काजू टोचले. मग तिने हात धुतला, बाहेर फॅन लावून सोफ्यावर 5 मिनिट शांत बसून राहिली. मग मात्र ती निर्धार केल्यासारखी उठली, कागद पेन हातात घेऊन, स्टडीमधल्या टेबलवर जाऊन बसली.तिने पत्र लिहायला घेतलं-

अमोल,

तुला प्रिय म्हणावं असं आपल नात राहील नाही.गेले बरेच दिवस तू माझ्या बदललेल्या वागण्याविषयी विचार करत असशील, सरळ मुद्द्यावर येते. तुझे आणि तुझ्या ऑफिसमधल्या रश्मीचे संबंध आहेत हे मला समजल आहे . मला हे समजल देखील नसतं जर एक दिवस माझी treatment लवकर संपली नसती आणि मी तुला सरप्राइज द्यायला घरी अचानक आले नसते तर. त्या दिवशी मी तुला आणि रश्मीला आपल्या (सॉरी आता ते आपलं राहिलं नाही) बेडरूम मध्ये एकत्र पाहिलं. खाली गणेश गाडीत झोपला होता म्हणजे तोच तुम्हा दोघांना घरी घेऊन आला होता नि त्याला सगळ माहीत होत.असो.हे सगळ 3 महिन्यांपूर्वीच समजूनही मी का थांबले? तर मी पूर्ण बरी झाली आहे याची खात्री करून घेण्यासाठी. मागच्या महिन्यात डॉक्टर तस खात्री लायकरित्या म्हणाले आणि मी दुसर घर शोधायला सुरुवात केली. मी मैत्रिणींच्या गेट टुगेदरला जात नव्हते तर घर शोधत होते.तुझ्या आई बाबांना मी आपला संसार का सोडते आहे याविषयी पूर्ण कल्पना दिली आहे, त्यांना उत्तर द्यायला मी बांधील समजते. मी नवीन घरात मुव्ह होतेय, एखाद आठवड्यात डिव्होर्स नोटीस पाठवेन, साईन करण्याचं सहकार्य कर. तुझ्याकडून पोटगी वगैरे मागून मला तुझ्या उपकरावर जगायचं नाही.हे घर इतके दिवस आपल्या दोघांच्या नावावर होत, आता ते तुझ होईल.

जमल तर एक कर, आर्यचा ताबा मागू नकोस (तो मी तुला मिळू देणार नाही)आणि मला सहानुभूती, कळवळा वगैरे दाखवून आर्थिक मदत वगैरे करायला येऊ नकोस..अपमान होईल. मी माझ्या माहेरच्या लोकांची मदत घेणार नाहीये तू तर परका आहेस.

आणि हो तुझ्या आवडीचे बेसन लाडू बनवून ठेवले आहे. इतके दिवस केवळ प्रेमाने लाडू बनवले तुझ्यासाठी आज त्यात माझा स्वाभिमान घातला. तुझी नि माझी स्वतंत्र अशी नवीन सुरुवात होऊ पाहत आहे, आणि हा आनंद आपण  सेलिब्रेट करायला हवा.

तुझ अभिनंदन, रश्मीला शुभेच्छा,

कधी काळी तुझी असलेली,

गार्गी…

आणि मग गार्गीने आर्यसोबत ते घर सोडलं. नवीन आयुष्याला, सोबतच लाडवांच्या बिझनेसला सुरुवात केली.आज काही वर्षांनी उत्कृष्ट उद्योजिका म्हणून तिचं नाव घेतलं जात तेव्हा तिच्या कर्तृत्वाचा , स्वाभिमानाचा दरवळ तिला जाणवतो.

Image by andreas N from Pixabay 

Bhagyashree Bhosekar

Bhagyashree Bhosekar

मुळची महाराष्टात जन्म घेऊन इथेच वाढलेली भाग्यश्री सध्या बंगलोर मध्ये आयटी क्षेत्रात नोकरी करते आणि विविध माध्यमात लिखाण पण करते. मराठी लेखनामुळे तिची मराठी मातीशी असलेली नाळ तुटलेली नाही. लिखाणातून तिचा मराठी भाषेशी जोडलेली राहण्याचा प्रयत्न असतो. भाग्यश्रीला लघु कथा, दीर्घकथा लिहायला विशेष आवडतात. आत्तापर्यंत तिने दोन shortfilms साठी पटकथा लिहिली आहे. शिवाय 2017 साली तिचं बॉम्बे बिट्स नावाचं मराठी पुस्तक प्रकाशित झालं आहे. याव्यतिरिक्त अवांतर वाचन हा तिचा छंद आहे.

3 thoughts on “बेसनाचा लाडू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!