भीती….
‘मी कुणाच्या बापाला भीत नाही.
तुझ्या तर बिलकूलच नाही.
काय करायचं ते करून घे.
हा मी असा आहे.
पटत असेल तर रहा नाहीतर दरवाजा ऊघडा आहे…’
‘बास झालं.
रोजचाच झालाय तुझा हा मेलोड्रामा.
तुझ्या डोळ्यातून वाहणारा तो खारट समुद्र.
साफ खोटा आहे.
बेचव जिंदगीसारखा.
तुझं माझ्यावरचं प्रेम तरी खरं आहे की तेही खोटंच ?
तू ही तशीच.
सख्ख्या भावापेक्षा जवळचा होता तो.
विश्वासाने त्याला पार्टनर करून घेतला.
त्यानेच बुडवला मला.
खोटारडा.
सगळं जग खोटारडं आहे.
तूही आणि तुझा बापही…’
‘तुझा बाप.
बाप म्हणवण्याची लायकी आहे का साल्याची ?
बापाचं काळीज समजत नाही का तुला थेरड्या ?
म्हणे , मला माझ्या लेकीची काळजी आहे..
माय फूट.
माझ्या परीला, माझ्या लेकीला माझ्यापासून तोडलंस.
स्वतःच्या घरी घेऊन गेलास.
जीव तुटतोय माझा इथे..’
रात्रीचे नऊ वाजले की फ्लॅट नं. नऊ मधनं हेच कानावर यायचं.
रोजचच झालंय हे.
सोसायटीवालेही कंटाळलेत या सगळ्याला.
माणूस चांगला होता.
चांगला पगार, चांगली नोकरी.
नोकरी सोडून धंद्याच्या वाटेला गेला.
पार्टनरने बुडवला.
त्याने स्वतःला दारूत बुडवला.
नशीब..
नशेत असला तरी बायकोवर हात नाही ऊगारला कधी.
ती..
सगळं करून झालं.
प्रेमाने समजावलं.
भांडण करून झालं.
देणी चुकवण्यासाठी दागिन्यांचा बळी.
बाकी शून्य.
नशीब.
डोक्यावरचं छप्पर तरी स्वतःचं आहे.
त्याच्या मनाने ऊभारी घेतलीच नाही कधी.
दोन चार दिवस तिचं मनसोक्त रडून झालं.
पदरात चार वर्षाची पोर.
मनाचा दगड केला.
स्वतःच्या आईवडिलांकडे ठेवली तिला.
कुठली तरी प्रीप्रायमरी स्कूल.
दिवसभर तिथे राब राब राबते.
संध्याकाळी निमूट ग्लास भरून ठेवते त्याच्यापुढे.
ईलाज नाही.
मधे एकदा पिऊन घरी येताना गाडीवरनं पडला.
खूप दिवस पुरलं ते दुखणं.
काय प्यायचं ते इथंच पी.
ती तरी काय करील बिचारी..?
कोण आहे तो ?
तुम्हाला माहित नाही ना.
बरंय.
खर सांगू ?
मीच आहे तो.
हो मीच.
सगळं हारलोय मी.
माझ्यातला काॅन्फीडन्सच मेलाय.
आणि मीही.
सकाळी ऊठलो की..
पहिल्यांदा ठरवतो.
अगदी मनापासून.
कुछ नही बिगडा.
नव्याने सुरवात करू.
थोडा वेळ लागेल.
हळूहळू गाडी रूळावर येईल.
मी घरातून बाहेर पडतोही.
सप्लायरकडे जाणार असतो.
रिक्वेस्ट करणार असतो.
थोडी साईड द्या.
तुमचा एकही पैसा बुडवणार नाही.
हिम्मतच होत नाही.
वाटतं,
सप्लायर मला दारात सुद्धा ऊभा करणार नाही.
दिवसभर नुस्ता भटकतो.
रात्र झाली की घरी.
दारूच्या ग्लासात जगबुडी.
शुद्धीत आहे म्हणून सांगतो.
बायकोनं काय नाही केलं आपल्यासाठी.. ?
दिवसभर राबते.
आणि मला पोसते.
मी हा असा.
बायको,चुकून सुद्धा वटसावित्रीचं व्रत करू नकोस.
असला नवरा पोसण्यापेक्षा..
खरं बोललात.
मरूनच जायला हवंय मी.
ते सुद्धा जमत नाही हो मला.
किती तरी वेळा टेरेसवर गेलोय.
डोळे मिटले की बायको दिसते.
लेकीचा चेहरा डोळ्यासमोर येतो.
लटपटत्या पावलांनी तसाच परत येतो.
सकाळचे नऊ वाजलेत.
बायको तिच्या स्कूलमधे.
होय.
आज सकाळी सकाळीच.
हिमतीचं टाॅनीक ढोसतोय.
आज फायनल.
साली लिफ्ट पण माझ्यासारखी लटपटतेय.
कसाबसा पोचलो टेरेसवर.
आज डोळे मिटलेच नाहीत.
एकदम शेवटीच मिटायचे आता.
पाय पॅरॅफीट वाॅल चढलेत.
नजर ढगात.
हिम्मते मर्दा…
दात ओठ खावून ऊडी.
खाली नाही.
गच्चीतच पडलोय.
एक बांगडी हात.
त्यानं सर्रकन मागे खेचलं.
मी तर्र डोळ्यांनी मागे बघितलं.
मिसेस प्रधान.
पापड वाळवायला गच्चीत आलेल्या.
फ्लॅट नं.2, ग्राऊंड फ्लोअर.
मिस्टर प्रधान शिपवर असतात.
काय करताय हे ?
पळून जाताय ?
तुम्ही तर फारच लेचेपेचे निघालात.
कशाला पुरूष म्हणवता स्वतःला ?
तुमची बायको खरी हिमतीची.
जीव देतोय म्हणे.
माझा ईगो जागा झाला.
‘मी हरलेलो नाहीये.
नशीब गां× आहे सालं…’
चॅलेंज.
हिंमत असेल तर हो म्हणा.
मी लाख रूपये देते तुम्हाला.
लोन.
दहा टक्के व्याज घेईन.
आधीचं विसरून नवी सुरवात करा.
एका सप्लायरचा पत्ता देते.
मिस्टर प्रधानांचा मावसभाऊ आहे.
मिनिमम रेटने सप्लाय देईल.
आहे हिंमत हो म्हणायची ?
हो म्हणालात तर इथंच थांबा.
पाच मिनटात पैसे आणून देते.
पैसे बुडाले तर..
पुन्हा इथेच या.
जोर लगा के हैया.
हिंमत कमी पडली तर मीच धक्का देईन.
कुठल्या धुंदीत ?
मी हो म्हणलं.
दहा मिनटात पैसे पोचले.
सप्लायरच्या पत्त्यासकट.
नशा चढलेली.
दारूची नाही.
शून्यातून सुरवात करण्याची.
त्या सप्लायरला गाठला.
देवमाणूस.
मिनीमम रेटमधे माल दिला.
चार युक्तीच्या गोष्टी सांगितल्या.
काही अडचण आली तर कधीही हाक मार म्हणाला..
दारू सुटली.
आयुष्याची नशा चढलेली.
हळूहळू शिकत गेलो.
त्या सप्लायरची फार मदत झाली.
चार पैसे सुटू लागले.
वर्ष झालंय.
बर्यापैकी जम बसलाय.
दोन पोरं कामाला आहेत.
बायको खूष.
माझी पोरगी माझ्या घरी परत..
सासर्याचे पाय धरून माफी मागितली.
बापपणाची जबाबदारी ओळखायला शिकलोय.
आज परीचा वाढदिवस.
दणक्यात सेलीब्रेट करणार.
मिसेस प्रधानांचे लाख रूपये + दहा टक्के व्याज.
बायकोला नवीन पैठणी.
परीला ड्रेस.
भलामोठ्ठा केक बुकलाय.
दुपारीच घरी आलो.
बायकोला म्हणलं, लवकर तयार हो.
मिसेस प्रधानांकडे जाऊ यात.
बर्थ डे पार्टीला त्यांनाही बोलवायचंय.
आजचा दिवस केवळ त्यांच्यामुळे दिसतोय.
तिला लाख रूपयांची गोष्ट सांगितली.
बायको शाॅक्ड.
तो दिवस.
कसा विसरेन मी ?
त्या दिवशी तर पुनर्जन्म झाला माझा.
मिस्टर प्रधानांचं काही तरी अफेअर होतं म्हणे.
कुणीतरी दुसरीच.
दिल्लीला फ्लॅटसुद्धा घेऊन दिला होता तिला.
एक दिवस फोन केला त्यांनी त्यांच्या बायकोला.
‘मला तुझी गरज नाही.
मला विसरून जा..
महिन्याच्या महिन्याला पैसे पाठवत जाईन.’
फार मानी बाई होती मिसेस प्रधान.
सहन नाही झालं त्यांना हे.
एक दिवस सक्काळी.
सव्वानऊ वाजता.
टेरेसवरून खाली ऊडी मारली त्यांनी.
दीड वर्ष होऊन गेलंय त्याला.
मला कसं कळणार ?
शुद्धीत नसायचोच तेव्हा मी.
कसं शक्य आहे ?
ती लाखमोलाची मदत.
जीव वाचवणारा तो हात.
मी घामाघूम.
डोकं भणभणतंय.
दारूनं सुद्धा एवढी झिंग आली नव्हती मला.
आज पुन्हा दारू प्यावीशी वाटत्येय.
एकदम मिसेस प्रधानांचा चेहरा डोळ्यासमोर आला.
मी जाम घाबरलो.
इच्छाच मेली.
मेलेल्या जीवाच्या पुण्याईवर मी जगतोय.
दारूपासून लांबचलांब पळतो आता.
भीती वाटते दारूची.
आणि त्या चेहर्याचीही.
मी सुधारलोय बहुतेक..
नक्कीच.
कौस्तुभ केळकर नगरवाला
Image by Brigitte Werner from Pixabay
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)
- घरघर….. - October 4, 2021
- ‘स्कूल चले हम ! - September 22, 2021
- चष्मा - July 12, 2021
भयकथा लिहिण्यात मानलं तुम्हाला… शेवटपर्यंत कळताच नाही आणि climax आला. की एकदम कहानी मे twist
धन्यवाद
Great 👌👌👌👌
छान जमली कथा
baap re!!! massst! shocking end!!1
उफ शेवट वाचून हललो ना राव