कॉर्बेटकथा…
ही कथा आम्हाला कॉर्बेटमधे वाघ दिसला, त्याने आमच्याकडे एक नजर टाकली, कसा रुबाबदारपणे तो आमच्या समोरून चालत गेला, मग आम्ही त्याचे झकास फोटो कसे टिपले याची नाही, तर या वाघोबाने आम्हाला कसा मस्त झाँसा दिला, अजिबातच भाव दिला नाही आणि सगळ्यात शेवटी आम्हाला एक वेगळंच सरप्राइज कसं मिळालं याची आहे.
कुठल्याही जंगलात किंवा वाइल्डलाइफ रिझर्वमधे आत जाताना सगळ्यात जास्त उत्सुकता कश्याची असेल तर ते वाघाच्या म्हणजे जंगलाच्या राजाच्या दर्शनाची. एक पक्क सांगू शकते, जंगलात गाडी शिरली रे शिरली की जिप्सीमधल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात फक्त एकच विचार येत असतो, तो म्हणजे, तो (वाघ) सर्वात पहिल्यांदा मलाच दिसणार आणि मी तो इतरांना दाखवणार. अनेक वळणांवर, पाणथळ जागांवर, अरुंद रस्त्यावरुन जात असताना मनात हेच येत रहातं, “अरे हा काय दिसला! पानांची सळसळ होते आहे, म्हणजे इथेच असणार. सगळीकडे शांतता आहे म्हणजे आता डरकाळी ऐकू येणार!” खरंतर हे साहेब सर्वात आधी फक्त गाईड लोकांना दिसतात. पण असतात आपल्या एकेक भाबड्या आशा! जंगल हुशार असतं. इतक्या सहजासहजी ते आपलं स्वप्न पूर्ण करणार नसतं.
कॉर्बेट मुळातच प्रचंड मोठं जंगल आहे, खरंतर भारतातलंच ते सर्वात अभयारण्य आहे. उत्तरखंड जेव्हा उत्तरप्रदेश मधून वेगळा झाला तेव्हा जंगलाचा काही भाग उत्तरप्रदेशकडेही गेला. इतर छोट्या जंगलांप्रमाणे (ताडोबा, कान्हा) कॉर्बेटमधे वाघ दिसण्याची शक्यता बरीच कमी असते असं म्हणतात. नशीबवान असाल तर प्रत्येक सफारीत एखादा वाघ दिसतो, नशीब जोरावर नसेल तर अजिबात दिसत नाही. आमची दोन्ही मुलं कान्हा, गीर, ताडोबा कधीची फिरून आलेली असल्याने, “आईबाबा, तुम्ही आजपर्यंत एकदाही वाघाला बघितलं नाहीये?? असे आश्चर्यमिश्रित सूर काढत आमच्याकडे ‘गरीब बापडे बिचारे’ असेच कटाक्ष टाकत होती. त्यामुळे या महाराजांनी किमान एकदा तरी आम्हाला दिसावं अशी सुप्त इच्छा मनात होतीच.
कॉर्बेटच्या जंगलात शिरल्याशिरल्या सर्वात पहिलं काय जाणवलं असेल तर तिथली नीरव शांतता. शहरात राहून राहून आपले डोळे, कान, सगळी इंद्रीयं आणि मन इतकं प्रदूषित झालेली असतात, की इतकं नैसर्गिक, इतकं अस्सल काही अस्तित्वात देखील असेल अशी आशा आपण जवळजवळ सोडून दिलेली असते. एकेका टप्प्यावर बिनघोर चरणारी हरणं, नाचणारे मोर, सावलीत निवांत पहुडलेले सांबर, रस्त्यावर बागडणाऱ्या टीटव्या, त्यांची पायात येणारी पिल्लं, फक्त त्याच्या चोचीच्या आवाजाने “मी आहे” असं सांगणारा सुतारपक्षी, जंगलात आपल्याला बघायला आलेल्यांची, फोटो घ्यायला आलेल्यांची जराही दखल न घेता पाण्यात खेळणारे भले मोठे हत्ती आपल्याला दिसत रहातात आणि आपण हळूहळू त्या जंगलाचा, निसर्गाचा एक भाग होत जातो. माझ्या मते, हे अतिशय महत्वाचं आहे की तो जंगलाचा राजा दिसो न दिसो, या संपूर्ण सफरीची मजा घेता आली पाहिजे. जंगलाशी बोलता आले पाहिजे. तिथल्या सूक्ष्म गोष्टी पंचेंद्रियांनी टिपता आल्या पाहिजेत. The journey should be enjoyable and not just the race towards destination.
आमची सफर सुरु असतानाच एका क्षणात शांत असलेलं जंगल, आमच्या गाईडचं बोलणं, ड्रायव्हरचं गाडी चालवणं सगळं काही बदललं. हीच ती वेळ, हाच तो क्षण होता ! ड्रायव्हरने भूतों न भविष्यति अशी जोरात आमची गाडी हाकली. आम्ही मनात म्हणत होतोच, ‘अपना टाइम आएगा’ तो आता बहुदा आला होता. गाडी थांबली आणि आम्हाला दिसले ते पाणी पिऊन सावकाश चालत झुडूपात अदृश्य होणारे वाघराजे. साहेब बरेच मळलेले होते. कुठे लोळून आले होते काय माहीत ! दहा सेकंदच असेल, पण अखेर आम्हाला वाघ दिसला होता. त्यानंतर मात्र तो जो झुडूपात गायब झाला तो काही केल्या बाहेर येईना. एक जिप्सी त्याच्या रस्त्यात मागे आणि दोन पुढे अश्या उभ्या केल्या होत्या. आमची आशा अजून कायम होती. पंधराएक मिनिटं झाली पण पठ्ठ्या नाही म्हणजे नाही बाहेर आला. ब्रह्मे मजेत म्हणाले सुद्धा, “एखादा चिकन लेग पीस भिरकवा रे, येईल कदाचित येईल बाहेर.” पण राजाची स्वतःची मर्जी असते. आम्हाला फूल टू झाँसा देऊन “बसा लेको वाट बघत” असं म्हणत स्वतः चोरवाटेने निवांत कुठल्यातरी दुसऱ्या ठिकाणी मळायला गेला असणार.
“थोडा वेळ का होईना, दिसला बाबा एकदाचा” म्हणत आम्ही परत निघालो. संध्याकाळचं किर्र जंगल जास्त सुंदर भासतं असं मला वाटतं. संधीप्रकाशात अजून काहीतरी प्राणी, पक्षी जंगलात दिसतील ही आशा मन सोडत नाही. पण फार काही न दिसता आम्ही हॉटेलकडे निघालो. तसा उशीर झाला होता. अंधार पडत चालला होता. रस्त्यात वाघाचीच चर्चा सुरु होती. दोन्ही मुलं “एकदा वाघ शिकार करताना दिसायला पाहिजे यार” असं काहीसं बोलत होती. तेवढ्यात आमच्या जिप्सी कचकन थांबली. गाडीच्या बरोबर समोर रस्त्यावर चक्क दोन कोल्ह्याची पिल्लं खेळत होती. हे म्हणजे सरप्राइज ऑफ द डे होतं. दोन संपूर्ण मिनिट ती (आमच्या लेकीच्या भाषेत गोंडस, मला ती फार बदमाश वाटतात!) पिल्लं खेळली आणि झटकन बाजूच्या झुडुपात गायब झाली.
हे म्हणजे जबरदस्त सरप्राइज होतं आमच्याकरता! जंगलात जे दिसलं नाही ते चक्क रस्त्यावर दिसलं. आमच्या मुलांच्या बकेट लिस्ट वर कधीचा असलेला कोल्हा टिक झाला होता, आमची अख्खी जंगलट्रिप वसूल झाली होती.
Image by Andreas Breitling from Pixabay
- समीर – अनयाच्या वॉट्सऍप गोष्टी - September 26, 2022
- कच्चा लिंबू - June 20, 2022
- आई - January 21, 2022
खुसखुशीत, नेहमीप्रमाणे 👌
Masta!
Ultimate Gauri.
Thanks😊
👍🏻
लयी भारी
thanks
धन्यवाद.😊
आम्हाला ताडोबाला चारही सफारी ला वाघ दिसला दोन वेळा माया आणि बच्चे कंपनी, एकदा तारा आणि एकदा मटकासुर, पैसे वसूल ट्रिप, पण फक्त हेच जंगल नसत बाकीचा निसर्ग सुद्धा एन्जॉय करता आला पाहिजे
बरोबर आहे. तुम्ही नशीबवान निघालात. 🙂