औषध…
नाकासमोर कसं चालायचं ?
आमचा दिगू सांगेल.
कुणाच्याही अध्यात नाही की मध्यात नाही.
आपण आणि आपलं काम.
बाकी जगाशी आपल्याला काय करायचंय ?
एकोणीस वर्ष झालीयेत दिगू माझ्या दुकानात काम करतोय.
एकदाही लेट नाही.
साडेनवाच्या ठोक्याला मी दुकानापाशी पोचतो.
माझ्याआधी दिगू तिथं हजर.
साडेनऊ ते साडेनऊ.
बारा तास.
गिर्हाईक सतत चालू असायचं.
दिगू कधीच दमायचा नाही.
त्याला तहानलाडू भूकलाडू लागायचेच नाहीत.
दुपारी दीड वाजला की मी जेवून घ्यायचो.
मला फार दम धरवत नसे.
तोवर दिगूचा वन मॅन शो.
माझं जेवण झालं की दिगू जेवायचा.
ते सुद्धा, ‘आता जेव रे बाबा..’
असा किलोभर आग्रह केल्यानंतर.
दिगूला कामाशिवाय काही सुचायचंच नाही.
प्रत्येक गिर्हाईकाशी हसतमुखानं बोलणार.
सबस्क्रीप्शननुसारच गोळ्या देणार.
गोळ्या कधी , कशा घ्यायच्या?
हे न विचारता सांगणार.
पेशंटच्या वेदना दिगूच्या चेहर्यावर दिसायच्या.
आपलेपणानं सांगणार..
‘काळजी घ्या.
तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.
औषध वेळेवर घ्या.
आणि लौकर बरे व्हा..’
दिगूचं आपलेपणाचं बोलणं + डाॅक्टरांनी दिलेलं औषध.
पेशंट बरा व्हायचाच.
हिशेबाचे राहिलेले एक दोन रूपये दिगू आठवणीनं परत करायचा.
त्याजागी चिरगूट चाॅकलेट गिर्हाईकाच्या माथी मारणं,
दिगूला हे पाप वाटायचं.
‘हे दुखतंय, ते दुखतंय.
कुठलं औषध घेऊ ?’
“हे मला समजत असतं तर मी डाॅक्टर नसतो का झालो ?
डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषध घ्या.
सबस्क्रीप्शनशिवाय मी औषध देणार नाही…”
गोड बोलून गिर्हाईकाला हे पटवणं,
कसं ? ते दिगूच जाणे.
दिगूका दिमाग चाचा चौधरीसारखं.
काॅम्प्युटरसे भी तेज..
पटाटा तोंडी हिशोब करायचा.
सुपरफास्ट.
सबसे तेज.
दुकानात लागला तेव्हा नुकताच डीफार्म झाला होता.
आता पक्का मुरलाय लोणच्यासारखा.
जीएसटी, वॅट, परचेस, स्टाॅक..
दिगू आॅलराऊंडर झालाय.
सुट्टी घेणं दिगूच्या जीवावर यायचं.
आणि माझ्या मुळावर.
सहसा दिगू सुट्टी घ्यायचाच नाही.
त्याच्या नात्यातली सगळी लग्नं, दिगूची बायको एकटी अटेन्ड करायची..
दिगूचं लग्न आमच्या दुकानाशी लागलेलं.
जिंदगीभराचा हनीमून पिरीयड.
एन्डलेस.
कॅरी आॅन दिगू..
विश्वास.
दिगू ईतका विश्वास माझा माझ्यावर सुद्धा नाही.
लाखोच्या हिशोबात एका पैशाचा सुद्धा घोटाळा व्हायचा नाही कधी.
एकंदर काय ?
आमचं दुकान ‘तब्येती’त चालू होतं.
टकाटक.
औषधालाही काळजी नव्हती.
दिगूकृपा.
दुसरं काय ?
पुढच्या महिन्यात होलसेल डेपो चालू करतोय.
आता माझा बराचसा वेळ डेपोतच जाणार.
दुकानाची काळजी नको.
दिगू है तो क्या फिक्र है !
तुम्हाला म्हणून सांगतो.
पुढच्या महिन्यापासून दिगूला दुकानात पार्टनर करून घेणार आहे.
तुम्हाला आनंद होईल हे ऐकून.
दिगूला काहीही फरक पडणार नाही.
‘हं….’
तो एवढंच म्हणेल आणि पुढचं गिर्हाईक बघेल.
दिगू म्हणजे दिगू आहे अगदी.
काल अचानक..
दिगू म्हणाला,
“आठवडाभराची सुट्टी हवीय..”
‘आठवडाभर ?’
काटाँ लगा…
मी किंचाळलो.
“का रे बाबा ?
काय झालं ?”
‘सासूला घेऊन तिरूपतीला जायचंय.
म्हातारीच्या पोराला वेळ नाही.
तिरूपतीचं दर्शन घेतल्याशिवाय म्हातारी संपायची नाही.
मी, बायको, पोरगी आणि सासू.
बालाजीला जाऊन येतो..’
मी काय बोलणार ?
जा बाबा.
दुपारी जेवता जेवता मी विचारलं.
‘ स्वतःच्या आईला तरी कधी घेऊन गेलास का देवदर्शनाला ?’
” कधीच नाही.
माझा दादा खूप जपतो आईला.
बँकेत आहे तो.
एलटीसी मिळते दरसाल.
जिथं जाईल तिथं बायकापोरांबरोबर आईलाही घेऊन जातो.
आईची काळजी नाही हो.
सगळं फिरून झालंय तिचं.
तो नसता तर मी होतोच.
सासूचं तसं नाही.
तिचं तिच्या सुनेशी पटत नाही.
पोरगा दूरचा झाला तिच्यामुळे.
सासू असली तरी काय झालं ?
आपली दुसरी आईच.
तिला हवं नको ते बघायलाच हवं.
खरं सांगू का शेट,
बायको आपल्याला आयुष्यभर सांभाळून घेते.
तिच्यासाठी तरी सासूकडे बघायलाच हवं.
नवरा बायको दोघांनाही आपापल्या सासूला सांभाळायचं.
संसाराचं आरोग्य जपायचं असेल तर हे औषध घ्यायलाच हवं…”
च्या मारी !
दिगू ग्रेट आहे आमचा.
कसला भारी बोलतो.
आठवडाभरानंतरची गोष्ट.
माझ्या सासूबाई येणार होत्या नागपूरहून.
एकट्या.
गाडी पहाटे पुणे स्टेशनला पोचते..
” स्टेशनवर पोचलीस की प्रीपेड रिक्षा कर..
मला रिक्षा नंबर कळव.”
हे नेहमीचंच.
मी रात्री ऊशीरा घरी पोचतो.
पहाटे लवकर ऊठणं मला कधीच जमायचं नाही..
काय झालं कुणास ठाऊक ?
त्यादिवशी पहाटे अलार्म लावून ऊठलो.
स्टेशनवर पोचलो.
सासूबाईंना गाडीत टाकून घरी आणलं.
हीनं दरवाजा ऊघडला..
तिचे ते ‘कौतुकी डोळे..’
मी ठार मेलो.
सासुबाई तर आल्यापासून रोज,
” जावई माझा नवसाचा “
यही रट लगा के बैठे है !
मान गये दिगू.
दिगूचं औषध जालीमच.
संसार सुखाचा करणारं.
सासूबाई प्रसन्न ||
….कौस्तुभ केळकर नगरवाला
Image by Steve Buissinne from Pixabay
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)
- घरघर….. - October 4, 2021
- ‘स्कूल चले हम ! - September 22, 2021
- चष्मा - July 12, 2021
😊👌🏻👌🏻👌🏻
नेहमीप्रमाणे छान लिहिले आहे,
भारीच 👌🏻👌🏻👌🏻
Dr. Kaustubh , Chhaan Aushadh prescribe keley aahey.
Nice medicine 👌👌👌👌
मस्तच…
हे औषध घेऊन बघायलाच हवं