धैर्य….

विनिता सकाळी उठली तेव्हा तिचा डावा गाल चांगलाच ठणकत होता. तिने डोळे उघडून इकडे तिकडे बघितले. शेजारी विनायक पालथा पडून झोपला होता. त्याच्या उघड्या पाठीकडे बघून तिला मळमळले. कशीबशी ती उठून उभी राहिली. मान हलवली तर डोळ्यासमोर काजवे चमकले तिच्या. दोन्ही पोटऱ्या लालबुंद होऊन सुजल्या होत्या. कसेबसे हात मागे घेऊन तिने मानेवर केस बांधले. विनायकच्या हात उचलण्याची तिला सवय नव्हती असे नाही पण काल त्याने तिला उभे आडवे झोडपले होते. गुरासारखी ओरडत होती ती. मध्येच एकदा दारावरची बेल वाजली. नक्की वरच्या मजल्यावरची प्रिया असणार. विनिताला हायसे वाटले. दुपारीच प्रिया तिला म्हणाली होती. मी आले की असशील तशी उठून माझ्याकडे चल म्हणून. पण विनायकने तिला फरशीवर ढकलली. तो तरातरा दार उघडायला गेला. सुटकेचा एकमेव मार्ग बंद झाल्याने विनिताने हताशपणे डोळे मिटले.

“काय पाहिजे?” विनायकाचा हॉल मधून आवाज आला.

“विनिता आहे का?”

“आहे, पण ती बाथरूम मध्ये आहे. काही काम होते का?”

“हो. तिच्याशी बोलायचे होते जरा”.

“ही वेळ नाही आत्ता. सकाळी या.” तिच्या तोंडावर दार आपटून विनायक आत आला.

“काय सांगितले आहेस तू तिला माझ्याबद्दल?”

विनिताने त्याच्याकडे बघितले.

“मान वर करून बघतेय आणि माझ्याकडे रांड साली. नजर खाली कर. काय सांगितलेस तिला तू?”

“काही नाही” विनिताचा अस्पष्ट आवाज आला.

“खोटे बोलते हरामखोर.” विनायकने सण्णकन तिच्या कानाखाली वाजवली. विनिता बसल्या जागी भेलकांडली. विनायकने तिला उलटी केली आणि हाताने मन दाबून तिच्या पोटऱ्यांवर बेल्टने मारायला सुरुवात केली. मारून मारून दमल्यावर तो थांबला. त्याच्या उघड्या अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्या.

“जा पाणी आण माझ्यासाठी.”

विनिता कशीबशी उठली. भिंतीला धरून धरून ती स्वयंपाकघरात गेली. ग्लास ओठाला लावल्यावर तिला रक्ताची चव लागली. पाणी थुंकून तिने परत एक ग्लास पाणी प्यायले. हातात भरलेला ग्लास घेऊन ती तशीच हळू हळू चालत बेडरूम मध्ये आली. तिच्या सुदैवाने विनायकला झोप लागली होती. त्याच्या उशाशी ग्लास ठेवून ती मुटकुळे करून त्याच्या शेजारी पडून राहिली. त्याच्या श्वासाने दचकत दचकत तिला कधीतरी झोप लागली.

रात्री अंगावर पडलेल्या त्याच्या हाताने तिला जाग आली. विनायक तिचे कपडे ओरबाडत होता. विनिताने नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. तिला ओरबाडून भोगून तो झोपला तेव्हा मध्यरात्र कधीच उलटून गेली होती.

विनिता कितीतरी वेळ जागी होती त्यानंतर. रोजचे होते हे. त्याने घरी आल्यावर आधी गोड गोड बोलणे आणि मग क्षणात त्याचे काही न काही बिनसणे. सुरुवातीला तो तिला शिव्या देत असे. एकदाच ती असह्य होऊन चिडून त्याला त्यावर काहीतरी बोलली. विनायकाचा संताप अनावर झाला. त्याने हातातले पाणी प्यायचे भांडे तिला फेकून मारले. विनिताच्या कपाळावर अजून त्याची खूण होती. ती एक पाऊल मागे सरकली. विनायकला आयते कोलीत मिळाले. तेव्हापासून रोजची मारहाण वाट्याला आली तिच्या. सुरुवातीला एखाद दुसरी थप्पड होती. आता मारहाणीत त्याचे रूपांतर झाले होते. का नाही आपण त्याच वेळी घर सोडून गेलो? विनिताने शम्भरव्यांदा स्वतःला हा प्रश्न विचारला. एकदा आई बाबा आले होते. विनायक ते आल्या आल्या आतल्या खोलीत निघून गेला. शरमली विनिता पार त्याच्या वागण्याने. सकाळी उठून त्यांच्याशी न बोलताच तो ऑफिसला निघून गेला.

“येतो पोरी आम्ही” विनिताचे बाबा तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणले.

“नका ना जाऊ बाबा”

“अगं तुझ्या नवऱ्याला आम्ही नकोय इथे बाळा, नको थाम्बवूस आम्हाला”.

तिची आई म्हणाली. आईच्या आवाजातला संताप जाणवून विनिता काही बोलली नाही. प्रेमविवाह होता तिचा. बाबांनी मुलीकडे बघून हो म्हणले असले तरी आईचा सुरुवातीपासूनच विनायकाच्या स्थळाला विरोध होता. त्याचे पाणी तिने क्षणात जोखले होते म्हणा किंवा आईच्या नजरेतून तिने त्याला पाहिले होते म्हणा, तिला तो कधीच आवडला नव्हता हे खरं. विनायकला याची जाणीवही होती. आई खूप बोलली होती विनिताशी यावरून. पण विनिता तिच्या निर्णयावर ठाम होती. शेवटी आईने नमते घेतले.

विनायकला पहिल्यांदा ऑफिसमध्ये पाहिले विनिताने. सेल्सकॉलसाठी आला होता तो. दिसायला देखणा, उंचापुरा, रुबाबदार विनायक तिला पहिल्या भेटीतच आवडला. विनिता दिसायला काही खास होती असे नाही. हसरी होती, बोलक्या डोळ्यात चमक होती. विनीतामध्ये सगळ्यात छान काय होते तर तिचे हसू. गालाला एक गोड खळी पडत असे तिच्या. पाहणारा तिच्या खळीकडे बघतच राही. विनायकचे तिच्याकडे लक्ष जायचे काही कारण नव्हते. तो आला की त्याच्या आसपास ऑफिसमधल्या सगळ्या पोरी गोळा होत असत. विनिता मागे मागे राहून त्यांचे बोलणे ऐकत असे. पण तिच्यात कधीही विनायकशी बोलायची हिम्मत झाली नाही.

त्यादिवशीही असाच त्याच्या भवती गराडा होता मुलींचा. विनिताचा जरा जळफळाटच झाला. नाराज नजरेने त्या सगळ्यांकडे बघत ती ऑफिसमधून निघाली. बाहेर चांगलेच भरून आले होते. बसस्टॉपवर भलीमोठी रांग होती.

“आज घरी जायला चांगलाच उशीर असे दिसतंय.” विनिता पुटपुटली.

“सोडू का मी तुम्हाला कुठे?”

विनिताने मान वर करून पाहिले. समोर विनायक कारमधून तिच्याकडे बघत होता. विनिता गोंधळली. तिला काय बोलावे सुचेना.

“आता इतका विचार करणार असाल तर मी गाडी साईडला घेऊन थांबतो.” तो हसत हसत म्हणला.

विनिता हसली. तिने मेन बसस्टॉपला गाडी घ्यायला सांगितली.

“मॅडम वातावरण बघताय ना? मेन बस स्टॉप वरून पण तुम्हाला लवकर बस मिळेल असे वाटत नाही. तुम्ही कुठे राहता?”

विनिताने घराचा पत्ता सांगितलं.

“अरे वा म्हणजे माझ्या वाटेवरच आहे. सोडतो तुम्हाला.”

नको नको म्हणत असताना त्याने विनिताला घरी सोडले. घरी चला विचारले तर परत कधीतरी येईन म्हणून तो गेलासुद्धा. विनिता तरंगतच घरी आली. त्यानंतर तो हमखास ऑफिस सुटल्यावर तिला बसस्टॉपवर भेटू लागला. तिला घरी सोडण्यासाठी तो मुद्दाम वाट वाकडी करून येई. विनिता मनातून सुखावली. आपल्या वाट्याला आईवडील निवडून देतील तोच राजकुमार येणार अशी तिची पक्की समजूत असताना परमेश्वराने हे दान अनपेक्षित तिच्या पदरी टाकले होते. विनायकने कधीही तिच्याकडून शारीरिक अपेक्षा केली नव्हती. विनितालाच कधीतरी त्याच्या मिठीत शिरावेसे वाटे. पण त्याच्याकडून पुढाकार नसल्याने ती गप्प राही. विनायक तिच्याशी भरभरून बोलत असे. त्याची स्वप्ने, त्याचे प्लॅन्स, सगळेच. या सगळ्यात तीही असे. विनिता तेव्हढ्यावर पण खूष होती.

एके दिवशी त्याची एक तास वाट बघून ती घरी आली. घरी पोचल्यावर जेमतेम पंधरा मिनिटे झाली असतील तिला तोच विनायकने फोन करून खाली बोलावले. ती खाली गेली. विनायक गाडीतच बसून होता.

“बस” त्याचा आवाज ऐकून ती बावचळली.

गाडीचा दरवाजा उघडून आत बसताना तिच्या अंगावर सर्र्कन काटा आला. काहीतरी चुकतंय असे तिला तिचे मन सांगत होते.

विनायक न बोलता गाडी चालवत होता. थोड्या निवांत रस्त्यावर आल्यावर त्याने गाडी बाजूला घेतली.

“कुठे गेली होतीस?”

“मी घरी गेले”

“खोटे बोलू नकोस”

“नाही हो मी खोटे का बोलेन?”

“तुलाच माहित का ते”

विनिताला कळेचना यावर काय उत्तर द्यावे ते. ती गप्प बसली. विनायकने तिचा हात पकडला. तिच्या मनगटावर त्याची बोटे उमटली. विनिता कळवळली.

“अहो नाही हो. मी कुठे जाणार? तासभर वाट बघितली तुमची. उशीर व्हायला लागला म्हणून मिळेल त्या बसने घरी गेले. चुकले माझे.”

ती अचानक हमसाहमशी रडायला लागली. विनायक वरमला. त्याने तिचा हात सोडला.

“सॉरी ग. ए … ऐक ना… अगं तू दिसली नाहीस ना मी सैरभैर झालो एकदम. मला वाटले तू मला सोडून गेलीस. मला सोडून नाही ना जाणार तू? खूप प्रेम आहे विनू माझे तुझ्यावर.”

त्याच्या डोळ्यात पाणी आले. विनिताने त्याचे डोळे पुसले.

“नाही हो. मी तुम्हाला सोडून कुठे जाणार?”

दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवले काही क्षण.

हळू हळू विनिताला त्याच्या या स्वभावाची सवय झाली. तिला वाटे तो खूप पझेसिव्ह आहे कारण तो तिच्यावर खूप प्रेम करतो. तिला मनातून बरेही वाटे. खर सांगायचे तर तिच्यापेक्षा तो लाख देखणा होता. पण तोच तिच्याबद्दल प्रचंड पझेसिव्ह होता. एकदा दोनदा विनिताच्या ऑफिसमधल्या एका पुरुष सहकाऱ्याने तिला घरी सोडल्यावर तर त्याने आकाशपाताळ एक केले होते. विनिताच्या आईला त्याचे वागणे खटकत असे. यावरून तिने विनिताला खूप समजावण्याचा प्रयत्नही केला होता. पण विनिताला मात्र विनायकच्या प्रेमाची पुरेपूर खात्री पटलेली होती.

आईचे ऐकायला हवे होते आपण. विनिताला राहून राहून वाटे. त्या दिवशी दुपारी त्यांच्याबरोबर घरी निघून गेलो होतो ते परतच आलो नसतो खरतर. विनायक घरी न्यायला आला होता दोन दिवसांनी. हातापाया पडला तो आईबाबांच्या. मनधरणी विनवणी करून घेऊन आला परत आपल्याला. त्यानंतर दोन चार आठवडे बराही वागत होता. मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरु झाले. संशय घेणे तर नेहमीचेच होते. त्याच्या जोडीने हळूहळू शिव्यागाळ, वाटेल तसे बोलणंही सुरु झालेच होते. का आपण हे सगळे ऐकून घेतो हा प्रश्न विनिताला नेहमी पडे. आधीच अबोल असलेली विनिता पार गप्प झाली होती.

जोराच्या वाऱ्याने आपटणारे गॅलरीचे दार लावून विनिता आत आली. दारावरची बेल वाजली. दारात विनिताच्याच वयाची बाई उभी होती.

“हाय माझे नाव प्रिया. तुमच्या गॅलरीत माझ्या मुलाचा टॉवेल उडून पडला आहे तेव्हढा द्याल का प्लीज?”

“हो देते की. विनिताने नीट घडी करून ठेवलेला टॉवेल तिच्या हातात दिला.”

“किती सुंदर घर ठेवलाय तुम्ही. आमच्या कडे महामूर पसारा असतो सगळीकडे. किती आवरणार? म्हणून मग मी हल्ली बघतच नाही.” प्रिया हसायला लागली. विनिताला पण हसू आले.

“येते मी. थँक यू.”

प्रिया गेली तरी विनिता बराच वेळ तिचाच विचार करत होती. हळूहळू प्रियाशी तिची घट्ट मैत्री झाली. दिवसभरात ती एकदा तरी चक्कर मारून जात असे. कधी एकटी येई, कधी जयला, तिच्या मुलाला घेऊन येत असे. जयला विनिताचा लळा लागला. एक दिवस विनिताच्या हातावरचे चटक्यांचे वण बघून प्रिया चमकली. खोदून खोदून विचारल्यावर विनिताने तिला सगळी कथा सांगितली. तिच्या कुशीत शिरून विनिता खूप रडली. विनिताकडून प्रियाने तिच्या आईवडिलांचा फोन नंबर घेऊन ठेवला होता. आजही विनिताचा आवाज ऐकून न राहवून ती खाली उतरली होती.

सकाळी विनिता उठली.  तिचे सगळे अंग ठणकत होते. ती स्वयंपाकघरात गेली. तिने लगबगीने स्वयंपाक केला. विनायकाचा डबा भरून ठेवला. त्याचा नाश्ता टेबलवर ठेवून ती त्याच्या ऑफिसची तयारी करण्यासाठी बेडरूममध्ये आली. स्वतःची नोकरी सुटलीच होती तिची विनायकपायी. तरीही त्याची ऑफिसची तयार करताना ती मनातून स्वतःही ऑफिसला जाऊन येई. विनायक आवरत होता. ती एकेक गोष्ट त्याच्या हातात देत होती. त्याने तिच्याकडे बघितले. त्याने तिच्या डाव्या गालावरून हळुवार बोट फिरवले.

“आय एम सो सॉरी विनू.”

हलकेच त्याने तिच्या गालावर ओठ टेकले आणि तो ऑफिसला गेला. विनिता बाथरूम मध्ये गेली. गरम पाणी सोडून ती दुखरे अंग शेकत राहिली. अपेक्षेप्रमाणे थोड्याच वेळात बेल वाजली. विनिताने दार उघडले. प्रिया दरवाज्यात उभी होती. प्रियाने या आधीही विनिताच्या अंगावर मारहाणीचे वण बघितले होते. पण आज मात्र ती हादरली.

“विनिता प्लीज तू आवर आणि माझ्याबरोबर चल जरा.”

“कुठे?”

“चल म्हणते ना.”

विनिता कशीबशी तयार झाली. तिला हाताला धरून प्रिया खाली आली. बळेच तिला गाडीत बसवून तिने गाडी वळवली.

“कुठे जातोय प्रिया आपण?”

“आपण पोलीस स्टेशनला जातोय विनिता. आय बेग ऑफ यू. प्लीज कंप्लेंट लॉज कर आज. मी एका संघटनेच्या लोकांशी पण बोलून ठेवलय. जरा हिम्मत कर ग.” प्रियाच्याच डोळ्यात पाणी आले एकदम.

विनिता थरथरत होती. विनायकाच्या विरुद्ध तक्रार करायची कल्पनाच तिला पेलेना. हात अंगाभोवती आवळून ती बसून राहिली शांत.

दोघी पोलीस स्टेशनला पोचल्या. प्रियाने हात धरून विनिताला बाहेर यायला मदत केली. तिला एका जागी उभे करून ती स्टेशन इन चार्ज कोण आहे, प्रोसेस काय आहे ते बघायला गेली. विनिता आतमध्ये जाऊन एका बाकावर बसली. तिच्या घशाला कोरड पडली होती. बाजूला ठेवलेल्या एका माठामधले पाणी ती घटाघटा प्यायली. जरा हुशारल्यावर तिला आजूबाजूच्या वातावरणाची जाणीव झाली. समोरच एक माध्यम वयाची बाई बसलेली होती. तिची तक्रार लिहून घेणे चालू होते.

“बोला बाई. नाव काय तुमचे?”

“लक्ष्मी सोनार.”

“काय तक्रार आहे तुमची?”

“नवरा मारतो.”

विनिता एकदम ताठ बसली.

“का मारतो?”

“काय माहित मला. मारतो पण लयी. हे बघा की.”

आता विनिताचे तिच्याकडे नीट लक्ष देऊन बघायला लागली. लक्ष्मीची पाठ काळीनिळी झाली होती. एक डोळा सुजला होता. विनिताला गरगरायला लागले.

“किती दिवस सुरु आहे हे?”

“माहित नाही.”

“म्हणजे?”

“म्हणजे साहेब लग्न झाल्यापासून हेच सुरु आहे. आधी गोड गोड बोलायचा. मग नंतर शिव्या द्यायचा घाण घाण.”

“मग तुम्ही काय बोलला नाहीत कधी त्याला?”

“बोलले ना साहेब. एकदा दोनदा बोलले. पण मग त्याचा हात उठला.”

“किती दिवस झाले मारतोय?”

“काय माहित? पण आज सुरी लावली गळ्याला साहेब. लयी भीती वाटली. म्हणून आले.”

“जीवावर उठेपर्यंत का थांबलात? आधीच यायचे.”

“नाही ना साहेब. इतके सोपे नसतंय हो. कुठेतरी आपला पण जीव गुंतलेला असतो. आता बदलेल मग बदलेल वाट बघतो हो.”

बघता बघता लक्ष्मी रडायला लागली. वातावरण गंभीर झाले.

तिचा रडण्याचा आवेग ओसरल्यावर हवालदाराने तिच्याकडे बघितले. एव्हाना हा काय प्रकार आहे बघायला इन्स्पेक्टर, स्टेशन इन चार्ज सगळे जमा झाले होते.

विनिता हे सगळे एकटक बघत ऐकत होती.

“बाई एक सांगू का?” तिचा आवेग ओसरल्यावर इन्स्पेक्टर म्हणाले.

लक्ष्मीने डोळे पुसले आणि मान हलवली

“तुम्ही सहन करता म्हणून जोर चढतो तुमच्या नवऱ्याला.”

“मग काय करायचे साहेब?”

“उठा आणि एकदाच प्रतिकार करा. जीवावर बेतेपर्यंत थांबू नका.”

“असा कसा विरोध करणार साहेब? प्रेम पण तर करतो तो.”

“तो प्रेम करत असता तर तुमच्यावर हात उचललाच नसता त्याने. एकदा ठाम उभ्या रहा. घरातली प्रत्येक वस्तू शस्त्र आहे तुमच्यासाठी. साधी गोष्ट आहे. एकदा कानाखाली वाजवा आणि मग या आमच्याकडे. नाहीतर तुम्ही याल. तक्रार नोंदवाल. आम्ही तुमच्या नवऱ्याला ताब्यात घेऊ. दोन दिवस आत टाकू. समज देऊ. तो चार दोन दिवस बरा वागेल आणि परत हेच करेल. मग तुम्ही आणि आम्ही हेच करत बसायचे का?”

लक्ष्मी विचारात पडली.

“तुमच्या जागी आमची बहीण असती तर आम्ही हेच सांगितले असते. हिम्मत करा बाई. असेच आयुष्य काढणार का तुम्ही?”

“नाही साहेब. आज आला घरी की बघतेच त्याला.”

काहीतरी ठरवल्यासारखी लक्ष्मी उठली. जाताना तिने विनिताकडे पाह्यले. विनिताचे वण बघून ती समंजस हसली. विनिताला कळेचना काय बोलावे ते.

“काळजी घ्या.” ती कसेबसे म्हणाली.

“हो माये. तू पण काळजी घे बघ. आपली आपणच काळजी घ्यायची बघ आता.”लक्ष्मी तिला म्हणाली आणि गेलीसुद्धा.

प्रिया हे सगळे मागे उभे राहून बघत होती. तिची आणि इन्स्पेक्टरची नजरानजर झाली. प्रिया पुढे झाली.

“चल विनिता.”

विनिता भारल्यासारखी उठली. मुकाट्याने ती गाडीत जाऊन बसली. परतीच्या वाटेवर दोघीही गप्प होत्या. विनिता घरी आली. या सगळ्या उद्योगात घड्याळ बघितलेच नव्हते तिने. दार उघडेच होते. विनायक आत उभा होता.

“कुठे गेली होतीस?”

विनिता स्वयंपाकघरात शिरली. विनायक तिच्यापाठोपाठ आत आला.

“कोण सापडला वाटते नवीन?”

विनिता काही बोलली नाही. या आरोपांची तिला सवय झाली होती. तरीही तिच्या मनावर एक चरा गेलाच.

“काय विचारतोय मी? जीभ नाही का थोबाडात?”

विनायकने तिचा हात हिसडला. विनिता कळवळली. काही कळायच्या आत त्याने तिच्या कानाखाली वाजवली. विनिता भेलकांडली. तिने ओटा गच्च पकडला. विनायकाची लाथ तिच्या पाठीत बसली. तशातही विनिता खडबडून उठली. विनायक तिच्याकडे खुनशी नजरेने पाहत होता. त्याने तिचे केस धरून ओढले. अचानक तो जोरात ओरडला.

विनिता हातात रक्ताळलेली सुरी घेऊन थरथरत उभी होती. खाली धुवून ठेवलेल्या भांड्यामधली सुरी तिच्या हाती लागली होती. एकच क्षण लागला तिला निर्णय घ्यायला. तिच्यावर हात उगारणारा विनायक तिला नव्या नजरेने दिसत होता जसा काही. तिच्या डोळ्यात पाणी तरारले. आईबाबा दिसले. आदल्या रात्रीपर्यंतचे सगळे भोग शरीरातून वाहिले तिच्या. कानशिले तापली आणि काय होतंय ते कळायच्या आत तिने सुरी जीव खाऊन विनायकच्या खांद्यावर खुपसली.

खांदा धरून गोळा होऊन पडलेल्या विनायककडे तिने घृणेने पाह्यले. ती तशीच पळत पळत वर प्रियाकडे गेली. जिवाच्या आकांताने ती प्रियाची बेल वाजवत राहिली.

प्रियाने धावत येऊन दरवाजा उघडला. तीरासारखी आत घुसली विनिता तिच्या घरात.

“मी मारले त्याला आज प्रिया…” कसाबसा श्वास गोळा करत विनिताचा आवाज फुटला.

प्रिया विस्मयाने तिच्याकडे बघत होती. विनिताच्या हातून सुरी गळून पडली. ती मटकन खाली बसली. अंगाचे मुटकुळे करून तिने आई म्हणून हंबरडा फोडला.

©प्राजक्ता काणेगावकर

Image by Gerd Altmann from Pixabay 

Prajakta Kanegaonkar

Prajakta Kanegaonkar

मॅनेजमेंटची प्रोफेसर म्हणून नोकरी. खाद्यपदार्थांचा स्वतःचा व्यवसाय. आजूबाजूला घडणाऱ्या अनेक लहान मोठ्या घटनांकडे चौकस कुतूहलाने बघणारी, लिखाणातून व्यक्त होणारी नजर. इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांवर प्रभुत्व पण अभिव्यक्ती मराठीवरच्या प्रेमामुळे मराठीतूनच. सर्व प्रकारचे लिखाण करायला आवडते.

3 thoughts on “धैर्य….

  • March 5, 2020 at 7:29 am
    Permalink

    Superb writing skill.. nice story

    Reply
  • June 19, 2020 at 6:06 pm
    Permalink

    अप्रतिम.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!