गेम
या वेळी आमच्या ट्रिपचा, पुणे – नैनीताल – पुणेचा प्रवास बराच लांबचा होता. आधी फ्लाइट, मग मेट्रो, त्यानंतर रेल्वे, मग गाडी, असा. मुलं लांबच्या प्रवासात शक्यतो कंटाळतात. त्यांना मजा यावी, बोअर होऊ नये म्हणून आम्ही मोठे त्यांच्याबरोबर पत्ते खेळत होतो, कोडी सोडवत होतो, गाणी ऐकत होतो. कोणतंही गॅजेट त्यांच्या हातात द्यायचं कटाक्षाने टाळत होतो. आणि हे सहज शक्य असतं. पालकांना (आपल्याच मुलांसाठी!) थोडी तोशीस पडते इतकंच!
एक अगदी वेगळा खेळ यावेळी आम्ही मुलांबरोबर खेळलो. कल्पना आमच्या लेकीची होती. खेळ असा की, एकाने कोणत्याही देशाचं किंवा गावाचं नाव सांगायचं. दुसऱ्याने या गावात किंवा देशात एक हॉटेल किंवा रेस्तरॉ उघडलं तर त्याचं नाव तो काय देईल हे सांगायचं. नाव सगळ्यांना पसंत पडलं तर १ पॉइंट, नाही आवडलं तर पुढे जायचं. वरवर सोपा वाटतो खेळ, पण आम्हा मोठ्यांनाही हॉटेलच्या नावाचा विचार करायला बरंच डोकं खाजवायला लागलं. नावात त्या गावाची किंवा देशाची, तिथली खासियत डोकावली पाहिजे. त्याचबरोबर ते आकर्षकही असलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला जगाची थोडीफार माहितीही हवी. फार धमाल खेळ होता. आमच्या खेळात कोणत्या नावांनी जन्म घेतला ते सांगते.
जपानमध्ये रेस्तरॉ उघडलं तर नाव काय? – या खावाकी!
अलास्कामध्ये? – The Polar Point.
कोल्हापूर मध्ये? – रंकाळा
पुण्यात? – कट्टा
श्रीलंका? – श्री अन्नवर्धने
रशिया? – आरामातबस्की!
अफ्रीका? – वाका वाका
ब्राझिल? – Foodball
प्रत्येक नावात त्या त्या जागेची, देशाची, भाषेची विशेष गोष्ट आली आहे. बुद्धीला चांगली चालना देणारा तसच थोडा सर्जनशील विचार करायला लावणारा हा खेळ आहे हे नक्की. यात टीम बनवून, गूगल बाबास मदतीस घेऊन भरपूर वैविध्यही आणू शकतो.
या खेळादरम्यान आमच्या लेकानी मुंबईतील हॉटेललासाठी सूचवलेलं एक नाव बरच बोलकं आहे.
“नीतामाईचा आशीर्वाद”
Image by Michael Gaida from Pixabay
- समीर – अनयाच्या वॉट्सऍप गोष्टी - September 26, 2022
- कच्चा लिंबू - June 20, 2022
- आई - January 21, 2022