मेट्रोकथा
पुण्यात सध्या येताजाता मेट्रोचे बांधकाम नजरेस पडत असतं. दिवसागणिक नवनवीन प्रगती झालेली दिसत असते. आज काय खांब उभे राहिले, उद्या काय पायऱ्या बनल्या, परवा तर चक्क पूलावर स्लॅब घालून झाली! कितीही ट्राफिक जॅम का होईनात, मेट्रोग्रस्त का वाटेना, हा सांगाडा जसा जसा पूर्ण होत जात आहे, तसंतसं या शहराच्या भविष्याबद्दल थोडसं होपफुल वाटतं हे खरं! पुढे मेट्रो प्रत्यक्षात सुरू झाल्यावर तिच्या अगदी पहिल्यावहिल्या खड्ड्यापासून आपण तिचे साक्षीदार होतो या गोष्टीचीही फार मजा वाटणार आहे. आमच्या लेकीला येताजाता हा पूल दिसला की एक गंभीर प्रश्न कायम पडतो. “आई, हा पूल पूर्ण बांधून झाल्यानंतर त्यावर मेट्रोचे डबे चढवणार तरी कसे?” मला तिचा हा प्रश्न ऐकला की एक मजेशीर प्रसंग डोळ्यांसमोर उभा रहातो. मेट्रो पूर्ण झाली आहे. रत्नांग्रिरीच्या मधल्या आळीतलं एक टोळकं, मेट्रोच्या पूर्ण झालेल्या पूलाकडे पहात, डोकं खाजवत म्हणत आहे, “शिंचे, ह्यांचं जरा चूकलंच नै? पूल आधी पूर्ण केलान् आता डबे कसे वर चढवणार?” ते मेट्रोतज्ञ कितिका हुशार असेनात, बाकी या प्रश्नात पॉइंट आहे!
या सुट्टीतल्या आमच्या प्रवासातला एक टप्पा दिल्ली मेट्रोचा होता. मुलांना जरा साहस केल्यासारख वाटावं, एक वेगळी मजा अनुभवायला मिळावी म्हणून मुद्दाम प्रवासच तसा प्लॅन केला होता. दिल्लीची एरोलाईन ज ब र द स्त आहे. Simply awesome! हे मी अमेरिका, यूरोपमधल्या ट्यूब्स, बाह्नच्या अनुभवांनंतर देखील म्हणते आहे. दिल्लीच्या अतिभयंकर ट्रॅफिकच्या कुठल्याही किचाटात न अडकता विमानतळावरुन इतरत्र किंवा थेट स्टेशनवर जाण्यासाठी मेट्रो ही उत्तम सोय आहे.
आम्ही मेट्रोची तिकीटं काढली. प्रत्येकासाठी एकेक प्लास्टिकचं नाणं आलं. हे नाणं एकतर स्वाइप करायचं किंवा तिथल्या खाचेत घालायचं. मगच दार उघडतं. मुलांचा हा पहिलाच अनुभव असल्याने त्यांना मजा येत होती. पुण्याच्या मेट्रोसाठीची रंगीत तालीम आधीच होत होती. आम्ही सगळेजण नाणं स्वाइप करुन दार उघडून पलीकडे आलो. मागे राहिला आमचा दहा वर्षाचा चार फूट सात इंच भाचा. याचं नाणं काही केल्या काम करेना आणि दारही उघडेना. तो पलीकडून ओरडू लागला, माझंच कॉइन का चालत नाही? दार का उघडत नाही?”
त्याचे बाबा त्याच्या जवळ गेले. त्यांनी त्याच्या हातात काय आहे ते पाहिलं आणि शांतपणे त्याच्या हातातलं पाच रुपयाचं नाणं काढून घेऊन त्याला मेट्रोचं कॉइन स्वाइप करायला लावलं! आता हा भाचा यापुढे पाच रूपयांचं नाणं हातात आलं की हसणार हे नक्की!
- समीर – अनयाच्या वॉट्सऍप गोष्टी - September 26, 2022
- कच्चा लिंबू - June 20, 2022
- आई - January 21, 2022
सिंहगड एक्सप्रेस सुरू झाली त्या दिवशी माझा काका घरातल्या सगळ्या मुलांना घेऊन गेला होता. पुणे स्टेशन ते शिवाजी नगर प्रवास केला होता त्या दिवशी. आणि हॉर्न सुद्धा वाजवला होता. तुझा लेख वाचून ती आठवण आली.