ओढ
ओढच ती. जबरदस्त ओढ.म्हणून तर तो परत आला ईथे. गावच्या मातीनं ओढून आणला परत त्याला ईथं. राजेश खन्नाच्या कटी पतंग मधलं ते गाणं. मुझे तेरी और कोई खींचे ….. अगदी तसंच. एक अनामिक ओढच त्याला ईथे खेचून आणत होती.
गुहागर तालुक्यातलं मेणवली हे त्याचं गाव. छोटंसं टुमदार. घर कौलारू टाईप. अगदी चांदोबातल्यासारखं. प्रत्येक घराला गुडघाभरच चिरेबंदी कंपाऊंड. गुरांनी आत येवू नये म्हणून. बाकी माणसांनी कधीही कुठेही घुसावं. प्रत्येक घर आपलं घर वाटावं असं. आव जाव घर तुम्हारा टाईप. मेणवलीत लोकांना खाजगी आयुष्य नसायचंच. सगळं काही सार्वजनिक. रात्रीच्यालाच काय ती घरं आपापली दारं लावून घ्यायची. पण या प्रायव्हसीत सुद्धा ही घरं गुदमरायची. कधी एकदा पहाट ऊगवते आणि आपले दरवाजे सताड ऊघडे पसरून मोकळा श्वास घेतोय असं व्हायचं या घरांचं.
बाकी निसर्गानं आपली सगळी ईस्टेट ओवाळून टाकली होती या गावावरनं. नारळी पोफळींची गर्द हिरवी झाडी. आजूबाजूचे ठुसके , सदाबहार डोंगर. गावकुसाबाहेर वाहणारी मेणा नदी. सदैव खारा वारा नाहीतर मतलबी वारा पाठवणारा फर्लांगभर अंतरावरचा समुद्र. गूढ घुमल्यासारखी दूरवरून सतत ऐकू येणारी त्याची गाज. एखाद्या मंदिरात गायत्रीमंत्राचा संततधार जप चालत असल्यासारखं वाटायचं. पण मेणवलीला या ऊन्मुक्त सौंदर्याची शून्य किंमत होती. ती आपली आपल्याच धुंदीत गर्क असायची. ऊभ्या कोकणाला लाज वाटेल ईतके ईथले लोक ऊद्योगी. सदैव हात कामात गुंतलेले. त्या मेणा नदीचा जीव तीळ तीळ तुटायचा. कुणीतरी यावं. काठच्या कृष्णेश्वराशी घटकाभर बसावं. एखाद दगड पाण्यात टप्पेरी भिरकावावा. पाण्याचं संगीत ऐकत जगाला विसरावं.
छे !छे! ऐहसानफरामोर्श मेणवलीला यातलं काहीच जमायचं नाही. ती आपली आपल्याच नादात. मग ही मेणाबाई चिड चिड चिडायची. पावसाळ्यात तर सगळा हिशेब चुकता करायची. चार चार दिवस अशी बेफाम व्हायची की मेणवलीचं पार अंदमान निकोबार होवून जायचं. रहा लेको बेटावर. ही मेणाबाई गावाला सतत पाण्यातच बघायची. अर्थात त्या ढिम्म मेणवलीपर्यंत हा संताप पोचायचाच नाही. ते चार दिवस सुद्धा मेणवली आपल्याच कोशात गुरफटलेली. बेटावर तर बेटावर. मेणवलीला फरक पडत नाही. हीच मेणा उन्हाळ्यात कुत्र्याच्या मुतासारखी सुकून जायची. ऊलीशी बारीक धार. मेणवलीचं शेंबडं पोरगं सुद्धा सहज छेड काढायचं तिची.
ईथं हे असं होतं सगळं. याच गावाच्या मध्यावर कृष्णा खोताचं घर. घर कसला मेणवलीसाठी ताजमहालच तो. ऐश्वर्याच्या खुणा पावलोपावली दाखवणारा. पण गावच्या लोकांना त्याचा कधी अडसर वाटला नाही. कारण कृष्णा खोत. कुणीही कसलीही अडचण घेवून यावं. रात्री अपरात्री बेलाशक दार ठोठावावं. कृष्णा खोत प्रत्येक हाकेला ओ द्यायचाच. हा म्हणजे मेणवलीसाठी गारंबीचा बापू होता.
याच कृष्णा खोतचा हा नातू. ईथल्याच शाळेत शिकला. हुशार पोर. मन लावून अभ्यास करायचं. दहावी नंतर तालुक्याला. .नंतर कोल्हापूरला मेडिकल कालजात. आणि आता पंचक्रोशीतला देवमाणूस. कृष्णाची चांगुलपणाची ईस्टेट वाढवत नेणारा. मेणवलीचा प्रकाश बाबा आमटेच हा.
दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. मेणा बेफाम ऊधाणावर होती. मेणवली जगापासून तुटलेली. नेमकं तेव्हाच खोताच्या छातीत ती जीवघेणी कळ यावी. गावात डाॅक्टर नाही. खोताच्या आयुष्याची दोरी मेणाबाईनं सर्कन कापली. तो . खोताचा नातू. त्याच्याच मांडीवर खोतानं डोळे मिटले. पण जाता जाता नातवाकडून भरतवाक्य म्हणवून घेतलं. डाॅक्टर हो आणि मेणवलीतच रहा. तो पण वचनाला जागला. आज मेणवलीला तोच जगवतोय. पण मेणाबाई मात्र त्याला पाण्यातच बघतेय. तेव्हापासून… आजपर्यंत.
सुदैवाने त्त्याला बायको पण गुणी मिळाली. ती पण डाॅक्टरच. याच्याबरोबरच शिकली. पुण्याची पोर ती. याचं बोट धरून ईथं आली. पुन्हा मागं वळून नाही बघितलं तिनं . किती अडलेल्या बायांची सुखरूप सुटका केली तिनं. वायनीसाब आहे म्हणूनच कृष्णेश्वराशी आरोग्यसंपदा होती. आता कुठे जुलै सुरू होतोय. यावेळी पावसाचं गणित चुकतंय बहुतेक. घमासान बरसतोय. तासाभरापूर्वी करंगळी एवढी होती मेणा. रक्त पिवून फुगलेल्या जळूसारखी फुगलीय टमाटम. तो आताच तालुक्याला गेलाय. वैनीसाबचे दिवस भरत आलेत. कधीही बाळ जन्म घेईल. ती औषधे आणायलाच हवीत. हा तिकडे आणि तेवढ्यात प्रसूती वेदना सुरू झाल्या.
हा फोनवरच म्हणाला . पोचतोच आहे. हा काय फरशीपुलाशीच आहे.
एकदम थबकलाच तो. बेफाम मेणा पुलाला भिजवत ऊधाणावर आहे. अशात पलीकडे जाणं म्हणजे जीवाशी खेळ.
तगमग तगमग. त्या जन्माला येणार्याची काळजी. बायकोसाठी तुटणारा जीव. जणू यालाच त्या प्रसूतीवेदना सोसायच्या होत्या.
ठरलं. काहीही होवो. पैलतीर गाठायचा. गाडीला कीक मारली. घट्ट पकड हॅन्डलवरची. मध्यापर्यंतचा डगमगता प्रवास. ते अघोरी वेडं साहस.
त्याला सदैव पाण्यात पाहणारी , बेफाम बेलगाम मेणा.
ती ओढच जबरदस्त . क्षणात त्याला पाण्यात खेचून घेवून गेली. अचानक त्याची गाडी पाण्यात गेली. मेणा कुठं घेवून चाललीस त्याला.??
ती ओढच जबरदस्त. ईथल्याच मातीची. त्याला त्याच मातीशी घेवून गेली.
ही ओढच जबरदस्त. ….
.
….कौस्तुभ केळकर नगरवाला.
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)
- घरघर….. - October 4, 2021
- ‘स्कूल चले हम ! - September 22, 2021
- चष्मा - July 12, 2021
बापरे…
का?… सुखांत करा की !!
निशब्द करून गेली कथा
Kokanatlya anek khedyanchi Katha watali