पत्र क्रमांक 2….

प्रिय मी,

काल रशम्याशी फोनवर बोलले. आई बाबा नि मी डॉ.आदित्य यांच्याकडे जाऊन आलो. त्यांना किती थँक्स म्हणू नि किती नको असं आई बाबांना झालं होतं. त्यांना गिफ्ट घेऊन गेलो होतो, अर्थात हेही आई बाबांचंच डोकं, पण डॉ. आदित्यनी ते नम्रपणे नाकारलं. मला त्यांचं असं हे नाकारणं खूप आवडतं. कित्येकदा त्यांच्या डोळ्यात नकार दिसतो, मोहवणारा…ट्रीटमेंटच्या वेळी जेवढ्यास तेवढं बोलणं व्हायचं त्यांच्याशी आणि अर्थात डॉ.शहांशी. डॉ.आदित्य मितभाषी आणि मनकवडे पण. म्हणूनच काल त्यांना भेटायला गेल्यावर त्यांना बहुदा समजलं असावं काय चाललंय माझ्या मनात ते..म्हणूनच त्यांनी प्रश्न केला असावा-

“डॉ.शहांना भेटलात का?”, अर्थात आम्ही डॉ.शहांना भेटायला निघालोच होतो. तर डॉ.शहांशी देखील बोलणं, भेटणं झालं. त्यांनी थोड्या वेळानंतर आई बाबांना बाहेर बसायला सांगितलं.त्यांना फक्त माझ्याशी गप्पा मारायच्या होत्या. मी जेव्हा जेव्हा डॉ.शहांशी बोलते तेव्हा तेव्हा मला असं वाटतं की मला अशीच सासू हवीय. म्हणजे समजा मी भविष्यात जर कधी लग्न करायचं ठरवलंच तर…असो विषयांतर होतंय. मग मला डॉ.शहा म्हंटल्या की “गार्गी, तू खूप जास्त खुश दिसत नाहीयेस? अगं इतके दिवस ज्यासाठी तुझी ट्रीटमेंट सुरू होती त्या ट्रीटमेंटला यश आलं..तुला फायनली मासिक पाळी आली. मग असं असताना तू अशी नाराज का?”

मी काय उत्तर देणार होते यावर, मुळात मी काय काय सांगणार होते…आई बाबा किती पागल झाले आहेत माझं लग्न करण्यासाठी..पिरियड्स यावे असं त्यांना वाटायचं ते ह्याच कारणासाठी…किती अपमानही सहन केला त्यांनी… पण मला इतक्यात लग्न करायचं नाहीये..मला समजत नाहीये काय करावं..म्हणजे त्यांनी इतके दिवस मला साथ दिली..आम्हा सर्वांच्याच आयुष्यात या गोष्टीमुळे खूप अप्स अँड डाऊन्स आले..मग मी आता त्यांचं म्हणणं निमुटपणे ऐकू? की सर्वांचा विरोध पत्करू?..काल रशम्याशी मनातल्या या गोंधळाबाबत बोलले..बया अपेक्षित उत्तरली

“गार, तुझं मन जे मनापासून सांगतंय तेच कर, आपलं इस्टिंट कधीच धोका देत नाही…दुनिया गेली तेल लावत..विचार कर..फॉलो युअर ड्रीमज”

आई उद्या अनुरूप मध्ये माझं नाव नोंदवणार आहे …काय करू? बंगलोरच्या जॉबची ऑफर स्वीकारू का?

तुझीच,

गार्गी

Image by Ralf Kunze from Pixabay 

Bhagyashree Bhosekar

Bhagyashree Bhosekar

मुळची महाराष्टात जन्म घेऊन इथेच वाढलेली भाग्यश्री सध्या बंगलोर मध्ये आयटी क्षेत्रात नोकरी करते आणि विविध माध्यमात लिखाण पण करते. मराठी लेखनामुळे तिची मराठी मातीशी असलेली नाळ तुटलेली नाही. लिखाणातून तिचा मराठी भाषेशी जोडलेली राहण्याचा प्रयत्न असतो. भाग्यश्रीला लघु कथा, दीर्घकथा लिहायला विशेष आवडतात. आत्तापर्यंत तिने दोन shortfilms साठी पटकथा लिहिली आहे. शिवाय 2017 साली तिचं बॉम्बे बिट्स नावाचं मराठी पुस्तक प्रकाशित झालं आहे. याव्यतिरिक्त अवांतर वाचन हा तिचा छंद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!