आनंदाचा सेल्फी….
या महिन्यात काही झाले तरी फोन घ्यायचाच अशा निर्धाराने कल्पना ऑफिसमध्ये आली. ऑफिसमधून वळून डावीकडे गेलं की तिची आवडती बसण्याची जागा होती. कल्पना खेळण्यांच्या कंपनीत काम करत असे. तिची कंपनी लाकडापासून बनवलेली, मुलांना अभ्यासाची गोडी लागावी म्हणून विविध प्रकारची खेळणी तयार करत असे. कल्पनाला या कारखान्यात तिच्या आईने चिकटवले होते. हुशार होती ती तशी. पण फर्स्ट इयर नंतर शिक्षणाची गाडी रेंगाळायला लागली. लग्नासाठी मुलेपण सांगून यायला लागली. शिकायचे नसेल तर तिचे काय करावे जरा प्रश्नच पडला होता तिच्या आईवडिलांना. लग्न करून द्यायलाही त्यांची ना नव्हती पण पहिल्यांदा जेव्हा मुलगा बघायला आला तेव्हा कल्पनाने रडून गोंधळ घातला. त्यामुळे तिच्या मनात नसेल तर राहू दे म्हणून मुले बघण्याचा कार्यक्रम स्थगित केला गेला. घरात बसून राहण्यापेक्षा इथे काम केले म्हणजे चार पैसे तरी मिळतील या हिशोबाने तिच्या आईने तिला या कामासाठी सुचवले. तिची आई या कामावर झाडूपोछा करत असे. एकदा कामाला मुली पाहिजेत इथे कळल्यावर तिने परस्पर मालकाची भेट घेतली आणि चाळीस रुपये तासावर पोरीची नेमणूक करूनच ती घरी आली.
कल्पनाची कामावर जायला अजिबात ना नव्हती. तशीही ती घरात बसून कंटाळली होती. चार पैसे मिळाले तर तिले हवेच होते. घरातही अडचण सुरूच असायची. पाहता पाहता एक महिना झाला. महिनाभर काम केल्याचे रोजचे आठ तासांचे पैसे कल्पनाला मिळाले. ती खूष झाली. जवळ जवळ उड्या मारतच ती घरी आली. कल्पनाची धाकटी बहीण आणि भाऊ दोघेही शिकत होते. त्या दोघांमध्ये मिळून घरात एक मोबाईल होता. दोघांचेही लेक्चर्स, अभ्यास, प्रॅक्टिकलच्या वेळा असे सगळे मोबाईल वर येत असे. त्यासाठी दोघांनाही मोबाईलची गरज होती. कल्पनाचे तसे नव्हते. ती घरीच असे त्यामुळे तिला मोबाईलची गरज नव्हती. उगाच का पैसे खर्च करायचे, ते दोघेही घरी असताना त्यांचा फोन तू वापर असे तिला सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे ती सुट्टी असली की मोबाईल घेऊन बसे. पण त्यावर भावाच्या मित्रांचे फोन, बहिणीचे निरोप असे येत असल्याने तो क्वचितच तिच्या हातात पडे. तिची तक्रार होती असेही काही नव्हते. पण तिला तिचा तिचा फोन हवा होता. तिने बघूनही ठेवला होता शेजारच्या गल्लीतल्या दुकानात जाऊन. निळ्या रंगाचा होता. कंपनीचे नाव तिला कळले नव्हते पण चांगला मोठा स्क्रीन होता त्याचा. एकदा बहिणीला घेऊन ती दुकानात गेली. दुकानदाराने तिला फोन चालू करून दाखवला. तिने मऊ हातांनी तो हाताळला आणि परत ठेवून दिला. घेतला तर हाच फोन अशी तिने मनाशी खूणगाठ बांधली.
त्यामुळेच आज ती खूष होती. हातात तीन हजार आले होते तिच्या. फोन बुक करून नंतर घेऊन जा असे दुकानदार म्हणाला होता तिला. त्यामुळे लगेचच वडिलांना घेऊन दुकानात जायचे आणि फोन घेऊन यायचे तिने ठरवले. त्या विचारातच ती भरभर चालत घरी आली.
“आई बाबा कुठे आहेत?”
“अजून आले नाहीत. का ग?”
“अगं त्या दुकानात जायचंय मोबाईलच्या. तो म्हणलं होता दुकानदार. थोडे पैसे भरून फोन घेऊन जा आणि नंतर हप्त्याने उरलेले पैसे द्या म्हणून”
“कल्पना आता फोन नको घेऊ.”
“अगं पण मला घ्यायचाय.”
“नको म्हणले ना”
“का पण?”
“शरुची फी भरायचीय या आठवड्यात. त्याचीच सोय करायला गेलेत बाबा. तिची फी भरली तरी घरात पैसे लागतील. आज पगार झाला असेल ना तुझा?”
कल्पनाने आईकडे बघितले. आईच्या रापलेल्या चेहऱ्यावर घाम साचला होता. एका बाजूच्या अंधाऱ्या स्वयंपाकघरात आई पोळ्या करत होती. खिडकी उंचावर असल्याने तिथे वारे यायचा प्रश्न नव्हता. बाहेरच्या खोलीत शरु आणि विकास अभ्यास करत होते. कल्पना काही बोलली नाही. ती बाहेर आली. तिने पर्स उघडली. पैसे काढून आईकडे दिले.
“अगं पहिला पगार तुझा. देवापाशी ठेव.” आई पोळ्या करता करता म्हणाली.
“ठेव तुझ्या हाताने”, असे म्हणून कल्पना बाहेर आली.
दीड खोलीतल्या वस्तूंकडे ती आळीपाळीने बघत राहिली. विकास फोनवर बघून काहीतरी लिहून घेत होता. शरु वहीत काहीतरी लिहीत होती. दोघे अभ्यास करतायत म्हणजे आपल्याला आता टीव्हीपण बघता येणार नाही हे एकदम लक्षात आले तिच्या. आता भल्याथोरल्या संध्याकाळी करायचे काय हा प्रश्नच उभा राहिला.
“मी टीव्ही लावू का रे थोडा वेळ?”
“लाव की” विकास म्हणला
“नको” शरु ओरडली. “तुला काय जातंय लाव म्हणायला? मला अभ्यास करायचाय. उद्या मला प्रोजेक्ट पूर्ण करून द्यायचा आहे हा.”
“अगं पण …” विकासने कल्पनाच चेहरा बघितला. त्याने फोन तिच्या हातात दिला.
“बघ काय बघायचे ते यावर. माझा कुठला निरोप येण्याची शक्यता नाहीये. माझे मित्र आपापल्या गावी गेलेत आहेत.”
कल्पनाने त्याच्या हातातून फोन घेतला. तिने कानात इयरफोन घातले. युट्युबवर ती गाणी शोधायला लागली. इतक्यात फोन वाजला. विकासच्या मित्राचा होता. कल्पनाने फोन त्याच्याकडे दिला. विकास फोन घेऊन इयरफोन घालून बाहेर गेला. आता काही तो लवकर येत नाही हे कल्पनाला कळून चुकले. शेवटी ती आईला मदत करायला म्हणून उठली. आत जाऊन तिने आईच्या हातातून पोळपाट लाटणे काढून घेतले आणि ती खाली मान घालून पटापटा पोळ्या लाटायला लागली. तिचे काहीतरी बिनसलंय हे तिच्या आईच्या लक्षात आले. पण कामे झाली हातातली की बोलू तिच्याशी असा विचार करत त्या एकीकडे आवरायला लागल्या. कल्पनाचे बाबा यायची वेळ झालीच होती. ते आले की सगळे जेवायला बसत. मग एकत्र एखादी सिरीयल बघत. आणि मग अकराच्या आसपास दिवे मालवले जात.
आज जेवायला बसल्यावर कल्पना मान खाली घालून शांत जेवत होती. एरवी तिची काहीतरी बडबड सुरु असे. तिचे गप्प गप्प असणे तिच्या बाबांच्या लक्षात आले.
“काय झाले बाळा? तू अशी गप्प गप्प का?”
“नाही हो बाबा. काही नाही. आज काम खूप होते. त्यामुळे दमलेय खूप.”
“बरं मग जेवून घे आणि पड जरा.”
कल्पनाने मान हलवली. शरुचा अभ्यास असल्याने ती पटकन जेवण करून अभ्यासाला बसली. म्हणजे आता दिवा बराच वेळ चालू राहणार हे साहजिक होते. कल्पनाने तिची चादर उशी उचलली आणि ती स्वयंपाकघरात जाऊन आईच्या शेजारी पडली. आईने तिच्या डोक्यावर मायेने थोपटले. कल्पनाच्या डोळ्यात पाणी आले. ती आईचा हात पकडून चेपत राहिली.
“बरं वाटतंय का आता?” आईचा हात भरून येतो तिला माहित होते.
“हो बाळ बरं वाटतंय आता. नाराज नको होऊस आणि. आपण घेऊ तुला मोबाईल नंतर.”
“हो आई, बघू नंतर काय करायचे ते. झोप आता. दमली असशील तू पण.”
पलीकडे बाबा जागेच होते. पाठ फिरवून झोपलेले असल्याने ते झोपलेत की जागे आहेत ते कळत नव्हते. पण बहुतेक झोपले असावेत असं कल्पनाला वाटले. ती पण आईचा हात पकडून झोपी गेली.
दुसऱ्या दिवशी पाणी भरून ठेवणे, स्वयंपाकात मदत करणे, ऑफिससाठी आवरणे यात सकाळ कधी संपली ते कल्पनाला कळलेच नाही. बस चुकेल म्हणून तिची गडबड सुरु होती.
“आज मी सोडतो तुला कंपनीत” बाबा म्हणाले.
आज बस मध्ये धक्काबुक्की करायला लागणार नाही या विचाराने कल्पनाला बरं वाटले. ती गाडीवर बसली. गाडीवर लागणाऱ्या वाऱ्याने तिला प्रसन्न वाटले. डोक्याचा स्कार्फ तिने थोडा सैल केला. ट्रॅफिक असले तरी आज बाबांच्या मागे बसून जाताना तिला सुसह्य वाटत होते.
“मला आज शाळेत गेल्यासारखे वाटतंय बाबा”
“का ग?”
“असेच शाळेत सोडायचात ना तुम्ही आम्हाला.”
“हो ना. आणि मग गेटपाशी उतरल्यावर तू नेहमी माझ्या गळ्यात पडून टाटा म्हणायचीस मला.”
“हो ना.” कल्पनाला हसूच फुटले आठवून.
“आणि मग तुम्ही गाडी लावून दप्तर घेऊन शाळेत यायचात.”
“मग तू मोठी झालीस. मग गळयात पडून टाटा करायचे पण विसरलीस.”
कल्पनाने हळूच त्यांच्या खांद्यावर थोपटले.
कंपनीपाशी आल्यावर ती गाडीवरून खाली उतरली. दोन पावले पुढे गेल्यावर ती अचानक मागे वळली.
“बाबा”
तिचे बाबा थांबले.
“काय ग?”
“तिने एकदम बाबांच्या गळ्यात हात घातले.”
“टाटा” ती मागे होत म्हणाली.
बाबांनी तिच्याकडे टक लावून पाहिले. क्षणभर त्यांच्या डोळ्यात पाणी आले.
“कल्पना”
“ओ बाबा.”
“बेटा तुला फोन घ्यायचाय ना? तू पैसे जमवतेयस आणि घरात द्यायला लागतायत ना?”
“नाही ओ बाबा. घर पण माझेच आहे ना. त्यात काय? फोन घेऊ परत कधी. आता सगळ्यांची फी भरायचीय आणि तुम्ही आणि आई तरी किती काम करणार? बरं मी जाऊ आता?”
बाबांनी मान हलवली. कल्पना वळली. बाबा तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिले. मग भानावर येऊन त्यांनी गाडीला किक मारली.
कल्पनाने मोबाईलचा विषय डोक्यातून काढून टाकला. ती नव्या जोमाने कामाला लागली. आतापासून चांगले काम केले तर चांगला बोनस मिळाला असता. मग घरात एक पंखा लावून घेतला असता. किंवा मग एक चांगला मिक्सर आला असता. बाबा पण सध्या फर्स्ट आणि सेकंड अशा दोन शिफ्ट करत होते. कल्पना दर महिन्याला घरी पैसे देत होती. तसा तिचा खर्च काही फार नव्हता. अधून मधून बहीण आणि ती मिळून एखादा टॉप घे, पिना घे असली फुटकळ खरेदी करत असत फारतर. बसचे पैसे आणि लागलेच वरती तर असूदे म्हणून शंभर दोनशे रुपये यापलीकडे तिला पैसे लागत नसत. कंपनी जवळ नसली तरी लांबही नव्हती फार. एकदा खूप पाऊस पडल्यावर बस मिळेना तेव्हा ती चालत आली घरी. अर्धा तास लागला तिला घरी पोचायला. तेव्हापासून पाच दहा मिनिटात जर बस मिळाली नाही तर ती सरळ चालायला सुरुवात करत असे. तेव्हढेच चालणेही होते असे तिने आईला सांगितले. येताना कधी भाजी दिसली तर ती घेऊन येत असे. पोरगी एकदम समंजस झालीय पैसे मिळवायला लागल्यापासून आईच्या मनात आले. गणपतीला कल्पनाने खास स्वतःच्या हाताने डेकोरेशन केले. चकमकत्या रिबिनी, गणपतीच्या मागे लावायचे चक्र, फुले, मोदकाचा प्रसाद कल्पनाच्या हौसेला मोल नव्हते. त्याच आसपास तिचा वाढदिवस असल्याने शरुने तिला एक पर्स दिली छान. आदल्या महिन्यात ती आणि कल्पना बाजारात गेल्या होत्या तेव्हा कल्पनाला आवडली होती ती पर्स. शरुच्या लक्षात होते. कल्पना हरखली. तिने लगेच पर्स खांद्याला अडकवून घरातल्या घरात मिरवून घेतले. मग तिने वर्तमानपत्रात गुंडाळून ती पर्स नीट कपाटात ठेवून दिली.
“अगं तुला वापरायला आणलीय ती” शरु म्हणाली.
“अगं होईल दिवाळीत मलाच. आणि जुनी पर्स छान आहे की अजून.”
आईने बाबांकडे बघितले. ते त्या दोघींकडे बघत होते. ते उठले आणि बाहेर गेले. आईला कळले. तिनेही हळूच स्वयंपाकघरात जाता जाता डोळे पुसले.
आज दिवाळीचा बोनस मिळाल्याने कल्पना खूष होती. तिने मिक्सरची चौकशी करून ठेवली होती. कंपनीतून ती तिकडेच जाणार होती. कधी एकदा कामावरून सुटत असे झाले होते तिला. संध्याकाळी ऑफिसमधून ती निघाली. भरभर चालत ती दुकानात आली. तीन चार मिक्सरची मॉडेल्स तिने पाहिली. एक फूड प्रोसेसर मिक्सर निवडून तिने बिल दिले. ती फारच खूष झाली. आता आईचा हात दुखत असताना तिला कणिक मळावी लागणार नाही याचा तिला फार आनंद झाला. तिच्या कंपनीत काम करणाऱ्या तिच्या मैत्रिणीने तिला प्रोसेसरबद्दल सांगितले होते. तिच्या घरी तोच असल्याने तिने नावपण सांगितले होते प्रोसेसरचे. ते लक्षात ठेवून कल्पनाने दुकानदाराला ते सांगितले होते. तिचे ठरले असले तरी घ्यायच्या आधी तिने दुकानातून एक चक्कर मारली. पलीकडेच मोबाईलचा काउंटर होता. तिथे गर्दीही खूप होती. ती त्या गर्दीकडे बघत उभी राहिली क्षणभर. तिथून बाहेर पडणाऱ्या एका माणसाच्या हातातला मोबाईलचा डबा बघून ती चमकली. तिला आवडलेला निळा मोबाईल होता त्याच्या हातात. कल्पना निग्रहाने मागे वळली.
मिक्सरचा बॉक्स घेऊन ती दुकानातून बाहेर पडली. आज तिला रिक्षाने जाणे शक्य होते. कधीतरी जावे की असा विचार करून तिने रिक्षाला हात केला. शिवाय एव्हढा मोठा मिक्सरचा खोका हातात घेऊन चालत जाणे अवघडच होते. ती घरी आली तेव्हा बहीण पणत्या लावत होती. ती घरात शिरली. बाबा अजून आले नव्हते.
“आई बाबा कधी येणार आहेत?” तिने स्वयंपाकघरात शिरता शिरता आईला विचारले.
“अगं आज थोडा उशीर होईल त्यांना यायला. बस तू. चहा करते तुझ्यासाठी.”
कल्पना हातापायावर पाणी घेऊन शांत बसली जरा. बाहेर आकाशकंदील खूप सुंदर दिसत होता. त्याला लावलेल्या जिलेटीन मधून त्याचा रंगीबेरंगी प्रकाश पसरला होता. खिडकीत लावलेली इलेट्रीकची माळपण मस्त दिसत होती. कल्पना दिवाणावर पाय जवळ घेऊन बसली. तिला खूप मस्त वाटत होते. तिच्या शेजारीच मिक्सरचा खोका होता. आई आतबाहेर करत असली तरी तिचे लक्ष नव्हते गेले अजून. कल्पनाने उशी ठेवली खोक्यावर आणि ती त्याला टेकून बसली. सगळीकडे छान दिवाळीचा कमीअधिक प्रकाश भरून राहिला होता. तिला कवडशांमध्ये बसल्यासारखे वाटत होते मस्त. इतक्यात शरु आणि विकास दोघेही आत आले. दोघांच्याही हातात पिशव्या होत्या. बाबा आले वाटते कल्पना मनात म्हणाली. आता तिला कधी एकदा बाबा घरात येतायत असे झाले. बाबा घरात शिरले. कल्पना त्यांच्याकडे बघून छान हसली.
“अरेच्या तू माझ्याआधी कशी काय आलीस?”
“लवकर निघाले जरा कंपनीतून.” कल्पना म्हणाली. तिने त्यांना पाणी दिले. दोन घोट पाणी प्यायल्यावर त्यांना जरा बरं वाटले.
“जा बोलावं सगळ्यांना.”
सगळे येईपर्यंत त्यांनी कपडे बदलले. ते फरशीवर ऐसपैस मांडी घालून बसले. आई तेव्हढ्यात सगळ्यांसाठी थोडा चिवडा घेऊन आली. ताजा केलाय सगळ्यांनी घ्या असे म्हणत तिने प्लेट मध्ये ठेवली. कल्पनाने आईकडे बघितले. आई दमलेली दिसत होती.
“आई आज रात्री मी स्वयंपाक करते. तू बस जरा. दमली असशील फराळाचे करून.”
“मी पण करते आज ताईबरोबर” शरु पटकन म्हणली.
आई हसायला लागली.
“अगं मगाशीच करून टाकला स्वयंपाक मी. तुम्ही दोघी करणार म्हणजे आम्हाला खाण्यासारखे तर झाला पाहिजे ना.”
“पण आता तुला पण खूप काम नाही पडणार आई”, असे म्हणत कल्पनाने मिक्सरचा बॉक्स बाहेर काढला.
आईचे डोळे विस्फारले.
“अगं इतका खर्च कशाला करायचा कल्पना?” तिने एकदम काळजीच्या आवाजात विचारले.
“अगं राहू दे आई. तुझा हात भरून येतो ना रोज.” तिने पैशाचे पाकीट बाबांच्या हातात दिले. “आणि बाबा हे तुमच्यासाठी.”
वातावरण एकदम गंभीर झाले. कुणालाच काय बोलावे ते कळेना. कल्पनाने आठवणीने प्रत्येकासाठी काही ना काही आणले होते.
तिच्या चेहऱ्यावर आनंद अगदी ओसंडून वाहत होता. तिची अखंड बडबड चालू होती.
“अगं हो हो किती बोलशील.” बाबा म्हणाले तशी ती भानावर आली.
“कल्पना मी पण तुझ्यासाठी काहीतरी आणलय.”
कल्पनाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले. बाबानी हळूच एक छोटासा बॉक्स तिच्या हातात दिला.
“बघ तरी काय आहे ते.” विकास म्हणाला.
कल्पनाने बॉक्स उघडला. आतमध्ये एक सुंदर भल्यामोठ्या स्क्रीनचा लेटेस्ट मोबाईल होता. त्याच्या कडा तर छान गुळगुळीत होत्या. तिने पाहून ठेवलेल्या निळ्या मोबाईलपेक्षा कितीतरी भारी होता हा फोन.
“अहो बाबा कशाला इतका महागाचा फोन मला? नंतर घेतला असता ना आपण”
“कल्पना तुला मोबाईल घ्यायचा होताच ना.”
“हो पण तशी काही गरज नव्हती आताच घ्यायची.”
“तू अजूनही माझ्या गळ्यात पडून टाटा म्हणणारी माझी छोटीशी कल्पनाच आहेस. पण तू मोठी झालीस एकदम गेल्या सहा महिन्यात. इतकी पटकन पण मोठी होऊ नकोस बाळा.”
बाबांच्या डोळ्यात पाणी आले. आईनेही पदराने डोळे पुसले. कल्पनाला काय बोलावे ते कळेना.
“बाबा…” कसाबसा तिचा आवाज फुटला.
“आणि जसे तू आमच्यासाठी काही न काही आणलेस तसेच मीही तुझ्यासाठी हा मोबाईल आणला. आवडला ना तुला?”
“म्हणून तुम्ही दोन शिफ्टमध्ये काम करत होतात का?”
“त्यात काय एव्हढे? आधीही केलेच आहे की दोन शिफ्टमध्ये काम मी.”
आता डोळ्यात पाणी यायची पाळी कल्पनाची होती.
बाबा असे म्हणत ती त्यांच्या गळ्यात पडली.
विकासने तिचा नवीन फोन सुरूही केला.
“ताई बाबा सगळे इकडे बघा. ताईच्या नवीन फोनमध्ये पहिला सेल्फी आपल्या सगळ्यांचा.”
हसू आणि असू एकत्र असलेला तो सेल्फी सर्वांसाठीच एक अमूल्य ठेवा झाला.
©प्राजक्ता काणेगावकर
Image by StockSnap from Pixabay
- Kaleidoscope- मुझे तुमसे मुहोब्बत है दिवानगी की हद तक - May 28, 2021
- Kaleidoscope- लव्ह ऍक्चुअली - April 29, 2021
- Kaleidoscope- दिल तो आखिर दिल है ना - April 14, 2021
डोळे भरून आले. अतीव सुंदर. किती सुंदर बाॅन्डींग
Mastach aanandacha selfie 😊👌
पाणी तरळलच डोळ्यांत …
खरच फारच छान
वाचताना डोळे भरून आले…माहेरच्या परिस्थितीची आठवण झाली ….आमच्यात पण असेच bonding आहे
❤️❤️❤️
खूप सुंदर… डोळे पाणावले
धन्यवाद 🙏
Nice one…
Khoopach chaan
Khoopach chaan
खुप छान
Khup Chan! Dole bharun aale.asatat asha families ekmekana samjun ghenarya
सुंदर घरटे
अप्रतिम
खूप छान…