पावसाच्या नावानं….

सकाळी  जाग आली.
पावसाच्या अंगात ऊस्ताद आलेले असावेत.
ताडताड ताडताड तबला बडवणं चाललेलं.
रियाझ बहुतेक  रात्रभर चालला असावा.
खिडकीतून बाहेर बघितलं , तर सोसायटीचं गेट पाण्यात अर्धेमुर्धे पाय बुडवून बसलेलं.
भोवतालचं सगळं जग  वर्षातली पहिली आंघोळ करत होतं.
झालं….
ही आमची पूररेषा.
ती ओलांडली गेली म्हणजे पुढच्या चौकात दाल लेक अवतरलं असणार.
गाड्या बंद पडणार.
ट्रॅफिकचा मुरांबा .
बोंबललं…
आज काय मी आॅफिसला  जाऊ शकणार नाही.
क्लायंट तिथे पोचलेला असणार.
बाॅस माझ्या नावानं जपाच्या माळा ओढणार.
आठवतील तेवढ्या शिव्या पावसाच्या खात्यात भरल्या.
हिला पावसाची चाहूल आधीच लागलेली असावी.
पाणी भरलेलं पाहून हिला भरून आलं.
एखाद वेळी  नेहरानं सेंच्युरी मारल्यावर ,त्याचं तोंड भरून कौतुक  करावं, तसं हिनं पावसाचं कौतुक केलं.
पोरांना सांगून आली , झोपा निवांत.
आज शाळेला सुट्टी.
घाईला सुट्टी.
आॅफिसला सुट्टी.
ही रिटायर्ड  माणसासारखी पाऊसगाण्याला निवांत दाद देत होती.
इकडे मी अत्यवस्थ.
तेवढ्यात ही म्हणाली , थांबा मस्त  अद्रकवाली चाय बनाती हूँ.
माझ्या घशाला कडकडून चहाची तहान.
ब्रश मी माझ्या  दातावर आणि  हिनं माझ्या आशेवर…
एकदमच फिरवला.
दूध संपलंय…
इतक्या पावसात आप्पा  काय यायचे नाहीत.
सो…. नो चाऽऽय.
माझ्या हार्टच्या सिलेंडरातला आॅक्सीजन संपल्यासारखा वाटलं.
एकदम बेल वाजली.
रेनकोट घालून आप्पा हजर.
साक्षात परमेश्वर  दूधगंगा घेवून आल्यासारखं वाटलं.
 ते नको नको म्हणत असताना सुद्धा  हिनं आप्पांना चहाला थांबवलं.
एवढ्या पावसात यायचं काय अडलं होतं आप्पा ?…
माझा भिजका प्रश्न.
….व्वा , आसं कसं चालेलं ? पाऊस तर ईस्वर आमचा.
तिकडं गावाकडं रूसला , म्हणून तर रान सोडून  इकडं यावं लागलं.
तेला नगं येवू कसं म्हनू ?
आणि  आपण थांबून कसं चालेल ?
येताना पावसाच्या थेंबात दोन आसू मिसळले  आमचं.
इकडं बरसतोयस तसा तिकडं बी बरस रे बाबा.
ईकडं येताना वाटलं की पहिल्या  पावसात , घोंगडं घेवून मी लावणी कराया चाललूया.
मग उठलो आणि  आलो…..
मला एकदम मंगेश पाडगावकर  झाल्यासारखं वाटलं.
वाटला , तुमचा आमचा पाऊस सेमच.
वर्षभराचं गणित सोडवणारा.
आनंदी चिंब भिजवणारा.
मला एकदम तो माझा फास्ट फ्रेन्ड वाटायला लागला.
मगाचच्या शिव्या मी गुपचूप गिळून टाकल्या.
आप्पांना म्हणलं थांबा जरा.
पटकन आवरलं.
रेनसूट चढवला.
आप्पा , सायकल डबलसीट घेईल का ?
आप्पांचा होकार गृहीत धरून डबलसीट स्टेशनवर निघालो.
माझ्या मनात ऊत्साहाची लावणी फेर धरत होती.
टिंग टिंग टिंग…….
माझ्या मनात आॅफिस जन्माला येत होतं.
मेघा रे …
मेघा रे….
……..कौस्तुभ केळकर नगरवाला
Kaustubh Kelkar
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)

Kaustubh Kelkar

कौस्तुभ केळकर ह्यांनी बीई (इलेक्ट्रिकल) तसे बीजे (जर्नालिझम) असे शिक्षण घेतले आहे. गेली अनेक वर्ष ते अहमद नगर येथे भौतिकशास्त्राचे क्लासेस चालवतात. फेसबुकवर कौस्तुभ केळकर नगरवाला ह्या नावाने परिचित असलेल्या कौस्तुभ ने अनेक कार्यक्रमांचे लेखन, निवेदन आणि सुत्रसंचलन केले आहे. हसरी दिवाळी तसेच कथुली ह्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. लोकसत्ता, सकाळ, लोकमत अश्या अनेक दैनिकांमधून विपुल लिखाण केले आहे. तसेच त्यांचे कथुली नावाचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे.

3 thoughts on “पावसाच्या नावानं….

Leave a Reply to minal Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!