लोकल प्रेम कहाणी….

लोकलच्या जनरल डब्यात गर्दीतून प्रवेश करताना आपल्या दोन्ही लुकड्या हातांचा विळखा घालून तो तिला एकदम सुरक्षित करतो. ती पण प्रचंड कौतुकाने, थोडी बेफिकीर होत त्याच्या छातीला आपली पाठ घासत गर्दीतून वाट काढत, मंद हसत पुढे सरकते. तिच्या पुढे तिचे रक्षण करत असलेले त्याचे दोन हात वाटेतील अडथळे ढकलून दूर करत असतात. शेवटी एकदाची दरवाज्याच्या बाजूला असलेल्या जाळीजवळ तिची पाठ टेकवून तो आपल्या बाहूंची तटबंदी तिच्या सभोवार बांधून आपले दोन्ही हात पूर्वी मुलं भोज्जा करताना ठेवायची तसे ठेवतो. ट्रेन सुटते.
वाऱ्याने उडणारी बट तशीच उडू देत ती तिचे पिंपल्सनी फुललेले गाल आरक्त करत, डोळ्यात टकमक कौतुक साठवून त्याच्या डोळ्यात बघत, वरची दोन बटणे उघडी असल्याने त्याच्या छातीच्या इटुकल्या पिंजऱ्यावर आपली पिटुकली नाजूक बोटं सैलसर फिरवत त्याला तो आरनोल्ड श्वाझनेगर असल्याचा फील देत हसत असते. तो देखील केसांचा तपेली कट करून बाळगलेली त्याची सोनेरी रंगाने ब्लिच केलेली शेंडी वाऱ्यावर उडवत आपला कचकड्याचा सप्तरंगी गॉगल आराधानामधल्या राजेश  खन्नासारखा खाली सरकवून तिच्याकडे आणि तिच्या घामाने भिजलेल्या, पोपटी रंगाच्या स्लिव्हलेस टॉपच्या छोटुल्या गळ्यातून डोकावणाऱ्या क्लिव्हेजकडे बघत तिच्या आणखी  थोडा जवळ सरकतो. तिला लगेच अवसान येत!
ट्रेन आता व्यवस्थित मार्गस्थ झालेली असते. तो मूडमध्ये येत गुढग्याच्या साधारण सव्वाचार ते पावणे पाच इंच वर नेसलेल्या, सफेद पुलच्या बाजारात घेतलेल्या नल्ल्या CK अंडरवेअरचे इलेस्टिक दाखवणाऱ्या सुरवारछाप शेंद्री रंगाच्या पँटच्या खिशातून गोवा, आरएमडी किंवा तत्सम प्रकारचे एक पाऊच काढून चेहरा वर करून ते पाऊच तोंडात रिकामे करतो. ती अनिमिष नेत्रांनी त्याचे हे तंबाखू सेवन करतानाचे रूप नजरेत साठवून ठेवत असते. तंबाखू तोंडात सेट झाल्यावर श्वाझनेगर जोमात येतो. एक नजर डब्यात उभ्या, बसलेल्या, लटकत असलेल्या समस्त पुरुषांवरून फिरवतो जशी बाबांनी आणलेली लिमलेटची गोळी एकट्याने खात असताना एखाद्या लहान मुलाने इतर मुलांना टुकटुक करावं तशी विजयी नजर! इतक्यात पुढलं स्टेशन येत. कामाचे लोक भराभर चढतात आणि उतरतात. त्या धक्काबुक्कीत ह्या दोघांना मजा येत असते. भर दुपारच्या उन्हाच्या काहिलीत गाडीतल्या लोकांना घटकाभर देशी श्वाझनेगर आणि कंट्री एन्जोलीना ह्यांचा हिंग्लिश पिच्चर छाप रोमांस फुकटात बघायला मिळून थोडा थंड हवेचा शिडकावा अनुभवायला मिळतो इतकंच!- मंदार जोग
Image by Free-Photos from Pixabay 
mandar jog

mandar jog

मंदार जोग ह्यांची कटिंग पिनाकोलाडा, वन बाय टू मार्गारिटा आणि कोनिएक कथा ही तीन पुस्तक प्रकाशित झाली असून त्यांच्या साडेचार हजार प्रती छापील आणी इबुक स्वरूपात विकल्या गेल्या आहेत. दृकश्राव्य, प्रिंट तसेच सोशल मिडीयावर मंदार जोग नियमित लिखाण करत असतात. लेखक ऑनलाईन ह्या संकल्पनेला सत्यात आणणाऱ्या टीमचा मंदार जोग एक हिस्सा आहेत.

One thought on “लोकल प्रेम कहाणी….

  • June 30, 2019 at 10:42 am
    Permalink

    मस्त हीरो हीरॉईन.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!