हनीमून…
तो मिडलक्लास.
ती मिडलक्लास.
शुभमंगल सावधान.
साधंसंच लग्न.
आनंदात पार पडलं.
रास्ता पेठेतल्या जुन्या बिल्डींगमधलं,
अडीच खोल्यांचं घर.
आत्ता पाहुण्यांनी काठोकाठ भरलेलं.
आत्ता सगळी मंडळी घरी पोचली.
येळकोट येळकोट जय मल्हार…
नवरा नवरीनं खंडोबाचं दर्शन घेतलं.
नांदा सौख्यभरे.
तो एम काॅम झालेला.
एका पतसंस्थेत कामाला.
घरची परिस्थिती बेताची.
बी काॅम झाल्या झाल्या नोकरीला लागला.
नोकरी सांभाळून एम काॅम.
पतसंस्थावाल्यांनी खूप सांभाळून घेतला त्याला.
वडील रिटायर्ड.
आॅक्सीजनपेक्षा सुद्धा नोकरी गरजेची होती.
पगार जरा कमीच.
काम भरपूर.
तरीही..
नीकरी मिळाली हे महत्वाचं.
मित्र मागे लागले म्हणून बँकेच्या एक्झॅम्सची तयारी केली.
यावर्षी बडोदा बँकेची एक्झॅम दिलीय.
छान झालीय.
पासही झालाय.
दोन चार महिन्यात काम होईल…
100%.
तो बडोदा बँकेत नोकरीला लागला की..
सगळं जग म्हणणार ,
नव्या नवरीचा पायगुण !
त्यानं मान मोडून केलेला अभ्यास ?
चालतंय की !
तो आणि ती.
आता वेगळे थोडीच आहेत..?
तोवर भैरवनाथ पतसंस्था जिंदाबाद.
एक छोटासा प्राॅब्लेम झालाय.
मी म्हणलं ना…
पगार कमी, काम भरपूर.
सुट्टीच्या नावानं चांगभलं !
कशीबशी चार दिवसांची सुट्टी.
लग्नाआधी दोन दिवस.
लग्नाचा दिवस.
आणि आज जेजुरीला जाऊन आले तो दिवस.
संपली सुट्टी !
हनीमून ?
ठेंगा !
तसाही तो काय तिला स्विझर्लंडला घेऊन जाणार नव्हता.
निदान महाबळेश्वर तरी.
ते जमलं असतं नक्की.
परवडणेबलही होतं.
आत्ता बँकेची नोकरी असती तर ?
चांगली पंधरा दिवस सुट्टी मिळाली असती..
बँकभरती होईपर्यंत हनीमून लांबवायाचा की काय ?
काहीही…
काय करायचं ?
घर पाहुण्यांनी फुगलेलं…
पंडितकाका.
त्याच्यासाठी प्रत्यक्ष देवच.
आत्ताच घरी येवून गेले.
” बंड्या, दोन दिवस गावाला चाललोय..
लेकीकडे हैद्राबादला.
दुरांतोचं कन्फर्मड टिकीट मिळालंय.
आम्ही दोघंही जातोय.
साडेपाचची गाडी आहे.
जाताना तुला किल्ली देवून जाणार..”
नंतर हळूच डोळे मिचकावून म्हणाले.
“आमच्या घरात एन्ट्री,
फक्त तुम्हाला दोघांनाच.
मजा करा..
एन्जाॅय दी हनीमून !”
तो जरासा लाजलाच.
थँक्यू म्हणायचंही सुचलं नाही त्याला.
हुश्श…
तो खूष.
एकदम हवेत.
हळूच त्यानं ही गंमत त्याच्या नव्या नवरीला सांगितली.
ती लाजून चक्काचूर..
मन में लड्डू फुटा..
दोघांच्याही मनात.
साडेपाच वाजता पंडित काका काकू गेले.
किल्ली हातात आली.
बिल्डींगमधले त्याचे जवळचे मित्र.
मंडळाचे कार्यकर्ते.
काही अनुभवी , काही नवखे..
कामाला लागले.
शेजारच्या फ्लॅटमधली बेडरूम.
फुलांनी सजली.
मंदधुंद निशिगंधाच्या माळा.
गादीवर गुलाबी पाकळ्यांची पखरण.
चांदीचा ग्लास.
केशराचं दूध.
ती आधीच पलीकडे जाऊन बसलेली.
मित्रांच्या घोळक्यातला तो..
साडेदहा वाजता पलीकडच्या फ्लॅटमधे शिरतो..
चावट शेरेबाजी.
तो या कानाने ऐकतो आणि,
त्या कानाने सोडून देतो.
तो दरवाजाला कडी लावतो.
आणि..
बाकी सगळं नेहमीसारखंच.
सकाळी सकाळी ती हळूच, पलीकडच्या आपल्या घरात शिरते.
बांगड्यांचा किण्ण आवाज करत चहाचं आधण ठेवते.
” आई, चहात साखर किती चमचे ?”
चला..
संपला हनीमून.
झाला संसार सुरू..
” काकू, चहा घे हो…”
पंडितकाकांनी काकूंच्या हातात चहाचा कप दिला.
” लागली का झोप ?”
“लागली तर.
मस्त घोरत होते मी..”
‘ वा वा!
माझीही मस्त झोप झाली..’
दोघंही एक नंबरचे खोटारडे.
म्हणे लागली झोप ?
रात्री साडेबारा वाजेपर्यंत वाट बघितली.
साडेपाचची गाडी.
एक तास, दोन तास, चार तास लेट.
शेवटी गाडी कॅन्सल..
घरवापसी ?
सहज घरी जाता आलं असतं.
काहीही..
वेटींगरूममधल्या खुर्चीवर बसून ,
दोघांनी मस्त अंग आंबवून घेतलं..
बैठे बैठे डुलकी समाधी.
चालतंय की !
सख्खे शेजारी असेच असणार..
काका काकू वेटींगरूममधे थांबले म्हणून..
त्या दोघांचा मोस्ट अवेटींग हनीमून पार पडला..
लग्नाचं गिफ्ट !
पंडित काका काकूंनी त्या दोघांना दिलेलं..
आणि…
त्या दोघांना माहितच नाही.
तरीही सगळे खूष.
प्रेमाचा चहा.
गोड लागतोच..!
Image by engin akyurt from Pixabay
Latest posts by Kaustubh Kelkar (see all)
- घरघर….. - October 4, 2021
- ‘स्कूल चले हम ! - September 22, 2021
- चष्मा - July 12, 2021
कौस्तुभ नेहमी प्रमाणे हलकीफुलकी छान कथा.
नेहमीप्रमाणेच भन्नाट!
छानच आहेत पंडीत काकाकाकू
Madhyam vargiyanchi Katha nemakya shabdat mandaliy👌😊
मस्त
मस्तच
कौस्तुभजी, मस्तच….
कौके आलो बाबा तुला आणि तुझ्या गोष्टींना शोधत शोधत इथे…कथा कशी हे वेगळं सांगायची आहे ???👌👌👌
किती गोड शेजारी
Bhari
वाह,मस्त गोड शेवट,कथुळी ही kk sir mast च.
How sweet … asa shejar milat nahi halli