पत्र क्रमांक 3
प्रिय मी,
आज रशम्या आणि मी आधी जाऊन बंगलोरच्या जॉबसाठी लागणारी सर्व कागदपत्रं आणि बाकीच्या फॉर्मलिटीज पूर्ण करून आलो. आता मोठा गड सर करायचा होता तो म्हणजे घरी ह्या बंगलोर जॉबचा बॉम्ब फोडणे.
संध्याकाळी बाबा ऑफिसमधून घरी आले, गौतमही आला त्याच्या प्रॅक्टीसहून घरी, आजी देवळातून आणि आई जिममधून आली. सगळे जेवायला बसले.
कसं असतं असं काही धक्कादायक सांगायचं असेल तर संध्याकाळी चहाची वेळ नाहीतर अशी डायनिंग टेबल वरची वेळ उत्तम. दिवस सरलेला असतो…बरंच काही घडलेलं असतं.. उद्याही बरंच काही घडेल अशी आशा घेऊन..थंड डोक्यासह माणूस घरट्यात परतलेला असतो..मग अशा वेळी आपण आपलं पिल्लू हळूचकन सोडावं..होणारे परिणाम निमूट झेलावेत ..तोवर पथारी पसरायची वेळ येते..लोकं पाठ टेकतात..रात्रभर विचार करतात..रात्रभरात विचारांच्या पावसाने जोर धरून पहाटेपर्यंत उसंत घेतलेली असते..मेंदू श्वास घेतो..आणि अंतिमतः काहीतरी कनक्लूजनला माणूस पोचतो वरचं सगळं ग्यान रशम्याने माझ्याजवळ झाडलं आणि मला घरी हे सगळं बोलायची हिम्मत आली.
ठरल्याप्रमाणे मी डायनिंग टेबलवर गौप्यस्फोट केला आणि घरात नऊ पूर्णांक सात डेसीबलचा भूकंप आला . गौतमला हे काहीसं अपेक्षित असावं त्याने सोडून इतर सर्वांनी विरोधाचा पवित्रा घेतला. आजी आणि आईनी नेहमीची ‘न जेवण्याची’ शस्त्र उगारली आणि असहकार पुकारला. बाबा आधी मला समजवण्याच्या फेजमध्ये होते नंतर त्यांनाही समजलं की मी याच्याही पलिकडे गेलेय..मला समजावून उपयोग नाही.
ती रात्र अशीच धुसफूस करण्यात सरली. सकाळी चहाच्या वेळी मातोश्रींनी विचारलं
“कधी निघायचं आहे बंगलोरला जायला?”
“आठवड्याभरात” मी उत्तरले
“अगं पुढच्या आठवड्यात तुझा वाढदिवस आहे, तो तरी करून जाणारेस नं?” मातोश्री
“नाही..आणि वाढदिवस वाढदिवस म्हणजे काय? तर मी 25 वर्षांची झाले आणि लग्नायोग्य झाले हेच सांगण्याचा दिवस नं?” मी
“तुला काही सांगायला गेलं की टांगायला निघतेस तू…” असं काहीसं बडबडत , धुसफूसत मातोश्री आत गेल्या.
इकडे मी रशम्याला मेसेज केला “तुझ्या फॉर्म्युल्याने काम केलं 😊”
तुझीच,
गार्गी
Image by Ralf Kunze from Pixabay
- सासूबाई will you be my valentine?- भाग्यश्री भोसेकर - February 23, 2020
- तुमचं आमचं प्रत्येक वेळी सेम नसत- भाग्यश्री भोसेकर - February 20, 2020
- गोष्टी लेखकांच्या –गौरी शिंदे - November 13, 2019
Interesting
आभार…पुढेही वाचत राहा