लक्ष्मी आली….
रत्ना घरी आली राहायला तसं बापू हरखला तिचा. लाडाकोडाची होती पोरगी त्याची. दोन वर्षांपूर्वी धूमधडाक्यात लग्न लावून दिले तिचे. पाव्हणे पार लांबच्या गावचे होते. रत्नाची आई म्हणालीसुद्धा त्याला इतक्या लांब देऊ नका पोरीला, पोर दुरावेल म्हणून. पण बापूने कुणाचेही ऐकले नाही. पोरींचे सासर तालेवार होते. घराला लागूनच त्यांचे वीस पंचवीस एकराचे वावर होते. काम पडायचे पोरीला पण सासरी कुठल्या पोरीला नाही पडत? नवरा आणि सासू दोघेही जीव लावणारे होते. पोरगी सुखात होती. नाही म्हणायला तिच्या आठवणीने बापूचा घास अडकायचा. रत्ना होतीच तशी. सावळी, तरतरीत, मोठ्यामोठ्या डोळ्यांची आणि कामाला वाघ. बापूला रागावणारी ती एकटीच होती घरात. बापू तिला मस्करीत माझी माय म्हणायचा. बापलेकीच्या जगात आईला पण प्रवेश नव्हता फारसा. म्हणूनच इतक्या लांबच्या स्थळी बापूने पोर दिली तरी कशी हे नवलच होते गावाला सगळ्या.
चार दिवसांपूर्वी पाव्हण्याची चिठ्ठी आली मुलीला माहेरपणाला घेऊन येतो म्हणून. बापू खूष झाला. त्याने घराची साफसफाई केली. बायकोने डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याची लगबग टिपली आणि हातानेच त्याला काय चाललंय असे विचारले. मग आता पाव्हणे येणार तर घर साफ नको का? बापूने उत्तर दिले. बायको हसली आणि आत गेली.
रत्नाच्या यायच्या दिवशी तर बापूला चैन नव्हते. त्याचे पन्नास वेळा घराच्या आतबाहेर करणे बघून शेवटी रत्नाच्या आईने त्याला पारावर पाठवले.
म्हातारा काय सुचू देईना ती स्वतःशीच पुटपुटली. पाव्हणे आले तशी तिने शेजारच्या विकासाला बापूला निरोप द्यायला पाठवले. विकासमागोमाग बापू पळतपळतच घरी आला आणि दारात रत्नाला उभी बघून तोंड भरून हसला.
“बापू कुठे गेला होता? कधीपासून वाट पाहतेय मी”, रत्ना फुरंगटून म्हणाली.
“अगं तुझी आई बसू देईना बघ मला घरात.” तिने पारावर पाठवला.
“तर तर … तुम्ही मला काही काम सुचू देईना घरात म्हणून पाठवले. आता बस दोघेजण गप्पा हाकत.” आई उठता उठता म्हणाली आणि पाव्हण्याकडे बघून हसली. पाव्हण्याला बापलेकीचे गूळपीठ माहित होते. तो हसायला लागला.
“आबा बायकोची काळजी घ्या माझ्या”, त्याने सासऱ्याला चिडवले.
“अरे लका तुझी बायको नंतर, आधी माझी पोरगी आहे ती”, सासऱ्याने टोला परतवला. “आणि आई नाही आल्या?”
“ती म्हणाली तुमच्याकडे यायचे म्हणजे बैलगाडीतून. सहन नाही होत या वयात”
ते पण खरंच आहे म्हणा पुटपुटत बापूने डोके हलवले. बापूचे गाव होतेही आडबाजूला. तालुक्याच्या गावापासून खूप आत होते. तालुक्याच्या गावी पोचायलाच पाच सहा तास लागायचे गावातून. तसे गावात प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र सगळे होते. पण गावापासून दुसरे गावच मुळी तास दोन तासावर होते. कुठून बाहेरून मदत मिळण्याची फारशी अपेक्षा नसायची त्यामुळे गावकरी सगळे एकमेकांना धरून रहात. कुणाच्या घरी काम निघाले, कार्य निघाले तर सगळेजण मदत करत. एकुलती एक जीप होती गावात नाना पाटलाची. नाना तसा भला माणूस होता. अडीअडचणीला कधी नाही म्हणायचा नाही. पण त्याची पण कामे निघायची कुठे कुठे. त्यामुळे त्याची जीप कधी हाती लागेलच अशी खात्री नसायची. रत्नाला पाठवायला तिची सासू म्हणूनच तयार नव्हती. रत्नाचे दिवस भरत आले होते. ऐन वेळी दवाखान्यात न्यायचे तर गाडी जुंपणार कधी आणि नेणार कधी याचा तिला घोर लागला होता. पण रत्नाला घरी जायचे होते. तिला बापूला आणि मायला बघायचे होते. सगळी हौस पुरवली होती सासूने तिची आता तिला थोडक्यावरून नाराज करायचे सासूच्या जीवावर आले. म्हणूनच मुलाबरोबर तिने रत्नाची रवानगी माहेरी केली होती. रत्नाचा नवरा दोन चार दिवसात परत जाईन म्हणत होता. त्याला तालुक्याच्या ठिकाणी नोकरी होती आणि शिवाय घरची शेतीची कामे पण होती. त्याला निघायला लागणारच होते काही दिवसांनी तसेही.
बापूने पाव्हण्याला आग्रह करकरून जेवायला घातले. आज पोरीला त्याने स्वतःच्या पंगतीला बसवून घेतले. तिच्या पानात मायेने सायदुधाची वाटी सरकवली. पोरीला बघूनच त्याचे पोट भरले होते. ती रागावली तशी भानावर येऊन त्याने दोन घास पोटात ढकलले.
आभाळ भरून यायला सुरुवात झाली होती. बापूने लगबगीने वावरातली कामे उरकली. दमून तो लगतच्या आंब्याखाली बसला. हवा दमट झाली होती. त्याने नजर उचलून आभाळाकडे बघितले. निळा रंग हळूहळू बदलत काळाभोर होत होता. बापूने जमिनीवरून मायेने हात फिरवला. तो उठला. त्याने खांद्यावर फावडे टाकले आणि तो घराकडे चालू लागला. एका हातात आंब्याच्या उरल्यासुरल्या अर्ध्यापिक्या कैऱ्या होत्या. रत्नाने घरच्या आंब्याबद्दल विचारले होते सकाळीच. म्हणून त्याने स्वतः झाडावरून उतरवल्या होत्या. पाव्हणे रत्नाला सोडून दुसऱ्याच दिवशी निघून गेले होते. त्यांची पण वावराची कामे होती आणि त्यांना सुट्टीही नव्हती. शिवाय पुढे सुट्टी घ्यायला लागली तर म्हणून त्यांना जास्त सुट्ट्या घेता पण येत नव्हत्या. हवेचा जोर वाढला तशी त्याने पावले उचलली. पावसाने गाठायचा आत तो घरी पोचला. घरात बायको चिंतेने आभाळाकडे पहात होती.
“काय वो?” बापूने विचारले
“आता कसे करायचे वो? पोरगी सकाळपासून तळमळतेय” बायकोच्या आवाजातली चिंता बापूला भिडली.
“काय होत नाही अजून एखाद दिवस. आणि आता आलाच पाऊस तर काय करणार?”
“अहो हो पण काळजी लागलीय मला”
“होईल सोय चला दोन घास खाऊन घेऊया”. असे म्हणत बापू घरात शिरला.
घरात शिरल्या बरोबर घरातली काळजी त्याला जाणवली.
“अहो” बायकोने मागून हाक घातली
“काय झाले?”
“रत्नाला फारच कसतरी होतंय हो.” आता बापूच्या काळजाचा ठाव सुटला. तो पळत सोपा ओलांडून आतल्या खोलीत पोचला. रत्ना चिंब घामेजली होती.
“बापू”
“ओ पोरी.”
“पोटात दुखतंय खूप.”
“वेळ आली का हिची?” बापूने चिंतेच्या सुरत बायकोला विचारले.
“नाही खरं. पण सकाळपासून दुखतंय म्हणतेय.”
“आणि तू आता सांगतेस मला?” बापू सणकला.
“अहो होत से अधून मधून.”
बापूचा राग काही उतरला नाही. पण बायकोकडे दुर्लक्ष करून त्याने पोरीकडे मोर्चा वळवला.
“रत्ना”
“ओ बापू”
“लगेच जायचे का डॉक्टरकडे?”
“नको बापू. थांबूया आजची रात्र. सकाळी जाऊया वाटले तर.”
बापूने तिच्या अंगावरची गोधडी सारखी केली. तो खोलीच्या बाहेर आला. त्याने बायकोकडे एकवार बघितले. बायकोही त्याच्याकडे काळजीच्या चेहऱ्याने बघत होती.
आलोच मी म्हणत बापू वहाणा घालून बाहेर पडला. मगाशी सुरु झालेल्या पावसाने आता जोर पकडला होता. बापू पळत पळत नाना पाटलाकडे पोचला.
“नाना आहेत का घरात?” त्याने अंगणातूनच ओरडून विचारले
कोण आहे म्हणत म्हणत नानाच बाहेर आले.
“आणिक काय रे बापू? असा भिजतोयस का? ये आत ये”, नाना म्हणाले तशी बापू चटकन आत गेला.
“नाना तुमची जीप लागल दोन दिवसात. पोरीची वेळ भरत आलीय. तालुक्याला न्याव लागेल तिला.” बापू मटकन खाली बसला
“बापू अहो काही होणार नाही. काळजी करू नका. अहो बापूसाठी चा टाका थोडा”, पाटलांनी बापूच्या खांद्यावर हात ठेवत बायकोला सांगितले.
“नको चा.” बापू कसाबसा म्हणाला.
“घ्या थोडा. बरं वाटेल”, नानांनी चहाचा कप बापूपुढे धरला. बापूने मुकाट चहाचा कप रिकामा केला
“पाटील गाडी लागणार नाही ना तुम्हाला दोन दिवस?”
“नाही लागणार. घेऊन जा. आणि लागलीच तरी दोन दिवसांनी कामे करेन मी. अंगणाच्या बाजूला कैलासची खोली आहे. त्याला सांगून ठेवा. थांबा मीच येतो”.
असे म्हणत नाना बापूबरोबर खाली उतरले.
“कैलास अरे कैलास” त्यांनी हाक मारली
कैलास डोळे चोळत बाहेर आला.
“काय नाना?”
“यांच्या पोरीला तालुक्याला दवाखान्यात न्यावे लागेल बहुतेक रात्री. तू तयार रहा. दोन दिवस यांना जीप लागेल. आपली कामे नंतर करू.”
कैलासने मान हलवली. तो वळला तशी नाना हळूच बापूला म्हणाले
“बापू, ड्रायव्हर चांगला आहे पण झोपला की झोपला गडी. हाक मारून तरी उठतोय की नाही काय माहित?”
बापूने मान हलवली. गाडीची तरी सोय झाली होती. तो तसाच घरी आला. रत्नाचे तळमळणे वाढले होते. संध्याकाळची दिवाबत्ती करून रत्नाची माय स्वयंपाकघरात गेली होती. तिचा एक कान रत्नाच्या खोलीकडे होता. दिवेलागण होऊन गेली तशी अंधार पसरला. पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. आता कौलांवरून, गावातल्या रस्त्यांवरून पाण्याच्या नद्या वाहायला सुरुवात झाली होती. तशात लाईट गेले. गाव अजूनच अंधारात बुडाले. बापूने चतकोर भाकरी घशाखाली ढकलली. पांडुरंगाचे नाव घेत तो जेमतेम आडवा झाला आणि त्याच्या एकदम लक्षात आले. तो धडपडत उभा राह्यला.
“काय वो? कुठे जातंय पावसात?” रत्नाच्या मायने घाबरून विचारले.
“जाऊन त्या कैलासाच्या तिथे झोपतोय. त्याला खूप उठवायला लागतय नाना म्हणले. उठलाच नाही तर सगळी पळापळ करून उपयोग काय?”
“अहो पण तुम्हाला कळवणार कसे?”
“सदाला पाठव निरोप घेऊन.”
असे म्हणून बापू घराबाहेर पडलासुद्धा. तरातरा चालत तो कैलासाच्या खोलीपाशी आला.
“कैलासमामा वो कैलासमामा” त्याने हाका मारल्या.
कैलासने दार उघडले.
“काय वो निघायचे का?”
“नाही अजून नाही. पण मी इकडेच झोपू का तुमच्यापाशी? म्हणजे निरोप आला की लगेच निघत येईल.”
“हो झोपा की.”
कैलासमामाने बापूसाठी सतरंजी घातली. तो झोपून गेला. बापूने पांडुरंगाचे समरण केले. तो आडवा झाला. गाढ झोपलेल्या कैलासकडे बघत बघत बापूचा डोळा लागला. थोड्या वेळाने कुणीतरी गदागदा हलवतय असे वाटले बापूला. तो दचकून उठला. समोर रत्ना उभी होती.
“तू? आग पोरी तू कशाला बाहेर पडलीस आणि असल्या पावसात?” बापूला कळेचना
“बापू पोटात खूप दुखतंय. कुणाला सांगणार? सगळे गाढ झोपलेत. खूप त्रास होतोय बापू.” असे म्हणून त्याच्या खांद्यावर मान टाकून रत्ना रडायला लागली. “सहन होईना बापू मला”
“पोरी हो अगं. जरा धीराने घे. जाऊच या आपण दवाखान्यात. वो कैलासमामा वो कैलासमामा…”
बापूने हाक मारली. पण कैलास गाढ झोपला होता. बापू गदागदा कैलासाला हलवत होता. इकडे रत्ना जोरजोरात रडत होती. बापूला घाम फुटला. त्याच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या. डोळ्यादेखत पोरींचे हाल त्याला बघवेनात. त्याने रत्नाला मिठीत घेतले.
बापू बापू रत्नाचा आवाज कानात घुमायला लागला. तो जीव एकवटून ओरडला
“काय वो बापू? ओरडला का?” घाबरलेला कैलास त्याला हलवून विचारात होता. बापूला क्षणभर उमजेचना. तो एकदम भानावर आला.
“कैलासमामा गाडी काढा तुम्ही. आलोच मी.” असे म्हणून बापू उभा राहिला. कैलासने बापूकडे पाह्यले. त्याने उठून शर्ट अंगात अडकवला. बापू तिथून पळत सुटला. त्याचे घर गावाच्या दुसऱ्या टोकाला होते. गच्च भिजलेला, श्वास लागलेला बापू घरात पोचला तर रत्नाची माय दारातच उभी होती. तिच्या शेजारी सदा उभा होता.
“तुम्ही?” रत्नाची माय बापूला बघून आश्चर्याने म्हणाली.
तिला उत्तर द्यायच्या भानगडीत बापू पडला नाही. तो तीरासारखा घरात शिरला. सोपा ओलांडून तो रत्नाच्या खोलीत गेला. त्याला बघून रत्नाने हंबरडा फोडला.
“बापू मला सहन नाही होत हो. कुठे गेला होता तुम्ही”
बापूने तिला आधाराने उठवले.
चल पोरी. मी आलोय ना असे म्हणत तिला धरून तो बाहेर घेऊन आला. बाहेर कैलासमामा गाडी घेऊन उभा होता. बापूने अल्लद पोरीला गाडीत बसवली.
“आता चल की तू पण” तो बायकोवर ओरडला. रत्नाची माय पटकन गाडीत चढून बसली.
कैलासमामा अनुभवी होता. पण पावसाने त्याच्या अनुभवाची परीक्षा घ्यायचे ठरवले होते आज. सगळीकडून पाऊस रंपाटत होता नुसता. बापू पांडुरंगाचा धावा करत होता. मायचा हात गच्च पकडून रत्ना जीपच्या हौद्यात बसली होती. थोड्या वेळाने ती सिटांच्या मध्ये खाली आडवी झाली. चाकाखाली येणाऱ्या प्रत्येक दगड धोंड्याने तिचा जीव कळवळत होता. बापू अधूनमधून मागे वळून तिचा अंदाज घेत होता. पावसामुळे गाडी अजून जोरात घेणे शक्य नव्हते. पोरगी दवाखाना तरी गाठते की नाही आता बापूच्या मनात विचार आला. त्याने बसल्या जागी कुलदैवताचे समरण केले. चार तासांच्या प्रवासानंतर गाडी तालुक्याच्या दवाखान्यात पोचली.
बापूने डॉक्टर शोधला. मुलीला ताबडतोब दाखल केले. आता त्याच्या हातात वाट बघण्याशिवाय काही उरले नव्हते. तो गाडीत येऊन बसला.
“कैलासमामा उपकार झाले तुमचे” बापूने हात जोडले.
“वो बापू..उपकार काय त्यात? चला चा घेऊया” कैलासमामाने बापूला ओढून नेले.
बापूला चहा पिऊन जरा तरतरी आली. एव्हाना पाऊसही उघडला होता. रात्रभर त्याचे रुद्र रूप बघून बापू हबकलाच होता नाही म्हणले तरी. आता पावसाच्या शांतावण्याने त्याला हुश्श झाले. तो दवाखान्यात पोचला तर रत्नाची माय तिथेच मुटकुळे करून झोपली होती. त्याने मऊपणे तिला हलवली. हातात झाकून आणलेला चहाचा ग्लास तिला दिला. चहा पिऊन तिला जरा बरं वाटले.
“का वो? काल काय झाले तुम्हाला? मी सदाला पाठवायच्या आधीच तुम्ही घरी आलात”
बापूने तिला स्वप्न सांगितले. रत्नाची माय डोळे विस्फारून ऐकत राहिली. ती काही बोलेना म्हणून बापूने तिला हलवली
“काय ग? बोल की काहीतरी?”
“अहो तुम्ही यायच्या आधी रत्ना म्हणाली बापू कुठेत. मी म्हणले अगं कैलासमामाकडे आहेत. तशी म्हणाली गाढ झोपलेत सगळे. बापूंना बोलवा फक्त. बाकी कुणी नको. तिचे बोलणे ऐकून मी सदाला उठवला. त्याला निरोप देतच होते आणि तुम्ही घरी आलात.”
बापू काही बोलला नाही. समोरच्या रिकाम्या पांढऱ्या भिंतीकडे बघत त्याने आवंढा गिळला आणि अचानक तो रडायला लागला.
रत्नाच्या मायने डोळे पुसले. तिने बापूच्या पाठीवरून हात फिरवला.
नर्समावशीला त्यांच्याकडे येताना बघून बापूने पटकन डोळे पुसले. तिच्या हातात एक छोटेसे कापडात गुंडाळलेले गाठोडे होते. तिने दोघांकडे पाह्यले.
“रत्ना तुमचीच मुलगी ना?”
“हो”
“घ्या.” तिने ते गोड गाठोडे बापूकडे दिले.
बापूने हातातल्या गाठोड्यात गुंडाळलेल्या लेकराकडे बघितले.
आणि भरल्या आवाजात तो म्हणाला
“रत्नाची माय… लक्ष्मी आली वो”
Image by Regina Petkovic from Pixabay
- Kaleidoscope- मुझे तुमसे मुहोब्बत है दिवानगी की हद तक - May 28, 2021
- Kaleidoscope- लव्ह ऍक्चुअली - April 29, 2021
- Kaleidoscope- दिल तो आखिर दिल है ना - April 14, 2021
खुप गोड कथा आहे. लक्ष्मी च्या आगमनाची.
❤️❤️❤️
Nice 👌👌👌👌
वा, फारच छान!!!
Baap lekichi maya , khup mast mandalit , surekh
खूप छान
Mast 👌👌👌😊
Mastaach..
सुंदर
Mast katha
कथा वाचताना नकळत डोळे पाणावले.
लेक बापाची जास्त लाडकी असते.
खूप सुंदर कथा.
Phar chan. Goshta sampe paryant jivala ghor lagla hota