मावशी….
अनेक महिन्यांनी 3 दिवस रजा टाकली. दिवाळीच्या सुट्टीला जोडून. मूळ प्लॅन कोकणात कुलदैवताचे दर्शन आणि पर्यटन असा ठरला होता. त्या दृष्टीने तयारीही केली होती. पण कोकणात राहणाऱ्या मित्राने “रस्ते खराब आहेत. गाडी आणि स्वतःची हाडं खिळखिळी करायची हौस असेल तर ये!” असा स्पष्ट निरोप धाडल्यावर मला तशी हौस नसल्याने तो प्लान बाद झाला. तोवर गोव्याची रिटर्न तिकिटे प्रत्येकी साधारण 12000 झाली असल्याने तीन दिवसांसाठी “its not worth it” म्हणत गोवा बाद झाला. हक्काच्या महाबळेश्वरला अनेकजण हक्क बजावायला येण्याची शक्यता गृहीत धरून गर्दी नको म्हणून त्याच्याही नावावर फुली मारली. शेवटी बायको आणि मुलीची अनेक दिवसांपासूनची ईच्छा असलेल्या पुण्याला जायचा बेत ठरला.
कधीच ट्रॅव्हल कंपनी बरोबर ग्रुप टूर न करणारे आम्ही प्रत्येक टूर स्वतः प्लान करतो, टूर मध्ये त्या त्या शहरात, गावात नवे मित्र जोडतो. बहुतेक ट्रिप्स समविचारी मित्रमैत्रिणींना बरोबर घेऊन एकत्र करतो. तसेच स्थानिक लोकांशी संवाद साधून लोकल फ्लेवर अनुभवायचा प्रयत्न करतो. पुण्यात तर प्रश्नच नव्हता. तीनही दिवसांचा भरगच्च कार्यक्रम ठरला. पहिल्या दिवशी आम्ही तिघांनी शनिवार वाडा पाहिला. पुणेकरांना जातायेता रोज दिसणारी ती वास्तू इतिहास शिकणाऱ्या माझ्या लेकीला नवीन होती. शनिवार वाड्याचा प्रचंड बलदंड दरवाजा पेशव्यांच्या शक्तिशाली राजवटीचे प्रतीक आहे. आत शिरल्यावर पेशव्यांचा इतिहास आणि शनिवार वाड्याची माहिती देणारे अनेक फलक वाचून कन्या हरखून गेली. कालाय तस्मै नमः म्हणत पेशव्यांचा रेफरन्स म्हणून रणवीर सिंगचा बाजीराव कामी आला. पण तिथून झालेली इतिहासाची सुरुवात पानिपत, काका मला वाचवा म्हणत धावणारा नारायण राव इथपर्यंत त्या भग्न अवशेषात भूतकाळाचे चित्र उभे करून गेली. आम्ही आमच्या सिमीत ज्ञानाच्या जोरावर पेशव्यांचा वैभवशाली इतिहास आणि शनिवार वाड्यातील काही इमारती कन्येच्या विस्फारलेल्या कुतुहलाने ओसांडणाऱ्या डोळ्यांसमोर जिवंत करायचा प्रयत्न केला! मग तुळशी बागेत फिरून पूना गेस्ट हाऊसला उशीरा पोहोचल्याने “बंद” ची पाटी बघून एका फारश्या प्रसिद्ध नसलेल्या हॉटेलात जेवून आम्ही टेकडीकडे निघालो.
मुंबईतील आमच्या आवडत्या नॅशनल पार्कशी साधर्म्य असलेली पण पुण्यासारखेच स्वतःचे वेगळेपण जपणारी ती टुमदार टेकडी एक झकास जागा आहे. हिरव्यागार झाडांनी अच्छादलेल्या अनेक इवल्याश्या पायवाटा. त्यावर चालणारे सर्व वयोगटातील हेल्थ कॉन्शस तसेच हौशी पुणेकर. टेकडीच्या मधोमध असणारे भेटीचे, विश्रांतीचे किंवा व्यायामाचे प्रसन्न पठार, टेकडीवर असलेला मोरांचा वावर, क्वचित होणारे मोरांचे विलोभनीय दर्शन, पलीकडे असलेली आता बंद झालेल्या खाणीची दरी, तिच्या कडेने असलेली चिंचोळी पायवाट, जवळच असलेल्या विसाव्याच्या भिंती आणि समोर मावळत असलेले लालबुंद सूर्यबिंब! फक्त अनुभवण्यासारखा अनुभव! त्यानंतर मित्र मैत्रिणींबरोबर हास्यविनोद करत डिनर आणि मग जेएम रोडवर आईस्क्रिमच्या भैरवीने मित्रमैत्रिणींच्या सहवासात संपलेला पहिला दिवस!
नवा दिवस, नवे मित्रमैत्रिणी, नवीन स्थलदर्शन! आज सिंहगडावर स्वारी! सकाळी लवकर उठून तयार झालेल्या पुणेकर मित्रमैत्रिणींना अर्धा तास वाट पाहायला लावून आम्ही आळशी मुंबईकर भेटलो. दोन्ही गाड्या गडाच्या पायथ्याशी आल्यावर बारीक नाश्ता करून वर गेलो. गाड्या पार्क करून गड चढायला सुरुवात केली. वाटेत बायकोने अचानक कैऱ्या, आवळे विकत घेऊन खायला सुरुवात केल्यावर माझ्या हृदयाचे ठोके अचानक वाढले. पण इतर मैत्रिणीही त्यावर तुटून पडलेल्या दिसल्यावर बायका आंबट चिंबट कधीही खाऊ शकतात. त्यासाठी ठरावीक परीस्थिती असण्याची आवश्यकता नाही हे लक्षात येऊन माझा प्लस रेट नॉर्मल झाला. वर पोहोचून फेरफटका मारून, काही सुंदर फोटो काढून होईस्तीवर कांदा भाजी, ताक, बर्फाचा गोळा अश्या गोष्टींचा हास्यअविनोद आणि गप्पांच्या संगतीत फडशा पडला होता. मग शिवाजी महाराजांच्या जीवनावरील शिवसृष्टी नामक प्रदर्शन पाहून आम्ही निघालो. निघताना महाराजांनी त्यांच्या अस्तित्वाने, त्यांच्या दैवी शौर्याने, त्यांच्या जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांच्या साथीने हिंदवी स्वराज्य स्थापून केलेले उपकार आज तीनशे वर्षांनंतरही आम्हाला का आणि कसे उपकृत करत आहेत हे लक्षात येऊन डोळ्यात पाणी आणि उरात अभिमान भरून येऊन आम्ही आपोआप नतमस्तक झालो! त्या तेजस्वी पुरुषोत्तमाला, त्याच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या त्या किल्याला, तिथे रक्त सांडलेल्या पराक्रमी सिंह तानाजीला मुजरा करून मनात खूप अभिमान घेऊन आम्ही खाली उतरलो. खाली पिठलं भाकरी, ठेचा, गुरगुट्या भात, मडक्यातील दही असे सुग्रास भोजन करून आम्ही गाड्या सोडल्या.
संध्याकाळी पु.ल. देशपांडे गार्डन नामक अतिशय सुंदर बाग बघितली. जपानी तज्ञानी रचना केलेली ती बाग उत्कृष्ट लँडस्केप, मनोहर झाडे, लहान लहान ओहोळ ह्यांनी बनली आहे. लहान मुले असलेल्या सर्वांनी आणि मनात लहान मूल असलेल्या प्रत्येकाने आवर्जून जावे अशी एक बाग. आमच्या कन्येच्या चेहऱ्यावर ओसांडणारा आनंद त्या बागेच्या सौंदर्याबद्दल बरंच काही सांगून जात होता. मग रात्री मित्रमैत्रिणींबरोबर आणखी एक धमाल डिनरने दिवसाची सांगता झाली.
तिसर्या दिवशी आमच्या मावशीच्या तळेगावातील अप्रतिम बंगल्याला भेट देऊन, तिचा प्रेमळ पाहुणचार स्वीकारून, लोणावळ्याच्या वॅक्स म्युझियमला भेट देऊन आम्ही मुंबईकडे निघालो. एक्सप्रेसवे वर गाडीचा स्पीडोमिटर ज्या जोमाने धावत होत्या त्याच जोमाने आम्हा तिघांची मने गेल्या तीन दिवसातील आठवणीत रमत होती. शरीराने मुंबईकडे निघालेले आम्ही मनाने पुण्यात अडकलो होतो. पुण्यात अडकायचं कारण? आम्ही पाहिलेली विविध स्थळे? अर्थात. पण स्थल दर्शन प्रत्येक ट्रीपमध्ये होतच असत. मग ह्या ट्रिपमध्ये असं काय होतं की इतर ट्रिपमध्ये घराची आस लागलेलं मन मागेच राहिलं होतं?
पूर्वी मी जिथे पुणेकर आणि मुंबईकर एकमेकांना टोमणे मारतात अश्या एका फेसबुक समूहावर होतो. पुणे आणि पुणेकरांना यथेच्छ शिव्या घातल्या. टिंगल केली. त्यांनी घातलेल्या शिव्या ऐकल्या. मग पुणेरी पाट्या, पुणेकरांचा टोकाचा पार्टिक्युलरपणा, पुणेरी बाणा आणि पुण्याच्या थट्टेचा इतर जो जो विषय मिळाला त्यात सहभागी झालो. मग कामामुळे पुण्यात माझ्या ट्रिप्स वाढल्या. विशेषतः फेसबुकमुळे अनेक पुणेकर संपर्कात आले. काही जणांशी सूर जुळले. संपर्कातून पुणे आणि पुणेकर समजत गेले, उमजत गेले, आवडत गेले. माझ्या ह्या तीन दिवसांच्या पुणे ट्रिपमध्ये मला आणि माझ्या कुटुंबियांना प्रेम, आपुलकी, आदरातिथ्य ह्याबरोबर आपला बहुमूल्य वेळ देणारे माझे मित्रमैत्रिणी कोण होते? पुणेकर होते! आपल्या गुलाबी थंडीच्या कवेत आम्हाला घेणारे उबदार शहर कोणते होते? पुणे होते! पुणे आणि पुणेकर हे पुण्यातील सुप्रसिद्ध मस्तानी सारखे आहेत. ते अनुभवल्याशिवाय त्याची गोडी कळत नाही. एकदा गोडी लागली की ती नशा सुटत नाही. पुनःपुन्हा अनुभवावीशी वाटते. पुणेकर फालतू माज सहन करत नाहीत. त्यांना त्याची गरजही नाही. पण तुम्ही प्रेम, आदर, आपुलकी दाखवलीत तर पुण्याचा अनुभव नसलेल्या कमनशिबी लोकांनी लावलेली खडूस, आत्मकेंदी वगैरे विशेषणे खोटी ठरवत पुणेकर दहापट प्रेम देतात हा माझा अनुभव आहे.
आपल्या साथीने आमचे तीन दिवस संस्मरणीय बनवणाऱ्या एकाही पुणेकर मित्रमैत्रिणीचे मी आभार मानणार नाही. कारण ते म्हणतील “आम्ही पुणेकर आहोतच भारी!” मी इतकेच म्हणीन की माझ्या पुणेकर मित्रमैत्रिणींनो तुम्ही खरच भारी आहात कारण तुम्ही पुणेकर आहात! आहात तसेच राहा! मला तुमचा मित्र असल्याचा अभिमान आणि आनंद आहे.
मुंबई माझी जन्मभूमी, कर्मभूमी, मातृभूमी…माझी आई आहे. पण तीन तासांवर माझ्या मावस मित्रमैत्रिणी असलेली पुणे नामक मावशी माझे दुसरे हक्काचे, प्रेमाचे, आपुलकीचे ठिकाण आहे. मावशी तुझ्या प्रेमाला तोड नाही. तू आहेस तशीच राहा. ज्यांना कळशील त्यांना प्रेम दे. ज्यांना कळणार नाहीस त्यांचे नशीब खराब असे समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष कर!!!- मंदार जोग
- व्हॅलेंटाईन डे- सर्व भाग (१ ते ६) एकत्र - February 18, 2024
- वारसा (भाग ७) - November 27, 2023
- वारसा (भाग ६) - October 30, 2023
very true
मस्त
खरच मावशी ती मावशी पुण्याला मावशी ची उपमा भारीच .
Punekarch
Mast.pune aahech tase.
Mast